बीबी ऑर नॉट बीबी ?

Submitted by Theurbannomad on 17 June, 2021 - 14:53

तुम्ही कधी डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट किंवा बीबीसी अर्थ ह्या वाहिन्यांवर ‘प्राईड कॅप्चरिंग’ बघितलं आहे का?? मला कल्पना आहे काही लोकांनी तरी नक्कीच बघितलं असेल!! ‘प्राईड कॅप्चरिंग’ म्हणजे एक किंवा दोन नर सिंहांनी (मेल लायन) दुसऱ्या एका सिंहाच्या कळपातील एक किंवा दोन नर सिंहांचा (मेल लायन) पराभव करून त्या कळपावर पर्यायाने त्या कळपातील मादी सिंहांवर (फिमेल लायन) आपलं प्रभुत्व प्रस्थापित करणे ह्याला ‘प्राईड कॅप्चरिंग’ म्हणतात!! प्राईड कॅप्चर केल्यावर नर सिंह सगळ्यात पहिले कुठली गोष्ट करतो माहितीय?? तो आधीच्या नर सिंहांपासुन झालेले जे लहान लहान पिल्लं असतात त्यांना निर्दयतेने मारून टाकतो!! उद्देश एकच मादी सिंह पुन्हा प्रजनन करण्यास तयार होईल आणि त्याची स्वतःची वंशावळ पर्यायाने लॉन्ग टर्म प्रभुत्व प्राईडमध्ये सुरु होईल. कधीकधी हे ‘प्राईड कॅप्चरिंग’ फार ब्रुटल असतं. अर्थात तिथे जंगलात मानवी कायदे, नियम चालत नाहीत तिथे जंगलाचा एकमेव नियम चालतो ‘बळी तो कान पिळी!!’ राजकारणात देखील आपण थोड्याबहुत प्रमाणात हे ‘प्राईड कॅप्चरिंग’ झालेलं बघतोच की!! आधीच्या सरकारने नियुक्त केलेले अधिकारी नविन सरकार सत्तेत आल्यावर पूर्णपणे बदलून टाकतात. पण ह्या संदर्भात आपण जेंव्हा इस्त्रायलच्या परिपेक्षतेत बघतो तेंव्हा गोष्टी इतक्या सहज साध्या नसतात. काल म्हणजेच नेफ्ताली बेनेट ह्यांनी शपथविधी घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसात गाझा पट्टीत इस्त्रायलने केलेल्या नविन हल्ल्यांना ह्याच परिपेक्षेत बघावे लागेल.

