नातं निसर्गाशी - गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति - भाग १

Submitted by जिज्ञासा on 4 July, 2021 - 22:40

गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति।
नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरू।।

पाण्याला जीवन असं म्हणतात आणि भारतीय संस्कृतीमध्ये वाहत्या पाण्याचं फार महत्त्व आहे. भारतातच कशाला जगाच्या अनेक सुरुवातीच्या संस्कृती या मोठ्या नद्यांच्या काठी वसल्याचे पुरावे आहेत. तर या आजच्या गप्पांच्या भागात आपण जल परिसंस्थांपैकी नदीच्या परिसंस्थेविषयी केतकीकडून जाणून घेणार आहोत.

जिज्ञासा: केतकी, नदीच्या उगमापासून ते शेवटपर्यन्तचा प्रवास आपल्याला साधारणपणे माहिती असतो पण त्यावरून नदीचे काही प्रकार असतात का?
केतकी: हो नदीचे प्रकार असतात आणि त्याचे वेगवेगळे निकष असतात.सगळ्यात सोपे दोन प्रकार म्हणजे seasonal (हंगामी) आणि perennial (बारमाही). एखादी नदी बारमाही किंवा हंगामी का असते तर त्याचं मुख्य कारण त्या नदीचा उगम कुठे होतो किंवा नदीला पाण्याचा पुरवठा कसा होतो. आता भारतात हिमालयात उगम पावणाऱ्या काही नद्या ह्या बारमाही आहेत कारण त्यांचा उगम हा एका हिमनदीतून होतो. त्यातल्या काही हंगामी पण आहेत ज्यांना episodic म्हणतात - त्यांचा प्रवाह काही कारणाने सुरु होतो उदाहरणार्थ, ऋतू बदलून बर्फ वितळला की. आणि आपण जर दक्षिण भारतातल्या नद्या पाहिल्या तर त्या बऱ्याचशा हंगामी नद्या आहेत.
आता याच नद्यांचे alluvial म्हणजे गाळाच्या दगडगोटे आणि मातीचा तळ असलेल्या आणि bed rock म्हणजे खडकाळ तळ असलेल्या असेही दोन प्रकार सांगता येतात. हिमालयातून येणाऱ्या गंगा, ब्रह्मपुत्रा किंवा त्यांच्या उपनद्या बघितल्या तर त्यांची पात्र प्रचंड मोठी असतात - पात्रातील काही भाग पूर्ण पाण्याखाली असतो पण काही वेळा पात्र कोरडं पण दिसतं त्याला braided channel असे म्हणतात कारण बाकी पात्रात सगळा गाळ भरलेला असतो. अशा नद्यांना alluvial नद्या म्हणतात. याउलट आपल्याकडे असलेल्या बहुतेक नद्या या बसाल्ट या दगडावरून वाहणाऱ्या अशा आहेत. असे हे ढोबळ प्रकार म्हणू शकतो नदीचे. आता यात अजून खोलात गेलो तर मग tributaries -उपनद्या अशा नद्या ज्या समुद्राला न मिळता एखाद्या नदीला मिळतात किंवा मोठ्या नद्यांच्या मुखाशी अनेक distributaries तयार झालेल्या दिसतात. तर असेही उपप्रकार सांगता येतील नद्यांचे.
एक गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गंगेचं मोठं महत्त्व आहे. पण geological timescale वर आपण बघितलं तर भारतीय उपखंडापेक्षा हिमालय तसा नवीन आहे. हिमालयाच्या पर्वतरांगा साधारण ४ ते ५ कोटी वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय उपखंड युरेशियाच्या महाखंडाला येऊन चिकटला त्यावेळी निर्माण झाल्या. त्यानंतर हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांची निर्मिती झाली. परंतु त्याआधी आपल्या भारतीय उपखंडाच्या तुकडा हा दक्षिण गोलार्धात ऑस्ट्रेलियाच्या जवळ होता आणि तेव्हाही या उपखंडावर काही नद्या अस्तित्वात होत्या. गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी या आजच्या पूर्ववाहिनी नद्या या त्यावेळी भारतीय उपखंडावर असलेल्या नद्यांच्या वंशज आहेत. त्यामुळे या नद्यांचे अंदाजे वय २६० कोटी वर्षे ते साडेसहा कोटी वर्षे इतकं आहे! अर्थात त्यांच्यात वेळोवेळी अनेक बदल झाले पण एकूण विचार केला तर या नद्या अतिप्राचीन आहेत.

