हे गणराया

Submitted by _आदित्य_ on 13 June, 2021 - 07:21

हे गणराया सोडवी माया

सहज सुखाने बालमुखाने सकळांना दे गीता
हे लडिवाळा दीनदयाळा मोक्ष मिळूदे जगता
तुजविण जीवन जीवन नाही सारे जाते वाया
हे गणराया सोडवी माया

आलस्य जडुनी तमात बुडुनी मनुष्य निजला आहे
सत्यप्रवाही तुझा दिवाही कधीच विझला आहे
उगा पोळती उन्हात ह्यांना तुझी हवी रे छाया
हे गणराया सोडवी माया

पळतो दमतो उगाच श्रमतो क्षणिक सुखांच्या मागे
जन्मा येतो जगतो मरतो मनुष्य तुझ्या वियोगे
बोध होऊदे तुझा उजळुदे तव तेजाने काया
हे गणराया सोडवी माया

Group content visibility: 
Use group defaults