हे सगळं समजुन घ्यायचं असेल तर मुळात इस्त्रायलमधली सामाजिक उतरंड आणि त्यांची लोकशाही व्यवस्था समजून घ्यावी लागेल. इस्त्रायल हे ज्युईश राष्ट्र आहे, ज्याची अधिकृत राष्ट्रीय विचारधारा ‘झायोनिस्ट’ मुव्हमेंट वर आधारित आहे, म्हणजेच ‘झायोनिझम’ हा इस्त्रायल ह्या देशाच्या अस्तित्वाचा गाभा आहे. १९४८ साली जेंव्हा इस्त्रायल राष्ट्र म्हणून उदयास आले तेंव्हा जगभरातील ज्यू लोकांसाठी इस्रायलचे दरवाजे सताड उघडे होते, आजही बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे हजारो वर्षांपूर्वी रोमन अत्याचाराने आपल्या मायभूमीतून युरोप, अमेरिका, इंग्लड, आशिया इथे परागंदा झालेली ज्यू लोकं त्यांच्या मायभूमीत परतु लागली. इतक्या वर्षांच्या अत्याचारामुळे अर्थातच एक पंथनिरपेक्ष लोकशाही सुदृढ व्यवस्था त्यांना त्यांच्या नवीन इस्त्रायलमध्ये हवी होती. अशी मान्यता आहे की किंग डेव्हिड किंवा मग त्यानंतर आलेला त्याचा मुलगा सॉलोमन ह्याच्या काळापासून ज्युईश लोकांमध्ये १२ टोळींची मान्यता आहे. त्या १२ टोळीचे १२० लोकं सॉलोमन काळातील ‘टेम्पल माऊंट’ मधील एका मोठ्या दरबारात ज्याला ‘बिग क्नेसेट’ किंवा ‘ग्रेट असेम्ब्ली’ म्हणायचे तिथे एकत्र येऊन न्यायनिवाडा किंवा टोळ्यांमधील आपापसातील प्रश्न सोडवायचे. ही टोळी परंपरा पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. अरब राष्ट्रांमधील सौदी, युएई, बहरीन, कतार, ओमान इथेतर अगदी १९३५ पर्यंत टोळ्या अस्तित्वात होत्या. स्वतंत्र इस्रायलची लोकसभा ज्याला ‘क्नेसेट’ म्हणतात तिथे देखील पुरातन सॉलोमनकालीन प्रथेप्रमाणे १२० जागांचीच नियुक्ती करण्यात आली म्हणजे इस्त्रायलच्या लोकसभेत १२० जागा ठेवण्यात आल्या. आता पुरातन ज्युईश लोकांची मानसिकता अशी होती की समाजातील सर्व घटकांना क्नेसेटमध्ये प्रतिनिधित्व मिळायला हवं त्यामुळे १२ टोळ्यांच्या प्रत्येकी १० टक्क्यांच्या हिशोबाने जागांची विभागणी करण्यात आली असावी. मॉडर्न क्नेसेटमध्ये मतांच्या टक्केवारीनुसार त्या पक्षाला जागा मिळतात म्हणजे समजा बिबींच्या ‘लिकुड’ पक्षाला फक्त १०% मतं मिळाली तर त्यांचे पहिले १२ सर्वाधिक मताधिक्य मिळविलेले सदस्य क्नेसेटमध्ये निवडून जातील. फक्त अट हीच होती की कुठल्याही पक्षाला ३.२५% च्या वर मतं मिळायलाच हवी त्याच्याशिवाय त्या पक्षाच्या सदस्यांना क्नेसेटमध्ये प्रवेश नसेल. त्याचबरोबर एक मोठा बदल १९९६ साली करण्यात आला ज्यानुसार पंतप्रधान हे थेट जनतेतून निवडले जाऊ लागले. आणि अशा प्रकारे जनतेतून थेट निवडून आलेले पहिले पंतप्रधान ठरले होते बेन्यामिन नेतन्याहू!!

वर आपण बघितलं की इस्त्रायल हे ज्युईश डेमोक्रॅटिक राष्ट्र आहे त्यामुळे तिथे प्रत्येक घटकांना अगदी अरबांना सुद्धा क्नेसेटमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे. मोटामोटी विचार केला तर इस्त्रायलमधील लोकांचे ठोबळ मानाने असे गट पडतात ज्युईश, अरब, उजवे, डावे, धार्मिक, सेक्युलर, अश्क्नाझी (युरोपातून आलेले ज्यू) मिझराही (मध्यपूर्वेतून आलेले ज्यू) हरेदी (कडवे कट्टर अल्ट्रा ऑर्थोडॉक्स ज्यू) जेरुसलेममधील नागरिक, तेल अव्हीव मधील नागरिक, किबुत्स किंवा मग सेटलमेंट आणि छोट्या शहरातील नागरिक!! नागरिकांच्या ह्या गटानुसार लोक त्या त्या राजकीय विचारांच्या पक्षाला मतदान करतात. इस्त्रायलसारख्या अत्यंत छोट्या देशात १५ छोटेमोठे राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे इस्त्रायलच्या ७३ वर्षांच्या इतिहासात कुठल्याही एका राजकीय पक्षाला पूर्ण बहुमताच्या ६१ जागा कधीही जिंकता आलेल्या नाहीत. त्यामुळे इथे नेहमीच आघाड्यांचेच सरकार असते. इस्त्रायलच्या लोकसंख्येचा विचार केला ७३.९% जनता ज्युईश आहे, तर २१.१% लोक अरब आहेत. अरब लोकांचा विचार केला दोन राजकीय पक्ष त्यांचं प्रतिनिधित्व करतात.

