दिलीप कुमार - ०२

Submitted by Theurbannomad on 7 July, 2021 - 07:57

मधुमती खरं तर दिग्दर्शकाचा सिनेमा. कथानक अगदी साधं - लाकूड इस्टेटीचा श्रीमंत पण स्त्रीलंपट मालक उग्रनारायण गावातल्या एका सुंदर मुलीला - मधुमतीला हवेलीत बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करतो, तिच्या प्रेमात असलेला आनंद वेडापिसा होऊन हवेलीत जातो, त्याला अर्धमेला करून उग्र आणि त्याचे साथीदार दरीत फेकून देतात, त्याचा जीव वाचतो आणि त्याची गाठ मधुमतीसारखी दिसत असलेल्या माधवीशी पडते. ते दोघे मधुमतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी उग्रनारायणच्या विरोधात एक ' प्लॅन ' आखतात पण शेवटी मधुमतीचं भूत येऊन उग्राचा सूड घेऊन जातं. पण या कथानकाला बिमल रॉय दिग्दर्शक म्हणून लाभले होते...त्यात प्राण साहेब खलनायकाच्या जबरदस्त भूमिकेत, नृत्याच्या आणि अभिनयाच्या प्रांतात अद्वितीय गणली गेलेली वैजयंती माला नायिका आणि तेही तीन - तीन भूमिकांमध्ये....संगीत सलील चौधरी नावाच्या जादुगाराने दिलेलं...या सगळ्या मांदियाळीत राजेंद्र कुमार किंवा जॉय मुखर्जी नायक असता तरी काय फरक पडला असता?

तर हा फरक मला जाणवला दिलीप कुमार या अभिनेत्याने केलेल्या अदाकारीमुळे. एक तर या माणसाने कथानकात आपली भूमिका नायकाची असली तरी भावखाऊ नाहीये, हे ओळखलं असावं किंवा क्रूर खलनायक, पडदा व्यापून टाकणारी सळसळती नायिका आणि गूढ प्रकाशचित्रण, फ्लॅशबॅक अशा मार्गाने कथानक फुलवत नेणारा दिग्दर्शक यात आपल्याला जराही ' लाऊड ' न होता अभिनय करावा लागणार आहे हे त्यांना कळलं असावं....सुहाना सफर गाण्यात संगीत, छायाचित्रण आणि मुकेशजींचा आवाज तर लगेच आपली छाप सोडतो, पण दिलीप कुमार या गाण्यात ज्या चेहऱ्याने वावरले, त्यातून त्यांची व्यक्तिरेखा साध्या सरळमार्गी सामान्य माणसाची आहे हे जाणवतं. उग्राच्या हवेलीत त्याला जाब विचारायला गेलेला आनंद ' हीरो' असता तर उग्राला मारून आला असता, पण तसं होत नाही...आणि तरीही दिलीप कुमार नायकच राहतात. त्यांना चित्रकलेची आवड असते...एका प्रसंगात ते मधुमतीचं ' potrait ' काढत असतानाच्या प्रसंगात ' स्केचिंग ' करतानाचा अभिनय इतका ' detailed ' प्रकारे केलाय की ते कसलेले चित्रकार आहेत की काय अशी शंका येते. ( मी स्वतः स्केचिंग करतो, त्यामुळे पेन्सिलीचे strokes कसे असतात हे मला माहीत आहे...या प्रसंगात त्यांच्या हाताच्या हालचाली बघा...लाजवाब! ) त्यांनी अख्ख्या सिनेमात आवाजाचा एक undertone वापरलेला आहे....त्यामुळे हवेलीत उग्राला जाब विचारायला गेल्यावर त्यांनी जो थोडा चढा आवाज लावलाय, त्यातून त्यांच्यातली चीड अधिक प्रखरतेने जाणवते...संयत आणि तरीही परिणामकारक असा हा अभिनय फार कमी बघायला मिळतो. इतका undertoned अभिनय करूनही लक्षात राहिलेला ' नायक ' हीच दिलीप कुमार नावाची अभिनयाची कार्यशाळा.

