बेत्ताडा जीव (लाईफ इन माउंटन्स ) सकाळ पेपर्स मध्ये प्रसिद्ध झालेला लेख - परिचय आणि रसस्वाद

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 15 June, 2021 - 03:20

बेत्ताडा जीवा ( life in the mountains )

बेत्ताडा जीवा २०११ सालचा कन्नड भाषेतील दिग्दर्शक पी. शेशाद्रो यांचा चित्रपट चित्रपट. या चित्रपटास national film award चे “बेस्ट फिल्म ओन इंव्होरमेंट “ चे २०११ साली पारितोषक मिळाले होते. जनपथ अवार्ड विजेते के शिवराम करंथ यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे.

चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. पण काळ स्वातंत्र्य पूर्वीचा असला तरीही हि कथा स्वातंत्र्य संग्रामाची नाही. हि कथा आहे जेव्हा देशात विकास झाला नव्हता तेव्हा दुर्मिळ भागात राहणाऱ्या लोकांच्या राहणीमानाची, त्यांच्या गरिबीची, तेथील संस्कृतीची. हि कथा आहे दुथडी भरून वाहत असलेला निसर्ग जरी चोहोबाजूला पसरला असला तरीही गोपाळया ( दत्तात्रया ) आणि शंकरी ( रमेश वर्मा ) या नवरा बायकोच्या मनात सलणाऱ्या एका वेदनेची. दहा बारा वर्षापूर्वी त्यांचा मुलगा घरातून निघून गेला असल्याने त्यांना वाटणाऱ्या एकाकीपणाची, आणि एकाकी आयुष्य काढत असतानाहि त्यांच्या आनंदी जगण्याची.

सुरवातीलाच “भारत माता कि जय” “महात्मा गांधी कि जय” अशा घोषणा करत काही क्रांतिकारी आंदोलन करत असताना आपल्याला दिसतात. संतप्त पोलीस लाठीमार करत असतानाच शिवरामु (सुचेंद्र प्रसाद ) नावाचा क्रांतिकारी तेथून पळ काढतो आणि स्वत:च्या न कळत एका जंगलात जाऊन रस्ता चुकतो. ते घनदाट जंगल आहे. आजूबाजूला कोणतेच शहर नाही. इतकेच काय जवळपास एखादी झोपडी सुद्धा नाही. पण अशा वातावरणात जंगलामधून लोकगीत गात जाणारे काही ग्रामस्थ शिवामुला दिसातात आणि आसऱ्यासाठी गावातील बुजुर्ग गोपाळयाकडे घेऊन येतात.

चोहोबाजूला पसरलेल्या त्या जंगलात मिणमिणता प्रकाश असणारे फक्त गोपाळयाचेच ( दत्तात्रेय) घर आहे. शिवरामुचे, गोपाळया आणि त्याची बायको शंकरी ( रमेश वर्मा ) स्वागत करतात पण शिवरामूकडे सातत्याने बघत असताना शंकरीला तिच्या मुलाची शंभूची आठवण येत आहे. अनेक वर्षापासून शंभू घरातून निघून गेला आहे. शंकरीचा स्वभाव भाऊक आहे तितकाच आशावादी आहे. तिला विश्वास आहे कधी ना कधी तिचा मुलगा परत येईल. पण या उलट गोपाळया मात्र निर्विकार आहे. आपल्या मुलाला कुणीतरी वाघ घेऊन गेला असेल असा बेफिकीर विचार तो व्यक्त करतो पण भावनाप्रधान मात्र तो होत नाही.

त्या छोट्याशा गावात नारायण आणि लक्ष्मी( लक्ष्मि हेगडे ) नावाचे गोपाळयाच्या अतिशय जवळचे जोडपे राहत असते. गोपाळया आणि शंकरी, लक्ष्मिला आपली मुलगी मानत असतात आणि नारायणला जावई. पण शिवरामुच्या गावात येण्याने मात्र ते दोघेही अस्वस्थ आहेत. अंधारलेल्या त्यांच्या घरात त्यांना फक्त एकच चिंता आहे शंभू जर परत आला तर? शिवरामु मुबईवरून आला आहे आणि त्याला शंभूनेच पाठवले आहे असा त्या दोघा नवरा बायकोचा समज झालेला असतो. शंभू जर परत आला तर त्या दोघांना परत जावे लागेल असे त्यांना वाटत असते कारण शंभू त्यांना आपले दुश्मन मानत असतो.

शंभू आपल्याला चित्रपटात कुठेच भेटत नाही पण इतर लोकांच्या बोलण्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यापुढे तयार होत जाते. त्याच्या घरातून निघून जाण्याबाबत शिवराममुला सुद्धा गूढ आहे. गोपाळया सांगतो शंभू शिकण्यासाठी बाहेर गेला होता पण नंतर आलाच नाही तर लक्ष्मि सांगते तो सातत्याने त्यांच्या घरी येत असे. त्या दोघांच्या खेळीमेळीच्या गप्पा होत असत पण एक दिवस शंभूची लक्ष्मिवर वाईट नजर पडते.या प्रकारामुळे नारायण चिडतो त्याला कठोरपणे खडसावतो आणि परिणाम शंभू निघून जातो. शंभू बद्दलचे गूढ वाढत जाते.