Israeli Population Donut Chart
१: ‘द जॉईंट लिस्ट’ जी अरब आणि अरब ज्यू कम्युनिस्ट लोकांची आघाडी आहे ज्यात तीन राजकीय पक्ष येतात ‘हदश, बलाद आणि तलाल’ आणि ह्या आघाडीचे दोन मोठे नेते आहेत ‘आयमन ओदेह’ आणि ‘अहमद तेबी’. ही आघाडी गेल्या ७३ वर्षात कधीही कुठल्याही स्वरूपात सत्तेत आलेली नाही. त्यांचा मूळ अजेंडा अरब लोकांच्या प्रश्नावरून सरकारसोबत संघर्ष करणे, विरोध दर्शविणे आणि द्वि राष्ट्रसिद्धान्ताच्या आडून स्वतंत्र पॅलेस्टाईनचा विषय इस्त्रायली क्नेसेटमध्ये उचलत राहणे.

२: ‘राम’ पक्ष (नावात राम असला तरी हा पक्ष मुस्लिम पक्ष आहे) ज्याचं नेतृत्व करतात ‘मन्सूर अब्बास’. बऱ्यापैकी कट्टर असलेला हा मुस्लिम पक्ष इस्त्रायलच्या दक्षिणेकडील ‘नेगेव्ह’ ह्या वाळवंटी प्रांतातील मुस्लिम मतदारांचे प्रतिनिधित्व करतो. हा पक्ष जॉईंट लिस्टपेक्षा बऱ्यापैकी व्यावहारिक आहे आणि सत्तेत बसलेल्या पक्षांशी वाटाघाटी करण्यात ह्या पक्षाला कमीपणा वाटत नाही. बेनेट ह्यांच्या सरकारमध्ये हा पक्ष सामील आहे.

आता इस्रायलमधील ज्युईश लोकांची विभागणी बघुयात. इस्रायलमधील एकूण ज्यू लोकसंख्येच्या १४% लोक हरेदी (कडवे कट्टर ऑर्थोडॉक्स ज्यू) आहेत, १६% धार्मिक (हरेदींपेक्षा थोडे कमी कट्टर) २५% परंपरावादी आणि २५% सेक्युलर आणि उरलेले ह्या कशातही नसलेले कुंपणावरील ज्यू आहेत. १४% हरेदीमध्ये अश्क्नाझी (युरोपातून आलेले ज्यू) मिझराही (मध्यपूर्वेतून आलेले ज्यू) ह्यांचा समावेश होतो बरं का!! तर हरेदी लोक प्रचंड कट्टर, धार्मिक असतात. त्यांना पॅलेस्टाईनचे अस्तित्व देखील मान्य नसते. इतकेच कशाला ‘जेरुसलेम’ मधील ‘अल अक्सा’ मस्जिद परिसरातील ‘डोम ऑफ रॉक’ भागावर त्यांचा दावा असतो आणि ह्याच ‘डोम ऑफ रॉक’ वर पुन्हा एकदा ‘टेम्पल माऊंट’ उभे करण्याचा त्यांचा मानस असतो. ह्या हरेदीमध्ये दोन पक्ष आहेत

Israeli Jewish population Donut Chart
१: मिझराही पंथीय ‘शास’ ज्याचं नेतृत्व ‘अरेह डेरी’ करतात. ह्या पक्षाची एकही स्त्री सदस्य क्नेसेटमध्ये निवडून गेलेली नाही. मोठे परिवार आणि स्त्रियांना चूल आणि मूल इथपतच अधिकार असण्यावर ह्यांचा भर असतो.

