रिते चांदणे..

Submitted by _आदित्य_ on 16 July, 2021 - 05:00

निराशेत विझल्या सुखाच्या दिव्यांना
कुठे ठाव असते पून्हा तेवणे?
गावापुनी दूर शहरात वसल्या
मुक्या पाखरांचे मुके बोलणे !
झटकून द्यावी छलावा म्हणोनी
तरीही टळेना अशी ही पीडा !
आभा वितळते त्वचा होत पाणी..
कसा घाव ! आत्म्यास गेला तडा !
आता बरे चालणे शांत आणिक
दुःखांवरी भाकऱ्या शेकणे !
निराशेत विझल्या सुखाच्या दिव्यांना
कुठे ठाव असते पून्हा तेवणे?

अतृप्त झाडांतुनी चांदव्याचा
निळा तृष्णला गंध येतो कसा?
तिमिरी बुडाल्या हिवाळी घनांचेच
अलगूज बळकावतो आरसा !
स्वच्छंद गोपाळ कसतो पुरावे
निकामी हवेच्या प्रवाहातले !
हलकेच वक्षी जळाच्या गुलाबी
धरेतून का रंग घनदाटले?
सांगा बरे वाटते का लतांनो
कुसुंबी तरुंचे खरे वागणे?
निराशेत विझल्या सुखाच्या दिव्यांना
कुठे ठाव असते पून्हा तेवणे?

निराकार होता कुळातील बाळे,
सख्यांची जुनी मंदिरे पेटली !
काळी मकानेच गेली लयाला
सुरीली पुराणे नवी वाटली !
प्रणवातले विश्वव्यापी तराणे
मुठीतून माझ्या निसटले बये !
अंधार खेळे जिथे सावलीशी
तिथे काव्य रचण्यास जाऊ नये !
शब्दात नसतेच गाणे फुलांचे
सुगंधात असते रिते चांदणे !
निराशेत विझल्या सुखाच्या दिव्यांना
कुठे ठाव असते पून्हा तेवणे?

... आदित्य

Group content visibility: 
Use group defaults