शेवट! (The End Of Relationship )

Submitted by रिना वाढई on 31 May, 2021 - 03:12

तीन दिवसांच्या सुट्ट्या लागून आल्या होत्या. खूप कमी वेळा अशा सुट्ट्या मिळतात . यावेळेस या सुट्ट्यांची पायल ला गरज देखील होती . किती दिवसांपासून तिला अर्जुनसाठी काहीतरी करायचं होत, पण ऑफिस च्या कामातून आणि मग घरच्या कामातून वेळ मिळतच नव्हता . 

आता या तीन दिवसांत आपण अर्जुनसाठी एखाद लेख लिहू जे फक्त त्याच्याबद्दल असेल , त्याला त्याच्या बर्थडे च्या दिवशी पोस्ट करू . या विचारातच पायल होती .

सुट्टीचा पहिला दिवस उजाडला , मनात साठवलेलं फक्त पानांवर उतरवायचं होत तिला , त्यामुळे दिवसातले १-२ तास पुरेसे असतील म्हणून पायलने आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात केली . सगळे काम करत असतांना मनात एकच विचार घोळत होता , का?? का मी त्याला माझ्या असण्याची जाणीव करून द्यावी . जेव्हा मी त्याच्याबद्दल काहीतरी लिहिणार आणि त्याला पाठवणार त्यावेळेस त्याला माझी आठवण नक्कीच होणार . पण मी जाणीव करून देण्याची गरज का आहे ? जर मी त्याला फोन नाही करणार तर तो स्वतःहून मला फोन करेल काय????
मागच्या वर्षी जेव्हा दिवसभरात त्याला फोन करून शुभेच्छा देणं नव्हतं जमलं आणि सायंकाळला मी फोन केला तेव्हा तो म्हणाला ... पायल, "मी तुला स्वतःच फोन करणार होतो ". तुझा मॅसेज वाचून झाल्यावरही तुला साधं धन्यवाद म्हणून नाही म्हणालो , कारण मला तुला फक्त एक मॅसेज करून रिप्लाय नव्हता द्यायचा ,तर तुला फोन करून तुझ्याशी बोलायचं होत . माझ्या बर्थडे च्या दिवशी तू नक्कीच फोन करशील म्हणून मी नेहमी वाट पाहत असतो गं . 

हे ऐकून पायल ने हि त्याला एक कमिटमेंट दिली होती ... अर्जुन , मी काहीही झालं तरी तुला तुझ्या बर्थडे च्या दिवशी न विसरता फोन करेल .
एवढ्या वर्षात पायलही कधी विसरली नव्हतीच त्याला फोन करणं ,पण फक्त तिलाच स्वतःला आजपर्यंत समाधान मिळालं होतं , आता अर्जुनही आपल्या फोनची वाट बघत असतो हे माहित झालं ,म्हणून ती तर आता न चुकता , न विसरता त्याला फोन करणार होती .
आताही तिला तेवढीच उत्सुकता होती , पण कुठेतरी तिला जाणवत होत कि यावर्षी अर्जुनला आपल्या फोन करण्याने किंवा न करण्याने काहीही फरक पडणार नाही . नात्यांमध्ये दुरावा आला कि त्याची चाहूलही जाणवतेच , तशीच चाहूल तिला या काही दिवसांत जाणवू लागली होती . त्याचे विचार आपोआपच मनात घर करून गेले .तिला त्याच्याबद्दल लिहायला आता जमणार नव्हते .  
त्या दिवशी तिचा लिहिण्याचा कार्यक्रम तिने दुसऱ्या दिवसावर ढकललं आणि आपला मन तिने घरकामात गुंतवून घेतलं . 

उन्ह्याळ्याचे दिवस असल्याने उन्हाळी पदार्थ बनवण्यातच तिचा पूर्ण दिवस गेला . रात्री मनाशी एक गाठ पक्की बांधूनच ती झोपी गेली . 

सकाळी उठल्या उठल्याच तिला आठवलं कि रात्रीच आपण ठरवलो होतो आज जास्त घरकाम न करता वेळ काढून लेख लिहायचं . पण मनामध्ये आठवणींची परत एकदा उकळी आली आणि मनाशीच बांधलेली गाठ अलगत सुटली . तिला आता कळून चुकले कि डोक्यात कितीही लिहिण्याचे विचार असले तरी मन आता साथ देत नाहीये . त्याला कारणही तसंच होत . 

एखाद्याच मन आपण किती वेळा तोडू शकतो...? जेव्हापर्यंत तो व्यक्ती आपला मन तुटू देऊ शकतो तेव्हापर्यंतच ना !