२: अश्क्नाझी पंथीय ‘याहदत होतेराह’ अर्थात ‘युनायटेड टोराह ज्युडिझम’ ह्याचे नेतृत्व ‘याकोह लित्जमन’ आणि ‘मोशेह गफनी’ करतात. हरेदी लोकांना सैन्यातील बंधनकारक सहभागातून धार्मिक कारणांमुळे सुट देण्यात यावी, शुक्रवारी संध्याकाळी ‘शब्बात’च्या दिवशी संपूर्णपणे सुट्टी असावी ह्याचा ही पुरस्कार हे लोक करतात.

धार्मिक उजव्या ज्यूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांवर एकदा नजर टाकुयात

१: ‘हात्जियोनुत हदातीत’ अर्थात ‘रिलिजियस झायोनिस्ट’ पक्ष ज्याचे नेते आहेत ‘बेझालेल स्मोत्रीच’

२: ‘यामिना’ ज्याचे नेते आहेत बिलेनियर व्यावसायिक आणि नंतर राजकारणाकडे वळलेले नवनियुक्त पंतप्रधान ‘नेफ्ताली बेनेट’

हे धार्मिक उजवे पक्ष हे एकमेकांत पक्षांचं मर्जर, डीमर्जर करून वेगवेगळी नावं अधूनमधून धारण करत असतात पण त्यांचा मुख्य अजेंडा हा वन स्टेट सोल्युशन अंमलात आणणे, सेटलमेंट्सशी संख्या मोठ्याप्रमाणात वाढविणे ह्यावर त्यांचा भर असतो.

उजव्या मध्यममार्गी राजकीय गटात एक पक्ष येतो तो आहे ‘येझरेल बेयटेनो’ ज्याचे नेते आहेत ‘अव्हिग्डोर लिबेरमन’ जे मुख्यत्वे रशियामधून आलेल्या रशियन ज्युईश इमिग्रण्टस (आश्रित) लोकांचे प्रतिनिधित्व करतात. हा गट कट्टर हरेदी गटाचा विरोधक आहे पण राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर मात्र हा पक्ष धार्मिक उजव्या पक्षांसारखीच भूमिका घेतो.

त्यानंतर येतात डावे आणि लेबर पक्ष ज्यात दोन पक्ष आहेत

१: ‘निताझन होरोवेट्झ’ ह्यांचा ‘मेरेत्ज’
२: ‘मेरेव्ह मिशेएली’ ह्यांची ‘लेबर’ पार्टी

डावे जशी जगभर परंपरावादी भूमिका घेतात तशीच भूमिका हे दोन्ही डावे आणि लेबर पक्ष घेतात. ६०-७० च्या दशकात ह्या लेबर पक्षांचा प्रचंड दबदबा इस्त्रायलमध्ये होता. लेबर पक्षाच्या नेत्या असून सुद्धा १९७३ च्या ‘योम किपुर’ युद्धात तत्कालीन पंतप्रधान ‘गोल्डा मेयर’ ह्यांनी जी राष्ट्रवादी भूमिका घेतली होती ती अचंबित करणारी होती पण त्यानंतर मात्र डावे पक्ष सतत राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात भूमिका घेऊ लागले आणि राष्ट्रीय राजकारणातून बाहेर फेकले गेले. आता डावे पक्ष ‘तेल अव्हिव्ह’ आणि ‘किबुत्झइम’ पुरते मर्यादित राहिले आहेत.

त्यानंतर येतात इस्रायलमधील दोन सगळ्यात मोठे पक्ष पहिला उजवा मध्यममार्गी पक्ष ‘लिकुड’ ज्याचे नेते आहेत इस्रायलचे सगळ्यात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले माजी पंतप्रधान ‘बेन्यामिन नेतन्याहु’ उर्फ बिबी आणि दुसरा मध्यममार्गी लिबरल पक्ष ‘येश अतिद’ ज्याचे नेते आहे नवीन सरकारमधील दुसरे सगळ्यात मोठे नेते ‘याईर लॅपिड’