जिज्ञासा: आता शुरू से शुरू करते हैं! तर नदीचा उगम कसा होतो? त्या साठी कोणते घटक कारणीभूत असतात? या पाणलोट क्षेत्राचे (catchment area) महत्त्व काय? इथे आपण आपल्या महाराष्ट्रातल्या नद्यांविषयी बोलूया.
केतकी: आपल्या बहुतेक साऱ्या नद्या डोंगरात उगम पावतात. आपल्याकडे म्हण आहे की नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये. असं का? तर एका ठिकाणी कुठेतरी नदीचा उगम नसतो. तो उगम अख्ख्या पाणलोट क्षेत्रात असतो. तिथल्या डोंगरमाथ्यावर अनेक बारके बारके ओढे तयार होतात, उतारामुळे एकत्र येतात आणि जरा मोठा एक प्रवाह तयार होतो. असे अनेक प्रवाह एकमेकांना मिळत राहतात आणि मग जेव्हा ते सर्व प्रवाह दरीत येतात (valley line) तेव्हा तिथे नदीचा प्रवाह तयार होतो. महाराष्ट्रात मुख्य डोंगररांग म्हणजे सह्याद्री - तर तिथे अशा प्रकाराने अनेक नद्या उगम पावतात. हा जो सगळा डोंगराचा भाग आहे त्याला नदीचं खोरं किंवा पाणलोट क्षेत्र (catchment area) असं म्हणतात.
भारताचा नकाशा पाहिला तर सुरत ते कन्याकुमारी अशी पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी ही डोंगररांग आहे त्यामुळे याच्या माथ्यावर उगम पावणाऱ्या काही नद्या पश्चिमेकडे वाहतात तर काही पूर्वेकडे वाहतात. गोदावरी, कृष्णा, आणि कावेरी या पूर्व वाहीनी नद्या सह्याद्रीत उगम पावतात. तर तापी आणि नर्मदा या मध्य भारतात सातपुड्यात उगम पावणाऱ्या दोन महत्त्वाच्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत. महाराष्ट्रात वाशिष्ठी, सावित्री, काळ इत्यादी पश्चिमेला वाहणाऱ्या मुख्य नद्या आहेत.
आता कोणत्याही नदीच्या प्रवासाचे ३ मुख्य टप्पे असतात. हे टप्पे कृष्णेच्या किंवा गोदावरीच्या प्रवासात छान दिसून येतात. कारण बंगालच्या उपसागरात समुद्राला मिळण्यापूर्वी भारतीय उपखंडाचा एक मोठा भाग त्या व्यापतात. हे टप्पे कोणते तर सुरुवातीचा उगमाचा भाग जो डोंगराळ असतो आणि थोडा उंचावर असतो म्हणजे आपल्यासाठी सह्याद्रीच्या डोंगर रांगा. नंतर नदी सपाटीवर येते आणि सगळ्यात शेवटी समुद्राला मिळताना तयार होणारा मुखाचा भाग.
जर नदी राखायची असेल तर या तिन्ही टप्प्यांमध्ये तिचा अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणजे पुण्यातून मुळा मुठा वाहते त्यामुळे तिचा फक्त पुण्यातल्या भागाचा विचार करून उपयोग नाही. त्या येतात कुठून तर पश्चिम घाटातून आणि संगमानंतर ही नदी कुठे जाते तर पुढे जाऊन भीमेला मिळते. त्यामुळे नदीचं नियोजन करताना तिच्या upstream आणि downstream अशा दोन्ही भागांचा विचार व्हायला हवा.

