कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..?

Submitted by DJ....... on 18 May, 2021 - 04:19

कोरोना काळ सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं. कोरोना भारतात येण्याआधी जीवनात सर्व काही सुरळीत चालू होतं. सकाळी उठलं की आधी जॉगिंग.. घरी येऊन आंघोळ.. झटपट आवरून चहा.. वर्तमानपत्र.. करता करताच ऑफिसची बस गाठण्याची धांदल. ऑफिसमधे सर्वकाही वर्षानुवर्षं जसं सुरू होतं अगदी तसंच तेंव्हाही सुरु होतं... संध्याकाळी पुन्हा ऑफिस ते घर.. घरी आलं की मुलांचा कल्ला.. संध्याकाळी जेवायला काय भाजी/कालवण बनवायची यावर खल.. जेवण झालं की टी.व्ही. आणि नंतर शतपावली झाली की झोप अस किती सुखाचं आयुष्य सुरू होतं असं वाटण्यासारखी परिस्थिती.. कधी एखाद्या वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीत एस.टी.ने गावी जाणं.. कधी चुकुन एखादी सहल.. पाहुणे-राऊळे.. स्नेहभोजने.. डी-मार्ट्च्या वार्‍या.. दर रविवारी मंडई मधली भाजी/फळे खरेदी.. दुकानांतली/मॉलमधली नवीन खरेदी.. कधी मित्रांसोबत ट्रेकिंग.. अगदी सगळं कसं सुखनैव सुरु होतं.

कोरोना जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा पुढे असं लॉकडाऊन वगैरे होईल अन आयुष्य पुर्णपणे बदलेल असं आजिबात वाटत नव्हतं. इतर साथीच्या रोगांप्रमाणे भारतात कोरोना जास्त हातपाय पसरू शकणार नाही अन भारतीयांची प्रतिकार शक्ती प्रबळ असल्याने इथे त्याचा टिकाव लागणार नाही असं बोलता-बोलता बरेच आप्त-स्वकीय-मित्र-स्नेही म्हणायचे. परंतु झालं उलटंच. नाही नाही म्हणता कोरोना कधी सर्वात जास्त चर्चेचा विषय झाला हेही कळालं नाही अन सुखनैव सुरु असलेल्या जीवनाला अचानक ब्रेक लागला. ब्रेक लागल्यानंतर सुसाट पळणारी जीवनाची गाडी एकदम संथ गतीने चालू लागली..

कोरोना मुळे आयुष्याला प्राप्त झालेल्या या संथ गतीत बर्‍याचशा गोष्टी जीवनात नसल्या तरी चालतात याचा साक्षातकार होऊ लागला. ज्या गोष्टींशिवाय जगणं अशक्य होईल असं वाटत होतं तो केवळ गोडगैरसमज होता हे आता ध्यानी येतं अन आपण मनातचं हसतो..

उदाहरणार्थ :
१) सकाळी उठल्यावर वर्तमान पत्र हवंच हवं या गृहितकाला छेद जाउनही आता वर्ष झालं. वर्तमान पत्र नसलं तरी चहाचा घोट आरामात घशाखाली उतरतो हा नवाच शोध कोरोना आल्यामुळे लागला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

२) चिकन्/मटण्/मासे अगदी महिना-महिना खायला मिळाले नाही तरी काहीही बिघडत नाही याचाही शोध लागला.

३) घसा दुखेल्/सर्दी होईल या कोरोना लक्षणांच्या भितीने का होईना पण सलग दोन वर्षं आईस्क्रिम खायला मिळालं नाही म्हणुन देखिल काहीही बिघडलं नाही.

तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की ज्या गोष्टी कोरोना काळ सुरु व्हायच्या आधी फार गरजेच्या वाटत होत्या अन आता त्या गोष्टी जीवनात नसतील तरी फार काही बिघडत नाही. असतील तर शेअर करा Bw

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< मृत्यूदर खरंच वाढतोय की अधिकृत मृत्यू मोजणीत सुधारणा झालीय? आणि म्हणुन तो आकडा वाढल्या सारखा वाटतोय? >>
------- आजच्या परिस्थितीत, विश्वासार्ह असा मृत्यू दर काढता येणार नाही.... त्रुटी एव्हढ्या आहेत का कुठल्याही आकडेवारीवर विश्वास ठेवणे कठिण आहे.

