‘वसंता’तल्या मुक्तांगणचे ऋणानुबंध...

Submitted by Charudutt Ramti... on 25 May, 2021 - 09:01

युगानुयुगे संथ गतीने वाहणाऱ्या ‘कृष्णे’ काठी वसलेल्या, चांदोबाच्या मासिकातील एखाद्या गोष्टीत ‘आटपाट नगर’ वगैरे वर्णन केलेलं असावं, तसं आमचं ऐतिहासिक टुमदार असं मिरज शहर. ह्या शहराचे आणि माझे काही वेगळेच ऋणानुबंध. त्यातले काही अनुबंध, तिथे गल्ली गल्लीत बनणाऱ्या सतारिंचे , काही कै. अब्दुल करीम खॉं साहेबांच्या स्मृतिदिना निमित्त दर्ग्यात ऐकलेल्या धारवाडच्या कुण्या नवोदित गवयाच्या मैफिलीतल्या रागदारीचे, काही गांधर्व महाविद्यालयाचे, तर काही खरे मंदिर मध्ये ऐकलेल्या वसंत व्याख्यानमालेचे.

त्या काळी, ह्या छोटेखानी शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि मुख्यत्वे 'बौद्धिक' गरजा भागवणारी, मोजक्याच पण सुस्पष्ट वैचारिक बैठक असलेल्या मंडळींनि चालवलेली प्रगल्भ अशी एक संस्था होती. 'मिरज विद्यार्थी संघ' (मि.वि.सं.) नावाची. अजूनही कार्यरत असेल कदाचित, पण नक्की माहिती नाही.

आजकाल काय 'नॉस्टॅल्जिक बिस्टॅल्जीक' म्हणतात ते तसलं काहीतरी, आणि आमच्या साध्या सोप्या मराठमोळ्या शब्दात 'मनाला आणि जीवाला, किंचित हुरहूर लावणाऱ्या आणि तरीही रम्यश्या’ भूतकाळच्या आठवणीत वगैरे हरवून जावं तसं काहीसं होतं, ह्या मिरजेच्या जुन्या आठवणी मनस्वी पणे स्मृती पटलावर गोफ धरून नाचू लागल्या की.

‘मिरज विद्यार्थी संघ’ हे सो कॉल्ड सांप्रदायिक ताकद वगैरे कडे झुकणारं नाव असलं तरी ‘राष्ट्रीय स्वसयंसेवक संघाशी’ ह्या मिरज विद्यार्थी संघाचा दुरान्वये ही संबंध नव्हता. मिरज विद्यार्थी संघाची स्थापना सन १९१९ ची, म्हणजे RSS च्या स्थापने पूर्वी सहा वर्षे. “मि.वि.सं.” ही संस्था ‘चळवळ बिळवळ’ चालवणे वगैरे असल्या भानगडीत अजिबात पडत नसे, स्वातंत्र्या पूर्वीही आणि स्वातंत्र्या नंतरही. 'थींकटॅंक' वगैरे आधुनिक शब्दप्रयोग त्यावेळी अजून प्रचलित व्हायचे होते, पण मि.वि.सं. ही संस्था म्हणजे आमच्या वेळचा आमच्या शहरापुरता जणू काही ‘थिंकटॅंक’च होता.

पंचवीस हजाराहून अधिक पुस्तकांना (त्यातली बरीचशी दुर्मिळ) निवारा देणाऱ्या "खरे मंदिर" ह्या सरकार मान्य मोफत वाचनालयाचे 'योगक्षेम' सांभाळणे हे ह्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप देऊन त्यांना पुढील शिक्षणास सहाय्य करणे, वगैरे अशी इतरही अनेक सामाजिक कार्ये सुरु असायचीच ह्या संस्थेची. परंतु ह्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा आणि आमच्या सारख्यांसाठी अत्यंत आकर्षण असणारा ह्या संस्थेचा ‘फ्लॅगशिप’ उपक्रम म्हणजे, ऐन “में” महिन्यात दरवर्षी हमखास आयोजित केली जाणारी 'वसंत व्याख्यान माला'. पुण्याची ‘वसंत व्याख्यानमाला’ जितकी सुप्रसिद्ध तितकीच आमच्या 'मिरजे'ची. माझ्या आई नंतर माझ्यावर सर्वात जास्त संस्कार जर त्या जडण घडणीच्या वयात कुणी केले असतील तर ते मिरजेच्या सुप्रसिद्ध 'वसंत व्याख्यानमाले'ने.