रात्रीच्या त्या प्रहरी शिवरामु शांतपणे झोपला आहे. पावलांचा आवाज न करता दबकत दबकत शंकरी येते आणि शिवरामुला एकांतात घेऊन जाते. तिच्या हातात आहे दागिन्याचा डबा. जो तो शंभूला देण्यासाठी शिवरामुला सांगते. कधीकाळी शंभूने आपल्या आईकडे दागिन्याचा डबा मागितला होता आणि आई तो देऊ शकली नाही हि खंत तिला आहे. तिला वाटते शंभू दागिने दिले नाहीत म्हणून घर सोडून गेला.

शंभूच्या काळजीने जरी शंकरी नेहमी दु:खी असली तरी गोपाळया आणि तिचे प्रेम मात्र तसेच टिकून असते. जेव्हा गोपाळया तिला एकदा म्हणतो जर आपण दोघे एकदम जग सोडून गेलो तर काहीच समस्या नाही पण दोघांच्या पैकी एकजण आधी गेले तर ? शंकरीला आपल्या नवऱ्याबद्दल आशावाद आहे. तो दीर्घकाळ जगणार, अजुनी शेती करणार, नवीन निसर्ग फुलवणार याची तिला खात्री आहे. कारण गोपाळयाचा स्वभाव नेहमी आनंदी आहे. पैसा , संपत्ती या कशाचा मोह त्याला नाही. “ ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत आणि ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत” या काव्यपंक्ती प्रमाणे त्यांचा स्वभाव आहे. पण तरीही त्याच्या मनात कुठेतरी सलणारी वेदना आहेच. आपला मुलगा जो दहा वर्षापूर्वी घर सोडून गेला तो कुठे असेल हा विचार त्याच्याही मनात येत असतोच. त्या रात्री शंभू बद्दलचे कुतूहल कमालीचे जागृत झाल्याने शिवरामू गोपाळयाला त्याच्या फोटो बाबत विचारतो. एका अडगळीतून एक ग्रुप फोटो काढून दाखवतो ज्यात शंभूचा फोटो आहे. शंभूचा तो अस्पष्ट फोटो पाहिल्यावर शिवरामुला जाणवते दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य लढ्यातील गुप्त चळवळीत शंभूची आणि त्याची भेट झालेली असते. गोपाळयाला धक्का बसतो कारण स्वातंत्र्य संगामात आपल्या मुलाने भाग घेऊ नये असे त्याला वाटत असते पण नेमके तेच घडते. शिवरामू त्याची समजूत काढतो जसे निसर्ग खुलवणे हि गोपाळयाची आवड आहे तसेच स्वातंत्र्यासाठी लढणे हे शंभूचे कर्तव्य आहे असे त्याला वाटते. दोन्ही गोष्टी अभिमानाच्याच आहेत पण शंभू घरी नसल्याने त्याच्या आईवडीलाना काय वेदना होत असतील याची जाणीव मात्र त्याला होत असते कारण शिवरामू सुद्धा असेच घर सोडून आपल्या आईवडीलांपासून दूर आलेला असतो.

बराच कालखंड निघून जातो. देशाला आता स्वातंत्र्य मिळालेले असते इतका वेळ जंगलात दिसणारे सारे प्रसंग संपलेले असतात आणि चोहोबाजूला सपाट गुळगुळीत रस्ते दिसू लागतात. आणि त्याचबरोबर रस्त्यावरून जाणारी एक गाडी आपल्याला दिसते. काही वेळातच ती गाडी त्याच कठमुले गावाजवळ थांबते. गोपाळया आणि शंकरीला ओळखणारे तिथे कुणीच नाही. वृद्ध शिवरामू गाडीतून उतरतो. पूर्वीचा स्वातंत्र्यासाठी झटणारा तरुण शिवरामु आता वृद्ध झालेला असतो. दूरवर पसरलेला कुमार पर्वत बघून शिवरामुच्या जुन्या आठवणी उचंबळून येतात. खोल दऱ्यातून गोपाळयाचे शब्द त्याला ऐकू येतात “ निसर्गापुढे माणूस खूपच लहान आहे” शंकरीचा आवाज त्याला ऐकू येतो “ शंभू जर भेटला तर त्याला सांग त्याची आई वाट बघती आहे”. तो आवाज आपल्या कानात प्रतीबिबित होत असतनाच चित्रपट संपतो.