एका ढोबळ अंदाजाने आज मृत पावलेल्या व्यक्तींना तिन - चार आठवडे आधी कोरोना झालेला असतो ( लक्षणे दिसायला ६-१० दिवस, पुढे दवाखाना.... त्याच्या नंतर काही दिवसांत ICU व्हेंटिलेटर.... ). अनेक गोष्टींवर अवलंबून आहे ( ऑक्सिजनच मिळाला नाही, बेड नाही , टेस्ट विलंब झाला... यामुळे अंदाज चुकतात).

https://www.worldometers.info/coronavirus/country/india/
या ठिकाणी Active Cases in India वर लक्ष ठेवायचे, आजपासून ३ आठवडे आधी ३०- ३१ लाख Active Cases दिसत आहे आणि १० मे रोजी उच्चांक गाठलेला दिसत आहे.. म्हणजे मृतांचा आकडा अजून काही दिवस ( साधारणत: १ अथवा २ जून ) वाढत रहाणार आहे त्यानंतर तो खाली येणार.

आजही रोज ३ लाख नव्याने बाधितांची संख्या आहे, हा आकडा पण खूप मोठा आहे.... दोन लाख पण मोठाच असणार आहे. म्हणजे पुढचे ३ आठवडे.... संपुर्ण आरोग्य व्यावस्था खिळखिळी होणार आहे. ( बाधितांच्या आकडेवारीला १० ने गुणायचे, मृतांच्या आकड्यांना २० ने अथवा २५ हे विचारायचे).

लहान गावांत ( तालुका ) कसल्या टेस्ट असतील ? होतात का ? कुणाला माहित आहे ? (अनेक कारणांनी ) टेस्ट होत नसतील तर मृत्यु राचे आकडे अगदी फसवे आहेत.

परिस्थिती एव्हढी पण वाईट व्हायला नको होती.... सतर्क राहिले असते तर दाहकता नक्कीच आहे त्यापेक्षा कमी करता आली असती. I feel very sorry....

महाराष्ट्रातल्या केसेस आणि अ‍ॅक्टिव्ह केसेस कमी होत असल्या तरी मृत्यूचे आकडे उच्चांक गाठताहेत.
भारताची आकडेवारी
https://www.mohfw.gov.in/
महाराष्ट्र https://www.covid19maharashtragov.in/mh-covid/dashboard

<< कोर्टाने फटकारल्यामुळे खोटेपणा करणार्‍या राज्यांनी खरी माहिती द्यायला सुरुवात केली असावी अशी शंका येते. >>

------ असे काही असण्याची शक्यता फार कमी आहे.

कोर्ट पण हतबल आहे... क्वचित प्रसंगी ते जनहिताचे निर्णय घेते असे वाटते.... पण त्यात सुसंगतता आढळत नाही. बहुतेक प्रसंगात ते केंद्राला एक हवा असलेला वेळ देत असते (कालापव्यय म्हणतात का? ) / कोंडी झालेल्या केंद्राला छान पळवाट मिळते. कोर्टने मारल्यासारखे करायचे.... आणि केंद्राने त त प प .... आणि हवा असलेला वेळ मिळवायचा.
अनेक निरपराधी , त्यांचा कुठलाही अपराध नसतांना तुरुंगांत खितपत पडले आहे त्यांच्याबाबत कोर्टाने कुठे काय केले ?

मृतांचे आकडे ३८०० वरुन ४५०० गेले म्हणजे आकडे खरे ठरत नाही.... जो ट्रेंड आधी दिलेला आहे ( number of total active cases, daily +ve cases) त्याचेच अनुकरण होत आहे... जेणे करुन आधीचा डेटा खरा ठरायला मदत होते.

<< महाराष्ट्रातल्या केसेस आणि अ‍ॅक्टिव्ह केसेस कमी होत असल्या तरी मृत्यूचे आकडे उच्चांक गाठताहेत. >>

------ तिन किंवा चार आठवडे आधी महाराष्ट्रातल्या Total अ‍ॅक्टिव्ह केसेस किती होत्या त्याच्याशी आजच्या मृतांच्या आकड्याची सांगड घालावी.

वल्डोमिटरचा सोर्स पण GOI आहे... पण डेटा चांगला मांडतात... लवकर समजतो.

