ती उन्हे उतरली अलगद झाडांच्या छायेखाली

Submitted by द्वैत on 26 May, 2021 - 10:43

ती उन्हे उतरली अलगद
झाडांच्या छायेखाली
वाटेवर लावून डोळे
मी निजलो संध्याकाळी

मन पाचोळा पाचोळा
संवेदन गेले गोठून
मी जिथे थांबतो तेथे
हे उठते वारूळ कोठून

हा शाप म्हणावा मी की
वरदान लाभले समजू
ह्या काठावरूनी दिसते
क्षितीजाची एकच बाजू

ही बुडते संध्याछाया
ह्या काळोखाच्या डोही
मज गहिवर आला पण मी
ते दान टाकले नाही

माझे हे मीपण खोटे
अस्तित्व शोधते बिंब
ती पहाट होण्याआधी
मी झाकून घेईन अंग

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्वैत,
कविता वाचली, पुन्हा पुन्हा वाचली.
ही कविता तुझी स्वत:ची आहे यातले विचार स्वयंसृजनतेतून आलेले आहेत.
हे मला तरी जाणवतय!!
खरतर गेली चार वर्षे प्रत्येक कलाकृतिला, तळाला तुला तुझे
स्वत:चे खरे नाव, आडनाव लावून लौकिकार्थाने दाद घेता आली असती!!
पण तू कायमच "द्वैत" राहिलास(प्रोफाईलवरही)! अज्ञात राहिलास..
जो माणूस गेली चार वर्षे' नावालाही श्रेय घेत नाही त्याला
कशाला कुठले लांच्छन (अर्थात लांच्छन म्हणून बोट लावायचा हेतू नसेलही पण तरीही...) लागेल
की "दुसर्‍या कुणासारखेतरी तुम्ही लिहीलेले आहे.."

(खरतर हे सर्व मला संपर्कातील मेल वर लिहायचे होते..पण तुम्ही मेल्स वाचता का याची कल्पना नाहीये)
(आणि वर अरेतुरे केलं कारण ते आतून आलेलं होतं! आणि जरी तुमचे चुकुनमाकून खरे नाव "द्वैत" निघाले, तरीही माझे वरचे म्हणणे जराही फोल ठरत नाही)

ग्रेसशी तुलना करणे किंवा त्यांची छाप (प्रभाव) जाणवतो असे म्हणणे म्हणजे मोठा बहुमान आहे हे वेगळे सांगायला नको. ग्रेस सारखे अणुभर जरी लिहिता आले तरी ती मोठीच उपलब्ध मानावी लागेल. पण अर्थात ग्रेस ते ग्रेस हे वास्तव उरणारच म्हणून कविता ठीकच आहे.