डोह

Submitted by रूपाली विशे - पाटील on 17 May, 2021 - 10:32

डोह....!
___________________________________________

गावाच्या वेशीबाहेर तो डोह होता. दोन पुरुषभर खोल, शेवाळलेल्या पाण्याने बाराही मास भरलेला...! त्याच्या शेवाळलेल्या , मळकट पाण्यात नेहमीच कमळं उगवत असत.

__आणि कधी-कधी आयुष्याला कंटाळलेले अभागी जीव त्या डोहात आपले प्राण झोकून देत, आपलं जीवन संपवून टाकत असत.

डोहा जवळचं वातावरण नेहमीच शांत, एकाकी, भयाण भासत असे. माणसांच्या किलबिलाटापासून दूर एक वेगळीचं गूढ वातावरण निर्मिती तिथल्या आसमंतात झालेली असे.

डोहा शेजारी एक जुनाट, म्हातारा वड होता. त्याच्या भोवती फार वर्षापूर्वी दगडी बांधकाम केलेला एक पार होता. तो पार ही आता ढासळू लागलेला. पाषाणी बांधकामातले दगड आता निखळू पाहू लागलेले.

त्या वडाच्या बुंध्याजवळ शेंदूर फासलेली एक अर्धभग्न दगडी मूर्ती विराजमान होती.. घोडेस्वार देवाची..!!

ती अर्धभग्न अवस्थेतील घोडेस्वाराची भंजाळलेली मूर्ती तारवटलेल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहत राही... नव्हे.... तसा भास जणू त्या मूर्तीकडे पाहून कुणालाही होत असे.

गावकऱ्यांची पूर्वापार चालत आलेली श्रद्धा अशी होती की, तो घोडेस्वार देव मध्यरात्री घोड्यावर स्वार होऊन गावातून फेरफटका मारतो. तो घोड्यावर स्वार होऊन गावाचं रक्षण करण्यासाठी गावात येतो, म्हणून त्याचं नाव घोडेस्वार पडलेलं...!

तो गावाच्या वेशीचे , गावाचे रक्षण करतो अशी आख्यायिका गावातल्या पिढ्या वर्षोनुवर्षे ऐकत आल्या होत्या.

त्या पाराजवळ असणारा आता लहानसा असलेला तो डोह , कधी काळी एक मोठं तळं होतं; आणि ते तळं घोडेस्वार देवाने खोदलेलं ...गावातल्या जनतेसाठी... त्यांची तहान भागवण्यासाठी ..!!

__आणि तो घोडेस्वार देव त्या तळ्याचा , त्या गावाचा अनभिषिक्त सम्राट होता, त्या तळ्याचा मालक होता, अशी कहाणी पिढीजात कानावर पडलेली..!

त्या वडाच्या पारावर ठाणं मांडून बसलेल्या घोडेस्वार देवाचं दैवी पावित्र्य आणि त्या डोहात जीव दिलेल्या अभागी जीवांच्या आत्म्यांचे असलेले वास्तव्य अश्या वंदतांचे तसेच डोहा शेजारी असणाऱ्या भूता- खेतांच्या वावराची चेष्टीतं या सर्वांचे मिळून त्या जागी एक चमत्कारिक गूढ मिश्रण बनले होते; आणि त्या मिश्रणाचा गंध त्या जागी सदैव पसरलेला असे.

डोहाच्या काठावर रानचाफे फुललेले असत. त्यांच्या पर्णहीन फांद्यावर पांढऱ्या फुलांचे गुच्छ उठून दिसत. ते फुलांचे गुच्छ म्हणजे एखाद्या नवविवाहित सवाष्ण स्त्रीच्या हातात भरलेला जणू हिरवा चुडा भासावा...!

मनुष्य जीवनातल्या सगळ्या ऐहिक, भौतिक सुखाचा त्याग करून तपोवनी तपस्या करणार्‍या आणि आपल्या अंतरीतल्या साऱ्या विशुद्ध वृत्ती अपर्ण करून ईश्वरी अनुभूती घेणाऱ्या ऋषी - मुनीं सारखी ती रानचाफ्याची झाडं बघणाऱ्याच्या नजरेला भासत असत.

डोहाच्या पलीकडे खुरट्या बाभळी आणि बोरूचं रान माजलेलं होतं. तिथल्या गूढ वातावरणात ; त्या बाभूळ वनाकडे लक्ष गेल्यास हृदयात भयकंपने सुरु होत असत.

डोहा जवळून नागमोडी वळणाचा डांबरी हमरस्ता जात होता. त्या रस्त्यावरून दिवसा वाहनांची वर्दळ चालू असे; पण त्या डोहाजवळ, त्या वडाच्या पाराजवळ भर दिवसाही कुणी फिरकत नसे.

भयाण शांतता आणि अनामिक गूढतेने भारलेल्या तिथल्या वातावरणात पाऊल टाकायची कुणाचीही हिंमत होत नसे.

__ तर अश्या ह्या गूढ वातावरणाच्या जागी नथू आजोबा गेल्या दहा दिवसांपासून येऊन त्या ढासळलेल्या पारावर तासन् तास बसून राहत होते.

वृद्धापकाळाने कमकुवत झालेल्या आपल्या धपापत्या ऊराने, संतापाने , अजीजीने, हतबलतेने त्या घोडेस्वाराच्या अर्धभग्न मूर्तीला प्रश्न विचारत होते. आपलं दुःख, आपले प्रश्नं त्याच्या समोर मूक संभाषणातून व्यक्त करत होते; आणि अर्ध भग्नावस्थेत असलेली ती घोडेस्वाराची मूर्ती तारवटलेल्या डोळ्यांनी नथू आजोबांकडे पाहत राही, त्यांचं गाऱ्हाणं ऐकत राही ..नव्हे ..तसा भास मूर्तीकडे पाहणाऱ्या कुणालाही होत असे.

त्या दिवशी अश्याच एका दुपारी, माथ्यावर आग ओकणाऱ्या सूर्याच्या उन्हात, आपल्याच तंद्रीत पारावर बसून ; नथू आजोबा घोडेस्वाराच्या दगडी मूर्तीशी मूक संवाद साधत होते.

__आणि अचानक एक मोटरसायकल स्वार मुख्य डांबरी रस्ता सोडून, मोटरसायकल वरचे आपले नियंत्रण सुटल्याने वेडीवाकडी वळणं घेत नथू आजोबा बसलेल्या पाराला येऊन मोटरसायकल समवेत ठोकला.

मोटरसायकल स्वार खाली पडला, पण पडल्या बरोबर त्याने स्वतःला सावरलं. त्याच्या हाता - पायाला खरचटलं. डोक्याला थोडी खोच पडली. त्यातून रक्ताची हलकीशी धार लागली. त्याने आपल्या जवळ असलेल्या रुमालाने डोक्याच्या जखमेला बांधलं; आणि तो लंगडत लंगडत पाराजवळ येऊन नथू आजोबा शेजारी बसला.

डोळ्यांसमोर घडलेल्या प्रसंगाने नथू आजोबा हबकले. त्यांची छाती अनामिक ताणाने धडधडू लागली.

"खूप लागलं का रे ..पोरा तुला?? कशाला एवढी घाई करायची रे..? तुला लिहिलेलं वाचता येतं ना..?? 'अति घाई मसणात नेई' वाचला नाही का तो बोर्ड ...तिथे रस्त्याच्या कडेला लावलायं तो..?? " नथू आजोबांनी काळजीपोटी त्या तरुणाला आपुलकीने खडसावलं.

"कामाच्या जागी रात्रपाळी करावी लागते हो आजोबा, त्यामुळे गाडी चालवताना डुलकी लागली क्षणभर..!" आपल्या जवळच्या बाटलीतले पाणी अंगावर ओरखडे पडलेल्या जागी टाकत, ओशाळत तो तरुण उत्तरला.

" हं.. काळजी घेत जा रे पोरा ...आपल्या जीवाची..!! लाख - मोलाचा जीव आहे हा .. जरा सावकाशीने वाहन हाकावं. गेल्या आठ दिवसांत दोन अपघात झाले तिथे समोरच्या वळणावर, दोघेही जागेवरचं गेले बिच्चारे... !" नथू आजोबांनी हळहळत अपघाताची बातमी देत, आपुलकीने त्या तरुणाला सल्ला दिला.

