कॉन्स्टॅन्टिनोपल ते इस्तंबूल - ०६

Submitted by Theurbannomad on 9 June, 2021 - 12:52

मेहमतने मोहिमेवर निघाल्यावर वाटेत अबू अयुब अल अन्सारी याच्या कबरीला भेट दिली. जे काम त्याच्याकडून पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही, जे काम त्याच्यानंतरच्या अनेक शूरवीर मुस्लिम योद्ध्यांना जमलं नाही ते आपण करून दाखवणार आहोत अशा दुर्दम्य विश्वासासह तो त्याच्या सैन्यासह मोहिमेवर पुढे निघाला. व्यूहरचना करून त्याने आवश्यक ती सगळी पूर्वतयारी केली आणि मोहिमेला प्रारंभ झाला.

सगळ्यात आधी वायव्येकडून मेहमतने आपल्या तोफदलाला पुढे करून थिओडोसियन भिंतींना लक्ष्य केलं. त्या कामगिरीवर त्याने अग्रस्थानी ठेवलं होतं ओरबान आणि त्याच्या ' बॅसिलिका ' तोफेला. या तोफेतून एक भला मोठा गोळा सूं सूं करत निघाला आणि तटबंदीवर आदळला....तटबंदीवर सज्ज असलेल्या सैनिकांनी आधीही असे हल्ले परतवले होते, पण या वेळी तोफेच्या गोळ्यामुळे झालेला आघात त्यांना चांगलाच जाणवला. भिंत शब्दशः थरथरल्यावर बायझेंटाईन सैन्य काही काळाकरिता गोंधळून गेलं. त्यांच्या बाजूने प्रतिहल्ले सुरु झाले, पण आपल्या मजबूत तटबंदीला हादरवून सोडेल अशी कोणती शक्ती ऑटोमनांना मिळालेली आहे हे काही त्यांच्या ध्यानात येत नव्हतं. मेहमतने ओरबानला अविरत आग ओकण्याचा आदेश दिला. त्याने बॅसिलिका पुढे नेली आणि त्यात भले मोठे तोफगोळे भरायला सुरुवात केली.

बॅसिलिका महाप्रचंड असली, तरी तिच्यात एक वैगुण्य होतं. या तोफेच्या आकारामुळे तिच्यातून एकदा मारा झाल्यावर तिला थंड होण्यासाठी वेळ द्यावा लगे. त्या कालावधीत ' दार्दानेल्स गन ' नावाच्या लहान तोफा कमला लागत. काहीही करून थिओडोसियन भिंतीला लवकरात लवकर भगदाड पाडून बायझेंटाईन मोर्चा कमकुवत करायचा ही मेहमतची रणनीती होती. दुसरीकडे त्याने तटबंदीच्या बाहेरच्या बायझेंटाईन प्रांतांवर आपल्या सैन्याला चढाई करायला पाठवून दिलं. बोस्फोरसच्या खाडीसमोरचा थेरपीया नावाचा गढीवजा किल्ला आणि मार्माराच्या समुद्राच्या बाजूचा स्टुडिअस गावाचा भाग आणि तिथली गढी काही तासांमध्येच ऑटोमन सैन्याने जिंकून घेतली. प्रिन्सेस आयलंड नावाचं छोटंसं बेट ऍडमिरल बाल्टोघलू या मेहमतच्या आरमारप्रामुख्याने सहज जिंकून घेतलं. तटबंदीच्या आतलं शहर सोडलं, तर आता बायझेंटाईन साम्राज्याच्या हाती काहीच उरलं नव्हतं.

