कळ्या अन फुले..

Submitted by _आदित्य_ on 16 July, 2021 - 04:58

जसे आर्त पाणी तसा जीव होता
कळीने फुलाच्या उरी ओतला !
सुगंधी घराच्या गवाक्षातला का
फुलाने परी चांदवा झाकला?

कळ्यांनी फुलांना फुलांनी कळ्यांना
असे का हळू बोल लावायचे?
बहरून कोमेजल्या सौम्य शरीरात
काटे पुन्हा रुतवुनी घ्यायचे?

अंती खुळी आंधळी माणसे ही
निसर्गातला गोडवा चोरती !
सृष्टीतला देव मारून त्याची
जिवापोरकी मंदिरे बांधती?

शोभेस उरल्या कळ्या अन फुलांचे
कसे होत आहेत अपमान हे?
आदित्य अवघा सुगंधात फुलतो
कळ्या अन फुलांचेच वरदान हे !

.. आदित्य

Group content visibility: 
Use group defaults