प्रकाश चित्र.१. नदीचे मुख्य टप्पे (https://oikos.in/html/monthcalendaryear.php?year=2018&month=1)
Nadi tappe.jpg

आता या उगमाच्या प्रदेशाची इकॉलॉजी कशी असते हे बघू. नदीच्या दृष्टीने इथली इकॉलॉजी अत्यंत महत्वाची असते. या डोंगराळ भागात तीव्र उतारामुळे नदीचं पात्र अरुंद असतं आणि पाण्याला वेग असतो. या भागात शेती कमी असते. त्यामुळे उतारांवर जंगल दिसतं -घाटमाथ्यावर निम्न सदाहरित जंगलं आहेत. नदीचं उगमाच्या प्रदेशातील आरोग्य जपण्यामध्ये या जंगलाचा मोठा रोल आहे. आता इथे काही विशेष अधिवास दिसतात. ते कुठले? तर उदाहरणार्थ धबधबा! आपण पावसाळ्यात करमणुकीसाठी धबधबे बघायला जातोच. अगदी रामदास स्वामींनीही “धबाबा तोय आदळे” असं धबधब्याच्या एकाच वेळी रौद्र आणि सुखावणाऱ्या वैशिष्ट्याचं वर्णन केलं आहे. पण नदीसाठी धबधब्याच्या प्रत्येक हवेत उडणाऱ्या तुषारांमध्ये प्राणवायू मिसळला जातो हे महत्वाचं आहे - त्यामुळे जितका धबधबा मोठा (उंच) तितके त्या पाण्यात प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आता या धबधब्याच्या आजूबाजूला अनेक खास वनस्पती दिसतात - विविध प्रकारची शेवाळं जमा होऊन cryptogamic crust तयार झालेला दिसतो. या थरातल्या जाती युनिक असतात. धबधब्याच्या कडावर जो उभा (vertical surface) असतो त्यावर काही विशिष्ट गवतं वाढताना दिसतात जी endemic (प्रदेशनिष्ठ) असतात जी तुषारांच्या ओलाव्यावर जगतात. किंवा Malabar whistling thrush सारखे पक्षी या धबधब्याच्या मागच्या खोबणीत घरटं करून राहताना दिसतात. अशा physical आणि जैविक दोन्ही प्रकारच्या विशेष गोष्टी आपल्याला धबधब्याच्या जवळ दिसून येतात.

प्रकाशचित्र २. धबधबा (https://oikos.in/html/monthcalendaryear.php?year=2018&month=2)
Nadi waterfall.jpg

