ओळख..!

Submitted by पाचपाटील on 19 May, 2021 - 14:05

''तो हिंदू आहे का?''
होय.. पण चॉईसनं वगैरे नाही.
आई-बाप हिंदू, म्हणून तो हिंदू.

"कसा हिंदू आहे तो?"
गोडसेवाला हिंदू नाही,
गांधीवाला हिंदू आहे तो..!
बरं वाटतं ते त्याला स्वतःपुरतं,
किंचाळावं वगैरे लागत नाही त्यात.

'तो परंपरावादी आहे का?'
नाही.
पुरणपोळी मिळते म्हणून सण आवडतात त्याला.
बाकी तो देवळांच्या वगैरे वाट्याला जात नाही.
आणि देवांनीही फारसं मनावर घेतलेलं नाही त्याला
अजूनतरी..
पण असं असलं तरीही तुकाराम जाम आवडतात त्याला..!

''तो विज्ञानवादी आहे का?''
होय..पण विज्ञानबाजी आवडत नाही त्याला.

"तो मानवतावादी आहे का?"
छे छे! त्याबाबतीत तो फक्त भाषणवादी आहे.

''तो भारतीय आहे का?''
होय.

''तो देशभक्त आहे का?''
काही कल्पना नाही.. पण तो टॅक्स वगैरे भरतो, कामही
सिन्सीअरली करतो.. शिवाय कायदेही पाळतो जमेल तसे.

''तिरकस बोलता.. डावे वगैरे आहात काय?''
नाही.. मला तसं वाटत नाही.

''तो सामाजिक आहे का?''
नाही. प्रायव्हेट आहे.

''तो आपल्यापैकी आहे का?''
आपल्यापैकी म्हणजे??

''आडनाव काय आहे त्याचं?''
आडनावात काय आहे?

''तरीही सांगा..''
जात हवीय का? थेट विचारा.. लाजू नका..
''छे छे .. आता तसलं काही राहिलं नाही, मी आपलं सहजच विचारत होतो..!''
हा हा..! बहुसंख्यांकांपैकी एक आहे असं समजा सध्यापुरतं.

''बरं..तो पुरुष आहे का?''
हो.

''कसला पुरुष आहे? डिफाईन करा..''
त्याला आधी आईच्या पदराआड लपायला आवडायचं,
आता वेळप्रसंगी बायकोच्या पदराआड लपतो, आवडीनं..

''अच्छा..! म्हणजे पेद्रटच की..!''
असेल.. तुमचा निष्कर्ष काढायला तुम्ही स्वतंत्र आहात..

''भाषा कोणती आहे त्याची?''
मराठी.
मराठी आहे तो..!

निःसंकोचपणे
निर्विवादपणे
ठामपणे
आणि अगदी आतड्यातून मराठी आहे तो..!

एवढीच ओळख बरीय..!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर. आवडलंच.
Submitted by हीरा on 20 May, 2021 - 04:19 +++१
मला पण. लई भारी आहे हे.

छान संतुलन राखून होता तो
अखेरच्या चार ओळींपर्यंत.... शेवटी उगाच अगदी आतड्यातूनही वगैरे मराठी होत पुन्हा त्याच लाईनीला गेला Happy