या चित्रपटाचा अंमल बराच काळ आपल्यावर तसाच राहतो कारण त्यातील निसर्ग. निसर्गाचे शुद्ध रूप बघायचे असेल तर हा चित्रपट बघणे आवश्यक आहे असे वाटते. कदाचित त्याचमुळे या चित्रपटास “ “बेस्ट फिल्म ओन इंव्होरमेंट”चे पारितोषक मिळाले होते. सुंदर फोटोग्राफी हे या चित्रपटाचे वैशिट्य मानावे लागेल आणि त्याचमुळे अनंत अर्स यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते.

निसर्गाचे दर्शन घडत असताना हा चित्रपट आपल्याला वेस्टर्न कर्नाटक मधील संस्कृतीचे, तिथल्या राहणीमानाचे दर्शन घडवतो. कठमुले गावातील लोक जितके निरक्षर आहेत तितकेच ते दरिद्री आहेत. संपूर्ण देश जेव्हा स्वातंत्र्यासाठी झटत आहे, तेव्हा गाव मात्र या लढयाबाबत अनभिज्ञ आहे. गावची शेती, पाणी या व्यतिरिक्त त्यांना काहीच माहित नाही. आपल्या विश्वात येथील लोक राहत आहेत.

अंधश्रद्धा हा या गावाचा स्वभावधर्म आहे. कोला नृत्य करण्याची प्रथा गाव वर्षानुवर्षे पाळत आहे. कारण एकच जर कोला नृत्य एका विशिष्ठ दिवशी केले तर गावावर संकट येऊ शकत नाही. पण असे असले तरीसुद्धा शेतात हत्ती येणे वाघ येणे चालूच असते हा विरोधाभास आहे.

या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे शिवरामुची. जंगलात चुकून हरवलेला शिवरामु शंकरी आणि गोपाळया यांच्या भावभावनाशी एकरूप होतो. शंकरी जेव्हा त्याला आपला मुलगा समजते तेव्हा ती कधीही दुखावली जाणार नाही याची काळजी तो सातत्याने घेत असतो तर लक्ष्मि जवळ तिच्या भावना न दुखावता प्रामाणिकपणे बोलणे हे त्याला आवश्यक वाटते. स्वातंत्र्यासाठी झटणे इतकेच त्याचे ध्येय आहे आणि त्याचमुळे एरवी कधी साध्या साध्या गोष्टीनी घाबरणारा शिवरामु जेव्हा स्वातंत्र्याचा विषय निघतो तेव्हा त्याचा त्वेष वाढलेलेला असतो. सुचेन्द्र प्रसादचा अभिनय सहज सुंदर !!!

शिवरामु इतकीच प्रभावी भूमिका आहे गोपाळया आणि शंकरीची. शिवरामुलाच आपला मुलगा समजणारी शंकरी असो किंवा आपण नेहमी आनंदात आहे असे दाखवूनही सलणारी वेदना सहन करणारा गोपाळया नक्कीच कौतुकास पात्र आहेत. गोपाळयाची भूमिका केली आहे दत्तात्रेय यांनी. अप्रतिम आणि सहज रित्या केलेला अभिनय यामुळे हि भूमिका विशेष भावते. दत्तात्रेय यांनी एका मुलाखतीत सांगितले होते अभिनय करताना त्यांना त्रास झाला नाही पण जंगलातून हिंडणे किंवा हत्ती आला म्हणून पळत जाणे या गोष्टी त्यांच्यासाठी आव्हानात्मक होत्या.

रमेश वर्मा यांनी केलेली शंकरीची भूमिका सुद्धा आपल्या स्मरणात राहते. मुलाचा वियोग तिला सहन होत नाही आणि त्यामुळे शिवरामू मध्ये आपला मुलगा शोधणारी शंकरी,विषेत: शिवरामु जेव्हा तिचा निरोप घेऊन परत जात असतो तेव्हा तिच्या डोळ्यातील भाव आपल्याला चटका लावून जातात.

सुंदर अभिनय आणि पी. शेषाद्री यांचे उत्तम दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट अधिक स्मरणात राहतो
. चित्रपट संपतो तेव्हा स्मरणात राहते गोपाळया आणि शंकरी यांचे एकाकीपण ... नारायण आणि लक्ष्मि यांना वाटणारी अनाहूत भीती ... आणि शंभूचे काय झाले ... शंभू परत आला असेल का?सर्व प्रश्नांनी आपण अस्वस्थ होतो. पी. शेषाद्री यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते कादंबरी पेक्षा त्यांनी चित्रपटाचा शेवट मुद्दाम वेगळा केला आहे कारण काही प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांनी शोधावी असे त्यांना वाटत होते.
चित्रपटातील निसर्ग आणि त्यात भेटणाऱ्या माणसांच्या स्वभावातील निसर्ग या दोन्ही गोष्टी जेवढ्या आपल्याला आकर्षित करतात तितकेच या कथेने निर्माण केलेले प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतात हेच या चित्रपटाचे निर्विवाद यश आहे ..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults