दिलिप कुमार - ०४

Submitted by Theurbannomad on 8 July, 2021 - 11:53

दिलीपकुमार यांनी पुनरागम केलं ते मनोज कुमार या त्यांच्याच ' कार्बन कॉपी ' च्या ' क्रांती ' द्वारे. एव्हाना क्षितिजावर राजेश खन्ना नामक चॉकलेट हिरो अवतरला होता आणि त्याने आसमंत व्यापून टाकलेला होता. त्याच्याच आजूबाजूला होते शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र असे तगडे ' हिरो '. नाही म्हणायला संजीव कुमार होता, जो अभिनयाच्या बाबतीत दिलीप कुमारांचा वारसा चालवण्याच्या तोडीचा होता. अमिताभ अजून 'बच्चन' व्हायचा होता आणि ' सेकंड लीड ' म्हणून शशी कपूरसारखे देखणे नट आपली जागा निर्माण करत होते. क्रांती आला १९८१ साली....त्याआधीचा १९७६ सालचा ' बैराग ' अभिनयाच्या बाबतीत चांगला असला तरी आपटलेला होता.

क्रांती तद्दन फिल्मी आणि कमालीचा आचरट प्रकार होता. देशप्रेमाच्या नावाखाली मनोज कुमारने त्यात वाट्टेल तो मसाला भरून त्या चित्रपटाला हास्यास्पद पातळीवर नेलेलं होतं. त्यात दिलीप कुमार , त्यांची कार्बन कॉपी ( मनोज कुमार ) , शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, प्रेम चोप्रा, परवीन बाबी, हेमा मालिनी असे झाडून गोळा केलेले सगळे जण होते. बोटीवर पावसात भिजत गाणारी हेमा मालिनी, तुरुंगात चणे विकायला जायच्या बहाण्याने गाणी म्हणत ( काय कल्पनाशक्ती आहे....सलाम ! ) तिथे कैद असलेल्या साथीदारांना सोडवणारे क्रांतिकारक, तेव्हाच्या चित्रपटांमध्ये कायम ' विदेशी ' भूमिकेत दिसणारा टॉम अल्टर आणि त्याचे भयंकर संवाद या सगळ्यानंतरही ' क्रांती ' बरा चालला. दिलीप कुमारसारख्या अभिनयसम्राटाला अशा केविलवाण्या भूमिकेत बघणं कठीण असलं, तरी या चित्रपटानंतर त्यांना अतिशय चांगल्या भूमिका मिळाल्या.

क्रांती नंतर त्यांनी केलेली एक अविस्मरणीय भूमिका म्हणजे ' विधाता '. राज कपूर नंतरचे शोमन सुभाष घाई यांचा तो सुरुवातीचा काळ. याही चित्रपटात दिलीपसाहेबांबरोबर होते त्यांच्यासारखेच चरित्र भूमिकांकडे वळलेले शम्मी कपूर, मध्यम वयाचा संजीव कुमार आणि नवखा, अस्पष्ट संवादफेक असलेला आणि मक्ख चेहऱ्याचा तरुण संजय दत्त. ' अबूबा ' चा चित्रपटभर ' अवूबा ' असा उच्चार करणाऱ्या संजूला संजीव कुमारने पार्टीमध्ये झापलं होतं, असा किस्साही कुठेतरी वाचलेला मला आठवतो....या चित्रपटात खरे नायक पुन्हा एकदा ठरले दिलीपसाहेब. त्यांनी आणि संजीव कुमारने अक्खा चित्रपट व्यापून टाकला. या चित्रपटात मोजक्याच प्रसंगांमध्ये दिलीपसाहेबांची आणि श्रीराम लागूंचीही जुगलबंदी दिसली. या सगळ्याला चार चांद लावले अमरीश पुरी यांच्या सणसणीत खलनायकी अभिनयाने. रूढार्थाने नायक - नायिका असलेले संजू - पद्मिनी कोल्हापुरे चित्रपटभर कुठे जाणवलेच नाहीत...