हीरक महोत्सवी परंपरा असलेल्या आमच्या शहरातील ह्या वसंत व्याख्यानमाले मुळे मुळातंच अत्यंत रसिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या, असंख्य अश्या मिरजकर श्रोत्यांना, राज्यभरातील प्रगल्भ अश्या वक्त्यांचे विचार, व्याख्यानांच्या रूपाने प्रत्यक्ष ऐकण्याची दुर्मिळ संधी मिळे. सागरा सारखा आवाका असलेल्या आणि हिमालयच्या उंचीच्या ‘वक्ता दससहस्त्रेषु’ अश्या उच्चकोटीत गणल्या जाणाऱ्या निवडक मोजक्या आठ दहा वक्त्यांची उपस्थिती, विषयांमधले वैविध्य, आणि तितक्याच रसिक आणि अभ्यासू गुणिजनांची श्रोत्यांमध्ये असलेली उपस्थिती, ही व्याख्यानमालेचे काही वैशिष्टये.

‘एप्रिल’च्या शेवटच्या आणि ‘मे’ च्या पहिल्या आठवड्यात, संध्याकाळचे सहा-साडेसहा वाजू लागले आणि दिवसभर तळपून तळपून दमलेला सूर्य, त्याचा धकाधकीचा दिनक्रम आटोपून थोडा निवांतपणा शोधत, दूर क्षितिजावर त्याची दुपार पासून वाट पाहत ताटकळत उभ्या असलेल्या नाजूक ‘तिन्हीसांजे’च्या बाहुपाशात शिरायचा. तेंव्हाकुठे मग हवेतील उष्मा किंचित कमी होऊन सर्वत्र गारवा पसरू लागल्याची चाहूल लागायची आणि आमच्या सारख्या अनेक रसिक मिरजकरांची पाऊले आपसूकच खरे मंदिरच्या पटांगणाकडे वळू लागायची. श्रोत्यांमध्ये वय वर्ष बारा ते अठ्यांणऊ ह्या वयोगटातले सर्वच जण असायचे. अर्थात पेन्शनर तुलनेनं जास्त.

‘खरे मंदिर’च्या आवाराच्या प्रांगणा आधी फाटका पाशी, काळ्या फळ्यावर, विद्यार्थी संघाच्याच कुणा सदस्याने वाटीभर पाण्यात मनसोक्त भिजवून आणलेल्या ओल्या लालसर पिवळया खडूने अगदी मन लावून कॅलिग्राफी करत “आजच्या व्याख्यानमालेचे पुष्प” आणि “वक्त्याचे नाव, गांव, व्याख्यानाचा विषय” वगैरे त्रोटक माहिती सुवाच्य हस्ताक्षरात लिहिलेली असायची. तो ‘फळा’च जणू हसत मुखाने श्रोत्यांचं स्वागत करायचा. मग तुम्ही, एखाद्या जुन्या दाक्षिणात्य गोपुरातल्या गर्भगृहा सारख्या भासणाऱ्या दुमजली दगडी इमारत असलेल्या ‘खरे मंदिर’च्या चिंचोळ्या ‘गल्ली’वजा ‘बोळा’तून (किंवा ‘बोळ’ वजा ‘गल्ली’तून) बाजूने चालत, चालत पुढे खरे मंदिरच्या प्रांगणात शिरलात, की तिथे, ‘दुर्गा’, ‘हमीर’, ‘खमाज’ अथवा तत्सम कोणत्यातरी संध्याकाळच्या रागातली शिवकुमार ह्यांनी छेडलेली ‘संतूर’ किंवा अमजद अलींनी ‘सरोद’ वर वाजवलेली एखादी जुन्या मिरजेतच कधी काळी घडलेल्या मैफिलीतल्या लाईव्ह बंदिशिची रेकॉर्ड सुरु असायची. पण ती सुद्धा अगदी (अगदी म्हणजे अगदीच) मंद आवाजात.

प्रांगणात भली मोठी सतरंजी पसरलेली असायची. ती सुद्धा कुणीतरी संस्थेस कुणाच्यातरी स्मरणार्थ दान केलेली. त्या सतरंजीवर त्या व्यक्तीचं "कै.गंगुबाई नारायणराव कुरुंदवाडकर ह्यांच्या स्मरणार्थ मि.वि.सं. सप्रेम, सन १९८८" वगैरे जाड ठळक मराठी फॉन्टची एम्ब्रॉयडरी करून ठाशीव पणे लिहिलेलं असायचं. समोर व्यासपीठावर फ्रेंच पॉलिश आणि चकचकीत वार्निश चढवलेला सागवानी पोडियम असायचा. त्यावर एखाद्या फुलदाणी मध्ये जवळच्याच लोणी बाजारातून आणलेल्या सुंदर अश्या ताज्यातवान्या फुलांचा गुच्छ, फुलदाणीतलं घोट घोट पाणी पीत वक्त्यांची वाट पाहत उभा असायचा. पायाखाली सतरंजी मधून डोकावणारी वाळूतली बारीक बारीक खडी टोचत असायची तळव्यांना. तिच्याकडे आपसूकच दुर्लक्ष होत असे.

बरोब्बर पावणे सात वाजता 'मिरज विद्यार्थी संघाच्या वतीने उपस्थिती श्रोत्यांचे स्वागत...' असा माईक वरून धीर गंभीर वयोमानानुसार किंचित कंप असलेला खर्ज स्वरातला वसंतराव आगाशे सरांचा आवाज ऐकू यायचा, आणि लोकांच्या आपापसात रंगलेल्या गप्पांची कुजबुज एकदम शांत व्हायची. आणि सभेतील औपचारिक पणाचे फारसे स्तोम न माजवता, वक्त्यांचा अगदी मोजक्या शब्दात परिचय करून देत मग वक्त्यांनाच पाचारण करून, सरळ मूळ विषयाला हात घातला जायचा. घरगुती साधेपणा हा ह्या उपक्रमाचा एक अनोखा पैलू. वक्तशीर पणा, शिस्त आणि एकंदर सगळंच वातावरण अगदी आखीव रेखीव. इथे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य पद्धतीची आठवण करून देणारा.

मुंबई मिरज महालक्ष्मी एक्सप्रेस चा सुखद अनुभव कथन करत मग, मिरजेत दीड दोन दिवसांकरिता ह्या व्याख्यान मालेच्या निमित्ताने पाहुणे म्हणून आलेले हे व्यासंगी वक्ते त्यांच्या आवडीच्या विषयांवर जिवंत झऱ्या सारखे अखंडपणे बोलू लागले की बोलता बोलता घश्याला कोरड पडली तरी समोर ठेवलेल्या तांब्याच्या फुलपात्रातलं पाणी सुद्धा कित्येकदा प्यायला विसरत असंत. अक्षरश: एव्हढे समरस होऊन बोलत असंत दीड दीड तास. आणि समोर बसून ऐकणारा श्रोता ही तितकाच मंत्र मुग्ध होऊन एकेका शब्दांच्या तुषारांमध्ये भिजून अगदी तृप्त होऊन जायचा. त्यालाही मागचे दीड दोन तास कसे गेले? ते समजायचं नाही.

