झाडू

Submitted by Shilpa१ on 1 July, 2021 - 02:12
मन, झाडू, शिल्पा, लेखन, आरोग्य, लेख

घरातील पसारा मला बघवत नाही, थोडी धूळ दिसली कि मी कशाचीही पर्वा न करता रात्री अपरात्री वेळ काळ न बघता, अगदी कोणत्याही वेळी काम करायला तत्पर असते, जेंव्हा माझे घर मला समाधान मिळेल इतपत लख्ख दिसते तेंव्हाच मी थांबते. मी माझ्यावरच खुश होते आणि मी घर कसे चकाचक ठेवते याचा अभिमान बाळगते आणि कोणी देवो न देवो स्वतःच स्वतःला शाबासकी देतेच माझ्या या कामाबद्दल.

हीच मी इतर काही बाबतीत मात्र एकदम वेगळी असते, माझ्या मनाला उगीचच वाजवीपेक्षा जास्त संवेदनशील , हळवे बनवुन ठेवते. कुठेही थोडे खुट्ट झाले कि वाटते मग पटकन वाईट , नाराज होते मन आणि मग साचत जातो तो ' कचरा '. हा कचरा किती साचतोय याचे मला बिलकुलच भान नसते, तो पण साफ करावा हे माझ्या ध्यानी मनी स्वप्नी पण नसते. तो किती साचला याचे मोजमाप करायचे कष्ट मी घेत नाही. असा दुर्लक्ष केलेला कचरा मग साचतच जातो आणि मग एवढे सगळे काम एकदम करणे अवघड होऊन बसते.

घरातील अडगळ, जुने सामान आपण वेळोवेळी फेकून देतो पण तेच efforts आपण मनात उगीचच खुपत , सलत राहिलेल्या गोष्टींसाठी घेतो का? उलट त्यांना अंमळ जास्तच गोंजारत आपण उराशी जपून बाळगतो आणि वेळप्रसंगी त्याला अगदी चघळतही बसतो. नुकसान फक्त आपलेच आहे आपले मन अश्याच बारीक सारीक क्षुद्र गोष्टींनी भरून जाते आणि मग महत्वाच्या जरुरी गोष्टींसाठी आपल्याकडे जागाच नसते. मनाचा तळ मग स्वतःलाही दिसेनासा होतो. माणूस म्हणाल कि विचार - अविचार येणारच पण कोणाला किती काळ गोंजारायचे आणि कशाला आसपास फिरकूही द्यायचे नाही हे आपणच ठरवायचंय. दगडातील नको असलेला भाग कोरून काढून टाकला तरच शिल्प घडते, तेच तत्व आपल्यालापण लागू पडत नाही का ? जिथे चांगले विचार वास्तव्य करतील तिथे का भित्री भुते तांडवनृत्य करायला धजतील ? देव - दानव म्हणजे तरी नेमकं काय , चांगले आणि वाईट यांच्या प्रतिकृतीच ना मग देव वसण्यासाठी दानवाला हटवायलाच लागणार , नाही का !

अगदी जादूची कांडी फिरवल्यासारखे सोपे नाहीये पण वाटते तितके अवघड नाही , अशक्य तर मुळीच नाही मात्र एक विचारी केरसुणी हवीच असा रोजचा रोज कचरा साफ करायला , एकतरी झाडुचा फर्राटा हवाच हा रोजचा कचरा बाहेर काढायला. सगळाच कचरा, सगळीच जळमटे एका दमात नाहीच निघणार... दिवसेंदिवस... वर्षानुवर्षे पुंजीसारखे जपून ठेवलय आपण त्या कचऱ्याला , वेळ तर लागणारच. साम , दाम दंड भेद यापैकी झेपतील ती प्रमाणे वापरून या वाईट विचारांना हिसकावून लावावे लागणार जेणेकरून ते आपल्याला डोईजड होऊन बसणार नाहीत.

प्रयत्नपूर्वक विचारांचा झाडू परत परत मागे जात फिरवायलाच लागणार , अगदी सगळी धूळ संपेपर्यंत, परत मन पहिल्यासारखेच प्रसन्न आणि माझ्या घरासारखेच लख्ख चकाचक होईपर्यंत !!

शिल्पा

Group content visibility: 
Use group defaults

एक विचारी केरसुणी हवीच रोजचा रोज कचरा साफ करायला!
उत्तम विचारशैली,खरच आपल्या मनातील विकारांचा कचरा स्वच्छ करायला एक सद्गुणांची केरसुणी हवीच!
पुलेशु!

छान लिहिलंय

>> सोपे नाहीये पण वाटते तितके अवघड नाही
सोपे/अवघड हे किती व कसला कचरा आहे (पक्षी नको असलेले विचार) त्यावर अवलंबून. अपेक्षांची कवाडे कधी कधी नकळत उघडी राहतात, ताज्या हवेच्या अपेक्षेने. आणि कुठूनशी अनपेक्षित वावटळ येते, भस्सकन सगळ्या घरभर कचराच कचरा Happy