दवबिंदू होऊन काही क्षण फुलांत सजले होते

Submitted by द्वैत on 9 July, 2021 - 11:31

दवबिंदू होऊन काही
क्षण फुलांत सजले होते
मी ऊन कोवळे झालो
त्या बागेतून जाताना

मज गंध फुलांचा जडला
मी उनाड अवखळ वारा
दाराशी येऊन थिजलो
रंगात रंग ढळताना

मी नभास देऊ केले
मग माझे सागरबाहु
नभ झेलून घेईल आता
तारा तारा तुटताना

हृदयातून गहिवरलेल्या
क्षितिजाला सांगा कोणी
मी तसा एकटा नसतो
ह्या काठावर गाताना

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users