वक्त्यांची एकेक नावं आठवली तरी आजही अंगावर शहारे उभे राहतात. ज्यांची अमोघ वाणी स्रवायची तेंव्हा इतिहास सुध्दा क्षणभर स्तिमित होऊन जायचा अश्या प्राचार्य बाबासाहेब भोसलेंना मी खरे मंदिरच्या ह्या व्यासपीठावर प्रथम ऐकलं. स्वराज्य आणि त्यावेळच्या शिवकालीन घटनांना प्रत्यक्ष समोर उभा करून दाखवताना बाबासाहेब पुरंदरेंना पाहिलं. अं.नि.स. चे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकरांना मी पहिल्यांदी इथेच ऐकलं. त्यांचे अंध श्रद्धा निर्मूलनाचे सखोल कार्य आणि एकंदर विचार ऐकून मी कित्येक दिवस भारावलेल्या आणि तितक्याच अस्वस्थ अवस्थेत काढलेले होते. असेच एकदा डॉ. दाभोळकरांच्या समवेत डॉ. श्रीराम लागू सुद्धा आले होते. 'देवाला रिटायर्ड करा' ही त्यांची व्याख्यानमाला तेंव्हा महाराष्ट्रभर चांगलीच वादग्रस्त ठरली होती. विषय कुणाला पटो वा ‘न’ पटो पण डॉ. लागूंचा स्पष्टवक्ते ते डायस वरूनवर बोलत असताना समोरच्याला अचंबित करून जाई.

अश्या ह्या सगळ्या समृद्ध अश्या सारस्वतांच्या यादीमध्ये प्राचार्य राम शेवाळकरांच्या ज्ञानेश्वरीवरील भाषणा पासून ते अत्यंत अभ्यासू आणि विद्वान अश्या प्रा. शेषराव मोरे ह्यांच्या ‘काश्मीर आणि युनो’ ह्या विषयावरील सखोल विवेचना पर्यंत. किंवा दहा वर्षांच्या भारतीय प्रशासकीय सेवेतून नुकतीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या अविनाश धर्माधिकारींच्या प्रशासकीय सेवे वरील त्यांच्या अनुभव कथनापासून ते डॉ. अनिल अवचटांच्या व्यसन मुक्ती च्या कार्या बद्दल ऐकलेले असंख्य अनुभव.

ह्या सर्व वक्त्यांबरोबर डॉ. य.दि.फडक्यांचे व्याख्यान ही असेच अजून स्मरणात आहे. ते जागतिक पत्रकारितेच्या सत्यासत्यतेवर सलग दोन दिवस, रोज दोन तास असे अत्यंत परखड बोलले होते. गंमत म्हणजे त्यांच्या व्याख्यानाचा विषय आणि त्यांनी मांडलेले विचार आजही पंचवीस तीस वर्षांनंतर जसेच्या तसे सुद्धा लागू पडतात हे पाहून अजूनच आश्चर्य वाटते. झालंच तर डॉ. यशवंत पाठक संत वाङ्मयावर सलग दोन वर्ष बोलून गेले. सिंधुताई सपकाळ तर अगदी प्रकाशझोतात येण्याच्या खूप आधी ह्या व्यासपीठावर येऊन त्यांची कथा/व्यथा सांगून गेल्या होत्या.

एके वर्षी श्रीमती वीणा देव (गो.नी.दां. च्या कन्या) ह्यांच्या शब्दात गोनीदांच्याच ‘शितू’ किंवा ‘पडघवली’ वगैरे कादंबरीचे वाचन आणि 'गोनीदांची साहित्य निर्मितीची प्रक्रिया' वगैरे विषयांवर बोलण्यासाठी आल्या होत्या. जगदीश खेबूडकरांनी त्याच्या गीत स्फूर्तीचा प्रक्रियेबद्दल केलेलं विवरण. विषयांचे इतके वैविध्य आणि ह्या अश्या दर्जाचे दुर्मिळ वक्त्यांना अनेकदा मला अगदी पहिल्या रांगेत बसून ऐकता आलं. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, पण कुठेतरी काहीतरी संचित असल्याशिवाय तुम्हाला ‘आयुष्यात इतकं सगळं भरभरून मिळत नसतं’ असं कुठेतरी वाटून जावं, इतकं हे सरस्वतीचं मुक्तहस्ते माझ्यासकट अनेक रसिक मिरजकरांच्या पदरी पडलेलं दान.

