अंबट गोड जीवन---( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 12 June, 2021 - 10:15

अंबट गोड जीवन---(वीक एंड लिखाण)

आज एक खूप जुनी आठवण आली. माणसांचा मेंदू म्हणजे एक विचित्र रसायन आहे. खूप जुन्या गोष्टी कारण नसताना आठवतात तर कधी अशातल्या गोष्टी आठवायला चक्क नकार देता. नंतर कधीतरी गरज नसताना अवेळी एकदम आठवतात.
अशीच मला परवा एकदम एका माणसाची आठवण आली. मी जेंव्हा माझे घर औरंगाबाद येथे बांधले तेंव्हा बांधकामाचे कंत्राट एकाला दिले होते. त्याने सर्व काम पाहिले, मी कांही कळत नसूनही प्लॉटवर जावून बराच वेळ तेथे थांबत असे. मनाला घरबांधकामाची देखरेख करत असल्याचे समाधान एवढेच काय ते. बाकी त्याला कांही अर्थ नव्हता.
त्यावेळी यंत्रांचा वापर नगण्य म्हणजे नव्हताच असे म्हंटले तरीही चालेल, त्यामुळे कामावर तीस चाळीस मजूर दररोज असायचे. मी त्यापैकी बर्‍याच लोकांशी गप्पा मारत असे. त्यांचे जीवन जवळून बघायचा योग आला. त्यात एक बांधकाम करणारे गवंडी होते. गवंड्याला मराठवाड्यात मिस्त्री असेही म्हणतात.  त्यांचे नाव रंगनाथ होते. या गृहस्थाचे वैशिष्ट्य म्हणजे ते एका पायाने अधू होते म्हणून लंगडत लंगडत चालत असत. काम खूप सफाईने आणि बारकाईने करायचे. सगळ्याच मजूरांमधे खेळीमेळीचे वातावरण असायचे. थट्टा मस्करी करत दिवस मावळायचा. यथावकाश घराचे बांधकाम संपले आणि सर्व मजूर, गुत्तेदार पांगले.
आम्ही वास्तूशांती करून घरात रहायला गेलो. मला बँकेत रोज जाण्यायेण्यास शॉर्ट्कट घेण्यासाठी एका झोपडपट्टीतून जावे लागायचे. एकेदिवशी घरी येताना एका घरासमोर रंगनाथ मामा दिसले. मी आश्चर्याने विचारले की इकडे कुठे? ते हसून म्हणाले की मी इथेच रहातो. सर्वांची घरे बांधणार्‍या या माणसाचे घर म्हणजे एक मातीची खोली. समोर एक छोटासा मातीचाच ओटा.  मग रोज सायंकाळी बँकेतून परतताना ते घरासमोरच्या ओट्यावर दिसायचे. त्यांची बायको पण शेजारी बसलेली असायची. आमचे नमस्कार नमस्कार व्हायचे. बर्‍याच दिवसांनी माझी औरंगाबाधून बदली झाली. आठ दहा वर्षे बाहेरच होतो. निवृत्तीनंतर परत औरंगाबादला आलो. तेथे पुन्हा ओट्यावर हे नवरा बायको दिसायचे. फरक इतकाच होता की दोघांच्याही तोंडावर सुरकुत्यांचे जाळे होते. दोघेही एकदम कृष दिसत होते. पण त्यांची एक खासियत होती. नेहमी ते दोघेही हसत हसत गप्पा मारायचे. तसे आयुष्य खूपच खडतर होते त्यांचे. बायको इतरांची घरकामे करून प्रपंचाला हातभार लावायची. एकेदिवशी रंगनाथमामा ओट्यावर सायंकाळी एकटेच दिसले. माझ्या मनात चर्र झाले. मी स्कुटर थांबवून चौकाशी केली असता त्यांनी सांगितले की एक आठवड्यापूर्वीच तिचे निधन झाले. मी त्यांना प्रथमच गंभीर बघत होतो. मी आवंढा गिळला आणि घरी परतलो.
कित्त्येक दिवस मामा आणि त्यांचा प्रपंच माझ्या डोक्यात घोळत होता. तसे त्यांनी सारे आयुष्य कष्टातच काढले होते. शेवटी जीवन म्हणजे सुखदु:खाची पुरचुंडी असते. पण त्यांच्या चेहर्‍यावरचे कायम हास्य माझ्या डोळ्यासमोर तरळत होते. कुठे आम्ही शॉवरला पाणी आले नाही असल्या तकलादू दु:खामुळे रडणारे लोक! आणि कुठे ते आयुष्य कठीण असूनही खुशीखुशीने हसत जगणारे लोक! कोणत्या गिरणीचे पीठ खात असावेत हे लोक? या लोकांनी जाणले आहे की जीवन अंबट गोड घटनांनी भरलेले असते. नुसते अंबट किंवा नुसते गोड जीवन तसे कंटाळवाणे आणि बेचवच असते.
अशा दु:खी पण हसर्‍या जीवनाबद्दल ते रोज आपसात काय बोलत असतील या कल्पनेने मी झपाटलो. यातून तयार झालेली एक कविता आज मी खाली पेश करत आहे.

सांजवेळी चाळवू या

पेलले ओझे,जिवाचा
शीण थोडा घालवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

जे घडावे ते न घडले
प्रक्तनाचा खेळ सारा
भोगला होता किती तो!
भावनांचा कोंडमारा
जिंकली आहे लढाई
चल तुतारी वाजवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

चैन म्हणजे काय असते?
हे कुठे माहीत होते?
पोट भरण्या घाम आणि
कष्ट हे साहित्य होते
भोगले अन्याय जे जे
चल जगाला ऐकवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

वेदना भोगीत चेहरा
नाटकी हसराच होता
मुखवट्याच्या आत दडला
तो कुणी दुसराच होता
लक्तरे शोकांतिकेची
चावडीवर वाळवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

दोन असतील फक्त नोंदी
जन्मलो मेलो कधी त्या
आत्मवृत्तातील पाने
का अशी कोरी विध्यात्या?
मोकळ्या पृष्ठावरी चल
दु:ख थोडे गोंदवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

हे कवडशा सांगतो मी
तू घरी येऊ नको रे!
मस्त काळोखात जगतो
तू दया दावू नको रे
तेवला नाही कधी जो
दीप तोही मालवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! नेहमीप्रमाणे छान.
अशा सामान्यतेचे कधीच पवाडे गायले जात नाहीत. कारण त्यांची कामगिरी कधीच heroic नसते. पण सरत्या आयुष्याच्या सरत्या सायंकाळी असे एकमेकांच्या साथीने निवांत आनंदात जगता येणे हे किती असामान्य आहे!