ही सगळी पार्श्वभूमी सांगायचे कारण म्हणजे हे समजून घेतल्याशिवाय सध्या इस्त्रायलमध्ये जे राजकीय भूकंप झाले आणि त्याचे धक्के अजुन किती दिवस आणि कशाप्रकारे बसतील ह्याची कल्पना येणार नाही. भारतात उजवे आणि डावे राजकीय पक्ष किंवा आघाड्या ह्यांची संकल्पना अगदीच स्पष्ट आणि स्वच्छ आहे. पण इस्त्रायलमध्ये ती तितकी सोपी नाही. म्हणजे उदा द्यायचे झाले तर ‘गे मॅरेज’ आणि ‘एलजीबिटी राईट्स’ ला समर्थन करणारा ‘लिकुड’ हा उजवा पक्ष असतो आणि ‘खुल्या अर्थव्यवस्थेचं’ समर्थन करणारा ‘लेबर पक्ष’ हा डावा असतो. मुळात इस्त्रायलमध्ये ‘उजवे’ आणि ‘डावे’ गट हे त्यांच्या ‘जेरुसलेम’ वरील भूमिकांमुळे आहे आणि त्यांच्या ‘भौगोलिक’ विचारसरणीवर ठरतात. ‘नेफ्ताली बेनेट’ पंतप्रधान व्हायच्या आधी बिबींनी क्नेसेटमध्ये ३५ मिनिटं भाषण दिलं त्यात नविन होऊ घातलेली आघाडी कशी अनैसर्गिक आहे आणि त्यांच्या मर्यादा कशा उघड आहेत ह्यावर विस्तृत आणि मार्मिकरित्या बोट ठेवलं. त्यांचा आणि बहुतांश अभ्यासकांचा कयास हाच होता की अरब, लेफ्ट, लिबरल ह्यांचा पाठिंबा घेणारे धार्मिक उजव्या ‘यामिना’ पक्षाचे नेते नेफ्ताली बेनेट राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर आणि विशेषतः इराण मुद्द्यावर कसे काय बिबींइतकी कडक भूमिका घेऊ शकतील?? माझं मत मी श्री विष्णु कुंभार ह्यांच्या वॉल वर मांडलं होतं ते असे होते “इस्त्रायलमध्ये कुठलाही पक्ष किंवा नेता Zionist विचारधारेला साईडलाईन करून राजकारण करूच शकत नाही. In fact Zionism हा इस्त्रायलचा राष्ट्रीय विचार आहे. नफ्ताली देखील वेगळा नाहीय, पण एक गोष्ट कदाचित इस्त्रायलच्या इतिहासात पहिल्यांदा होतेय की कुठल्याही उजव्या ज्युईश पक्षाच्या नेत्याने क्नेसेटमध्ये बहुमत मिळवायला अरब पक्षांची मदत घेतलीय तेच अरब ज्यांचं अस्तित्वच Anti Zionism वर अवलंबून आहे. त्यामुळे आऊट अँड आऊट नफ्ताली लुकीड म्हणजेच बिबींची जी भूमिका आहे तशी थेट भूमिका कितपत मांडू शकतील ह्याबद्दल मला शंका आहे. आणि समजा त्याने तसा प्रयत्न केलाच तर डावे/अरब आणि मध्यममार्गी सेक्युलर पक्ष त्यांना ते संख्याबळाचा धाक दाखवून करू देणार नाहीत, आणि अति उजवे किंवा ल्युकिड/बिबी त्याला Anti Zionist भूमिका इतक्या सहजा सहजी घेऊ देणार नाही. Its tough and interesting time ahead for Israel n Middle East region.”