हे सगळं होतं असताना थिओडोसियन भिंत मात्र ताठ उभी होती. एक तर ऑटोमन तोफदलाच्या अतिउत्साहामुळे डागलेले तोफगोळे एका भागावर ना थडकता भिंतीवर जागोजागी थडकत होते. बॅसिलिका एकदा तोफगोळा डागल्यावर थोडा वेळ घेऊन पुन्हा सज्ज होत होती. जोवर हे सगळं सव्यापसव्य होत होत, तोवर बायझेंटाईन सैन्याकडून तटबंदीची डागडुजी होत असे. मेहमतच्या अनेक दिवस चाललेल्या हल्ल्यानंतरही तटबंदी त्याच्या तोफांच्या माऱ्याला दाद देत नव्हती. जसजसे दिवस सरत होते तसतशी मेहमतच्या गोटात अस्वस्थता वाढत होती. अखेर त्याने ' गोल्डन हॉर्न ' कडून आपल्या आरमाराला आगेकूच करायचे आदेश दिले.

गोल्डन हॉर्नच्या मुखाशी बायझेंटाईन सैनिकांनी साखळ्या आवळलेल्या होत्याच. ऑटोमन आरमाराने तोफांचा मारा करून बायझेंटाईन सैन्याला मागे हटवायला सुरुवात केली. त्यातल्या काहींनी तलवारी उपसून बायझेंटाईन सैन्याची फळी कापून काढायचाही प्रयत्न केला...पण बायझेंटाईन सैन्याचं पारडं जड होतं. एकीकडून तटबंदीच्या वरून तोफांचा अविरत मारा करून त्यांनी ऑटोमन आरमाराला जेरीस आणलं, आणि दुसरीकडे साखळ्या खेचून गोल्डन हॉर्नचा प्रवेशमार्ग बंद करून ठेवला.ऑटोमन आरमाराची बरीच हानी झाली पण गोल्डन हॉर्नच्या भागातून त्यांना इंचभरही आत जाता आलं नाही.

तशात इटलीहून रसद घेऊन चार गलबतं मार्माराच्या समुद्राच्या बाजूने येताना ऍडमिरल बाल्टोघलूला दिसली. काहीही करून ही गलबतं गोल्डन हॉर्नच्या मुखाकडून आत गेली नाही पाहिजेत, या त्वेषाने त्याने आपल्या आरमाराला आगेकूच करायचे आदेश दिले. समुद्रातच तुंबळ युद्धाला सुरुवात झाली. बायझेंटाईन सैन्याने तटबंदीवरून आपल्या मदतीसाठी येत असलेल्या गलबतांना सुरक्षित ठेवण्यासाठी तोफांचा जबरदस्त मारा सुरु केला. त्यांचं स्थान उंचावर असल्यामुळे ऑटोमन गलबतांना लक्ष्य करणं त्यांच्यासाठी सोपं जात होतं, पण ऑटोमन गलबतांवरून होतं असलेला तोफांचा मारा तटबंदीच्या खालच्या भागापर्यंतच पोचत होता. तशात बायझेंटाईन सैन्याने बाणांचाही वर्षाव सुरु केला होताच....ऑटोमन आरमाराने पराक्रमाची शर्थ केली. बाल्टोघलू स्वतः जखमी झाला...पण भौगोलिक परिस्थितीमुळे बायझेंटाईन सैन्याची अखेर सरशी झाली. त्यांनी तोफांच्या माऱ्याआड युरोपियन गलबतांना गोल्डन हॉर्नच्या मुखाशी आणलं आणि साखळ्या सैल करून त्यांना आत घेतलं. शेवटचं गलबत आत येताच साखळ्या पुन्हा एकदा ओढून घेऊन बायझेंटाईन सैनिकांनी तटबंदीच्या आत धाव घेतली.

तोफांच्या माऱ्याला येत असलेलं अपयश आणि रसदपुरवठा रोखण्यात असमर्थ ठरलेलं आरमार यामुळे मेहमत वैतागला. त्याने रंगाच्या भरात ऍडमिरल बाल्टोघलूला मृत्युदंड देण्याचा आदेश दिला, पण आरमारातल्या वरिष्ठांनी
बाल्टोघलूने केलेली पराक्रमाची शर्थ मेहमतसमोर उलगडून दाखवली आणि बाल्टोघलूवर दया करण्याची विनंती केली. मेहमतने त्यांची विनंती मान्य केली खरी, पण त्यांना अपयशाबद्दल चांगलंच सुनावलं. त्यांनी मेहमतला यापुढे आपल्याकडून अशी चूक होणार नाही अशी ग्वाही दिली आणि त्वेषाने चवताळले ते आरमारी सैनिक गलबतांची डागडुजी करायला गेले. त्यांच्या मनात आता अपमानाची धुमस होती...जी त्यांना काहीही करून शांत करायची होती. परंतु दुसरीकडे मेहमतला आता अशा परिस्थितीला सामोरं जावं लागणार होतं, ज्यामुळे त्याच्याच अपयशाबद्दल दबक्या आवाजात कुजबूज सुरु होणार होती.

युद्धआघाडीवर मेहमतने काहीही करून तटबंदी ध्वस्त करायची असा चंग बांधून ओरबानला आपल्या तळावर बोलावून घेतलं. जे होईल ते होईल, पण बॅसिलिका थांबली नाही पाहिजे असा त्याने ओरबानला आदेश दिला. तोफेने एकदा गोळा डागल्यावर तिला थोडं थंड करावं लागत, तिच्यावर तेल चोपडून तिची थोडीफार डागडुजी करावी लागते, तिच्या भिवती करकचून बांधलेले दोरखंड सैल झाले किंवा तुटले तर पुन्हा एकदा बांधावे लागतात अशा अनेक ' तांत्रिक ' अडचणींचा पाढा ओरबानने वाचून दाखवला. यात अतिशयोक्ती काहीच नव्हती...कारण सत्तावीस फुटाची तोफ डागायची तर या सगळ्या गोष्टी स्वीकार करणं क्रमप्राप्त होतं....पण मेहमत पेटून उठला होता. त्याने ओरबानला अविरत मारा करण्याचा आदेश तर दिलाच, पण स्वतःही त्या तोफेच्या बाजूला उभं राहून जातीने आघाडी सांभाळायचा हट्टही धरला. अखेर ओरबानचा नाईलाज झाला. त्याने आठ - दहा माणसांना दिमतीला घेतलं, त्यांना सतत तोफेच्या बाहेरच्या भागावर तेल चोपडायचं आणि तोफेच्या भोवताली गुंडाळलेल्या दोरखंडांना घट्ट करत राहायचं काम नेमून दिलं. आधी तासाभराने एक गोळा तोफेतून बाहेर पडत होता, पण आता अवघ्या पंधरा मिनिटात एक गोळा डागला जाऊ लागला. आठ - दहा गोळे डागल्यावर तोफ थरथरायला लागली आणि ओरबानने मेहमतला काही काळ विश्रांती घ्यायची विनंती केली. मेहमतने तलवारीच्या टोकावर त्याला अविरत तोफ चालवण्याचा आदेश दिला आणि अनिच्छेनेच ओरबानने पुढचा तोफगोळा तोफेच्या आत सरकवला....बत्ती दिली आणि आपले कां बंद केले. तोफ धडधडली, पण शेवटची. तोफेतून गोळा बाहेर फेकला गेला आणि प्रचंड स्फोट करत तोफेचे तुकडे पडले. ओरबान आणि आठ - दहा मदतनीस जागीच ठार झाले....आणि मेहमतही जखमी झाला. काही सैनिकांनी त्याला उचलून तळावर नेलं आणि तंबूमध्ये आडवं करून त्याला पाणी दिलं. काही वेळाने मेहमत सावध झाला, पण झालेला प्रकार समजल्यावर त्याच डोकं पुन्हा एकदा सुन्न झालं.

वजीर हलील पाशा आता पुढे सरसावला. मेहमतला त्याने मोहीम आवरती घेण्याची विनंती केली....पण त्याच्या आवाजात विनंती कमी आणि कुत्सितपणा जास्त होता. बरेच मोठे सरदार तंबूत जमलेले होते....त्यांच्यापैकी काहींनी मूकपणे वजिराच्या बोलण्याला दुजोरा दिला. तशात मेहमतकडे युरोपच्या भागातून एक वाईट खबर आली. त्याच्या आईने युरोपच्या ख्रिस्ती महासत्तांनी बायझेंटाईन सत्तेला वाचवण्यासाठी अधिकची रसद पाठवल्याची ही खबर मेहमतसाठी धोक्याची घंटा होती. ही रसद नुसती धान्याची किंवा दारुगोळ्याची नव्हती, तर युरोपमधून बरेचसे सैनिकही या ' धर्मयुद्धात ' सामील व्हायला निघाले होते. ही खबर मिळेपर्यंत युरोपीय गलबतांनी भूमध्य समुद्र ओलांडून एजियन समुद्रात प्रवेश केला असण्याची दाट शक्यता होती आणि पुढे अर्थातच बल्गेरियाच्या बाजूने जमिनीवरूनही नवी आघाडी उघडली जाण्याचा धोकाही स्पष्ट दिसत होता.

एखाद्याने या सगळ्या परिस्थितीत तात्पुरती का होईना, पण माघार घेऊन पुन्हा एकदा युद्धआघाडीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला असता, पण मेहमत अवघ्या विशीतला तरुण असूनही त्याने अशी काही धूर्त चाल केली, की अवघ्या जगाला पुढे इतिहासात त्याची नोंद ठळकपणे घ्यावी लागली. दोन-एक महिन्याच्या अपयशी ठरत चाललेल्या मोहिमेला अचानक जबरदस्त कलाटणी देणारा हा निर्णय कोवळ्या मेहमतच्या महत्वाकांक्षी आणि बेडर वृत्तीचा नमुना ठरला. वजीर हलील पक्षाचं नव्हे, तर सैन्यदलातल्या अनेक जुन्या जाणत्या सरदारांनाही हा निर्णय पचवणं सुरुवातीला जड गेलं, पण मेहमत इरेला पेटला होता. ही चाल नक्की काय होती, त्याविषयीची माहिती येईल पुढच्या भागात....तोवर अलविदा.

मेहमतने ठोठावलेल्या शिक्षेची अंमलबजावणी एकीकडे होत होती...ऍडमिरल बाल्टोघलूची सगळी संपत्ती शिक्षा म्हणून जॅनिसेरी सैनिकांमध्ये वाटली गेली आणि त्याच्या पाठीवर शंभर फटके मारले गेले. एकेक फटक्यासह बाल्टोघलू आणि त्याचे आरमारी सैनिक अपमानाचे कडू घोट रिचवत संतापाने फुरफुरत होते. मेहमतने बाल्टोघलू आणि आपल्या बाकीच्या विश्वासू सरदारांना आपल्या तंबूत बोलावून घेतलं. तोफदलाच्याही काही महत्वाच्या सरदारांना त्याने आपल्या मसलतीत सामील करून घेतलं. त्या सगळ्यांसमोर त्याने गलाटा भागाचा नकाशा पसरवला. हा भाग पेराच्या स्वायत्त संस्थानाचा. इथे वस्तीचा आणि बाजाराचा भाग सोडला, तर बाकीच्या भागात घनदाट जंगल होतं आणि तेही उतरंडीवरचं. ही उतरंड गोल्डन हॉर्नच्या मुखाच्या बाजूला उंच तर खाडीच्या आतल्या भागाकडे सखल होती. मेहमतने आपल्या कुशाग्र बुद्धीने याच भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन आपलं आरमार थेट खाडीत घुसवायची योजना आखलेली होती.

मेहमतकडे सैन्यदलात प्रचंड मनुष्यबळ उपलब्ध होतं. त्याने अशी योजना आखलेली होती, की त्याच मनुष्यबळाचा वापर करून जंगल साफ करायचं, जंगलातल्याच झाडांच्या ओंडक्यांना आडवं पडायचं, त्यावर भरभरून तेल ओतायचं आणि आरमाराच्या गलबतांना खेचून त्या ओंडक्यांवर आणायचं....तिथून ती जहाजं घरंगळत घरंगळत उतरंडीच्या दिशेला पुढे जातील आणि अखेर खाडीच्या आतल्या भागापर्यंत आल्यावर त्यांना मनुष्यबळाचा वापर करून खाडीच्या पाण्यात ढकलता येईल असा त्याचा कयास होता. योजना वरवर अप्रतिम होती, पण अमलात आणण्यासाठी तितकीच कठीण. शिवाय पेराच्या भागात या योजनेचा सुगावा जरी लागला तरी खबर बायझेंटाईन गोटात लगोलग जाण्याची शक्यता होतीच...