तो तरुण ती अपघाताची बातमी ऐकून मनोमन शहारला.

" हो, बरं आजोबा.. पण मला सांगा तुम्ही एवढ्या रणरणत्या उन्हात; भर दुपारी एकटेच का बसला आहात इथे..??" तरुणाने आजूबाजूला नजर फिरवत आजोबांना विचारलं.

" काय सांगू पोरा तुला..? तो समोर पाण्याचा डोह दिसतो ना , तिथे माझ्या नर्मदेला भेटायला येतो मी...गेल्या दहा दिवसांपासून, तिची वाट बघतोय, पण एकदाही नाही आली ती मला भेटायला..!" आजोबांचा आवाज कातर झाला.

तो तरुण विस्मयाने, प्रश्नार्थक नजरेने नथू आजोबांकडे पाहू लागला.

"म्हणजे मला समजलं नाही. डोहाजवळ भेटायला येता म्हणजे..??

" खूप मोठी कर्मकहाणी आहे ती..!! " नथू आजोबांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला.

पुन्हा एक दिर्घ श्वास घेत नथू आजोबा सांगू लागले.

" माझी नर्मदा त्या डोहात पडून गेली. मला सोडून गेली कायमचीचं!" आजोबांनी धोतराच्या सोग्याला डोळे पुसले.

" आता मला तू सांग, सासू सुनेची भांडणं काय नवीन आहेत का जगाला..?? भरल्या घरात भांड्याला भांड लागणारचं ना..?? पण लोक म्हणतात, माझ्या नर्मदेने जीव दिला ह्या समोरच्या डोहात...सुनेच्या जाचाला कंटाळून; पण माझा नव्हता विश्वास हया असल्या भाकड कथांवर..!!. माझी नर्मदा एवढी कचखाऊ नव्हती रे, मला असं एकट्याला टाकून ती नाही जाणार..!!" नथू आजोबांच्या डोळ्यांतल्या टिपांनी डोळ्यांतून बरसण्याचा वेग घेतला.

"पण तुला सांगतो पोरा, जेव्हा तिच्या दशक्रियेला कावळा पिंडाला शिवला नाही ना, तेव्हा मला समजून चुकलं की, नर्मदेने ह्या डोहात नक्कीच जीव दिला असणार. ती कंटाळून गेली असणार सगळ्या सांसारिक व्यापांना, त्यातल्या कटकटींना.. ती सोडून गेली..परत न येण्यासाठी..! फसवलं रे तिने मला ...फसवलं ...! नर्मदे , कुठे आहे तू..??" नथू आजोबा शांत डोहाकडे पाहत आपल्या पत्नीच्या नावाने टाहो फोडत आक्रोश करू लागले.

तो तरुण आजोबांच्या आक्रोशाने भांबावून गेला. त्याला काय करावं ते सुचेना. तो शांतपणे त्या डोहाकडे पाहू लागला.

तिथल्या वातावरणात भयाण शांतता भरून राहिलेली. सूं..सूं आवाज करत भणाण वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाने तिथल्या वातावरणात एका गूढ, चमत्कारिक मिश्रणाचा गंध मिसळून आलेला.

रस्त्यावरून लांबूनच एक मोटरसायकल स्वार वेगाने गेला. त्याने नथू आजोबांना जोराने आवाज दिला. नथू आजोबा शेजारील तरुणाने आवाजाच्या दिशेने पाहिलं; पण त्याचं तिथे लक्ष जाई पर्यंत तो मोटरसायकल स्वार क्षणार्धात दिसेनासा झाला.

वारा सुसाट सुटलेला. वडाची पानं सळसळू लागलेली. वडाच्या फांद्या एकमेकांना धडकू लागल्या. वार्‍यासोबत वाहून येणारा एक कुबट , कुजलेला दर्प नाकाला मध्येच जाणवू लागला.

नथू आजोबा शांतचित्ताने , चमत्कारिक नजरेने एकटक नजर रोखून त्या डोहाकडे पाहू लागले.

