ज्या क्षणाला ठरवले

Submitted by निशिकांत on 3 June, 2021 - 10:47

रुक्षसे आयुष्य माझे
त्या क्षणाला बहरले
वादळायाचे मनी मी
ज्या क्षणाला ठरवले

चौकटी, सीमा कुणी त्या
आखल्या पाळावया?
तोडता त्या, का स्त्रियांना
लागले दंडावया?
भाग्यरेषा मी लिहाया
लागता जग खवळले
वादळायाचे मनी मी
ज्या क्षणाला ठरवले

द्यायची दानात कन्या
संस्कृती जेथे जुनी
हा विषय नव्हताच केंव्हा
काय कन्येच्या मनी
छेडला एल्गार मी अन्
लोक सारे बिथरले
वादळायाचे मनी मी
ज्या क्षणाला ठरवले

शिवधनुष्या पेलणारे
सूर्यवंशी रघुपती
हेच करता अन्य, तोही
जाहला असता पती
मूक होते जानकीला
वाल्मिकीने बनवले
वादळायाचे मनी मी
ज्या क्षणाला ठरवले

वाट पुढती खूप आहे
ध्येय क्षितिजाच्या पुढे
युध्द हे आहे पिढ्यांचे
यादवी चोहीकडे
काळजी का या क्षणाला?
गवसले की हरवले
वादळायाचे मनी मी
ज्या क्षणाला ठरवले

मुक्त मी होणार आहे
बंध सारे तोडुनी
सज्ज मी घ्याया भरारी
पंख माझे उघडुनी
वाटते वाटो जगाला
बेबंद झाले बहकले
वादळायाचे मनी मी
ज्या क्षणाला ठरवले

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users