तरुण रक्त पेटून उठलं, की अशा अचाट कल्पनांना मूर्त रूप देतं. मेहमतने आपल्या तोफदलाला सतत तोफांचा मारा सुरु ठेवत आसमंतात कल्ला करत राहण्याचा आदेश दिला...जेणेकरून गलबतांची धुडं सरकण्याचा आवाज दबून जाईल. दुसरीकडे त्याने आपल्या निवडक सैन्यफळीला सतत तटबंदीच्या खाली जाऊन शक्य तितके सुरुंग भिंतींमध्ये पेरून त्यांचे स्फोट करत राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे तटबंदीचं काही नुकसान होणार नसलं, तरी बायझेंटाईन सैन्य गाफील राहायला आणि मुख्य म्हणजे निश्चित राहायला मदत होणार होती. त्यात त्याच्या सैन्याची बरीच हानी होणार असली, तरी त्याने ती जोखीम जाणून बुजून पत्करलेली होती.

तिथे बायझेंटाईन सैन्याला लवकरात लवकर कुमक पोचवायचा उद्देशाने पोपच्या आदेशाला अनुसरून किएव्ह प्रांतातल्या ( सध्याच्या युक्रेन देशाची राजधानी ) कार्डिनल इसिडोर याने जवळच्याच कीऑस प्रांतातल्या शूर लढवय्या सैनिकांची एक तुकडी कॉन्स्टॅन्टिनोपलच्या दिशेने धाडली. या तुकडीच्या प्रमुखपदी होता इटालियन वंशाचा शूर सेनानी जिओव्हानी गीअसतीयानी. अनेक युद्धांमध्ये मर्दुमकी गाजवलेला हा लढवय्या आपल्या हजार - बाराशे सैनिकांसह काही दिवसांतच कॉन्स्टॅन्टिनोपल येथे आला आणि बायझेंटाईन सैन्यात सामील झाला. त्याने आपल्याबरोबर आणलेले २०० निष्णात तिरंदाज त्याने तटबंदीवर उभे केले. त्यांचा लक्ष्याचा भेद करण्याचा सराव इतका जय्यत होता, की त्यांनी लांबवर उभ्या असलेल्या ऑटोमन सैन्यालाही व्यवस्थित लक्ष्य करायला सुरुवात केली. या सगळ्यामुळे बायझेंटाईन सम्राट सुखावला आणि त्याने अखेर सुटकेचा निश्वास टाकला. पोदेस्तालाही आपण ऑटोमन साम्राज्याऐवजी बायझेंटाईन साम्राज्याच्या बाजूने उभे राहिलो याचा अभिमान वाटला.

मेहमतच्या सैन्याने पराक्रमाची शर्थ केली. भल्या मोठ्या गलबतांची धुडं त्यांनी जंगलातल्या त्या बिकट वाटेवरून तराफ्यांतून घरंगळत पुढे नेली. हे काम रात्रंदिवस सुरु होतं आणि सरणाऱ्या प्रत्येक दिवसानंतर मेहमतच्या मनातली चलबिचल वाढत चाललेली होती. युरोपियन कुमक नेमकी कॉन्स्टॅन्टिनोपलपर्यंत पोचलीच, तर याही योजनेचे तीनतेरा वाजण्याची शक्यता होतीच, पण ऑटोमन साम्राज्याचं आरमार खाडीत अडकून आयतंच बायझेंटाईन सैन्याच्या हाती जाण्याचा महाप्रचंड धोका त्याच्या डोक्यावर टांगलेला होता. कितीही झालं तरी अवजड गलबतांना मनुष्यबळाच्या जोरावर चार-पाच किलोमीटर आणि तेही खाचखळग्यांच्या जंगलातून वाहून नेणं खायचं काम नव्हतं.