याच चित्रपटाच्या यशानंतर दिलीप कुमारांची दुसरी इनिंग्स बहरली. त्यापाठोपाठ आलेल्या ' शक्ती ' मध्ये बच्चन - दिलीपकुमार ही जोडी समोरासमोर आली. दिलीप कुमारांचा रोल सशक्त होता, त्यांना केंद्रस्थानी ठेवून कथा लिहिली गेली होती आणि त्यांना त्यांच्या ' होम पिच ' वर खेळायला दिग्दर्शक रमेश सिप्पीने पूर्ण मोकळीक दिली होती....पण तरीही दिलीपसाहेबांसमोर अमिताभने कमालीचा ' अंडरप्ले ' करून आपल्या अभिनयाची दखल समस्त प्रेक्षकवर्गाला घ्यायला लावली. अभिनयाच्या बाबतीत दिलीप कुमारांना आदर्श मानणाऱ्या अमिताभने त्यांच्या बरोबरीने फिल्मफेयरचं ' नॉमिनेशन ' मिळवून दाखवलं. स्मिता पाटीलसारखी सणसणीत अभिनेत्री या दोहोंपुढे खंबीर उभी राहिली....पण....नव्या दमाच्या अभिनेत्यांपुढेही दिलीपसाहेब उभे राहिले आणि त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवून दाखवलं. इथेही अमरीश पुरी होतेच....

हा काळ ' मल्टिपल स्टार कास्ट ' चा असल्याचं त्यांनी ओळखलं असावं, कारण त्यांचे या टप्प्यातले सगळेच चित्रपट त्याच प्रकारचे होते. ' मशाल ' मध्ये अनिल कपूर ( आणि पुन्हा एकदा अमरीश पुरी ) , कर्मा मध्ये खुद्द नासिरजी, जॅकी , अनिल कपूर, नूतन आणि अनुपम खेर , सौदागरमध्ये राज कुमार ( १९५९ सालच्या पैगाम मध्ये हे दोघे एकत्र होते, पण तेव्हा राज कुमार चाचपडत होता आणि दिलीप कुमार ' द दिलीप कुमार ' होता...) , अनुपम खेर, जॅकी श्रॉफ ( आणि अमरीश पुरी ) असे मोहोरे आजूबाजूला असूनही त्यांनी आपली छाप पाडलीच...पण आता त्यांच्या अभिनयात एक प्रकारचा एकसुरीपणा आलेला होता. हेल काढत संवाद खेचायची त्यांची शैली आता थोडीशी असह्य वाटायला लागलेली होती. कधी काळी जो संयत अंडरप्ले करून त्यांनी भल्या भल्यांना घाम फोडला होता, तोच अंडरप्ले आता नाहीसा होत चाललेला होता. लोकांना ' बच्चन ' गवसलेला होताच, पण त्यांच्या बरोबरीने समांतर सिनेमातून अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन आलेले नासिरजी, ओम पुरी, पंकज कपूर, अन्नू कपूर, अमोल पालेकर असे चाकोरीबाहेरचे नट भारतीय सिनेमाला अभिनय काय चीज आहे याची नव्याने ओळख करून देत होते. दिलीपकुमार अशा चित्रपटांमध्ये काय करून गेले असते, असं नेहेमी राहून राहून वाटतं, पण तो योग काही जुळून आला नाही.

१९९८ सालच्या ' किला ' या अतिशय सुमार दर्जाच्या चित्रपटाने या अभिनयोत्तमाच्या कारकिर्दीची सांगता झाली. त्याआधी स्वतःच्याच दिग्दर्शनात होऊ घातलेल्या ' कलिंगा ' चित्रपटाची घोषणा करून आणि पुढे तो चित्रपट नको तितका लांबत गेल्याने डब्यात घालून दिलीप कुमारने नको तिथे हात पोळून घेतले होतेच....चाहत्यांनाही आपल्या आवडत्या नटाची अधोगती आवडत नव्हती....पण नशिबाने दिलीप कुमारांचा राजेश खन्ना झाला नाही. योग्य त्या वेळी त्यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय घेऊन आपला मान राखला.

१९९१ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या कार्याचा सरकारने योग्य तो सन्मान केला. १९९४ साली फिल्मफेयर लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळवून चित्रपट सृष्टीने त्यांचा गौरव केला. याच वर्षी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आणि त्यांच्या झळाळत्या कारकिर्दीला सुयोग्य सन्मान मिळाला. तब्बल आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेयर त्यांना मिळाला होताच. पुढे अतिशय खंगलेल्या अवस्थेत त्यांना २०१५ साली सरकारने पद्मविभूषण जाहीर केला, तेव्हा मात्र त्यांचा पुरस्कार घेतानाच फोटो बघून चाहते हळहळले. जवळ जवळ विस्मृती झालेल्या अवस्थेतले दिलीप कुमार बसलेल्या अवस्थेत शून्यात बघत होते, पण त्यांच्या बाजूला उभ्या होत्या त्यांच्या भक्कम आधार असलेल्या सायराजी.