उदय, बाधितांचा उच्चांक आणि मृतसंख्येचा उच्चांक यात तीन चार आठवड्यांचा टाइम लॅग असण्याचा तुमचा मुद्दा लक्षात आला.
मृत्यूमोजणी प्रक्रियेत बदल केल्याचे कुठे वाचले नाही तेव्हा हा वाढलेला मृत्यूदर या टाइम लॅग मुळे असेल.

<< उदय, बाधितांचा उच्चांक आणि मृतसंख्येचा उच्चांक यात तीन चार आठवड्यांचा टाइम असण्याचा तुमचा मुद्दा लक्षात आला.
मृत्यूमोजणी प्रक्रियेत बदल केल्याचे कुठे वाचले नाही तेव्हा हा वाढलेला मृत्यूदर या टाइम लॅग मुळे असेल. >>

------ मृत्यूमोजणी प्रक्रियेत बदल झालेले आहेत असे मी म्हटलेले नाही... पण या कोव्हिड प्रकारांत व्यक्ती किमान २-३ आठवडे किंवा जास्त काळ आजारी पडून मग दगावते त्यामुळे गुंतागुंत वाढते. आणि "खर्‍या " बाधितांचा आकडा आपल्याला माहित नाही (अ) अनेक कारणांनी टेस्ट होत नाहीत (ब) अनेक लोक कोरोना +ve असतील पण त्यांच्यामधे कुठलिही कोरोनाची लक्षणे दिसत नाही किंवा त्यांना कुठलाही त्रास जाणवत नाही, टेस्ट आदी पुढच्या गोष्टी. पण याने मॉरटॅलिटी रेट कमीच होणार आहे.

https://www.medicalnewstoday.com/articles/why-are-covid-19-death-rates-s...

मृत्यूमोजणी प्रक्रियेत बदल झालेले आहेत असे मी म्हटलेले नाही >>> मीच म्हटले होते की मृत्यूदर मोजणी सुधारणा झाली का, त्याबद्दल हे लिहिले.

कालच मी मटा मधे बातमी वाचली होती की कोरोना मृत्युंचा आकडा का वाढत आहे तर त्या बातमी मधे असं सांगितलं होतं की बर्‍याचदा मृत्यु होणार्‍यांचा म्रूत्यु नेमका कशाने झाला हे कळण्यात ४-५ दिवस जातात. त्यांच्या स्वॅबचे रिझल्ट येऊन डेटा अद्ययावत करायला आठवड्यापेक्षाही जास्त कालावधी लागतो त्यामुळे बाधित संख्या तुलनेने कमी असतानाही म्रूत्यु संख्या वाढताना दिसते आहे त्यामागे हे कारण आहे. त्या बातमीची लिंक मला आज सापडत नाही. कुणाला सापडली तर कृपया डकवा.

सापडली : https://www.loksatta.com/explained-news/explained-covid-19-why-deaths-ar...

लाईक्स??? सिरीअसली???
तसे असते तर मी लोकांशी गोग्गोड बोललो असतो, वाद नसता घातला. उद्या मायबोलीवर प्रतिसादांना आणि धाग्यांना लाईक्स डिस्कलाईक्सची सोय ठेवली तर माझ्या वाटणीला लाईक्सपेक्षा जास्त डिसलाईक्स येतील. कारण मी माझ्या मनाला पटेल ते बोलतो, ईतरांना ऐकायला वाचायला काय छान वाटेल ते नाही.

बाई दवे,
आधिभौतिक हा शब्द माझ्यासाठी नवीन आहे. नक्की काय अर्थ आहे याचा?

आणि हो, सोशल मिडीयावर मिळणार्‍या लाईक्सचा फोलपणा मला बालपणातच कळला आहे. आई मीन ऑर्कुट काळातच. त्यासाठी आयुष्यात कोरोना यायची गरज भासली नाही Happy

कोरोना मुळे लोकांना भौतिक सुखाचा विचार करावासा वाटला म्हणून आता माझे म्हणणे मांडू शकेन. एरव्ही मांडले असते तर प्रगती होऊ नये का ? विकासाचे मारेकरी ठरवले असते. माझी समस्या एखाद्याच्या मूळव्याधासारखी जुनी आहे.