ऑटोमन सैन्याने अखेर हे काम पूर्णत्वाला नेलं. २२ एप्रिल १४५३ या दिवशी सूर्य उगवला तो बायझेंटाईन सैनिकांना जबरदस्त धक्का देतं. खुद्द सम्राट कॉन्स्टंटाईनलाही समोरच दृश्य बघून धडकी भरली....संरक्षक साखळ्यांना वळसा घालून ऑटोमन गलबतं चक्क खाडीच्या आत आलेली होती आणि त्या गलबतांवर त्वेषाने पेटलेले ऑटोमन आरमाराचे सैनिक बायझेंटाईन साम्राज्याचा घास घ्यायला शस्त्र परजत उभे होते. थिओडोसियन भिंत आता आरमारी गलबतांच्या तोफांच्या थेट टप्प्यात आलेली होती आणि ऑटोमन सैनिक आता थेट भिंतीच्या पायथ्याशी भिडू शकणार होते. या एका टप्प्यावर एकदम युद्धाचं पारडं पालटलं आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मेहमतच्या ऑटोमन सैन्याला युद्धभूमी मोकळी झाली.

ऑटोमन सैन्यातल्या अवघ्या पंचवीस वर्षाच्या एका तरण्याबांड योद्ध्याला मेहमतने थिओडोसियन भिंतीला भेदण्यासाठी पुढे केलं. या योद्ध्याचं नाव उलूबाटली हसन. या हसनच्या दिमतीला होते सर्बियन वंशाचे निष्णात खाणकामगार , ज्यांना सुरुंग लावून भुयार खणण्याचा चांगला अनुभव होता. तशात बायझेंटाईन सैन्याने युद्धात पकडलेल्या २००-२५० युद्धकैद्यांना ऑटोमन सैनिकांसमक्ष तटबंदीवरून शिरच्छेद करून खाली फेकलं. हे दृश्य पाहून ऑटोमन सैन्याला उलट जास्तच चेव चढला आणि त्यांनी अधिक त्वेषाने हल्ले करायला सुरुवात केली....पण अजून त्यांच्या हल्ल्यांना हवं तसं यश येत नव्हतं, कारण तटबंदीवरचा एक एक बायझेंटाईन सैनिक शंभर ऑटोमन सैनिकांना भारी पडत होता. उंचीवरून फेकलेला प्रत्येक तोफगोळा ऑटोमनांची अपरिमित हानी करत होता.

मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात ऑटोमनांनी जमिनीखालून बरेच सुरुंग खोदून थिओडोसियन तटबंदीच्या भिंतींमध्ये शिरकाव करण्याच्या हालचाली सुरु केल्या. बायझेंटाईन सैनिकांमध्ये जोहानास ग्रांट नावाचा एक जर्मन युद्धतज्ञ होता. त्याने जमिनीवर मोठमोठ्या लाकडी बदल्यांमध्ये पाणी भरून जागोजागी या बादल्या ठेवलेल्या होत्या. जमिनीच्या खाली भुयार खोडात असताना निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे बादलीतील पाणी थरथरायला लागलं, की त्याला जमिनीखाली होतं असलेल्या कामाची चाहूल लागे. अखेर त्याने ऑटोमनांनी खोदलेल्या अनेक सुरुंगांचा छडा लावला आणि ' ग्रीक फायर ' पद्धतीने ( भुयाराच्या वरच्या भागातून भोक करून त्यातून तेल आणि पेटलेले बोळे सुरुंगात टाकून आगी लावणं ) ऑटोमनांची अपरिमित हानी केली.