सगळ्या अँगलनी आणि एकूण नेफ्ताली बेनेट ह्या व्यक्तिमत्वाचा थोडा फार वेध घेतला तर काही गोष्टी थोड्याफार स्पष्ट होऊ शकतात. बेनेट हे पूर्णपणे बिबींच्या हाताखाली तयार झालेले नेते आहे. तसं पाहिल्या गेलं तर बेनेट ही बिबींसारखे सिझन्ड पॉलिटिशियन नाहीत. पण बेनेट हे बिबींइतकेच किंबहुना काकणभर सरस राष्ट्रवादी राजकारणी आहेत. ते स्वतः इस्राइलच्या सर्वात घातक फोर्स ‘सैरत मटकल’ मध्ये कमांडर देखील राहिले आहेत. त्यानंतर पुढे ते बिलेनियर उद्योगपती देखील होते. एक असं थोडंसं अंकनव्हेंशनल मटेरियल म्हणजे बेनेट आहे. ते पंतप्रधान झाल्यावर भारतात काही लोकांनी बेनेट म्हणजे तिथले योगी अश्या उपमा देखील त्यांना देऊन झाल्या आहेत. पण वर म्हटले तसे ते इतके सोपी नाही. इस्त्रायलच्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तर ज्यू-अरब हा शेकडो वर्ष भिजत घोंगडं झालेला प्रश्न दोन अंगानी सुटू शकतो तो म्हणजे

१: धार्मिक अंगाने ज्यात जेरुसलेमचा तिढा सोडवावा लागेल.

२: भौगोलिक अंगाने ज्यात ज्युईश सेटलमेंट, अनएक्सेशन, आणि टू किंवा वन स्टेट सोल्युशन हा प्रश्न सोडवावा लागेल.

ज्यू-अरब प्रश्न हा भौगोलिक, राजकीय ह्यापेक्षाही ‘धार्मिक’ जास्त आहे. त्यामुळे ह्या प्रश्नावर म्हणजेच जेरुसलेम बाबत बेनेट काय भूमिका घेतात ह्यावरून त्यांचं देशांतर्गत भवितव्य ठरेल. बेनेट ह्यांनी पंतप्रधानपदावर आरूढ झाल्याझाल्या काय केलं असेल?? कट्टर उजव्या ‘ज्युईश’ गटाच्या एका मोर्चाला ‘पॅलेस्टिनी अरब नागरिकांच्या वस्तीतुन मोर्चा काढण्यास परवानगी दिली. ही परवानगी दिल्यावर लगेच ‘हमास’कडुन मोर्चे निघाले तर ह्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी आली. ह्या धमकीला भीक न घालता ते ज्युईश मोर्चे अरब वस्तीतून निघाले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हमासने इस्त्रायलच्या दक्षिण भागात फुग्यांना बांधून स्फोटकं सोडली ज्याने इस्त्रायली शेतीचं नुकसान केलं. ह्यापूर्वी जेंव्हा असे हल्ले व्हायचे तेंव्हा बेनेट ह्यांनी बिबींच्या सरकारवर ह्याला प्रत्युत्तर न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याच बेनेट ह्यांनी अजिबात वेळ न दवडता बॉम्बरूपी फुग्यांना प्रत्युत्तर म्हणून थेट गाझा पट्टीवर हमासच्या छावणीवर रॉकेट हल्लाच केला तेही बिबी-हमास ह्यांनी केलेल्या शांतता समझोत्याला धुडकावून लावत!!

१५ जुनला म्हणजे नवीन पंतप्रधान बेनेट आरूढ झाल्यानंतर दोन दिवसांनी हजारोंच्या संख्येत ज्युईश मॉब ‘अल अक्सा’च्या ‘दमास्कस गेट’ जवळ जमा झाले. कारण होतं जेरुसलेमच्या रियुनिफिकेशन डे चं सेलिब्रेशन!! अशा देखील बातम्या आल्या की ‘दमास्कस गेट’ परिसरातून ज्युईश लोक जमा होण्याआधी इस्त्रायली पोलिसांनी अरब लोकांना हुसकावून लावले. १७ अरब लोकांना अटक केली आणि ह्यात ३३ लोक जखमी झाले. सत्तेतील सगळ्यात मोठे भागीदार ‘येश अतिद’ पक्षाचे सर्वोच्च नेते ‘याईर लॅपिड’ ह्यांनी ह्या दोन्ही मोर्चांचा निषेध व्यक्त केला आहे!!

