स्वरांगण

Submitted by _आदित्य_ on 7 June, 2021 - 22:38

आभासी अवकाशामध्ये अंनत स्वर भिरभिरती..
वेचायाला जाता किंतु सातच ओंजळ भरती !
रोज कुठे वरदान सख्या रे? एकदाच ना मिळते !
सांग मला तू अवकाशातून कधी चांदणे गळते?
सातांतील त्या एकेकाची अखंड आहे कीर्ती !
भिऊ नको तू पुरते लख्ख स्वरांगण आहे वरती !

षड्जाचा ठहराव निराळा अनुभूती पूर्तीची..
रिषभ मनाला दिशा दाखवे रचनेच्या स्फूर्तीची !
गंधारातून गंध दरवळे सौंदर्याचा निळा..
मध्यम रंग तयात मिसळता वेगळाच सोहळा !
पंचम भाव टिकवुनी धरतो होऊन घट्ट सहारा..
धैवत आणिक निशाद करती पूर्ण खेळं हा सारा !
अजून ऐकायाला जरीही गात्र गात्र हे झुरती..
भिऊ नको तू पुरते लख्ख स्वरांगण आहे वरती !

पुन्हा षड्ज जन्मतो नव्याने गीते साकाराया !
रे ग म प ध नी ही येती त्याला साथ कराया !
नव्या नव्या रचनांनी प्राण सुगंधी होतच राही..
नवल वाटते कसाकाय रे त्यांना अंतच नाही?
नऊ रसांच्या पलीकडचा तो अतिरस अंगी भिनतो..
सप्तसुरांच्या मिलनातून आकार देव ही घेतो !
कोमल, शुद्ध नी तीव्र तिघेही परमात्म्याला स्मरती..
भिऊ नको तू पुरते लख्ख स्वरांगण आहे वरती !

Group content visibility: 
Use group defaults