नदी जरा कमी उतारावर आली की रॅपिड्स दिसतात. White water rafting करणाऱ्या अनेकांना रॅपिड्स माहितीचे असतील. इथे नदीचा प्रवाह खळाळता असतो - जितका हा खळाळ जास्त तितका जास्ती प्राणवायू पाण्यात विरघळतो. या ठिकाणी पात्रात मोठाले खडक (boulders) असतात. या खडकांच्या आधाराने मासे प्रवाहाच्या विरुद्ध वरच्या भागात जातात आणि नदीच्या उगमाशी जाऊन अंडी घालतात. अशा कारणासाठी रॅपिड्ससारखे अधिवास महत्त्वाचे असतात. आता जेव्हा धरण होतं आणि हा रॅपिड्स चा भाग पाण्याखाली जातो तेव्हा मग या बांधावरून माशांना उडी मारून पलीकडे जाता येत नाही त्यामुळे त्यांचे जीवनचक्र डिस्टर्ब होते. परदेशात अशा माश्यांसाठी धरणाला लागून मुद्दाम फिश लॅडर म्हणजे माश्यांसाठी चक्क शिड्या केल्या जातात. आम्ही पण असा प्रयत्न इथे करून बघितला आणि त्याला यश पण मिळालं. माश्यांनी अशा शिड्या वापरल्या!
थोडा अजून उतार मंदावला की मग नदीत riffles आणि pools दिसतात. म्हणजे काय तर काही ठिकाणी गाळाचे दगडगोटे पसरलेले दिसतात त्याला riffles म्हणतात आणि pools म्हणजे पाण्याचे छोटे/मोठे डोह. आता या riffles मधला प्रत्येक दगडगोटा एक हॅबिटॅट असतो. नदीतील मासे सगळ्यांना माहिती असतात पण ते सोडून अनेक डोळ्यांना पटकन न दिसणारे प्राणी म्हणजे invertebrates त्यातलेच महत्वाचे म्हणजे जलीय कीटक. ते नदीत खूप मोठया प्रमाणात असतात - या प्राण्यांच्या वाढीच्या अवस्थेतील वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये (nymphal stages) हे दगडगोटे “आसरा” म्हणून आवश्यक असतात. फोटोत दिसेल की अशा ठिकाणी बरेचदा प्रवाह उथळ असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश खालपर्यंत झिरपतो - पाण्याचा तळ दिसतो, हे सगळे कीटक, थोडे मासे असं सगळं इथे riffles च्या अवतीभवती दिसतं. याला लागूनच डोह (pools) असतात. riffles आणि pools हे बरेचदा alternating pattern मध्ये दिसतात. हे pools खोल असल्याने तिथे अर्थातच प्राण्यांच्या, माशांच्या वेगळ्या जाती दिसतात. याला इकॉलॉजीमध्ये habitat segregation म्हणतात. या दोन ठिकाणचे प्राणी वेगवेगळ्या अन्नावर जगतात. नदी सपाटीवर आल्यावर देखील काही ठिकाणी हे riffles आणि pools दिसतात. सपाटीवर नदीच्या पात्रात रांजणखळगे (potholes) जास्त दिसतात. हे नदीतल्या दगडाचे पाण्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे होणाऱ्या घर्षणामुळे तयार होतात. एखादा गोटा/दगड एका तळाच्या दगडाच्या एका खळगीत अडकतो आणि पाण्याच्या प्रवाहात गोल गोल फिरत राहतो. यातून असे खळगे तयार होतात. हे एखाद्या उखळासारखे दिसतात. निघोजच्या रांजणखळग्यांबद्दल आपण मागच्या भागात बोललो. आता या विविध आकाराच्या खळग्यांमध्ये आढळणाऱ्या प्राण्यांच्या जाती देखील वेगळ्या असतात. आता या खळग्यांची एक उत्तम इकॉलॉजिकल सेवा आहे - हे रांजणखळगे कातळात असल्याने यात पाणी साठतं आणि चांगली खोली असेल किंवा riparian zone मध्ये वरती झाडांची सावली असेल तर बाष्पीभवनाने पाणी उडून जात नाही आणि जर हे पाणी स्वच्छ राखलं तर नदीकाठच्या गावातल्या लोकांना वर्षभर यातून पाणी मिळतं. विशेषतः ज्या आपल्या हंगामी नद्या आहेत त्या जेव्हा उन्हाळ्यात कोरड्या पडतात तेव्हा अशा खळग्यांमधलं साचलेलं पाणी वापरता येतं.