या चित्रपटानंतर मी दिलीप कुमारचे जुने सगळे चित्रपट शोधून शोधून बघायला सुरुवात केली. मधुमती नंतर हातात पडला देवदास. हा अगदीच वेगळ्या जातकुळीतला. बंगाली संस्कृती, प्रथा, चालीरीती याचा प्रचंड प्रभाव असलेलं कथानक शरतचंद्र चटर्जी यांच्या १९१७ सालच्या स्वानुभवातून लिहिलेल्या कादंबरीवर बेतलेलं. कथेतच मेलोड्रामाच्या जागा ठिकठिकाणी पेरलेल्या...आणि त्यात ही कथा ट्रॅजेडीच्या अंगाने जाणारी. इथेही दिलीप कुमारसमोर वैजयंती माला आणि सुचित्रा सेन अशा तगड्या नायिका होत्या. हाही बिमलदांचा चित्रपट..पण इथे मात्र वेगळा दिलीप कुमार दिसतो. इथे देवदास खानदानी आहे, बंगालच्या गर्भश्रीमंत ब्राम्हण घरातला उच्च शिक्षण घेऊन आलेला तरुण आहे. इथे दिलीप कुमारने जी देहबोली चित्रपटाच्या पूर्वार्धात पकडली आहे, ती लाजवाब. खानदानी रुबाब दाखवण्यासाठी तेव्हाच्या कृष्णधवल चित्रपटात भव्यदिव्य सेट, झकपक हवेल्या असे प्रकार वापरायला मर्यादा यायच्या, पण दिलीप कुमार आपल्या देहबोलीतून तो दाखवून देतात. पुढे आयुष्याची माती करण्याच्या मार्गावर देवदासची वाटचाल सुरू होते आणि तो दारूच्या आहारी जातो, तेव्हाही तो नसानसात मुरलेला रुबाब अधूनमधून डोकावत राहील हे त्यांनी कटाक्षाने पाळलेल आहे. काही प्रसंगात दिलीप कुमारचे डोळे बोलतात, तर काही प्रसंगात शरीर. दिलीप कुमारने जर देवदास संयत ठेवला नसता, तर तो नाटकी झाला असता.

यानंतर असाच मनात घर करून गेलेला चित्रपट म्हणजे दाग. इथेही दिलीप कुमारचा शंकर दारुडा आहे, पण इथे परिस्थिती वेगळी आहे. हा शंकर मातीची खेळणी विकणारा साधा गरीब माणूस आहे, खानदानी देवदास नाही. तो गुत्त्यातली स्वस्त दारू पितो, कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे हताश होऊन खांदे पाडून बसतो आणि मनातल्या मनात पार्वतीवर प्रेमही करतो. इथे दिलीप कुमार ' शंकर ' वाटतो तो त्याच्या दिसण्यातून. या चित्रपटात त्याची चालण्याची, बोलण्याची आणि बघण्याची लकब अतिशय ' crude ' आहे. पुढे तो पैसा कमावून श्रीमंत होतो तरी त्याने खानदानी श्रीमंत आणि नवश्रीमंत या दोहोंमधला फरक अभिनयातून अचूक दाखवलाय. हे कथानक तद्दन फिल्मी, पण दिलीप कुमार लाजवाब. याच चित्रपटाने त्यांना पहिला फिल्मफेअर मिळवून दिला.

अनेक समीक्षकांनी गौरवलेल्या ' मुघल - ए - आझम ' मध्ये मला दिलीप कुमार शहजादा सलीम म्हणून विशेष भावला नाही. हा चित्रपट भारतीय सिनेमाचा पहिला भव्यदिव्य चित्रपट असावा....भपकेबाज सेटस, मुघल बादशाह अकबर म्हणून खुद्द पृथ्वीराज कपूर, सौंदर्य हा शब्द जिच्याकडे बघून ' समजतो ' अशी मधुबाला, नौशादने जीव ओतून घडवलेली एक एक गाणी, के. आसिफ या स्वप्नाळू अवलियाचं दिग्दर्शन आणि शापूर्जी पालोंजी या ' कॉर्पोरेट ' कंपनीची निर्मिती या सगळ्या मांदियाळीत दिलीप कुमार मात्र मला तरी काहीसे विजोड वाटले. त्यांच्याकडे पृथ्वीराज कपूर यांच्या समोर उभी राहू शकेल अशी पर्सनालिटी आणि आवाज नाही, हे कारण असू शकेल पण दिलीप कुमार इथे मला विशेष आवडले नाहीत...पण....काही प्रसंग मात्र त्यांनी आपल्या लाजवाब अदाकारीने अजरामर केलेत. या चित्रपटात त्यांनी मधुबलाशी केलेला अतिशय संयत, हळूवार आणि हळवा प्रणय अप्रतिम. खऱ्या आयुष्यात मधुबाला आणि तिच्या अब्बूंशी चांगलाच अबोला आलेला असूनही पडद्यावर समरसून वावरलेले दिलीपसाब अप्रतिम. पार्श्वभूमीवर बडे गुलाम अली ' प्रेम जोगन ' आळवत असताना समोर पडद्यावरचा दीलीपसाब आणि मधूचा अतिशय हळूवार प्रणय अशा काही नजाकतीने चितारला गेलाय, की शृंगाररसाचा हा आविष्कार चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झालेला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुमतीसाठी जे जे लिहिलंय त्याला अगदी अनुमोदन!
देवदास मी बघितला नाहीये. मुगले आजम लहानपणी. पण तेव्हा कंटाळा आला होता.