पायलच्या बाबतीतही काही अशेच घडले होते. आता तिने आपल्या मनाला एवढं घट्ट केलं होत कि कुठलाही वादळ , तिच्या मनापर्यन्त पोहचू शकणार नव्हता . अर्जुन...अर्जुन ची आठवण येताच मन मात्र अगदी सुन्न होऊन जायचं . सुट्ट्या संपल्या , तिला जे लिहायचं होत ते राहूनच गेल .
अर्जुनचा बर्थडे आता उद्याच होता . पायल ला सकाळपासूनच थोडं अस्वथ वाटत होत, नक्कीच याच कारण म्हणजे तिने केलेला एक निश्चय होता . जे तिच्याकडून पूर्ण होईल कि नाही याची तिलाच खात्री नव्हती . "काहीही झालं तरी अर्जुनला फोन करणार नाही , हं त्याला विश केल्याशिवाय मी राहू शकणार नाही म्हणून एक मॅसेज टाकून देईल ". त्या मॅसेजचा प्रतिऊत्तर मिळालं कि समजून जाईल माझ्या मनात जे द्वंद चालू आहेत त्यात नक्कीच काही तथ्य आहे , आणि जर त्याने मॅसेज वाचून उत्तर नाही दिल कि समजून जाईल तो आजही माझ्या फोनची वाट बघतो आहे . 

हे मनोमन तिने ठरवून टाकलं . साहजिकच ती रात्र तिला खूप मोठी वाटत होती . १२ वाजले  , तिने मोबाईल हातात घेतला , त्याच्यासाठी चार ओळींचा मॅसेज टाईप करून तो नोट मध्ये सेव्ह केला. मनात आलंही कि पहिलं विश त्याला आपण करावं, पण तो हक्क आपल्याला नाही याची जाणीव झाली , नकळत डोळे पाणावले . तिने सकाळी वेळ मिळेल तेव्हा पाठवू म्हणून फोन बाजूला ठेवला आणि त्याच्या विचारातच हरवून गेली . पहाटेचे ३ वाजले तेव्हा कुठे तिला झोप लागली . रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उठायला जरा उशीरच झाला . भराभर घरातली कामे आटोपून ती देवघरात गेली , मनात कितीही वादळ असलं तरी देव्हारा एक असं ठिकाण आहे जिथे गेल्यावर आपोआपच मनाला विसावा मिळतो . आज तर तिच्या अर्जुनाचा बर्थडे, त्यामुळे देवाला आज थोडं जास्त वेळ देऊन देवाकडून खूप काही मागायचं होत तिला . 

हात जोडून ती अर्जुनच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली . कारण त्याच आयुष्य म्हणजे तिचा श्वास होता . 

सॉरी देवा , आज मी अर्जुनला फोन नाही करणार , तुला तर कळत असेलच ना रे ,कि तो काय विचार करतो . मग सांग ना मला ,कि त्याला आज माझी आठवण येईल काय???? मी जेवढ्या अधीरतेने या दिवसाची वाट पाहत आलीये तो हि तेवढाच उत्सुक असेल का रे माझ्याशी बोलायला . 

थोड्या वेळा पूर्वीच जेव्हा भाजीच चिरायला घेतलं त्यावेळेस चुकून चाकू हाताला लागला , त्यावेळी काळजात धस्स झालं कि आजच्या दिवशी मला इजा का ??? पण आपल्याच लापरवाहिने हात कापला असेल म्हणून मग मनाला शांत केलं . 

पूजा करायच्या आधी जेव्हा देवाजवळ रांगोळी टाकत होते तेव्हा सगळी रांगोळी झाल्यावर त्या रांगोळीच्या डब्याला हात लागल्याचं निमित्य , नि सगळे कलर सांडले .सगळे कलर एकमेकांत अशे मिसळले कि कोणता रंग आहे हे ओळखायला आलं नाही . 

सगळं काही तिला खूप जपून ठेवायची सवय होती , रांगोळीचे प्रत्येक रंग तिच्याकडे ठेवले होते . आज स्पेशल दिवस म्हणून तिने काढलेल्या प्रत्येक रांगोळीमध्ये छानस कलर भरलं होत . देवाजवळ अगदी शोभून दिसेल अशी रांगोळी टाकली , पण मध्येच सगळे कलर सांडल्याने ती रांगोळी विस्कटली . 