दिलीप कुमार यांचे काही किस्से यापुढच्या भागात देऊन या लेखमालेची सांगता करण्याचा मानस आहे. मोहम्मद युसूफ खान म्हणून आत्ताच्या पाकिस्तानातल्या पेशावर येथे जन्माला आलेल्या या पठाण मुलाचा ' दिलीप कुमार ' होणं, त्याच्या नावावर ' ट्रॅजेडी किंग ' पासून ' फर्स्ट मेथड ऍक्टर ऑफ इंडियन सिनेमा ' सारखी विशेषणं लागणं, त्यांचं रंगभूमीवरचं प्रेम, भूमिकेच्या तयारीसाठी स्वतःला झोकून देण्याच्या सवयीमुळे देवदासनंतर त्यांना नैराश्याचा करावा लागलेला सामना अशा असंख्य गोष्टींमुळे या नटसम्राटाची कारकीर्द भारतीय चित्रपटसृष्टीचा मैलाचा दगड होऊन राहिलेली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळाचा गोंधळ होतोय का ? क्रांतीच्या वेळी राजेश खन्नाचा जमाना संपून अमिताभचा सूर्य मध्यान्ही तळपत होता. दिलीपकुमार यांनी मुघल ए आझम नंतर नैराश्याच्या समस्येने मोठी गॅप घेतली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी मग हलक्या फुलक्या सिनेमातून पुनरागमन केले. हे त्यांचे पहिले कम बॅक. बैराग दुसरे आणि क्रांती पासून वयाला साजेल असे तिसरे पुनरागमन.

अंडरप्ले म्हणजे काय ?
अमिताभ बच्चन आणि अंडरप्ले, अंडरप्लेने घाम फोडणे हे समजले नाही. सुरूवातीच्या काळात थिएट्रिकल अभिनयाचा बोलबाला असताना दिलीपसाब यांचा अभिनय अंडरप्ले असेल. त्याला मेथड अ‍ॅक्टिंग म्हणत असतील कदाचित.
बलराज साहनी, रैना नावाचा एक अभिनेता ही अंडरप्लेची उदाहरणे. कदाचित माझी समज चुकीची असेल.

@ शांत माणूस

अंडरप्ले हा शब्द वापरात आला अभिनयाच्या एका विशिष्ट शैलीमुळे. कथानकात नक्की कोण ' प्रोटॅगॉनिस्ट ' आहे ( हिरो नव्हे, प्रोटॅगॉनिस्ट ) हे समजून घेऊन त्या पात्राच्या अनुषंगाने बाकीच्या पात्रांनी आपला अभिनय संयत करणे आणि कुठेही उगाच आक्रस्ताळेपणा, अंगविक्षेप, अचकट विचकट चाळे न करता जितका हवा तितकाच अभिनय करणे हे अंडरप्लेमध्ये अपेक्षित असतं. या पद्धतीच्या अभिनयाचा परिणाम असा असतो, की नट नव्हे, तर अभिनय बघणाऱ्याच्या लक्षात राहतो आणि काही काळानंतर त्याच्या अभिनयामुळे त्याला ओळख मिळते.

या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर होतो, जे जीवाचा आटापिटा करून स्वतःला ' फोकस ' मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. नीट बघितलं तर अमिताभ बच्चनने आपल्या भरदार आवाजाचा टोन संयत ठेवून दिलीप कुमारांच्या मूळच्या आवाजाच्या पट्टीला शोभेल अशा पद्धतीने संवादफेक केलेली आहे. दिवार किंवा हम सारख्या चित्रपटांमध्ये त्याने आपला खरा उंच पट्टीतला आवाज वापरलाय, त्याच्या तुलनेत शक्तीमध्ये त्याने बराच संयत आवाज लावलाय.

आजचं उदाहरण द्यायचं झालं तर पंकज त्रिपाठी असाच परिणामकारक अंडरप्ले करतो. हीच पद्धत वापरून इरफान खान, नासिरजी, पंकज कपूर चित्रपटांमध्ये आपल्या पात्राला चित्रपटात जिवंत करतात. मराठीत माझ्या मते सर्वोत्कृष्ट अंडरप्ले करणारे दोघेच - डॉक्टर लागू आणि यशवंत दत्त.