राजेंद्रकुमार हे दिलीपकुमार यांचे कॉपीकॅट म्हणून ओळखले जात. दिलीपकुमार यांच्या जागी त्यांना घेतले असते तर लांबचा फरक पडला असता.

दिलीपकुमार हे मेथड अ‍ॅक्टर होते. सत्यजित राय यांनी त्यांना अभिनयाची पाठशाळा म्हणून गौरवले आहे. राज कपूर आपल्या मुलाला (रणधीर कपूर) घेऊन चित्रपट बनवत होते. तेव्हां त्यांना मुलाचा अभिनय मनासारखा वाटत नव्हता. शेवटी ते म्हणाले तुला अभिनय म्हणजे काय हे शिकायचं असेल तर दिलीपसाब यांचे चित्रपट बघ. राज आणि दिलीप हे प्रतिस्पर्धी होते, पण हा आदर होता.

नजरेतून बोलणे, डोळ्याच्या हालचालीतून शब्दांचे काम कमी करणे, आवाजावरची हुकूमत, संवादफेक आणि याच्या जोडीला शैली हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अत्यंत स्टायलिश अभिनय त्यांनी पडद्यावर आणला. नासीर यांनी स्टाईला ऐवजी नैसर्गिक अभिनयाला पसंती दिली. संजीवकुमार, पंकज त्रिपाठी , नवाजुद्दीन हे नैसर्गिक अभिनेते आहेत. पंकज त्रिपाठीच्या अभिनयात किंचित नाट्य आले की आपले परेश रावल.

अलिकडे नैसर्गिक अभिनयामुळे किंवा अंडरप्लेमुळे दिलीपकुमार यांच्या काळचा हा भुलवणारा शैलीदार अभिनय लोकांना हास्यास्पद वाटत असेल कदाचित. तोरडमल छाप लाऊड अभिनय तर आज कुणीही पाहणार नाही. काळाचा प्रताप आहे हा.

अहो शांत माणुस त्या काळात ( राज दिलीप देव वगैरे ) जी स्पर्धा होती ना , ती निकोप , निरोगी स्पर्धा होती. गायक असो वा नट असो वा व्हिलन,
हे सगळे एकमेकांविषयी एक प्रेम आणी आदर ठेऊन असायचे. भारतीय सिनेमा या लोकांच्या काळात खर्‍या अर्थाने उच्च पातळीवर होता.

छान लेख.
मी फक्त मुघलेआझम बघितलाय तो हि रंगीत झाल्यावर मधुबाला साठी.
वर दिलेले दिलीप कुमार चे सिनेमे पाहिन असं वाटतंय.

हे वाचून आता मधुमती बघितला. किती काव्यात्मक चित्रपट होते तेंव्हाचे. संयत आणि कलात्मक मुल्ये प्रत्येक फ्रेम मध्ये ठासून भरली होती. विशेष म्हणजे शेवटचे धक्कातंत्र. 'माधवी' जेंव्हा 'मधुमती' बनून येते ते दृश्य Happy आणि नंतर ती 'पुन्हा एकदा' येते आणि म्हणते 'माफ कर, यायला उशीर झाला'. हे भगवान! अंगावर शहारे येतात तेंव्हा. स्क्रिप्टवर किती मेहनत घेत होते हे लोक. कथानकाची भक्कम बांधणी. त्यात कुठेही loose end नाही. अप्रतिम नि सर्वांगसुंदर चित्रपट.

जाता जाता: एक मजेशीर गोष्ट आढळली ती म्हणजे `मै तेरा खून पी जाउंगा` हा पुढे धरमपाजीचा पेटंट झालेला डायलॉग, ह्यात चक्क दिलीपकुमार म्हणत आहेत.

अनुमोदन अतुल सर. दिलीप कुमार प्राण चे चित्र रेखाटताना फक्त प्रकाश ,सावल्या आणि हलणारे पडदे वापरुन किती भितीदायक वातवरण निर्मीती केली आहे.

गंगा -जमुना वरुन दीवार बनला.

सुंदर लेखमाला आहे. दिलीपकुमार माझ्या बाबांचाही आवडता नायक होता. हिरो असावा तर दिलीपकुमारसारखा आणि खलनायक प्राणसारखा असेच त्या पिढीतल्या लोकांचे मत होते. मला मात्र राजकपूर जास्त आवडला. त्याचा भाबडा आशावाद आवडायचा त्यातुलनेत दिलीपकुमारचे चित्रपट व्यावसायिक आणि भडक वाटायचे. मी नया दौर, गोपी सारखे चित्रपट बघितले. नंतर मुगल ए आझम बघितला, नंतर देवदास, मधुमती बघितले म्हणजे त्या काळानुरुप डॉयलॉगबाजी होती पण ठिक वाटले. खूप लहान असताना आईसोबत मशाल बघितला होता, त्यात त्याचे ओरडणे बघून खूप रडलो होतो. नंतर कर्मा, विधाता वगैरे ठिक पण सौदागर मात्र डोक्यात गेला. फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला होता. अजिबात आवडला नाही. त्यानंतर दिलीपकुमारचे फार चित्रपट बघितले नाही. एक दिवस अचानक टिव्हिवर संघर्ष बघितला आणि अंगावर काटा आला. यातला दिलीपकुमार पूर्ण वेगळा होता.