"आजोबा, तुमचं दुःख खरंच खूप मोठं आहे, पण तुम्हांला यातून सावरायला हवं. मृत्यू हे जीवनातले अंतिम सत्य आहे ; आणि ते सत्य सगळ्यांना स्वीकारावंच लागतं. मनुष्याच्या कल्पने पलीकडल्या, जीवनातल्या वास्तवा पलीकडल्या जगात गेलेला माणूस पुन्हा कधीच परतून येत नाही. स्वतःला सावरा आजोबा..!!" नथू आजोबांचे सात्वंन करत असतानाच, मघाशी डोक्याला झालेल्या जखमेतून एक विलक्षण जीवघेणी कळ त्या तरुणाच्या मेंदूत उठली. जखमेतून रक्ताची धार उसळून ती कपाळावरून वाहू लागली. त्याने ती जखम रुमालाने दाबून धरत आपले ओठ दाताखाली दाबले.

त्याला होणाऱ्या वेदना पाहून नथू आजोबा हळहळू लागले.

थोडा वेळ दोघं शांतच बसले.. एकमेकांशी काहीही न बोलता... !! डोहाकडे, त्या डोहातल्या शांत पाण्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत..!!

"मेलेला माणूस परत येत नाही..?? त्याचा आत्मा परतून येत नाही..?? तुला काय माहित ..?? " अचानक नथू आजोबा उसळले.

नथू आजोबांच्या आवाजाने तिथल्या भयाण शांततेचा भंग झाला. त्यांच्या आवाजाने तो तरुण दचकला. विस्फारलेल्या डोळ्यांनी तो नथू आजोबांकडे पाहू लागला.

"आजोबा, अहो कसं समजावू मी तुम्हांला..?? मी कुठे नोकरी करतो , सांगू तुम्हांला..??.... हॉस्पीटलच्या शवागृहात...! रोज कितीतरी मुडदे येत असतात तिथे..! कुणी आजारपणात गेलेले, कुणी अपघातात गेलेले, कुणी हत्या झालेले, कुणी आत्मघात केलेले ...असे असंख्य अभागी जीवांच्या मृतदेहासोबत मी रात्र काढतो पण; आज पर्यंत एकही मुडदा उठून जागेवर बसलेला नाही पहिला मी..! " त्याने खिशातून सिगारेटचे पाकीट काढले.

सिगारेट शिलगावित, त्यातून निघणाऱ्या धुरांच्या वलयाकडे तो चमत्कारिक नजरेनं पाहू लागला. स्वतःला त्या धुरांच्या वलयात हरवू लागला.

नथू आजोबा त्याच्याकडे कुतुहलाने पाहू लागले.

" खरंच..!" नथू आजोबांचे वृद्धत्वाने कोरडे पडलेले डोळे आणि त्या डोळ्यांतल्या बाहुल्या विलक्षण आश्चर्याने विस्फारल्या.

"आता तुम्ही घरी जा आजोबा. तुमच्या घरातली लोकं जीवाला घोर लावून वाट पाहत असतील तुमची..!" त्या तरुणाने नथू आजोबांना काळजीने सल्ला दिला.

" घरी कुणीही वाट पाहणार नाही माझी. कुणी ऐकत नाही माझं... मी म्हणजे अडगळीत टाकलेलं एक जुनं सामान आहे त्यांच्यासाठी.. सगळ्यांना नकोसा झालायं मी... वार्धक्य म्हणजे शाप आहे शाप... मनुष्य जीवनाला..!" नथू आजोबा एकदम तारस्वरात ओरडू लागले.

" शांत व्हा आजोबा..! उगाच तुम्ही गैरसमज करून घेतायेतं.. एकत्र कुटूंबात राहताना थोडं तुझं ..थोडं माझं.. असं करावं. थोडं त्यांच ऐकावं ... थोडं आपलं सांगावं..! विनाकारण राग डोक्यात घालून घेऊ नये!" त्या तरुणाने नथू आजोबांची प्रेमाने समजूत घातली.

नथू आजोबा भकास हसले. त्यांच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर विलक्षण हतबलतेचे, वैफल्याचे भाव झळकू लागले.