पण ह्या सगळ्यांवर कळस म्हणजे, मिरज विद्यार्थी संघाच्या नवीन सभागृहाचे उदघाटन करण्यासाठी पु.ल.आणि सुनीताबाई उभयत: स्वतः उपस्थित होते. त्यांनी त्या वेळी, म्हणजे साधारण तीसेक वर्षांपूर्वी, विद्यार्थी संघाच्या सभागृहासाठी एक लाखाच्या वर देणगी दिली होती. सभागृहाचे नामकरण अर्थातच "मुक्तांगण" असे करण्यात आले. पुलंना ऐकायला आणि पाहायला आलेल्या मिरजकरांच्या गर्दीने मुक्तांगण आणि खरे मंदिर चे पटांगण अक्षरश: ओसंडुन वाहून गेले. बाहेरच्या रस्त्यावर लोक टाचा उंचावून उंचावून एक छोटीशी झलक तरी दिसत्ये का पुलंची? ते पाहायचा प्रयत्न करत होते. 'पुलं'ना त्यांनीच दिलेल्या देणगीतून साकार झालेल्या 'मुक्तांगण' सभागृहात समक्ष समोर बोलताना ऐकणे हा 'दुघशर्करा', 'मणिकांचन', वगैरे पेक्षा कितीतरी पट अधिक दुर्मिळ असा योग असतो आणि त्याचा मी एक साक्षीदार.

पुढे ‘स्टीव्ह जॉब्स’ पासून ते ‘सलमान रश्दीं’ पर्यंत, आणि ‘जॅक मा’ पासून ते ‘देवदत्त पटनाईकां’पर्यंत अनेकांचे ‘यु-ट्यूब’ वर व्हिडीओ पाहिले, असंख्य टेड टॉक्स ऐकले. क्वचित प्रसंगी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ दुसरीकडे अचानक आलेल्या कामात अडकले म्हणून, त्यांच्या जागी केवळ नशिबाने माझी वर्णी लागल्यामुळे, अगदी आंतराष्ट्रीय दर्जाच्या कॉन्फेरन्स सुद्धा वातानुकूलित सभागृहात बसून ऐकायची संधी मिळाली. हे सर्व जरी असलं तरी सुद्धा वसंत व्याख्यानमालेत दिड तासांच्या अस्खलित मराठीमधले व्याख्यान मिरजेतल्या मुक्तांगण मध्ये बसून ऐकताना मिळणारी एकाग्रता आणि मंत्रमुग्धता मला आयुष्यात परत कधीच गवसली नाही.

मिरजेत वास्तव्यास असताना, ह्या अश्या संस्मरणीय वसंत ऋतूत मुक्तांगण मध्ये सतरंजी वर बसून, व्याख्यान ऐकायला मी शेवटचा मी कधी गेलो? ते मला आता धड आठवतही नाही. कदाचित मी इंजिनीयरिंग ला गेलो आणि ऐन 'मे' महिन्यात माझ्या परीक्षांच्या तारखा पडायला सुरु झाल्या. आणि इच्छा असूनही व्याख्यानं ऐकायला जाणं जड होत गेलं. आणि, पुढे नोकरी धंद्यामुळं पोटाची खळगी भरण्यासाठी मिरज सोडलं, ते कायमचंच.

आयुष्यात चांगले दिवस रेंगाळून 'न' राहता झर झर सरतात आणि त्या दिवसांच्या स्मृती मात्र मनाच्या खोल डोहात, जाळीजाळीची पिंपळ पानं होऊन, त्या डोहातल्या हलणाऱ्या लाटेवर तरंगत हळू हळू आपल्या पासून अधिकच दूरवर जात राहतात. जवळ उरते ते तलावाच्या पाण्यात उमटलेल्या लाटांमुळे हळू हळू फिस्कटत जाणारं स्वतःच प्रतिबिंब आणि कधीकाळी कोणत्यातरी अनोळखी गांवी जीवनाची पालवी बनून राहिलेल्या, त्या सुमधुर स्मृतींच्या ओलसर थेंबांचे डोळ्यातले लपवलेलं पाणी.