राज कपूरने अंदाजमध्ये ( आणि इतरही चित्रपटांमध्ये ) गरज नसताना चार्लि चॅप्लिनचे अंगविक्षेप करायचा प्रयत्न केला आणि त्याचा अभिनय तोकडा पडला. आदमी मध्ये मनोज कुमारने आपल्या कुवतीनुसार दिलीपसमोर उभा राहायचा प्रयत्न केला, पण त्याच्यातला awkwardness स्पष्ट दिसून येतो. पैगाममध्ये राज कुमारचा ताठर आणि नुसता आवाजी अभिनय ' style ' म्हणून चांगला असला तरी नाटकी वाटतो. म्हणूनच संजीव कुमार, अमिताभ बच्चन, नूतन, वैजयंती माला, वहिदा रहमान, नर्गिस अशा तुल्यबळ आणि संयत अभिनेत्यांसमोरच दिलीप कुमार यांना खऱ्या अर्थाने ' चॅलेंज ' मिळताना दिसतं.

@ शांत माणूस

क्रांती च्या वेळी अमिताभ सुपरस्टार असला, तरी माझ्या मते तो ' द अमिताभ बच्चन ' झाला ' कुली ' च्या त्या अपघातानंतर. तेव्हा त्याच्यासारथी अक्खा देश प्रार्थना करत होता आणि त्यामुळे त्याच्या स्टारडमवर शिक्कामोर्तब झालं. पुढे अपयशाची चव चाखल्यानंतर त्याने दुसरी इनिंग्स ज्या प्रकारे खेळली, त्यानंतर त्याने सगळ्यांनाच झाकोळून टाकलं.

राजेश खन्ना ' स्वर्ग ' पर्यंत जोमात होता. जरी तो चॉकलेट हिरो रहिला नसला तरी त्याच्यासाठी गर्दी जमायची. त्याने माती खाल्ली स्वतःच्या मोठ्या ' इगो ' मुळे आणि शेवटी वफा, रियासत अशा अतिशय टुकार चित्रपटांमध्ये काम करून त्याने आपल्या पुण्याईचा अंत आपल्याच हाताने करून घेतला.

दीवार, शोले, डॉन ई. ७० च्या दशकातल्या मध्यापर्यंत अमिताभ 'अँग्री यंग मॅन' बच्चन झाला होता. क्रांती त्यामानाने बर्यापैकी नंतर आला. कुली वगैरे च्या वेळी अमिताभ करियर च्या peak वर होता.

लेख खूप छान आहेत. पण काही लोकांचा आदरापोटी आलेला बहुवचनी उल्लेख (दिलिपकुमार, नसीरुद्दीन शाह) आणि इतर समकालिन कलाकारांचे एकवचनी उल्लेख ह्यामुळे वाचताना अडखळायला होतं. सगळ्यांचा सरसकट एकवचनी उल्लेख चालू शकेल.

शक्तीमधे स्मिता पाटील चा रोल अगदीच नगण्य आहे.

क्रांती च्या वेळी अमिताभ सुपरस्टार असला, तरी माझ्या मते तो ' द अमिताभ बच्चन ' झाला ' कुली ' च्या त्या अपघातानंतर. तेव्हा त्याच्यासारथी अक्खा देश प्रार्थना करत होता आणि त्यामुळे त्याच्या स्टारडमवर शिक्कामोर्तब झालं. >>>> असं का वाटतंय की जन्माआधीच्या काळाचं हे तुटक आकलन असावं ? अमिताभचे चार पाच चित्रपट एकाच वेळी आल्याने तो त्याच वेळी सुपरस्टार झालेला होता. वन मॅन इंडस्ट्री, बिग बी असा उल्लेख होऊ लागला होता. ते चित्रपट म्हणजे जंजीर, दीवार, त्रिशूल, शोले आणि अमर अकबर अँथनी. त्याच वेळी परवरीश चं शूटींग देखील चालू होतं. पुढे लावारीस आणि शराबी सारखे तद्दन सुमार चित्रपट फक्त अमिताभच्या नावावर चालले. कुली खूप उशिरा आला. कुली, मर्द हे चित्रपट अमिताभचं नाव आणि जादू यावर तरले होते. पण त्याच्या अतिरेकामुळेच गंगा जमना सरस्वतीनंतर त्याच्या यशाला उतरती कळा लागली.

