कॉन्स्टॅन्टिनोपल ते इस्तंबूल - ०५

Submitted by Theurbannomad on 9 June, 2021 - 11:13

मेहमतने मोहिमेवर निघाल्यावर वाटेत अबू अयुब अल अन्सारी याच्या कबरीला भेट दिली. जे काम त्याच्याकडून पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही, जे काम त्याच्यानंतरच्या अनेक शूरवीर मुस्लिम योद्ध्यांना जमलं नाही ते आपण करून दाखवणार आहोत अशा दुर्दम्य विश्वासासह तो त्याच्या सैन्यासह मोहिमेवर पुढे निघाला. व्यूहरचना करून त्याने आवश्यक ती सगळी पूर्वतयारी केली आणि मोहिमेला प्रारंभ झाला.

सगळ्यात आधी वायव्येकडून मेहमतने आपल्या तोफदलाला पुढे करून थिओडोसियन भिंतींना लक्ष्य केलं. त्या कामगिरीवर त्याने अग्रस्थानी ठेवलं होतं ओरबान आणि त्याच्या ' बॅसिलिका ' तोफेला. या तोफेतून एक भला मोठा गोळा सूं सूं करत निघाला आणि तटबंदीवर आदळला....तटबंदीवर सज्ज असलेल्या सैनिकांनी आधीही असे हल्ले परतवले होते, पण या वेळी तोफेच्या गोळ्यामुळे झालेला आघात त्यांना चांगलाच जाणवला. भिंत शब्दशः थरथरल्यावर बायझेंटाईन सैन्य काही काळाकरिता गोंधळून गेलं. त्यांच्या बाजूने प्रतिहल्ले सुरु झाले, पण आपल्या मजबूत तटबंदीला हादरवून सोडेल अशी कोणती शक्ती ऑटोमनांना मिळालेली आहे हे काही त्यांच्या ध्यानात येत नव्हतं. मेहमतने ओरबानला अविरत आग ओकण्याचा आदेश दिला. त्याने बॅसिलिका पुढे नेली आणि त्यात भले मोठे तोफगोळे भरायला सुरुवात केली.

बॅसिलिका महाप्रचंड असली, तरी तिच्यात एक वैगुण्य होतं. या तोफेच्या आकारामुळे तिच्यातून एकदा मारा झाल्यावर तिला थंड होण्यासाठी वेळ द्यावा लगे. त्या कालावधीत ' दार्दानेल्स गन ' नावाच्या लहान तोफा कमला लागत. काहीही करून थिओडोसियन भिंतीला लवकरात लवकर भगदाड पाडून बायझेंटाईन मोर्चा कमकुवत करायचा ही मेहमतची रणनीती होती. दुसरीकडे त्याने तटबंदीच्या बाहेरच्या बायझेंटाईन प्रांतांवर आपल्या सैन्याला चढाई करायला पाठवून दिलं. बोस्फोरसच्या खाडीसमोरचा थेरपीया नावाचा गढीवजा किल्ला आणि मार्माराच्या समुद्राच्या बाजूचा स्टुडिअस गावाचा भाग आणि तिथली गढी काही तासांमध्येच ऑटोमन सैन्याने जिंकून घेतली. प्रिन्सेस आयलंड नावाचं छोटंसं बेट ऍडमिरल बाल्टोघलू या मेहमतच्या आरमारप्रामुख्याने सहज जिंकून घेतलं. तटबंदीच्या आतलं शहर सोडलं, तर आता बायझेंटाईन साम्राज्याच्या हाती काहीच उरलं नव्हतं.

हे सगळं होतं असताना थिओडोसियन भिंत मात्र ताठ उभी होती. एक तर ऑटोमन तोफदलाच्या अतिउत्साहामुळे डागलेले तोफगोळे एका भागावर ना थडकता भिंतीवर जागोजागी थडकत होते. बॅसिलिका एकदा तोफगोळा डागल्यावर थोडा वेळ घेऊन पुन्हा सज्ज होत होती. जोवर हे सगळं सव्यापसव्य होत होत, तोवर बायझेंटाईन सैन्याकडून तटबंदीची डागडुजी होत असे. मेहमतच्या अनेक दिवस चाललेल्या हल्ल्यानंतरही तटबंदी त्याच्या तोफांच्या माऱ्याला दाद देत नव्हती. जसजसे दिवस सरत होते तसतशी मेहमतच्या गोटात अस्वस्थता वाढत होती. अखेर त्याने ' गोल्डन हॉर्न ' कडून आपल्या आरमाराला आगेकूच करायचे आदेश दिले.