अश्या च कोणत्यातरी निसर्ग-नियमामुळे माझी आणि वसंत व्याख्यानमालेची जुळलेली नाळ मधेच कधीतरी अचानक कापली गेली, ती मात्र कायमचीच. पण ऋणात मात्र ही वसंत व्याख्यानमाला सदाचीच ठेऊन गेली, अगदी आयुष्यभर फेडले तरी न फेडता येणाऱ्या.

चारुदत्त रामतीर्थकर
२४ मे २०२१, पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर लिहिले आहे. सांगली मिरज कोल्हापूर ह्या पट्ट्याशी लहानपणी थोडाफार संबंध असायचा. पण पुढे मिरज म्हणजे तंतुवाद्यनगरी आणि किराणा घराणे आणि अन्य बडे गायक एव्हढीच माहिती राहिली.
लेख वाचून मला प्रत्यक्ष त्या मिरजेत गेल्यासारखे वाटले.

मिरजेत बसून हा लेख वाचणे म्हणजे भाग्य. एक दोन महिने करता करता दीड वर्ष झाले इथे आहे. मिरज मला सोडायला तयार नाही. मी संध्याकाळी पंढरपूर रोडला सायकलिंग करायला जातो कधीतरी. पेट्रोल पंपाच्या थोडं पुढे एक जागा आहे. तिथे सायकल पाच दहा मिनिटे उभी करतो. माहीत नाही का पण थांबावंस वाटतं तिथे थोडावेळ. समोर सूर्य मावळतीला आलेला असतो, उजव्या बाजूला दाट झाडी, आकाशात एकाच जागेवर जास्त वेळ कसं थांबायचं याचा सराव करणारा पक्षी आणि समोर दूरवर पसरलेली शेती. काही जागा असतात अशा तिथे थांबलं की त्या आपल्यासोबत काहीतरी बोलतत.

बोकलत जी , अन्जु,जी हर्पेन जी , स्वाती२ जी , Shardg जी , जिज्ञासा जी

अभिप्रायाबद्दल सर्वांचे मनापासून आभार!

बोकलत जी >>>मी संध्याकाळी पंढरपूर रोडला सायकलिंग करायला जातो कधीतरी. ...<<<
खूप छान वर्णन, आवडलं! मी ही अनेकदा पंढरपूर रोड वर फिरायला जाई , फार रम्य आणि गूढ अश्या प्रकारची सफर असायची ही.

Sharadg : >>>मस्त आठवणी. मी पण सलग 4-5 वर्षे सांगलीतुन सायकलवर जाऊन ऐकायचो.<<<अरे वाह, मानलं पाहिजे, विशेषतः परत जाताना कारण बऱ्यापैकी अंधार पडत असे, साडे आठ नऊ तरी व्हायचे व्याख्यान संपायला.

मस्त ! मलाही मिरजेतले दिवस आठवतात. मंगल कार्यालयातले जेवण एकदम मस्त असायचे ! आय होप त्या खोडरबरासारख्या पनीर ने कार्यालयात घुसखोरी केलेली नसावी ! खरे मंदिरा बरोबरच बायसिंगर वाचनालय आणी उरुसातली संगीताची मैफिल ही सुद्धा मिरजेची गौरवस्थाने !

शेवटचे दोन परिच्छेद मनाला स्पर्शून गेले.
आठवणींचा सुंदर कोलाज.
आपण नशीबवान आहात आपल्याला इतक्या मोठया व्यक्तीचे वक्तृत्व ऐकायला मिळाले. सगळ्यांनाच मिळतं नाही.