अखेर सतत होत असलेल्या पराभवामुळे मेहमतने नाखुशीने एक निर्णय घेतला. २१ मे रोजी त्याने आपला दूत बायझेंटाईन सम्राटाकडे पाठवला. सम्राटाने जर राजीखुशीने शहराचा ताबा ऑटोमनांकडे दिला तर या मोहिमेला पूर्णविराम देण्यात येईल आणि बायझेंटाईन लोकांना सुरक्षितेपणे युरोपमध्ये जाऊ दिलं जाईल असा हा प्रस्ताव सम्राट कॉन्स्टंटाईनने धुडकावला. तटबंदीच्या बाहेर ऑटोमनांनी काहीही केलं, तरी तटबंदीच्या आत मात्र आपला निर्णय चालतो अशा शब्दात त्याने मेहमतच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. आता मेहमतसाठी काहीही करून कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकणं महत्वाचं झालेलं होतं.

तशात ऑटोमनांना आणि बायझेंटाईन सम्राटालाही एक महत्वाची खबर मिळाली. १२ व्हेनेशियन गलबतांची कुमक एजियन समुद्रातून कॉन्स्टॅन्टिनोपलजवळ पोचलेली होती. कॉन्स्टंटाईनसाठी हा नाही म्हंटलं तरी धक्काच होता, कारण ऑटोमनांच्या विरोधात लढण्यासाठी त्याला यापेक्षा बरीच मोठी कुमक अपेक्षित होती....पण काही काळाकरिता या मदतीच्या साहाय्याने शहर लढवत ठेवणं शक्य असल्यामुळे त्याला हायसंही वाटलं होतं. ओटोमानांकडून युद्धविरामाचा खलिता आलेला होताच, तेव्हा ही कुमक बघून कदाचित ते गर्भगळीत होतील असा त्याला विश्वास वाटत होता. ऑटोमनांसाठी ही खबर धोक्याची घंटा होती, पण तरीही मेहमतने ही मदत पुरेशी नसल्याचं ताडून आपल्या निर्वाणीच्या हल्ल्याची योजना पुढे रेटली.

पुन्हा एकदा मेहमतच्या खलबतखान्यात सगळे सरदार जमले. वजीर हलील पाशाने आता मेहमतला निर्वाणीचा सल्ला द्यायला सुरुवात केली, पण मेहमतचा विश्वासू सरदार झागन पाशा त्याच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. त्याने वजिराला सरळ सरळ धुडकावून लावलं आणि सरळ निर्वाणीची लढाई सुरु करण्याची भाषा करायला सुरुवात केली. बघता बघता अपमानाने पेटलेल्या ऑटोमन सरदारांनी पाशाच्या सुरात सूर मिळवत आपापल्या तलवारी बाहेर काढल्या आणि जीव गेला तरी कॉन्स्टॅन्टिनोपल ऑटोमन साम्राज्यात सामील करण्याची शपथ घेतली. २६ मे या दिवशी सगळ्या ऑटोमन सैन्याने जमीन आणि पाणी अशा दोन्ही बाजूंनी जबरदस्त चढाई केली. तीन दिवस अविरत युद्धभूमी तापलेली होती. २८ मे या दिवशी ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोकांचा ' पेंटेकॉस्ट ' नावाचा सण होता. या दिवशी ऑटोमनांनी तब्बल ५५००० पौंड गन - पावडर वापरून ५००० तोफगोळ्यांचा वर्षाव कॉन्स्टॅन्टिनोपलच्या भूमीवर केला. शहराची भूमी भाजून काढल्यावर २९ मेच्या रात्री अखेर ऑटोमन सैन्यातले ख्रिस्ती सैनिक पुढे आले. त्यांच्याबरोबर अझाप सैन्याची तुकडी होती. हे अझाप इतर ऑटोमन सैनिकांच्या तुलनेत कच्चे सैनिक होते. सुरुवातीची मनुष्यहानी कच्च्या सैनिकांची व्हावी आणि आपल्या ख्रिस्ती धर्मिय बांधवांवर हल्ला करताना बायझेंटाईन सैन्याची द्विधा मनस्थिती व्हावी हे त्यामागचे उद्देश होते.