गोल्डन हॉर्नच्या मुखाशी बायझेंटाईन सैनिकांनी साखळ्या आवळलेल्या होत्याच. ऑटोमन आरमाराने तोफांचा मारा करून बायझेंटाईन सैन्याला मागे हटवायला सुरुवात केली. त्यातल्या काहींनी तलवारी उपसून बायझेंटाईन सैन्याची फळी कापून काढायचाही प्रयत्न केला...पण बायझेंटाईन सैन्याचं पारडं जड होतं. एकीकडून तटबंदीच्या वरून तोफांचा अविरत मारा करून त्यांनी ऑटोमन आरमाराला जेरीस आणलं, आणि दुसरीकडे साखळ्या खेचून गोल्डन हॉर्नचा प्रवेशमार्ग बंद करून ठेवला.ऑटोमन आरमाराची बरीच हानी झाली पण गोल्डन हॉर्नच्या भागातून त्यांना इंचभरही आत जाता आलं नाही.

तशात इटलीहून रसद घेऊन चार गलबतं मार्माराच्या समुद्राच्या बाजूने येताना ऍडमिरल बाल्टोघलूला दिसली. काहीही करून ही गलबतं गोल्डन हॉर्नच्या मुखाकडून आत गेली नाही पाहिजेत, या त्वेषाने त्याने आपल्या आरमाराला आगेकूच करायचे आदेश दिले. समुद्रातच तुंबळ युद्धाला सुरुवात झाली. बायझेंटाईन सैन्याने तटबंदीवरून आपल्या मदतीसाठी येत असलेल्या गलबतांना सुरक्षित ठेवण्यासाठी तोफांचा जबरदस्त मारा सुरु केला. त्यांचं स्थान उंचावर असल्यामुळे ऑटोमन गलबतांना लक्ष्य करणं त्यांच्यासाठी सोपं जात होतं, पण ऑटोमन गलबतांवरून होतं असलेला तोफांचा मारा तटबंदीच्या खालच्या भागापर्यंतच पोचत होता. तशात बायझेंटाईन सैन्याने बाणांचाही वर्षाव सुरु केला होताच....ऑटोमन आरमाराने पराक्रमाची शर्थ केली. बाल्टोघलू स्वतः जखमी झाला..त्याचा एक डोळा त्याला या धुमश्चक्रीत गमवावा लागला...पण भौगोलिक परिस्थितीमुळे बायझेंटाईन सैन्याची अखेर सरशी झाली. त्यांनी तोफांच्या माऱ्याआड व्हेनेशियन गलबतांना गोल्डन हॉर्नच्या मुखाशी आणलं आणि साखळ्या सैल करून त्यांना आत घेतलं. शेवटचं गलबत आत येताच साखळ्या पुन्हा एकदा ओढून घेऊन बायझेंटाईन सैनिकांनी तटबंदीच्या आत धाव घेतली.

तोफांच्या माऱ्याला येत असलेलं अपयश आणि व्हेनेशियन रसदपुरवठा रोखण्यात असमर्थ ठरलेलं आरमार यामुळे मेहमत वैतागला. त्याने रागाच्या भरात ऍडमिरल बाल्टोघलूला मृत्युदंड देण्याचा आदेश दिला, पण आरमारातल्या वरिष्ठांनी बाल्टोघलूने केलेली पराक्रमाची शर्थ मेहमतसमोर उलगडून दाखवली आणि बाल्टोघलूवर दया करण्याची विनंती केली. मेहमतने त्यांची विनंती मान्य केली खरी, पण त्यांना अपयशाबद्दल चांगलंच सुनावलं. त्यांनी मेहमतला यापुढे आपल्याकडून अशी चूक होणार नाही अशी ग्वाही दिली आणि त्वेषाने चवताळले ते आरमारी सैनिक गलबतांची डागडुजी करायला गेले. त्यांच्या मनात आता अपमानाची धुमस होती...जी त्यांना काहीही करून शांत करायची होती. परंतु दुसरीकडे मेहमतला आता अशा परिस्थितीला सामोरं जावं लागणार होतं, ज्यामुळे त्याच्याच अपयशाबद्दल दबक्या आवाजात कुजबूज सुरु होणार होती.