थोडं निवांत लिहा. क्रोनोलॉजी हाताशी ठेवा. थोडा अभ्यास करून लिहा. इतकेच. तुमच्या चुका काढणे हा हेतू नाही. ही लेखमालिका परफेक्ट व्हावी हाच हेतू आहे.
पुलेशु !

शामा पूर्ण पोस्ट अनुमोदन.. पण हे वाक्य सोडून -
पुढे लावारीस आणि शराबी सारखे तद्दन सुमार चित्रपट फक्त अमिताभच्या नावावर चालले
>> लावरीस येस... पण शराबी चा वेगळा फॅन क्लब आहे .. क्या डायलॉग क्या गाने...
मुझे नौलखा दिला रे अजूनही प्रत्येक बॉईज हॉस्टेल मध्ये वाजते... आणि पुढची 100 वर्षे वाजत राहील....

छान लेखमाला चालू आहे.
शांत माणूस यांचेही प्रतिसाद छान
च्रप्स @ शराबी +७८६ .. त्यातली गाणी संवाद तर छानच. पण त्यातील पुर्ण चित्रपटभर असलेले शराबी व्यक्तीचे बेअरींग, यासाठी अमिताभला एक चुम्मा.

एकदम झकास लिहीलयं. आई गेल्यावर मुलगा वडिलांना भेटायला येतो हा शक्तीतला सीन दिलीपकुमार व अमिताभ दोघांनी काय जिवंत केलाय.

<<<<<म्हणूनच संजीव कुमार, अमिताभ बच्चन, नूतन, वैजयंती माला, वहिदा रहमान, नर्गिस अशा तुल्यबळ आणि संयत अभिनेत्यांसमोरच दिलीप कुमार यांना खऱ्या अर्थाने ' चॅलेंज ' मिळताना दिसतं.>>>>> एकदम सही !

मला एकच सांगा, हा गृहस्थ , संजीव कुमार किंवा अँथनी क्विन किंवा रिचर्ड बर्टन किंवा श्रीराम लागूंच्या एवढा थोर होता का? ७०% तद्दन बाजारू चित्रपटात काम केलेला हा, उगीचच उदो उदो होतोय!!!

बाजारू चित्रपटात काम केले म्हणजे अभिनय बाजारू ठरतो का?

सर ॲंथनी क्वीन, सर रिचर्ड बर्टन, संजीव कुमार अगदी श्रीराम लागुंनी बाजारू चित्रपटात कामं नाही केली?

बाजारू हा शब्द कमर्शिअल या अर्थाने घेतेय मी तरी…

वाह! किती माहितीप्रचुर लेखमाला आहे. प्रतिसादातून सुद्धा रोचक माहिती मिळते आहे. हे सगळे सिनेमे पहायची इच्छा होत आहे.

क्रांती विषयी अगदी तंतोतंत खरे. तुटक तुटक पाहिलाय पण खरंच फारच बकवास चित्रपट. मनोजकुमार तसा सुदैवीच म्हणायचा. सुमधुर संगीत, सुंदर गाणी आणि तगडे सहकलाकार मिळाल्याने अनेक चित्रपट तरले त्याचे. नाहीतर क्रांती कोण बघितला असता? तगड्या स्टारकास्ट मुळे असेल म्हणा किंवा संगीतामुळे असेल पण क्रांती चालला मात्र. किंबहुना लोकांना त्याकाळात फार पर्याय पण नव्हते. म्हणूनही चालला असेल. जे काही असेल ते असेल. पण एक असे ऐकलेय कि इंदिरा गांधीनी तो पाहिला होता म्हणे. आणि टीका सुद्धा केली होती, "असे चणे खाऊन स्वातंत्र्य मिळाले असते तर दीडशे वर्षे लागली नसती" इत्यादी. खखोदेजा. हो पण गाणी खूपच छान आहेत. त्यातली जिंदगी कि न टूटे लडी... चित्रीकरण आचरट आहे जरूर. पण लताजी आणि नितीन मुकेशजी यांनी खूपच छान गायले आहे.