प्रकाशचित्र ३. नदीतील आसरे (https://oikos.in/html/monthcalendaryear.php?year=2018&month=4)
RifflesPoolRapids.jpgजिज्ञासा: आत्ता बोलताना तू riparian zone चा उल्लेख केलास. हा झोन म्हणजे नक्की काय?
केतकी: Riparian zone हा एक अत्यंत महत्वाचा हॅबिटॅट आहे जो नदीच्या सपाटीच्या भागात आढळतो. म्हणजे काय तर नदीच्या दोन्ही काठांवर विशिष्ट झाडांची दाट झाडी असलेला भाग. ही झाडं बरीचशी सदाहरित आणि काही पानगळीची अशी असतात. उदाहरणं द्यायची झाली तर उंबर, करंज, वाळुंज, अर्जुन, जांभूळ, तामण ही नदीच्या काठी दिसणारी झाडं आहेत. मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी नदीच्या काठी अर्जुन दिसतो - सुंदर पांढरं खोड असतं अर्जुनाचं आणि त्याने नदीचं रूप इतकं देखणं दिसतं! बालकवींनी “पाय टाकुनी जळात” बसलेला औदुंबर आपल्या कवितेतून अजरामर केला आहेच. म्हणजे तो riparian zone मधला वृक्ष कसा आहे याचं परफेक्ट वर्णन कवितेत आहे. कोकणात नदीच्या काठी तामण नावाचं झाड दिसतं. आता या riparian zone मधल्या वनस्पतींचं वैशिष्ट्य काय तर या झाडांमध्ये पूर आला तरी त्यात टिकून राहण्याची ताकद असते - म्हणजे काही काळ जरी त्यांचे बुडखे पाण्यात बुडाले तरी ती मरत नाहीत. वाळुंज हे कृष्णेकाठी भरपूर ठिकाणी दिसणारं झाड आहे त्याला Indian willow tree पण म्हणतात - तेही नदीकाठी फार सुंदर दिसतं.
या वृक्षांच्या बरोबरीने काही झुडुपं आणि गवत पण या ठिकाणी दिसतात. काही लव्हाळी म्हणजे Cyperaceae जातीची गवत असतात. जसं तुकोबांनी म्हटलं आहे “महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती” तशी ही पुरात तग धरतात कारण ही खूप लवचिक असतात. यांच्या जोडीला परळ (Polygonum), हळदकुंकू (milkweed) अशा काही उभयचर (amphibious) वनस्पती असतात ज्या थोड्या पाण्यात थोड्या जमिनीवर अशा वाढतात. ही झुडुपे फुलपाखरांसाठी अन्नाचा स्रोत असतात. हळदकुंकू वर काही फुलपाखरं अंडी देखील घालतात.
आता या riparian zone च्या पण काही इकॉलॉजिकल सेवा आहेत. असा झोन असेल तर जवळच्या मानवी वस्तीतून किंवा शेतांमधून येणारं पाणी हे थेट नदीत मिसळलं जात नाही. ते फिल्टर होऊन थोड्याफार प्रमाणात शुद्ध होऊन मग नदीत जातं. जिथे riparian zone नसतो तिथे हे घडत नाही. तेव्हा ही नदी देत असलेली फुकटातली सेवा आहे. अर्थात कोणत्याही झोनची प्रदूषण नियंत्रित करण्याची क्षमता मर्यादित असते.
नदी जेव्हा सपाटीवरून वाहते तेव्हा काही ठिकाणी पाणथळ प्रदेश (wetlands) तयार होतात. जिथे जिथे बारमाही ओढे नदीला येऊन मिळतात तिथे बऱ्याचदा हे पाणथळ प्रदेश दिसतात. या ठिकाणी वर्षभर पाणी असल्याने इथे विशिष्ट पाणवनस्पती दिसतात. त्यामुळे इथे एक सुंदर हॅबिटॅट तयार होतो. अनेकदा मोठ्या पाणथळ जागी स्थलांतरीत पक्षी पहायला मिळतात. उदाहरण द्यायचे तर पुण्याचा पाषाण तलाव. जरी छोट्या पाणथळ जागा असतील तरी तिथे बगळे, बदकं असे पक्षी दिसतात. आणि या नदीकाठच्या पाणथळ जागांची इकॉलॉजिकल सेवा ही फार महत्त्वाची आहे. या जागा जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा ते पुराचं पाणी शोषून घेतात. म्हणजे नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढून धोका निर्माण होत नाही. त्यामुळे जर का पुरामुळे होणारे नुकसान टाळायचे असेल तर riparian zone आणि पाणथळ जागा राखल्या गेल्या पाहिजेत. या जागांमुळे परिसरातली जैवविविधता पण वाढते.