__ अचानक कुबट, कुजलेला गंध वार्‍यासोबत वातावरणात पसरू लागला. त्या तरुणाला त्या वासाने मळमळू लागलं.

" आजोबा, इथे हा घाण वास कुठून येतोयं..?? तुम्ही कसे काय बसता हया असल्या घाणेरडया वातावरणात..?? " तो जमिनीवर थुंकत नथू आजोबांना विचारू लागला.

" अरे, तिथे मागे बोरूच्या, बाभळीच्या माजलेल्या वनात गावातली लोकं, मेलेली जनावर आणून टाकतात. असेल एखादे मेलेले जनावर पडलेले तिथे...!" आजोबांनी उत्तर दिलं.

नथू आजोबा पुन्हा डोहाकडे शांतपणे पाहत, एकटक नजर लावून बसले.

तरुणाचे कुतुहूल चाळवले. कुजलेला, कुबट वास कुठून येतोय, ते पहायला तो उठून पारामागे असणाऱ्या बाभळीच्या वनाकडे जाऊ लागला. जसा जसा तो पुढे जाऊ लागला तसा तसा कुजकट दर्प तीव्रतेने त्याच्या नाकपुड्यांत शिरू लागला. त्याच्या पोटातली मळमळ वाढली.

__ आणि चालता चालता अचानक तो एका बाभळीच्या झाडाजवळ येऊन थबकला. त्याचं लक्ष वर बाभळीच्या झाडावर गेलं. विजेचा झटका बसावा तसा झटका त्याला क्षणार्धात लागला. त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडू लागला. अंग थरथरू लागलं. विलक्षण भयकंपने त्याच्या छातीत दाटून आली. आपली हृदयक्रिया बंद पडतेयं की, काय असं त्याला वाटू लागलं.

__ आणि अचानक त्याच्या खांद्यावर थंडगार हात पडला. त्या स्पर्शाने त्याचं सर्वांग थरारलं. त्याने गर्रकन मान वळवत मागे पाहिलं.

"सांगितलं ना तुला, कुणीही माझी वाट पाहणार नाही घरी. गेल्या दहा दिवसांपासून गळ्यात फास लावून लटकलोयं इथे बाभळीच्या फांदीवर; पण कुणीही आलं नाही शोधायला मला. रोज भेटायला यायचो मी माझ्या नर्मदेला तिथे डोहाजवळ, पण ती सुद्धा आली नाही... तू म्हणतो तसं मेलेलं माणूस परत कधीच येत नाही... वाट पाहून कंटाळून शेवटी मग मीच गेलो तिला भेटायला.. !!" एखाद्या अंधाऱ्या खोल गुहेतून आवाज घुमावा तसा आवाज त्याच्या कानावर पडला.

डोळे खोबणीतून बाहेर आलेले , अंगावरची कातडी कुजून लोंबलेल्या अवस्थेतले नथू आजोबा त्याच्याकडे रोखून पहात, कातडी गळालेल्या हाताचे बोट वर दाखवत त्याला सांगू लागले.

त्या तरुणाच्या तोंडातून एक अस्फुट किंकाळी फुटली. तो जीवाच्या भीतीने पाराच्या दिशेने लंगडत- लंगडत पळू लागला. मोटरसायकल वर बसत, दम खात तिला किक मारत तो मुख्य रस्त्याच्या दिशेने मोटरसायकल सुसाट पळवू लागला.

तो तरुण गाडी घेऊन मुख्य रस्त्याच्या नागमोडी वळणावर आला आणि वळणावर पोहचताच__

धाड ss ....!!

काही कळायच्या आतच समोरून येणाऱ्या ट्रँकरने त्या तरुणाला मोटरसायकल समवेत फेकून दिलं दूरवर.. आणि त्या अभागी जीवाचा श्वास क्षणात संपला. त्याच्या शरीरातला आत्मा आता कधीच परतून येणार नाही.... अश्या वाटेला लागला होता...!!