एव्हाना अथक प्रयत्नानंतर वायव्य दिशेची ब्लासर्न भागातली तटबंदी पुरेशी खिळखिळी करण्यात ऑटोमनांना यश आलेलं होतं. तिथे निष्णात आणि कणखर अनातोलियान सैनिकांच्या तुकडीने मोर्चा सांभाळला. त्या तटबंदीच्या भगदाडातून अनातोलियान सैन्याने कॉन्स्टंटाईनच्या आत घुसण्याचा प्रयत्न सुरु केला. बायझेंटाईन सैन्याने आणि त्यातही जिओव्हानीच्या जिओनीज सैनिकांनी जबरदस्त प्रतिहल्ला करून कसाबसा ऑटोमन सैन्याचा वारू रोखला खरा, पण त्यांना लवकरच पुढचा तडाखा बसला. अनातोलियान सैन्याच्या मागे होती जॅनिसेरी सैनिकांची खास तुकडी. लढाई करून थकल्या - दमल्या अवस्थेतल्या जिओनीज सैनिकांवर जॅनिसेरी त्वेषाने तुटून पडले. हा हल्ला इतका जबरदस्त होता, की खुद्द जिओव्हानी या हल्ल्यात चांगलाच जखमी झाला आणि त्याला कसाबसा उचलून आत नेतानाचं दृश्य बायझेंटाईन सैन्याला दिसलं.

या दृश्यामुळे बायझेंटाईन सैन्याचं अवसान गळलं. ब्लासर्न भागात बायझेंटाईन सैन्य एकवटल्यामुळे बाकीच्या तटबंदीवर पुरेसे सैनिक उरलेले नाहीत हे ऑटोमनांनी ताडलं. त्यांनी आता तटबंदीला ठिकठिकाणी शिड्या लावल्या. भिंतींमध्ये सुरुंग पेरले . ऑटोमनांच्या सैन्याच्या लाटा आता मिळेल तिथून शहरात शिरकाव करायला लागल्या. ब्लासर्न भागातूनही आता जॅनिसेरी शहराच्या आत घुसले. बायझेंटाईन नागरिकांमध्ये हाहाक्कार उडाला. काहींनी जेनोईज सैनिकांबरोबर त्यांच्या गलबतांमध्ये उड्या मारल्या आणि निघून जाणाऱ्या गलबतांसह आपला प्राण वाचवला. अनेकांनी तटबंदीवरून उड्या मारून जीव दिला. बेभान झालेल्या ऑटोमनांच्या तावडीत सापडलेले कोणीच वाचले नाहीत. तटबंदीजवळच्या ग्रीक घरांमधल्या लोकांना तर किंचाळायची संधीही मिळाली नाही. सम्राट कॉन्स्टंटाईन आणि त्याच्या खाशांनी आपल्या परीने लढाई करत करत मोर्चे सांभाळले, पण आता उशीर झालेला होता. आपल्या वैभवशाली शहराचा घास मुस्लिम ऑटोमन सैन्याच्या हाती जात असतानाचं दृश्य त्यांना डबडबलेल्या डोळ्यांनी बघावं लागत होतं.

शहराचा पाडाव काही वेळातच झाला. ऑटोमन सैन्याला मेहमतने मनसोक्त रक्तपात करू दिला. दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर आणि हजारोंच्या संख्येने सैनिकांची आहुती दिल्यानंतर कॉन्स्टॅन्टिनोपल ऑटोमन साम्राज्याच्या झेंड्याखाली आलेलं होतं. उलूबाटली हसन याने दिमाखाने आपला ऑटोमन झेंडा शहराच्या तटबंदीवर फडकावला. अंगात तब्बल सत्तावीस बाण घुसलेले असतानाही त्याने झेंडा रोवूनच आपले प्राण सोडले. हे बघून ऑटोमन सैन्य शब्दशः पिसाळलं आणि त्यांनी ना भूतो ना भविष्यती असा नरसंहार केला. २९ मे या दिवशी कॉन्स्टॅन्टिनोपल पडलं आणि मेहमतने दिमाखाने या शहरात प्रवेश केला...पण त्याविषयी पुढच्या भागात. तोवर अलविदा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users