जेरुसलेम प्रश्नानंतर दुसरा मोठा प्रश्न आहे तो वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेम भागातील इस्त्रायली सेटलमेंट्सचा!! भर अरब वस्तीत २५-३० फूट उंच भिंत बांधून इस्त्रायली वस्ती बांधण्याची कल्पना सन २००० साला पासून सुरु आहे. ह्या सेटलमेंट्स वर देखील लॅपिड आणि बेनेट ह्यांच्यामध्ये थोडे मतभेद आहेत तर अरब आणि लेबर पक्ष आणि पंतप्रधान बेनेट ह्यांच्यामध्ये तीव्र मतभेद आहेत. बेनेट हे पुढील २ वर्ष पंतप्रधान असतील त्यानंतर त्यांना लॅपिड ह्यांच्याकडे पदाचं हस्तांतर करायचे आहे. हे ट्रान्सिशन कितपत स्मूथ होईल ह्याबद्दल अनेकांना शंका आहे.

सगळ्यात कमी चर्चेला आलेला मुद्दा हा इराण-इस्त्रायल प्रश्न हा आहे. ह्याचं कारण हे की बिबी स्वतः आणि त्यांचा पक्ष, त्यांचे समर्थक हे फार आक्रमकपणे एक मुद्दा मांडतात की इराणपासून आणि एकूणच कुठल्याही अरब मुस्लिम आक्रमकांपासून इस्त्रायलला कुणी सुरक्षित ठेवू शकत असेल तसेच इस्त्रायलला कुणी शांततापूर्ण भवितव्य देऊ शकत असेल ते आहेत बेन्यामिन नेतन्याहु!! नेफ्ताली बेनेट ह्यांना जर स्वतःला बिबींपेक्षा उजवे (उत्तम ह्या अर्थाने) नेते म्हणून प्रोजेक्ट करायचे असेल तर त्यांना इराण मुद्द्यावर थेट आणि डिसायसिव्ह भूमिका घेणे भाग आहे. म्हणजे कोणती तर ओल्ड ज्युईश भुमिका ‘Attack is the best defence’ ही भुमिका घ्यायची झाली तर इराणच्या आण्विक कार्यक्रमावर इस्त्रायल ला स्वरक्षणाच्या टॅग लाईन खाली हल्ला करावा लागेल!! बिबींच्या प्लॅन ला मूर्त दिल्याशिवाय बेनेट स्वतःला बिबींइतकेच किंवा काकणभर अधिक कणखर नेते म्हणून कसे प्रस्थापित करू शकतील?? नॉर्मलायझेशन करार आणि पडद्यामागच्या हालचाली ह्याने ग्राऊंड बेस तर तयार झाला आहे प्रश्न हा आहे की बेनेट प्लॅन इम्प्लिमेंट करणार की नाही??

पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे इस्त्रायलमध्ये २ सिंहांनी मिळून वृद्ध पण तितक्याच ताकदवर सिंहाची प्राईड कॅप्चर तर केली आहे, ह्यावेळी मुकाबला वृद्ध सिंहासाठी थोडा कठीण होता कारण प्रश्न एकच होता की बिबी ऑर नॉट बिबी?? त्यात सलग १२ वर्ष बिबी सत्तेत राहिल्यामुळे नॉट बिबी स्वर मोठा ठरला!! पण ‘प्राईड कॅप्चरिंग’ नियमानुसार नविन किंगला जुन्या किंगचे काही निर्णय उखडून फेकावे लागतील त्याची सुरुवात कालच्या गाझा पट्टीवरील हल्ल्याने झाली असे मानण्यास वाव आहे. फक्त नवीन किंग प्राईडचा विश्वास पूर्णपणे काबीज करायला कुठपर्यंत जातो हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. अर्थात वाट सोपी नाहीय अंतर्गत खाचखळगे तर आहेच पण त्याचबरोबर कधी नव्हे ते अरबांचा अंतर्गत उठावाचा प्रश्न देखील आ वासुन उभा आहे. नीट पावलं टाकली नाहीत तर कपाळमोक्ष निश्चित आहे, आणि हे त्या ७३ वर्षीय वयोवृद्ध सिंहाला चांगलं माहितीय कारण त्याला ह्याचा पुरेपूर अनुभव आहे. त्यामुळे क्नेसेटमध्ये ‘मी पुन्हा येईन आणि लवकरच येईन’ हे बिबींचे शब्द मोठ्याप्रमाणात घुमले ते उगीच नाही. So as always interesting time ahead in west Asia, keep an eye on it!!

