जनरेशन गॅप---( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 19 June, 2021 - 10:52

( वीक एंड लिखाण )

आज एक गंभीर विषय हाताळायचा प्रयत्न करतोय. या विषयाचे मूळ चांगल्या भावनेतच आहे. आई वडील यांना आपल्या मुलांची काळजी वाटणे स्वाभाविकच आहे. प्रश्न निर्माण होतात ते अतिरेकांमुळे. पालकांना, वोशेषतः आईला खूपच काळजी असते आपल्या मुलांची. त्यापोटी वेगवेगळ्या सुचना देणे आहोरात्र चालू असते. मुलांनी खावे काय, खेळावे काय,  कपडे कोणते घालावेत, काय आणि कसे बोलावे, अशा अनेक गोष्टीत सुचनांचा भडिमार चालू असतो.
मी अनेक घरात यामुळे कलह झालेले पाहिले आहेत. जुन्या पिढीने जाणीवपूर्वक थोडे लक्ष कमी करायला पाहिजे. तरूण पिढीला अशा पावलोपावली सुचना दिलेल्या आवडत नाहीत. खरे म्हणजे प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगू द्यायला हवे. आता एखाद्या मुलाला आपला जोब बदलायचा असेल तर तर तो विचार करूनच निर्णय घेईल ना! तेथे पण सल्ला द्यायची काय गरज?
या संबंधात घरचेच कांही किस्से सांगतो. माझा मुलगा सातवी आठवीला असेल. तो शाळेत सायकलीवर जायचा. त्याची आई घराच्या फाटकात जाऊन त्याला टाटा करायची आणि बाळा हळूच रस्त्याच्या डाव्या बाजूने  सायकल चालव अशी न चुकता सुचना द्यायची. एकदा मुलगा आईची फिरकी घेत म्हणाला की आई मी मोठा झाल्यावर विमान कंपनीत  पायलट झालो तरी सांगशील की विमान हळू चालव आणि डाव्या बाजूने चालव. असेच माझ्या मुलीनेही आईबरोबर केले. आई सांगत होती की लहानपणी आम्ही किती गरीबीत दिवस काढले ते. मी पीयुसीला असताना एका मिणमिणत्या चिमणीच्या उजेडात आभ्यास केला आहे. मराठवाड्यात चिमणी म्हणजे एक प्रकारचा केरोसिनचा दिवा ज्याची ज्योत प्रकाश देते पण त्याला काच लावायची सोय नसते. हे मुलीने ऐकून तर घेतले. पण एकदा आई अशी बोलल्यावर चक्क हसू लागली, मुलगी तेंव्हा जेमेतेम पाचवीत असेल. तिला दटावून हसायला काय झाले असे विचारता तिने मजेशीर दोन उत्तरे दिली. ती म्हणाली की तुझ्या लहानपणी गरीबी होती, घरात विजेचे कनेक्शन नव्हते म्हणून तुला तसे रहाणे भाग होते. आता आपल्या घरी लाईट आहे, अर्थिक परिस्थिती पण चांगली आहे. आम्ही कशाला तसे रहायचे? आणि दुसरा याहूनही मजेशीर प्रतिसाद म्हणजे ती सरळ म्हणाली तिच्या आईला की आम्ही बहीण भावांनी खूप आभ्यास करावा म्हणून या गोष्टी तू पुन्हा पुन्हा सांगतेस. हा प्रतिसाद ऐकून मी तर आवकच झालो. मुलांना मग ते लहान असोत की मोठे, आई वडिलांना वाटते त्या पेक्षा जास्त जाण/समज असते.
आई वडिलांनी आम्ही तुम्हाला किती कष्टाने मोठे केले, किंवा नऊ महिने पोटात भार वाहिला असे वारंवार बोलायचे टाळावे. हे सर्व लिहायचे कारण म्हणजे मुले मोठी झाल्यावर विचारला नसताना सल्ला देऊ नये. त्यांना असा सल्ला बिलकुल आवडत नाही. आधी कांही दिवस आदरापोटी ते गप्प बसतील पण केंव्हा तरी स्फोट होतोच.
माझे स्वतःचे मत आहे की मुलांनी विचारले तरच दोन तीन पर्याय सुचवावेत. आणि मुलांना पर्याय निवडण्याची मुभा द्यावी जेणे करून जनरेशन गॅप थोडा कमी होईल .हा मला सुवर्णमध्य वाटतो. एका घरात फक्त या कारणाने मुलगा दुरावला आणि त्याने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. ही घटना पाहिल्या नंतर माझ्या डोक्यात विचार चक्र सुरू झाले. या मंथनातून तयार झालेली कविता खाली पेश करतोय.

तुम्हीच तर ठरवायचं

जाईच्या मांडवात
का काँक्रिटच्या तांडवात?
शंभर कौरवात का
फक्त पाच पांडवात?
कुणी कुठं रहायचं?
तुम्हीच तर ठरवायचं

पिझ्झा कोकचा आहार
का बर्गर चिप्स बहार
मऊ भात पिठल्यावर
गावरान तुपाची धार
पोट कसं भरायचं?
तुम्हीच तर ठरवायचं

रोज दारू पिण्यात
अन् बेहोष जगण्यात
का विठूच्या भजनात
देह भान विसरण्यात
सूख कशात बघायचं?
तुम्हीच तर ठरवायचं

दीर्घायुष्यी बनणे
अन् पिकता पान गळणे
दवबिंदूसमान थोडंच
पण चमकत चमकत जगणे
ध्येय काय ठेवायचं?
तुम्हीच तर ठरवायचं

स्मरायचाय गुरूमंत्र
की जुनेरं प्रेमपत्र
जगत जगत शेवटचं
आयुष्याचं सत्र
कशात किती रमायचं
तुम्हीच तर ठरवायचं

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

<< विचारला नसताना सल्ला देऊ नये. >> हे निव्वळ मुलांनाच लागू नाही तर बायकोच्या बाबतीत पण मी तसाच प्रयत्न करतो. Lol

<< एका घरात फक्त या कारणाने मुलगा दुरावला आणि त्याने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. >>
माझ्या मते तरी ही खरं तर चांगली गोष्ट आहे आणि मी स्वत: त्याच मताचा आहे की लग्नानंतर मुलांनी स्वतंत्र राहावे.

कविता आवडली Happy
आणि येस्स, सहमत !
माय लाईफ माय चॉईस .... मलाही मागे यावर लिहायचे होते, पण राहून गेले