टू जी होतं. तेव्हां फोन संभाषणासाठी होते. आता ते प्रकरण वाढत वाढत ऑल इन वन गॅझेट बनत चालले आहे. ३ जी आलं जुने फोन टाकून द्या, नवीन घ्या. गेले दहा हजार खड्ड्यात. जुन्या फोनचे पार्ट्स हटकून महाग असल्याने कुणाला गा-हाणे सांगावे ? मग ४ जी आले. आता तरी थांबा की. काय करायचेत ५ जी ? ४ जी मधे सर्वसामान्य माणसाचे सगळे काम होते. माझ्या फोन मधे काय काय सुविधा आहेत ते मला अजूनही माहीत नाही. गरजच पडत नाही. आता पूर्वीप्रमाणे डेस्कटॉपवर इस्न्टॉलेबल अ‍ॅप्लिकेशन्स येत नाहीत. थेट गुगल प्ले वरून अ‍ॅप्सच. मला अजूनही डेस्कटॉप इंटरनेट साठी आवडतो. मोठा डिस्प्ले, कीबोर्ड हवा तसा. फोन मधे घुसून डोळ्याची खाचरं करून मराठी टायपिंग आपल्याला आवडतच नाही.
बास झाली की फोनची प्रगती. ज्यांना घ्यायचेत त्यांना घेऊ द्या. पण एखादे मॉडेल काढले की वीस वर्षे त्याचे स्पेअर पार्ट्स आणि विकीपश्चात सेवा मिळायला हवी हा कायदाच पाहीजे. मला जर ४ जी पुरेसं आहे तर किमान वीस वर्षे ४ जी मिळायला हवं. नंतर जर मला ते अपुरं वाटायला लागलं तर तेव्हां मी ठरवीन ५ जी घ्यायचं कि नाही ते. पण आता ४ जी चे फोन सेट जुने होत चालले. पहिल्यांदा त्याचं चार्जिंग सॉकेट खराब होतं. मग इनबिल्ट बॅटरी जाते. पुर्वी ही विकत आणून बदलता यायची. आता बॅटरी मिळत नाही. मिळालीच तर महाग मिळते. मग त्या ऐवजी एक्स्चेंज करून नवीन घ्या असे सुचवले जाते.

नाईलाजाने मग ५ जी सेट आणला की ५ जी कनेक्शन घ्यावे लागणार. ते त्या क्षमतेने वापरले जात नाही. त्याचा एव्हढा फायदा होत नाही. यातला फोलपण आता कोरोनामुळे ऐकणा-याला कळेल म्हणून आत्ता सांगतोय.
किमान आता तरी जगाबरोबर आपण बदलले पाहीजे असले पांचट डायलॉग्ज हाणणार नाहीत.

खरं तर आता सगळंच फोल वाटत आहे .
आपल्या गरजा फार कमी असतात .
पण तरी , वरील एका प्रतिसादाप्रमाणे , हे आता लॉक डाउन मध्ये . त्यानंतर ते तसंच राहणार आहे का ? हे जास्त महत्वाचं .
पहिल्या लॉक डाउन नंतर , आताच्या लॉक डाउन आधी लोक कोरोना नाही असं समजून हिंडायला लागले होते . त्यानंतर दुसरी लाट उसळली .
लोकांचं गांभीर्य टिकतं हाच एक फोलपणा आहे .

काल असाच क्रिकेटचा विषय निघाला .. सचिन विरुद्ध कोहली..
तेव्हा आता अशीच परीस्थिती पुढची चारपाच वर्षे राहिली तर कोहलीला सचिनचा विक्रम तोडायला पुरेशी संधी मिळणार का हा प्रश्न पडला..
आणि मग असाच जास्तीचा विचार करता नको ना तोडू दे. आपल्याला काय त्याचे म्हणत त्या विक्रमातील फोलपणाही कळला..

<< कालच मी मटा मधे बातमी वाचली होती की कोरोना मृत्युंचा आकडा का वाढत आहे तर त्या बातमी मधे असं सांगितलं होतं की बर्‍याचदा मृत्यु होणार्‍यांचा म्रूत्यु नेमका कशाने झाला हे कळण्यात ४-५ दिवस जातात. त्यांच्या स्वॅबचे रिझल्ट येऊन डेटा अद्ययावत करायला आठवड्यापेक्षाही जास्त कालावधी लागतो त्यामुळे बाधित संख्या तुलनेने कमी असतानाही म्रूत्यु संख्या वाढताना दिसते आहे त्यामागे हे कारण आहे. >>

------
ज्या दिवशी व्यक्ती गेली आहे त्याच दिवसाची नोंद असायला हवी..., पण अनेक कारणांनी तसे होणे नेहेमीच शक्य नसावे असे दिसते. ४-५ दिवस लागत असतील तर अशा वेळी ३ किंवा ७ दिवसाची सरासरी एक चांगला अंदाज देते ( seven-day rolling average ) .