"ही आजकालची पोरं ना अजिबात ऐकत नाही कुणाचं..!! ते दोघे पण असेचं गेले....एवढं सांगत होतो मी त्यांना 'अति घाई मसणात नेई' .. पण त्यांनीही नाही ऐकलं माझं. आता हा सुद्धा तसाच ....त्यांच्या सारखाचं वागला..नाहीचं ऐकलं माझं.. माझ्या म्हाताऱ्याचं कुणी ऐकतच नाही.. कुणीचं नाही... वार्धक्य म्हणजे शाप.. आहे.. शाप! "

नथू आजोबा एकटेच बडबडत परत त्या ढासळलेल्या पारावर येऊन बसले. वार्धक्याने क्षीण झालेल्या डोळ्यांनी ते डोहाकडे आसुसलेली नजर लावून वाट पाहू लागले .. आपल्या नर्मदेची..!!

__ आणि त्या पारावरची अर्धभग्न अवस्थेत असलेली, शेंदूर फासलेली... घोडेस्वाराची मूर्ती गेल्या दहा दिवसांत हे असे घडणारे प्रसंग, आणि त्या प्रसंगाची दुर्दैवी मृत्यूंमध्ये होणारी परिणीती पाहत होती... आपल्या तारवटलेल्या डोळ्यांनी ... अलिप्तपणे.... .!!

समाप्त..!!

धन्यवाद..!!

रूपाली विशे- पाटील

rupalivishepatil@gmail.com

__________________ XXX__________________

(टिप: सदर भयकथा काल्पनिक असून वाचकांचे निव्वळ मनोरंजन व्हावे ह्या हेतूने लिहिली आहे. कथेद्वारे
कुणाच्याही भावना दुखविणे तसेच अंधश्रद्धा पसरविणे हा कथा लेखिकेचा उद्देश नाही.)

____________________ XXX_____________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जाई, rmd, मामी, साधा माणूस, लावण्या, अज्ञातवासी..!!
प्रतिसादासाठी धन्यवाद..!!
तुम्हांला कथा आवडली म्हणजे जमलीयं भयकथा..!!

मानवजी, गौरी, मृणाली, किल्ली, सामी, बिपिनजी, वीरुजी..!!!
धन्यवाद... कथा आवडल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल..!!

खूप छान! भाषाशैली उत्तम!दिमाखात वर्णन रेखाटलेलं आहे!climax danger!
रानचाफाच्या पर्णहीन पांढऱ्या फुलांच्या गुच्छाला सवाष्ण स्रीने हातात भरलेल्या हिरव्या रंगाचा चुडा अशी उपमा दिली आपण!
पांढरे फुल आणि हिरवा चुडा समर्पक नाही वाटत!
बाकी उत्तम!

सुनिधी, अस्मिता, चंद्रमा... धन्यवाद.. कथा आवडल्याबद्दल आणि आर्वजून तसा प्रतिसाद दिल्याबद्दल..!!

चंद्रमा,

अगदी योग्य टिप्पणी केलीत तुम्ही... रानचाफ्याची पांढरी फुलं आणि सवाष्णीच्या हातातल्या हिरव्या चुड्यावर. हे वर्णन लिहिताना मला हि खटकलं होतं थोडंसं ; पण रानचाफ्याचं पावित्र्य अधोरेखित करण्यासाठी जरा जास्तच शाई सांडली कागदावर..!! त्याला कारण म्हणजे लहानपणापासून मला रानचाफ्याच्या झाडाचं आणि त्या पांढऱ्या फुलाचं विलक्षण आकर्षण वाटतं... ( आमच्या शेतातल्या तळ्यावर आणि आजूबाजूला एक दोनचं झाडं आहेत त्याची, पण ती झाडं आणि फुलं नेहमीचं आकर्षुन घेतात मनाला..)
तुमचा प्रतिसाद खूप सुंदर आहे आणि केलेली टिप्पणी अगदी योग्य आहे. मी पुढच्या लेखनावेळी ती नक्कीच ध्यानात ठेवीन..!

मला आवडली ही कथा. थोडाsssssसा अंदाज आला, कारण प्रतिलीपी वर भुतांच्या कथा खूप वाचल्यात. पण कथा छान रंगवली आहे.

राणी , रश्मीजी धन्यवाद कथा आवडल्याबद्दल..!

@ रश्मीजी- मला पण मध्ये भयकथा वाचायचा भारी छंद लागलेला.. शेवटी त्याचा परिणाम हा असा... भयकथा लिहिण्यात झाला..

Pages