युद्धआघाडीवर मेहमतने काहीही करून तटबंदी ध्वस्त करायची असा चंग बांधून ओरबानला आपल्या तळावर बोलावून घेतलं. जे होईल ते होईल, पण बॅसिलिका थांबली नाही पाहिजे असा त्याने ओरबानला आदेश दिला. तोफेने एकदा गोळा डागल्यावर तिला थोडं थंड करावं लागत, तिच्यावर तेल चोपडून तिची थोडीफार डागडुजी करावी लागते, तिच्या भिवती करकचून बांधलेले दोरखंड सैल झाले किंवा तुटले तर पुन्हा एकदा बांधावे लागतात अशा अनेक ' तांत्रिक ' अडचणींचा पाढा ओरबानने वाचून दाखवला. यात अतिशयोक्ती काहीच नव्हती...कारण सत्तावीस फुटाची तोफ डागायची तर या सगळ्या गोष्टी स्वीकार करणं क्रमप्राप्त होतं....पण मेहमत पेटून उठला होता. त्याने ओरबानला अविरत मारा करण्याचा आदेश तर दिलाच, पण स्वतःही त्या तोफेच्या बाजूला उभं राहून जातीने आघाडी सांभाळायचा हट्टही धरला. अखेर ओरबानचा नाईलाज झाला. त्याने आठ - दहा माणसांना दिमतीला घेतलं, त्यांना सतत तोफेच्या बाहेरच्या भागावर तेल चोपडायचं आणि तोफेच्या भोवताली गुंडाळलेल्या दोरखंडांना घट्ट करत राहायचं काम नेमून दिलं. आधी तासाभराने एक गोळा तोफेतून बाहेर पडत होता, पण आता अवघ्या पंधरा मिनिटात एक गोळा डागला जाऊ लागला. आठ - दहा गोळे डागल्यावर तोफ थरथरायला लागली आणि ओरबानने मेहमतला काही काळ विश्रांती घ्यायची विनंती केली. मेहमतने तलवारीच्या टोकावर त्याला अविरत तोफ चालवण्याचा आदेश दिला आणि अनिच्छेनेच ओरबानने पुढचा तोफगोळा तोफेच्या आत सरकवला....बत्ती दिली आणि आपले कान बंद केले. तोफ धडधडली, पण शेवटची. तोफेतून गोळा बाहेर फेकला गेला आणि प्रचंड स्फोट करत तोफेचे तुकडे पडले. ओरबान आणि आठ - दहा मदतनीस जागीच ठार झाले....आणि मेहमतही जखमी झाला. काही सैनिकांनी त्याला उचलून तळावर नेलं आणि तंबूमध्ये आडवं करून त्याला पाणी दिलं. काही वेळाने मेहमत सावध झाला, पण झालेला प्रकार समजल्यावर त्याच डोकं पुन्हा एकदा सुन्न झालं.

वजीर हलील पाशा आता पुढे सरसावला. मेहमतला त्याने मोहीम आवरती घेण्याची विनंती केली....पण त्याच्या आवाजात विनंती कमी आणि कुत्सितपणा जास्त होता. बरेच मोठे सरदार तंबूत जमलेले होते....त्यांच्यापैकी काहींनी मूकपणे वजिराच्या बोलण्याला दुजोरा दिला. तशात मेहमतकडे युरोपच्या भागातून एक वाईट खबर आली. त्याच्या आईने युरोपच्या ख्रिस्ती महासत्तांनी बायझेंटाईन सत्तेला वाचवण्यासाठी अधिकची रसद पाठवल्याची ही खबर मेहमतसाठी धोक्याची घंटा होती. ही रसद नुसती धान्याची किंवा दारुगोळ्याची नव्हती, तर युरोपमधून बरेचसे सैनिकही या ' धर्मयुद्धात ' सामील व्हायला निघाले होते. ही खबर मिळेपर्यंत युरोपीय गलबतांनी भूमध्य समुद्र ओलांडून एजियन समुद्रात प्रवेश केला असण्याची दाट शक्यता होती आणि पुढे अर्थातच बल्गेरियाच्या बाजूने जमिनीवरूनही नवी आघाडी उघडली जाण्याचा धोकाही स्पष्ट दिसत होता.

एखाद्याने या सगळ्या परिस्थितीत तात्पुरती का होईना, पण माघार घेऊन पुन्हा एकदा युद्धआघाडीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला असता, पण मेहमत अवघ्या विशीतला तरुण असूनही त्याने अशी काही धूर्त चाल केली, की अवघ्या जगाला पुढे इतिहासात त्याची नोंद ठळकपणे घ्यावी लागली. दोन-एक महिन्याच्या अपयशी ठरत चाललेल्या मोहिमेला अचानक जबरदस्त कलाटणी देणारा हा निर्णय कोवळ्या मेहमतच्या महत्वाकांक्षी आणि बेडर वृत्तीचा नमुना ठरला. वजीर हलील पक्षाचं नव्हे, तर सैन्यदलातल्या अनेक जुन्या जाणत्या सरदारांनाही हा निर्णय पचवणं सुरुवातीला जड गेलं, पण मेहमत इरेला पेटला होता. ही चाल नक्की काय होती, त्याविषयीची माहिती येईल पुढच्या भागात....तोवर अलविदा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users