आज आपल्यासोबत असं का होत असेल असा प्रश्नच पडला मनाला . म्हणून ती देवासमोर खूप आत्मीयतेने बसली होती . 
अंतर्मनातून आवाज आला , नाही पायल अर्जुन आता बदलला आहे ,तू हि थोडी बदल स्वतःला .
मी त्याच्यामध्ये झालेला बदल स्वीकारू शकते पण स्वतःला बदलने म्हणजे काय ? जगण्यासाठी श्वासांची गरज असतेच , आणि अर्जुन तीच गरज आहे माझी ....मानव हा सगळं काही अगदी ठरवून बदलू शकतो , सध्या आहे त्या परिस्थितीतही तो बदल करू शकतो .पण मन कसा बदलेल तो . मान्य ! कि मानवी मन खूप चंचल असते आणि खरेच आहे चंचल ते , पण मनात वसलेल्या एखाद्याच्या भावनांना तो बदलवू शकतो ? पायलसाठी तरी तिच्या मनाला बदलणे हे एक आव्हानचं होते .  तिने त्याचा बदलही स्वीकारला. देवाला पुन्हा एकदा त्याच्या सुखासाठी प्रार्थना केली आणि ऑफीच्या कामाला लागली . सकाळी ११  वाजता टीम मीटिंग होती म्हणून तिने अर्जुनला मीटिंग झाली कि मॅसेज करू असा विचार केला . बॉसचा मॅसेज आला कि मीटिंग ११ च्या ऐवजी १२ वाजता होणारं आहे . मीटिंग मध्ये राहिल्यावर वेळ कसातरी निघून जाईल आणि अर्जुनची जास्त आठवण येणार नाही वाटून ती मीटिंग साठी वाट बघत होती , पण बॉसचा मॅसेज पाहून तिला आता कळलं कि वेळ आज आपल्यासोबत नाही आहे . जे होईल ते होईल ,प्रत्येक परिस्थितीला समोर जायची मनाची तयारी तिने केली . लांब श्वास घेतच तिने सेव्ह केलेला मॅसेज अर्जुनला सेंड केला . एका मिनिटातच अर्जुन ने तो रीड केला आणि लगेच त्याचा रिप्लाय आला , थँक यु !

बस! फक्त एक थँक यु अर्जुन , अ रे तो मॅसेज काही कुठून कॉपी पेस्ट नाही केलाय . ते भाव आहेत माझ्या आत्म्यातले जे फक्त तुझ्यासाठीच शब्दांत उतरले आहे . तुझ्या मनापर्यंत का नाही पोहचत रे माझ्या भावना . खरंच तुझ्या मनाला याचा थांग नाही कि तू जाणून असा वागतोस माझ्यासोबत ....? अशे अनेक प्रश्न तिच्या मनाला पडत होते . 

कितीदा तिला वाटलं कि त्याला विचारावं , फोन करू का ? कारण त्याच्या होकाराशिवाय ती त्याला फोनही करू शकत नव्हती . पण तिने केलेला निश्चय आठवुंन ती तो विचार बाजूला सारत होती . टीम मीटिंग म्हटलं कि ३-४ घंटे आरामात निघून जायचे , त्यामुळे तिला अजून थोडा वेळच हि घुसमट सहन करावी लागणार होती . १२ वाजले नि मीटिंग सुरु झाली , त्या मीटिंग मध्ये फक्त तिचा देह होता , मन तर अर्जुनकडेच धाव घेत होते . 

१:३० वाजले नि मीटिंग संपली . बॉस ने आज एवढ्या लवकर मीटिंग का संपवली म्हणून रागही येत होता . तर दुसरीकडे एक संकेतही मिळत होत की कदाचित आपण अर्जुन ला फोन करू शकलो पाहिजे म्हणून ....?

थोड्या वेळ डोक्याचे आणि मनाचे आपसातच द्वंद सुरु झाले नि साहजिकच त्यात  डोक्याची हार झाली.

न राहावून अर्जुनला फोन केलाच , फोन करायच्या आधी एक गोष्ट ठरवली होती आणि ती फक्त आता अर्जुनच्या बोलण्यावर अवलंबून होती कि पुढे काय ???

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे.
फक्त पुर्णविराम, स्वल्पविराम देतांना स्पेस टाकु नका आणि जरा शुध्दलेखनाकडे लक्ष द्या.

छान लिहिले आहे.
फक्त पुर्णविराम, स्वल्पविराम देतांना स्पेस टाकु नका आणि जरा शुध्दलेखनाकडे लक्ष द्या.>>

वीरू , तुमच्या प्रतिसादासाठी मनापासून आभार. पुढील भागात चुक सुधारण्याचे नक्कीच प्रयत्न करेल.

नक्कीच प्रयत्न करेल.>> ताई करेन असे हवे. जाईन असे हवे. न विसरता फोन करेन. असे हवे. एक तर्फी प्रेमाची तडफड चांगली रंगवली आहे.