दिलीप कुमारच्या काळात नायक नृत्य करत नव्हते. दिलीप, देव आणि राज ही तिकडी नृत्यासाठी प्रसिद्ध कधीही नवती. राजकुमार, राजेंद्रकुमार हे सुद्धा नाही. शम्मी कपूर आणि जितेंद्र हे त्या काळचे नाचरे नायक होते. ते बरेच नंतर आले. गाण्यात जी काही कोरिओग्राफी असेल ती त्या नायकाच्या शैलीला अनुसरून असायची.
उडे जब जब जुल्फे तेरी मधे आपल्या अदाकारीने नृत्याची कमी दिलीपकुमार यांनी भासू दिलेली नाही. अमिताभने सुद्धा तोच कित्ता पुढे चालवला.
https://www.youtube.com/watch?v=Hr6SAJ5CfYc

राज देव दिलीप यांनी तीन शतके बॉलिवूड वर राज्य केले... राजेश खन्ना आणि बच्चन आल्यानंतर त्यांचे नायक म्हणून चित्रपट कमी होत गेले...
या तिकडी ची लोकप्रियता आणि सलमान शाहरुख आमिर या तिकडीची लोकप्रियता एकदम समान आहे... ही तिकडी देखील आता लवकरच अस्ताला जाईल... तीन दशके राज्य करतेय...

राज देव दिलीप... मध्ये राज-देव आणि दिलीप-देव एकत्र आलेत कधीमधी निमित्ताने. पण राज आणि देव फारसे कधी कुठे एकत्र आले नाहीत (जितकं माझं वाचन आहे त्यानुसार)

राज देव दिलीप यांनी तीन शतके बॉलिवूड वर राज्य केले..>>> तीन शतके? शिवाजी महाराजांच्या काळापासून आहेत हे तिघे? चिमीत्कार

आदिलशहाने खूष होऊन मोत्यांच हार दिला होता राज कपूरला. समर्थांनी देव आनंदला तू चिरतरूण होशील असा वर दिल्याचे आठवते.
दिलीपकुमार हा दारा शुकोहचा गुमनाम मुलगा. ते माहीत नसल्यानेच औरंगजेबाच्या हातून वाचला. तोच दर्द त्याच्या अभिनयात आला.

बोकलत - शिवाजी महाराजांच्या काळाबद्धल विनोद नको...जमल्यास संपादित करा तुमचा प्रतिसाद...
ते शतके ऐवजी दशके वाचा.. आता मुदत उलटून गेलीय माझी संपादनाची...

राज देव दिलीप... मध्ये राज-देव आणि दिलीप-देव एकत्र आलेत कधीमधी निमित्ताने. पण राज आणि देव फारसे कधी कुठे एकत्र आले नाहीत
>>> श्रीमतीजी नावाचा एक चित्रपट आहे त्यात राज आणि देव दोघे आहेत गेस्ट अपियरन्स मध्ये...

बोकलत - शिवाजी महाराजांच्या काळाबद्धल विनोद नको...>>>का? शिवाजी महाराजांच्या काळात हसायला बंदी होती का? तसंही त्या काळाबद्दल मी काही विनोद नाही केला. तो काळ मी फक्त रेफरन्स साठी घेतलाय.

कठीण आहे बाबा लोकांचं . कोणाच्या भावना कशामुळे दुखावतील सांगू नाही शकत. नुसता काळाचा उल्लेख केला तरी भावना दुखवतात.

तुम्ही संपादन केलाय प्रतिसाद... हा वेगळा प्रतिसाद आहे...>>> कशाला खोटं बोलताय. तुमच्या आधी दोघांनी प्रतिसाद दिलाय त्यांना विचारा प्रतिसाद संपादित आहे का? वाटल्यास admin ना विचारा. शिवाजी महाराजांच्या काळाचं नाव घेतलं तरी भावना दुखावतात आणि दुसरीकडे धडधडीत खोटं पण रेटून सांगता.

त्यांनी वाचण्याआधीच संपादित केलेला असेल मग.. एका मिन मध्ये...
जाऊदे विषयांतर नको... अडमीन ने उडवण्याआधी बदलला ते बरे केलेत..

मी पण वाचला होता ना लिहिला तेव्हाच बोकलत यांचा पहिला प्रतिसाद, हाच होता जो आता आहे. ------- हो तोच आहे प्रतिसाद

Pages