एक गोष्ट मला सतत वाटत आलीय आणि काल मधुमती पाहिल्यावर पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली. ती अशी कि साधारणपणे १९७९-८० पर्यंत जे चित्रपट होते, विशेषत: १९५५-६० नंतर बनलेले. ते खरंच खूप सुंदर आहेत. यामध्ये मराठी चित्रपट सुद्धा म्हणेन मी. अजूनही पाहिले तरी असह्य होत नाहीत हे चित्रपट. स्टेजचा प्रभाव हिच एक नकारात्मक बाजू होती. पण डोळ्याला कानाला शांत व मुख्य म्हणजे कलात्मकता जपणारे वाटतात. पण ७९-८० नंतर अनेक चित्रपट असे आले कि ते आता पाहवत सुद्धा नाहीत. बटबटीतपणा, देमार हाणामारी, रक्तपात, ढाणढाण कर्कश्श संगीत, आरडाओरडा यांचे प्रमाण वाढले असे वाटते. प्रचंड अस्वस्थता असमाधान बदला इत्यादी भोवती कथानक असायची त्यात शक्यतो. ९० च्या आसपास आलेल्या रोजा नंतर पुन्हा जरा सुसह्यपणा आला असे वाटते. अर्थात हेमावैम.

या लेखमालेच्या निमित्ताने दिलीपकुमार हे मध्यभागी ठेवून त्या काळातील अनेक चित्रपटांना स्पर्श केला गेलाय. वस्त्रातला एक धागा उचलावा आणि त्याला लागून आजूबाजूचे धागे आपसूक वर यावेत तसेच काहीसे हे Happy लेखनशैली सुद्धा खूपच छान. वाचनीय झालीय लेखमाला.

@ रेव्यू

दिलीप कुमार विषयी दोन टोकाचं मत आहे लोकांमध्ये. काहींना तो मुळीच म्हणजे मुळीच आवडत नाही, काहींना त्याच्यासारखा अभिनय कोणीच करू शकत नाही असं ठामपणे वाटतं.

त्यांना कोणाशी तुलना करून मोठं करण्यापेक्षा माझ्या मते त्यांचं काम ( विशेषतः ब्लॅक अँड व्हाईट ) थोडा अभ्यासल तर बऱ्याच गोष्टी समजतील. ज्या काळात रंगभूमीचा प्रभाव असलेले नट आवाजी अभिनय करून चित्रपटात लाऊड आणि बटबटीत सीन देत, तेव्हा सिनेमाच्या अभिनयाचा अभ्यास करून, सिनेमाच्या तंत्राचे बारकावे समजून घेऊन स्वतःला स्वतःच नट म्हणून घडवणं सोपं नव्हतं. डॉक्टर लागू जग फिरले आणि त्यांनी ऑपेरा - ब्रॉडवे बघून त्या अनुभवानंतर आपला रंगभूमीला बदलून टाकणारा अभिनय मराठीत आणला, पण दिलीप कुमारला केवळ निरीक्षण, वाचन आणि उपलब्ध सिनेमाचं अवलोकन हेच मार्ग मिळाले.

आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र त्यांनी भयंकर सिनेमे स्विकारले आणि आपल्या अभिनयाच्या मूळ शैलीला बगल देत बरेचदा थोडासा लाऊड अभिनय केला हे खरं आहे...पण तोवर जुने जाणते दिग्दर्शक सुद्धा बाजूला झाले होते हेही खरं.

काहींना तो मुळीच म्हणजे मुळीच आवडत नाही, काहींना त्याच्यासारखा अभिनय कोणीच करू शकत नाही असं ठामपणे वाटतं.>>>> मी पहिल्या गटात आहे.कोहिनूरसारखा चांगला सिनेमा सोडल्यास मला कधीच आवडला नाही.दुसरे म्हणजे त्याच्या रोनी सुरतेला योग्य अशा भूमिकेत तो फिट बसत असे.बाकी च्या भूमिकेत त्याला पहाणे बोअर व्हायचे हेमावैम.

माझा भाऊ सांगत असे,आमच्या गल्लीतील त्याच्या काही मित्रांना त्यांच्या आईबहिणींना काही बोलले तरी चालायचे.पण दिलीपकुमारबद्दल वावगे बोलणार्‍याच्या निदान सात पिढ्या भकारात उद्धरल्या जायच्या.

दी अर्बन नोमॅड, आपण लिहिलेले दिलीप कुमारांवरील सगळेच लेख आणि त्यावरील तुमचे सगळे प्रतिसाद सुंदर आहेत. पुलेशू.