निष्काम कर्मयोगी मी

Submitted by निशिकांत on 5 June, 2021 - 07:03

( आज पर्यावरण दिवस आहे. त्याचे औचित्य साधून झाडाचे मनोगत सांगणारी एक जुनी कविता )

मी रणरण उन्हात जगतो
अन् छाया प्रदान करतो
निष्काम कर्मयोगी मी
विश्वाला देण्या जगतो

पाखरे बांधती घरटे
नवपिढी जन्मते येथे
फुटताच पंख पिल्लांना
ती उडती नाते तुटते
वृध्दांनो मी तुमच्यासम
ना रडतो अथवा कुढतो
निष्काम कर्मयोगी मी
विश्वाला देण्या जगतो

छायेला वैष्णव बसता
भक्तीचा अनुभव घेतो
तरुणाई कुजबुजताना
दुसर्‍याच क्षणी मोहरतो
बसतात तळी त्यांच्याशी
तारा मी जुळवित असतो
निष्काम कर्मयोगी मी
विश्वाला देण्या जगतो

नांदते भूत झाडावर
अथवा मुंजा बसलेला
दावता कशाला भीती?
मी नसतो झपाटलेला
बाधा मज तुमची जडली
आनंदे मी सळसळतो
निष्काम कर्मयोगी मी
विश्वाला देण्या जगतो

मी स्थितप्रज्ञ दिसतो पण
आहेत इरादे इतके !
पेलाया नभास लिलया
शोधीन मार्ग मी नवखे
सूर्याला छाया द्यावी
हे स्वप्न उरी बाळगतो
निष्काम कर्मयोगी मी
विश्वाला देण्या जगतो

सावलीतल्या झुडुपांच्या
प्राक्तनी वाढणे नसते
वेगळी स्वतःची त्यांना
सावली कधी का असते?
झेलण्या ऊन घाबरतो
तो वंशज माझा नसतो
निष्काम कर्मयोगी मी
विश्वाला देण्या जगतो

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users