प्रकाशचित्र ४. Riparian zone (https://oikos.in/html/monthcalendaryear.php?year=2018&month=3)
Riperian zone.jpgजिज्ञासा: आजकाल शहरी माणसाला नदीची आठवण पावसाळ्यातच होताना दिसते आणि त्याचं कारण म्हणजे तू उल्लेख केलास तो म्हणजे पूर. आपल्याला असं वाटतं की नदीला पूर आला नाही पाहिजे. त्याने किती नुकसान होतं. तर या पुराचे फायदे तोटे आणि त्यापाठी असणारी नदीची इकॉलॉजी कशी असते या विषयी सांगशील का?
केतकी: नदीला येणारा पूर हा खरंच महत्त्वाचा आणि गेल्या काही वर्षात गंभीर स्वरूप धारण करणारा विषय आहे. पण पुराविषयी बोलण्याआधी नदीची दोन महत्त्वाची तत्त्वं आपण बघूया - ती म्हणजे फ्लो (प्रवाह) आणि फ्लड (पूर). म्हणजे नदी ही वाहती असली पाहिजे आणि नदीला पूर आला पाहिजे.
आता हे प्रवाहीपण कसं निर्माण होतं - तर तीन मार्गांनी.
पहिल्या प्रकारचा फ्लो म्हणजे बेस फ्लो - हा नदीत असलेल्या जमिनीतून येणाऱ्या नैसर्गिक झऱ्यांमुळे तयार होतो. हा प्रवाह नदीच्या पाणलोट क्षेत्रात भूगर्भ जलाची पातळी कशी आहे त्यावर अवलंबून असतो.
दुसरा असतो इ-फ्लो (environmental flow) - हा म्हणजे नदीचा मुख्य प्रवाह ज्याच्यामुळे नदी वाहते आणि तिच्यातल्या आणि तिच्या काठी असलेल्या जैवविविधतेला जगवण्यासाठी आवश्यक ते घटक पुरवते.
तिसरा फ्लो म्हणजे इकॉलॉजिकल किंवा किमान आवश्यक फ्लो - हा कमी जास्त होऊ शकतो पण नदीची एकसंधता (integrity) टिकवण्यासाठी आवश्यक असा हा किमान प्रवाह असतो.
आणि दुसरं तत्व म्हणजे पूर! यात हे लक्षात घेतलं पाहिजे की नदीला पूर येणं हे नैसर्गिक आहे. भारतासारख्या देशात ऊन आणि कॅनडासारख्या देशात बर्फ हे जसं आपण गृहीत धरतो तसा नदीचा पूर गृहीत धरला पाहिजे. उन्हाविषयी किंवा बर्फाविषयी तुम्ही तक्रार करता का?
आपल्याला पुरामुळे नुकसान सोसावं लागतं कारण आपल्या वस्त्या नदीच्या काठाच्या अगदी लगत आहेत. कोणीही समुद्राच्या भरतीच्या क्षेत्रात बांधकाम करून मग ते भरतीच्या पाण्यात बुडालं असं म्हणताना दिसत नाही. भरती दिवसांतून २ वेळा येत असल्याने हे आपल्याला पक्के माहिती आहे. मात्र पुराचे तसे होताना दिसत नाही. आपल्याला जर नदीच्या काठाने काही वस्त्या करायच्या असतील तर त्या हे पुराचं स्वरूप बघूनच वसवल्या पाहिजेत. पूरक्षेत्रात मानवी वस्ती नसली आणि उत्तम riparian zone आणि पाणथळ जागा असतील तर आपल्याला पुराचा काहीही त्रास होणार नाही. पण ही इतकी साधी गोष्ट आपण पाळू शकत नाहीयोत. प्रत्येक पुराची तीव्रता सारखी नसते - दरवर्षी एका विशिष्ट पातळीचा पूर येतोच नदीला पण काही अधिक मोठे पूर असतात जे २५ वर्षांतून एकदा येतात आणि काही १०० वर्षांत एकदा येतात. या तिन्ही पुराच्या पातळीच्या रेषा ही नदीची स्वतःची जागा आहे. हा नदीचा कॉरिडॉर मोकळा न सोडल्यामुळे पुरामुळे होणारे नुकसान वाढते.
आता पुराचे फायदे काय? तर पुरामुळे नदी स्वच्छ होते - cleansing effect असतो पुराचा. नदीत जे काही नैसर्गिक अनैसर्गिक साचलेले असते ते या पुरामुळे दरवर्षी वॉश आऊट होते. यात काही जीवसृष्टी नष्ट होते आणि काही पुन्हा नव्याने तयारही होते. पण हेच नदीचे वैशिष्ट्य आहे. A river is continuously in a state of physical change. जंगलांत दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात physical बदल होताना दिसत नाही. कारण नदी ही एक प्रवाही इकोसिस्टिम आहे आणि ती अशाप्रकारे रिसेट होत राहणे हेच नैसर्गिक आहे.
आता हे पुराचे पाणी जेव्हा नदीपात्राच्या बाहेर पसरते तेव्हा ते तिथे काही काळ थांबते. उत्तरेकडे गंगा किंवा यमुनेची मोठाली flood plains दिसतात जिथे हे पुराचे पाणी शिरते. हे आपल्याकडेही थोड्या प्रमाणात दिसते. तर जेव्हा असे हे पुराचे पाणी जमिनीवर येते तेव्हा ते जमिनीत मुरते आणि त्यामुळे आजूबाजूच्या जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढते - groundwater recharge होतो. हे जे नदीचं पाणी जमिनीवर येऊन साचतं त्यात बरेचदा शेती केली जाते किंवा तिथे स्थलांतरीत पक्षी येतात. ही एक काही ठिकाणी दोन महिन्यांची हंगामी ऍक्टिव्हिटी आहे. तेव्हा पुराकडे आपण या दृष्टीने पाहायला हवं.
अशी ही नदी जेव्हा सपाटीवरून वाहते तेव्हा काही ठिकाणी नागमोडी वळणं घेते - यात नदीच्या वळणाच्या आतल्या बाजूला नदी वाहून आणलेला गाळ टाकते तर बाहेरच्या बाजूला थोडे अधिक घर्षण होऊन तिथून नदीचा प्रवाह वाहतो. या नागमोडी वळणे घेत जाणारा नदीचा प्रवाह आणि आजूबाजूची जमीन यांचा एक कॉरिडॉर तयार होतो. जिथे अनेक प्राणी पक्ष्यांचा अधिवास असू शकतो.