सतत ३ किंवा ७ दिवस आकडे कमी मिळत असतील तो सर्वात चांगल दिवस... १-२ दिवसाच्या आकड्यावरुन काही निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही.

मोजण्यातली सदोष पद्धती किंवा त्रुटी यामुळे खरा आकडा नजिकच्या काळात समजणार नाही.
( कोरोनाच्या PCR किंवा इतर) टेस्टचे निकाल वेळेवर आले नाहीत, किंवा false -ve आले असतील तर अशा घटनांत व्यक्तीच्या मृत्युचे कारण सर्टिफिकेटवर काय लिहीणार?
कुठलिही टेस्ट न करता घरीच (कोरोनामुळे ) मृत्यु झाला असेल तरी त्याची नैसर्गिक मृत्यु अशीच होणार.

कोविड पूर्व काळांत, २८,००० लोक दर दिवशी (भारतात) आपली जिवन यात्रा पुर्ण करतात असे मी इतरत्र सांगितले आहे. या पेक्षा जेव्हढे जास्त लोक जात असतील ते सर्व कोरोनामुळे असे साधे समिकरण आहे.

पारंबीचा आत्मा - सहमत आहे...

<<आपल्या गरजा फार कमी असतात .
पण तरी , वरील एका प्रतिसादाप्रमाणे , हे आता लॉक डाउन मध्ये . त्यानंतर ते तसंच राहणार आहे का ? हे जास्त महत्वाचं .
पहिल्या लॉक डाउन नंतर , आताच्या लॉक डाउन आधी लोक कोरोना नाही असं समजून हिंडायला लागले होते . त्यानंतर दुसरी लाट उसळली .>>

----- लाट ओसरल्यावर... काही महिन्यांचा अवकाश... जिवनसरणी मधे थोडाफार बदल घडेल पण आधीच्या पेक्षा जास्त उत्साहाने लोक बाहेर पडतील , शॉपिंग, सिनेमा/ नाटके, पर्यटन... आणि हेच निसर्गाला मान्य आहे.

मॉल चालवणारे, मॉलमधे दुकान असणारे, तिथं काम करणारे सद्ध्या काय करत असतील..? अगदी अशीच परिस्थिती मल्टिप्लेक्स, हॉटेल्स, स्पा, सलून, बांधकाम व्यवसाय, ओला-उबर, आडते, दलाल, वास्तुशास्त्र, ग्रहगोळे, भविष्यकार यांच्यावरही आली असेल... या सर्वांना आता शेतकर्‍यांना वर्षानुवर्षं कष्ट करून मातीमोल भावाने शेतमाल विकावा लागतो तेव्हा काय गत झालेली असते याचा साक्षातकार व्हावा.

लॉकडाउन मध्ये मला असाध्य आजार झाला. त्यावर निदान व उपचारास विलंब झाला. या वर्शी ट्रीटमेंट सुरू झाली आहे. ह्या मुळे दुसृया लाटेतील मृत्यु तांडव अरेरे हे हेल्दी लोक गेले तरुण मुले वारली कुटुंब प्रमुख वारले असे विष ण्ण मना ने रोज वाट्त राहिले. ते जात्यात तर आपण सुपात असे भीति दायक विचार मनात येत राहतात. मला डिप्रेशन येत नाही. कारण स्वतःच्या मृत्युचे भय ह्यावर विचार जानेवारीतच करून झाला. पुढे दुसृया लाटेत मात्र गेलेले जीव वाचवता आले असते असे सारखे वाटत राहते.

आज लोक फेस करत आहेत ते फॅमिली मधील लोक अचानक जाणॅ , मुलांचे प्रश्न वगिअरे वर विचार व अ‍ॅक्षन माझी २००७ - ८ मध्ये करून घेउन झाल्याने आता देजा वू फीलिन्ग येते. अरेरे आता काय होईल ह्या दु:खी कुटुंबांचे असे वाट्त राहते. पण त्यांना काउन्सेलिंग करायची कुवत व ट्रेनिन्ग माझ्यात नाही. एकटीने हळ हळत राहते.