( तळटीप - हा लेख माझ्या एका मित्राबरोबर अभ्यासाअंती तयार केलेला लेख आहे. यात व्यक्त केलेली मते आमची वैयक्तिक मतं आहेत...वाचकांना कदाचित काही मुद्दे न पटण्याची शक्यता आहे, पण विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपण सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे ही विनंती. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरपूर अभ्यास करून लिहीलेला आहे हा लेख. ओळख मस्त झालीये. जसे तुम्ही म्हटले आहे की ही तुमची वैयक्तीक मते आहेत त्यामुळे त्याबद्दल मी काही जास्ती बोलत नाही. पण ही जी आघाडी झालीये ती फक्त बीबी सत्तेत नको यामुळे झालेली दिसते.

त्यात ते २ - २ वर्षांनी सत्तांतर वाचल्यावर मला एकदम युपी मधल्या मायावती आणि भाजपाच्या राज्याची आठवण झाली.

@ धनि

खरा issue हाच आहे की २ वर्षांनी काहीही खळखळ न करता पंतप्रधान पद हस्तांतरित होईल का... आपल्याकडे देवेगौडा सरकारचं उदाहरण आहेच....शिवाय २ वर्षात बीबी नक्की काय काय करतील हेही सध्या कोणाला ठाऊक नाहीये....

एकूण काय, तर राजकारणाचे डाव उलटसुलट पडतायत आणि त्यात पॅलेस्टिनी अरब होरपळले जातायत....

०-७० च्या दशकात ह्या लेबर पक्षांचा प्रचंड दबदबा इस्त्रायलमध्ये होता. लेबर पक्षाच्या नेत्या असून सुद्धा १९७३ च्या ‘योम किपुर’ युद्धात तत्कालीन पंतप्रधान ‘गोल्डा मेयर’ ह्यांनी जी राष्ट्रवादी भूमिका घेतली होती ती अचंबित करणारी होती

>>>> हे नीटसं कळालं नाही.

त्यात पॅलेस्टिनी अरब होरपळले जातायत >>>> याबद्दल अजुन लिहा. नक्की कशा प्रकारे त्रास होतोय, कारण हमास पण काही कमी नाही ना.

@ आसा

Yom Kippur युद्ध जेव्हा झालं, तेव्हा सत्तेत असलेली लेबर पार्टी इस्राएलच्या मवाळ पक्षांपैकी एक समजली जाई. या पार्टीतले नेते अरब आणि जहाल ज्यू लोकांप्रमाणे सतत युद्धखोर भाषा करणारे नव्हते, तर काही प्रमाणात उदारमतवादी होते. पण या युद्धाच्या वेळी गोल्डा मायर यांनी प्रखर राष्ट्रवादी भूमिका घेऊन अमेरिकेलाही आपल्या बाजूने युद्धात उघडपणे उतरायला भाग पाडलं आणि ज्यू लोकांच्या कट्टर Zionism ला पाठिंबा दिला. ही त्यांची भूमिका आधीच्या लेबर पक्षाच्या भूमिकेविरुद्ध होती.

हमास मुळात प्रबळ होण्यामागे इस्रायली लोकांची टोकाची भूमिका आहे. जरी पॅलेस्टिनी नेते आणि जनता आज हमासमागे उभी असलेली दिसली तरी पूर्वी असं नव्हतं...पण ज्यू लोकांच्या वस्त्या जशा अरब भागात वाढत गेल्या तसे अरब सुद्धा अधिकाधिक जहाल होत गेले.

Submitted by Theurbannomad on 18 June, 2021 - 17:15

>>>> धन्यवाद Happy
तुमचं लेखन आवडतं नेहमीचं Happy