हळद आणि हडळ - ६

Submitted by सुर्या--- on 24 July, 2021 - 02:13

हळद आणि हडळ - ६

सावलीने अमृताच्या डोक्यावर ताबा मिळवण्याबरोबरच घरांमध्येही प्रवेश मिळवला. बंद पडलेल्या घरात सावली सर्वच गोष्टींपासून वंचित होती. भरलेलं घर, रंगीबिरंगी भिंती, टीव्ही, लुकलुकणारे दिवे, फिरणारे पंखे, स्वयंपाक घरातील स्वादिष्ट पक्वानें आणि ते बनवताना पसरणारे सुगंध, माणसांची ये जा, गप्पा गोष्टी.

(काही माणसं वेगवेगळ्या आयामात असूनही नकळत कोणत्यातरी मार्गावर जोडली जातात आणि त्यामुळेच अश्या वेगळ्या आयामात असूनही काही लोकांना भूत दिसण्याचे प्रकार होतात. माणसाची प्रत्येक कृती त्याच्या पुढे घडणाऱ्या घटनांसाठी वेगवेगळे रस्ते/दुवा जोडत असते. अर्थातच हे दुवे आधीच एकमेकांशी जोडलेले असतात. या रस्त्याने गेलो तर अमुक ठिकाणी पोहोचू त्याप्रमाणेच. उदा. अमृता शेतात गेलीच नसती तर वेगळं काही घडलं असत. अमृताच घर येथे नसत तर सावलीचा आणि तिचा संपर्कच झाला नसता. सामान्य माणसाचं उदाहरण घ्यायच झालं तर एखादी व्यक्ती ऑफिस ला जाताना रिक्षाने न जाता बस ने अथवा ट्रैन ने गेली तर त्या वेळात, प्रवासात आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांचा क्रम वेगळा असू शकतो.)

इथेही सावली कोणत्यातरी सावजासाठी प्रयत्न करत होती आणि तिच्या हाती अमृता लागली, आणि पुढे तिच्या घरातील वातावरणच बदलून गेलं.

बराच वेळ अमृता स्वतःशीच म्हणजेच सावलीशी गप्पा मारत होती. कंटाळल्यानंतर ती टीव्ही पाहायला आली. अवंती टीव्ही वर गाणी पाहण्यात मग्न झालेली. सावलीला टीव्ही पाहण्याचा मोह झाला. तिनेच टीव्ही चे चॅनेल बदलले. अवंती अमृतावर चिडली. "तायडे, काय ग तू, किती मस्त गाणं लागलं होत, कश्याला बदललस?" अवंती म्हणाली.

"अगं, मी कुठे बदललं?, मी जस्ट आले इथे, रिमोट ला मी हात पण नाही लावला" अमृता म्हणाली.

"बस्स हा, नको मला पकवू" अवंती म्हणाली.

"उफ्फ , आता काय बोलायचं हिला" कपाळावर हात मारत अमृता स्वतःशीच पुटपुटू लागली.

दुपारची जेवणाची वेळ होती. सर्व जण टीव्ही पाहता पाहता जेवत होतें. आज श्रीखंड पुरीचा बेत होता. अमृताने पुरी श्रीखंड घेतलं आणि अवंती आणि आजीच्या मध्ये जाऊन बसली. अमृता आणि अवंती टीव्ही पाहता पाहता जेवण्यात मग्न होते. अवंतीच्या ताटातील पुऱ्या सावलीने अमृताच्या ताटामध्ये ठेवल्या. आजीची श्रीखंडाची वाटी अमृताच्या मागे लपवली.

अवंतीचं ताटामध्ये लक्ष गेल्यावर ती अमृतावर ओरडली. "काय गं तायडे, पुऱ्या हव्यात तर तिकडून घे ना, माझ्या ताटातून का घेतेस" अवंती म्हणाली.

"अगं पणं मी कुठे काय केलाय" अमृता म्हणाली.

"हो कां? मग तुझ्याकडे एवढ्या पुऱ्या कुठून आल्या?" अवंती म्हणाली.

ताटात पाहून अमृतालाही काही समजत नव्हते, असं कसं झालं. तिकडून आजीसुद्धा तिची वाटी शोधू लागली. अवंतीने वळून पहिले. "ती बघ, तायडीने लपवून ठेवली तिच्यामागे" अवंती म्हणाली.

आजीने हसण्यावर घालवले. "किती गं मस्ती करता" आजी म्हणाली.

"करू द्या मस्ती, आता थोडे दिवस राहिलेत, लग्नानंतर नाही कोण येणार तुमची वाटी लपवायला" अमृताची आई म्हणाली.

सर्व जण हसत होते. अमृता मात्र चिंताग्रस्त झाली. आपल्याबरोबर असं विचित्र का होतंय, तिला काहीच कळत नव्हते. जेवण आटोपून ती तिच्या खोलीत गेली. दरवाज्या बंद करून ती पुन्हा स्वतःशीच बोलू लागली. तिला सर्व जण तिच्या विरोधात वाटू लागले. तिच्या डोक्यात विचारांचा काहूर माजला. प्रत्येकाने तिलाच दोष देणे, तिच्या मनात गोंधळ घालू लागले. आपल्यावर आरोप करतात, आपल्याला खोटे पाडतात, आपली मस्करी करतात, यांची चांगलीच जिरवते असा तिने निर्धार केला.

सावलीने अमृताच्या एकाकीपणाचा उपयोग करून घेतला. अमृताच्या खोलीतील सर्व सामानसुमान, सजावट तिने तिच्या मर्जीप्रमाणे करून घेतली. आता सावलीला तिच्या घरातील म्हणजेच तारासाहेबांच्या बंगल्यातील तिच्या स्वतःच्या खोलीत राहण्यासारखाच समाधान वाटू लागला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@हाडळीचा आशिक
धन्यवाद. पुढील भाग आणखी मोठे बनवतो. वाचत रहा.