रच्याकने पहिल्या लॉकडाउन मध्ये मे २०२० मध्ये मर्ज ड्रॅगन नावाची गेम डाउनलोड केलेली होती. लॉक डाउन मध्ये वेळ घालवायला खूपच खेळली. तेव्हा समजत नव्हते तर रेडीट मध्ये फोरम जॉइन केला. हळू हळू शिकून घेतली. आता गेम मधील वीकां ताचे इव्हेंट पूर्ण करता यायला लागले आहेत. ही च प्रगती.

मे २०२० पासून हपीसात जाउनच नोकरी चालू ठेवली. काही कलीग वारले काही प्रोसेसेस ज्या हाती करत होतो त्यांचे आटो मेशन केले करवून घेतले. बाहेर जेवायची सवय बंद झाली. पहिले ऑर्डर फार करत होतो पण त्याने वजन वाढते हे लक्षात आले व ते आता पूर्ण बंद केले आहे. अ‍ॅपच काढून टाकले.

बकेट लिस्ट म्हणून हलवाया कडून चांगले दही, जिलेबी पेढे श्रीखंड काजू कतली आमरस ( मार्च मध्येच) बंगाली मिठाई असे पदार्थ एकेक दा मागवून खाल्ले. ह्या वर्शी ती ही चव गेली आहे. इतके मृत्यु एका वेळी बघून वैराग्य अधि क गडद झाले आहे.

मनःस्थिती नुसार साधे छंद जोपसले आहेत. अमेझॉन वरून अ‍ॅक्रिलिक कलर मागवून घरी जे सामान येते त्यांची खोकी रंगवून काढली.
पिंटरेस्ट मधून डिझाइन शोधले. ऑफिसात खूप चालावे लागते लोकेशन टु लोकेशन तेव्हा वेग वेगळी पिकली पाने शोधून वहीत दाबू न
ठेवली आहेत. पिकले पान कलेक्षन २०२१ चालू आहे.
एकूण ठेविले अनंते तैसेची राहावे व एक एक दिवस मोजून घालवायचा चांगली कर्मे करायची हे कायम ठेवले आहे.

अमा, उत्तम पोस्ट. कठीण परिस्थितीत मनाची सकारात्मकता आणि संतुलितपणा राखता येणे ही मोठीच achievement आहे.

अमा
काय बोलावं तुमच्याबद्दल ?
खूप पॉझिटिव्ह आहात तुम्ही .
कीप इट अप !
सगळ्या माबोकरांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेतच .

यश अपयश, प्रगती, श्रीमंती या साऱ्यांच्या व्याख्या किती संकुचित आणि फोल आहेत हे जाणवलं. सध्या स्वतःचे metrics बनवणे सुरू आहे.
भारतीय माणसाच्या किमान बुद्धीमत्तेवर असल्याच्या माझ्या विश्वासाचा फोलपणा सिद्ध झाला आहे. माझा भारतीय समाजमनाच्या समजूतीच्या कुवतीवर फार विश्वास होता. आज मात्र मला तसं वाटत नाही. Insanity has prevailed all around me Sad

भारतीय माणसाच्या किमान बुद्धीमत्तेवर असल्याच्या माझ्या विश्वासाचा फोलपणा सिद्ध झाला आहे. माझा भारतीय समाजमनाच्या समजूतीच्या कुवतीवर फार विश्वास होता. आज मात्र मला तसं वाटत नाही. >>>>>>>

माझा कधीही नव्हता पण करोनाकाळात सुरवातीला वाटले की लोक जरा शहाणे होतील. पण तोही फोल ठरला. मी सध्या ज्या गावी राहते ते तथाकथित थंड म्हणून प्रसिद्ध आहे (गेले तीन महिने गरमीने मरतोय इथे, इथल्या पर्यावरणाची वाट ग्लोबल वॉर्मिंग व स्थानिक या दोघांनीही उत्साहाने व आनंदाने लावलीय. )... इथे सप्टेंबरपासून टूरिस्ट मंडळींचा महापूर आलेला, तो मार्चपर्यंत होता. लोक घरात बसून कंटाळलेले पण म्हणून मास्क कचऱ्यात टाकून थेट हिल स्टेशन गाठावे? मलातर फेब्रुवारीला वाटायला लागले होते की आता करोना संपलाच. युरोपातुन तेव्हा दुसऱ्या लाटेच्या बातम्याही यायला लागलेल्या पण बाहेर लोकांची गर्दी काही थांबत नव्हती. आता परत पूर्ण थांबलीय.

Pages