प्रकाशचित्र ५. नदीची वळणं (https://oikos.in/html/monthcalendaryear.php?year=2018&month=8)
Nadi meandering.jpg

प्रकाशचित्र ६. नदीचा कॉरिडॉर (https://oikos.in/html/monthcalendaryear.php?year=2018&month=9)
Nadi corridor.jpgजिज्ञासा: आजच्या भागात आपण नदीचे मुख्य प्रकार, तिच्या उगमाच्या प्रदेशात असलेली इकॉलॉजी आणि नदी सपाटीवर येते तेव्हा तयार होणारे झोन्स या विषयी बोललो. आजच्या भागात आपण इथेच थांबू आणि पुढील भागात नदीच्या पुढच्या प्रवासाविषयी बोलू.
या मालिकेचा पुढचा भाग पुढील सोमवारी प्रकाशित होईल.

आधीचे भाग

भाग १: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १

भाग २: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २

भाग ३: नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्

भाग ४: नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वाचतो आहे. नदी प्रकरण किंवा तो अधिवास फार मजेशिर आहे. मुख्य म्हणजे गोड्या पाण्याचा स्रोत आहे. पिण्यासाठी समुद्राचे वापरता येत नाही. वरती नद्या वाहताना दिसतात तशा भूगर्भातसुद्धा आहेत. त्यांंचेच पाणी विहिरींना मिळते. एका विहिरीजवळ शंभर मिटरांत दुसरी का असू नये याचे कारणही अंतर्गत नदीच आहे. पण ही समुद्रास पूर्ण मिळून कोरडी पडत नसावी. वापर / उपसा वाढल्यावर आटते.

