सांजवाती

Submitted by _आदित्य_ on 17 June, 2021 - 22:47

चांदणे मंदावले इकडे दिशा अंधारल्या !
आणि तिकडे वक्षकाठी सांजवाती लागल्या?

दुःख निजले काल होते जे सुखाने अंतरी,
जागले ते आज आणिक पापण्या पाणावल्या !

लेखनातूर लेखणीही स्तब्ध झाली तेधवा,
जेधवा त्याने सखीला चंद्रमाळा घातल्या !

काय मी केले असे कि प्राण झाला पोरका?
ह्या फुलासाठीच ना मी त्या कळ्या झिडकारल्या !

जाणतो मी जीवनी ह्या शाश्वती कसली नसे !
रंगण्यापूर्वीच गोष्टी आमुच्याही भंगल्या !

फुल ते कोमेजता का त्यास पाणी द्यायचो?
व्यर्थ मी बहुतेक त्याच्या पाकळ्या कुरवाळल्या !

संत मी झालो तरी मज खंत ही वाटेल रे,
ज्यास नव्हते मोल त्यास्तव स्वप्नओव्या जाळल्या!

आज इकडे जीवनाला गंध येतो मृत्यूचा !
आणि तिकडे वक्षकाठी सांजवाती लागल्या..
आणि तिकडे वक्षकाठी सांजवाती लागल्या !

Group content visibility: 
Use group defaults