सांजवेळ--( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 17 July, 2021 - 10:44

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती वेगवेगळे अनुभव मिळतात. जीवन जगणे आणि तेही सकारात्मकतेने, ही एक फार मोठी कसरत आहे. हे सगळे माहीत असूनही सकारात्मकता जोपासणे फार अवघड आणि जिकिरेचे काम आहे. जीवन जरी देवाने दिलेले असले तरीही त्याला स्वप्रयत्ने घडवायचे असते.
बालपण जरी गरिबीत गेले किंवा कष्टमय असले तरीही ते आजही हिरवेगार असते. त्याच्या आठवणी नेहमीच तजेला देतात. तारुण्याबद्दल काय आणि किती बोलावे! हा धुंद फुंद सुवर्णकाळ असतो. यावेळी ग्रिष्मही मधुमास वाटतो. श्रावणाची रिमझिम बारा महिने असते. पण खरा कस लागतो तो आयुष्याच्या सांजवेळी. भविष्य अंधारमय. गत आयुष्यातील आठवणारे सुवर्ण क्षणच आज काचतात. अजून एक गंमत आहे. बालपण येते आणि भुर्रकन उडून जाते. तारुण्य लुटता लुटता कधी संपते हे कळतही नाही. पण वार्धक्य संपता संपत नाही. ते शेवटपर्यंत साथ सोडत नाही ही खरी शोकांतिका आहे.
अशा या वार्धक्या विषयी मी खूप विचार मंथन केलेले आहे आणि शेवटी या निष्कर्षाला पोहंचलो की हे भोगणे अपरिहार्य आहे. मी फारच नकारात्मक लिखाण करतोय असे समजू नये. हे वार्धक्य प्रयत्न करून सुसह्य निश्चितच बनवता येते आणि तसे प्रयत्न प्रत्येकाने अपापल्या परीने करायला हवेत.
मला जे भेसूर वार्धक्याचे दर्शन समाजातून झाले ते ह्रदयद्रावक असेच आहे. वृध्दांची होणारी घुसमट, हेळसांड, भयाण एकलेपण, मुलांचे याच वेळी दूर जाणे हे मी जागोजागी प्रत्यक्ष पाहिले आहे. याचमुळे कदाचित या विषयावर माझे भरपूर लिखाण झाले आहे. हे विषय मी खूप आत्मियतेने हाताळतो. पुष्कळ कविता, गझला या विषयावर लिहून झाल्या आहेत.
एकदा सहजच मनात विचार आला की माणसाला जे वास्तव छळते ते प्राण्यांना आणि वनस्पतींना पण छळत असेल का? नक्कीच छळत असावे पण आपणाला त्यांची भाषा कळत नसल्याने आपण तसे अनभिज्ञ आहोत. या विचारात मग्न असताना मी एका गझलेद्वारे वृक्षाचे दु:ख चित्रित करण्याचा प्रय्त्न केला आहे. ही गझल मी खाली पेश करतोय. ही गझल वाचताना वाचकांच्या लक्षात येईल की झाडाचे दु:ख माणसांपेक्षा फारसे वेगळे नाही. हे सांजवेळचे रुदन आहे.

एकला दारी उभा मी

एकला दारी उभा मी वृक्ष, फांद्या वाळलेल्या
वेदना गत आठवांच्या अंतरी घोंगावलेल्या

कैक पक्षांचा, पिलांचा राबता तो सांजवेळी!
आजही कानात घुमती किलबिली त्या ऐकलेल्या

गात होत्या कोकिळाही आड पानांच्या दडूनी
विव्हळते मन आठवूनी मैफिली त्या रंगलेल्या

ऊन रखरख झेलले मी सावली देण्या जगाला
त्या जगा कळती न माझ्या भावना हेलावलेल्या

पान नाही फूल नाही मी कफल्लक आज आहे
सावल्या सूर्यास्त होता पाहिल्या ना थांबलेल्या

भैरवी रागात गातो गीत अस्ताचे सुखाने
मज समाधी, ऐकताना मीच ताना छेडलेल्या

वाटते माझ्या असावी रात्र काळोखी उशाला
ना दिसो जगतास माझ्या पापण्या ओलावलेल्या

वाटते काहूर यावे उन्मळुन खाली पडावे
बाद मृत्यूच्या बघू दे वेदना मम संपलेल्या

पूस ते "निशिकांत" डोळे ईश पाठीशी तुझ्या रे !
"श्री" कसा विसरेल वेड्या चार दुर्वा वाहिलेल्या

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. न. ९८९०७ ९९०२३
गझलेचे वृत्त--व्योमगंगा
लगावली--गालगागा X ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users