प्रवाहाच्या स्रोताबद्दल उगमभागातला पाऊस, बर्फ वितळणे कारण आहे तसेच सातत्यासाठी उतारासह तिथल्या खडक/ मातीचाही प्रकार कारणीभूत आहे. महाराष्ट्रातील नाशिक - लोणावळा - महाबळेश्वर - आंबोली करत आपण गोव्यातून कर्नाटकातल्या सह्याद्रीकडे सरकतो तसे एक जाणवते की झरे अधिक काळ वाहते दिसतात. म्हणजे की उडुपी मंगळुरुच्या वरच्या डोंगरांत मार्च एप्रिलमध्येही वाहतात. तिथले लाल खडक पाणी धरतात आणि हळूहळू सोडतात. ( चिकमंगळुरु - बाबाबुदनगिरी पर्वतरांगा.)

महिन्याप्रमाणे चित्रे टाकून केलेली आइकॉस दिनदर्शिका झकास दिसते आहे.

मी देखील वाचतो आहे.

एसार्डी, ऑयकॉस ची कॅलेंड र्स खूपच छान असतात. आपल्याला दरमहा ईमेल आयडीवर मिळूही शकतात.
ऑयकॉसच्या वेबसाईटवर त्यांची जुनी कॅलेंडर्स पाहू शकता.
https://www.oikos.in/html/desktop-calendars.php

Srd, हर्पेन, धन्यवाद प्रतिसादासाठी! मला एकदा शंका आली होती की लेख दिसत नाहीये की काय!

srd, रोचक माहिती!
हर्पेन, होय मस्त असतात ऑयकॉसची कॅलेंडर्स!

सुंदर ओळख करून दिली आहेस. नद्यांवर आपण किती बंधने घातली आहेत आणि मग त्यांनी ती झूगारली की आपणच आरडा ओरडा करतो.

सध्या इथे तरी १०० वर्ष पूर पुन्हा पुन्हा येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते आहे त्यामुळे पूररेषा आणि वस्ती सगळेच अनिश्चित झालेले दिसतेय.

नद्यांवर आपण किती बंधने घातली आहेत - धनि.

वाईचंच पाहा. कोणे एके काळी धोम धरण होण्याअगोदर कृष्णेला पाणी असायचं बरेच महिने. ढोल्यागणपती आणि बसडेपो, पूल पाहा. पण आता तिथे नुसती डबकी उरली आहेत.

तर उत्तराखंडातील धार्मिक पर्यटकांमुळे हॉटेल्स, घरं, वस्ती वाढते आहे. कमाईच्या दृष्टीने अधिकाधीक नदीजवळ बांधकाम होतंय. पूर आला की वाहतंय.

मला एकदा शंका आली होती की लेख दिसत नाहीये की काय! ......

तसं नाही. मराठी /हिंदी मालिका, सिनेमांच्या चर्चेच्या नद्या वाढल्या आहेत ना!

अमितव, धनि, धन्यवाद!
धनि, srd, नद्यांवर आपण घातलेल्या वेगवेगळ्या बंधनांचे जसे माणसाला फायदे आहेत तसे आपल्यासाठी आणि या परिसंस्थेतल्या इतर जीवांना तोटेही आहेतच. पण आपल्या विकासाच्या धोरणांमध्ये बरेचदा याचा विचार केला जात नाही Sad
वाढलेल्या नद्या Happy

जिज्ञासा, फारच सुंदर लेखमालिका.
निसर्गातल्या नदी या अतिमहत्त्वाच्या संस्थेबद्दल इतकं भरभरून वाचायला मिळतेय ही खरंच मेजवानी वाटतेय.