कौतुकाची थाप!

Submitted by ॠचा गौरव on 16 May, 2021 - 10:44

आपण करत असलेल्या कामाचे किंवा जोपासत असलेल्या छंदाचे जर कुणी थोडेसे जरी कौतुक केले तरी किती छान वाटते नाही!! एकदम एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला आणि आपल्यात देखील निर्माण होते!!

आपल्याला कामाच्या ठिकाणी देखील बढती/पगारवाढ/बोनस यांपैकी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात आपल्याला कौतुकाची थाप किती हवीशी वाटते किनही... तसंच आपण घरात, कलाकुसरीच्या एखाद्या गोष्टीत जे काही करतो त्यासाठी देखील ती कौतुकाची थाप तितकीच महत्वाची असते, नाही का!! सध्याच्या घरून काम करण्याच्या काळात तर मी हे खूपच अनुभवले.रोजचा कामावर जाण्या येण्याचा वेळ वाचल्यामुळे एक दोन चित्रे काढली आणि एक दोन लेख लिहिले तर सगळ्या आप्तेष्टांनी आणि मित्रमंडळींनी, "मस्त...अशीच चित्रे काढत राहा,पेंटिंग करत रहा,बंद करू नकोस...असंच सुचेल ते छान लिहीत रहा" असा प्रतिसाद दिला, ही माझ्यासाठी केवढी मोठी कौतुकाची थाप होती!!

यावरूनच कौतुक करणं ही किती महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे हे मला खूप जास्त जाणवलं;आणि हो,तसा विचार केला तर कुणाला कौतुक केलेलं नको असतं सांगा पाहू…याला ना वयाचे बंधन ना इतर कुठले! अगदी ‘मला काही कुणाच्या कौतुकाची गरज नाही ‘ असे टेचात सांगणाऱ्या व्यक्तीला देखील चार कौतुकाच्या शब्दांनी छानच वाटत असणार यात मला मुळीच शंका नाही!!!

आता स्वयंपाकाचच उदाहरण घ्या,बनवणारी व्यक्ती काही इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी स्वयंपाक करत नसते; पण ‘ भाजी छान झाली आहे बरका किंवा ‘वा!!चहा एकदम कडक झालाय!!!’ या छोट्याश्या कौतुकाने देखील त्या करणाऱ्या व्यक्तीला एकदम कष्टाचं चीज झल्यासारखं वाटून जातं.
दुसरं उदाहरण घ्यायचं तर …एखाद्या कम करून घर सांभाळणाऱ्या व्यक्तीला जेव्हा घरातली मोठी मंडळी म्हणतात की ‘ तुम्ही तुमचा व्यवसाय आणि घरातला समतोल सांभाळण्याचा उत्तम प्रयत्न करत आहात हं!’ तेव्हा यासारखी कौतुकाची दुसरी थाप काय असू शकते!!! जरी आपण जगावेगळं काही करत नसलो तरी या छोट्याश्या कौतुकाने येणारा हुरूप काही निराळाच!!

जरा गंमतशीर आहे..पण बघा हं…. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ म्हणतात त्यानुसार काही व्यक्ती मनमोकळेपणाने इतरांच्या चांगल्या गोष्टींचे मागे पुढे न बघता पटकन कौतुक करतात, तर काही ‘ त्यात काय कौतुक ‘ असा विचार करतात….काही व्यक्ती इतरांचे कौतुक करतात देखील आणि त्यांना आपले कुणी कौतुक केलेले हवेही असते…तर काही व्यक्ती ‘ फक्त माझेच कौतुक झाले पाहिजे,मी काही कुणाचे करत बसणार नाही ‘ अशी वृत्ती असलेल्या पाहायला मिळतात.

तसं बघायला गेलं तर कौतुक करायला लागतं तरी काय हो? ‘फक्त चार गोड शब्द आणि एक मनापासून दिलेलं हास्य ….असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा! आणि परत एकदा विचार करा बरं… तुमच्याही लक्षात येईल कि कुणाचं मनापासून कौतुक करणं हे इतकही सोपं नाही आणि ते सगळ्यांनाच जमतं असंही नाही!!! तर मुळात कुणाचं तरी कौतुक करण्यासाठी लागतं ते मोठं मन…आणि मनमोकळे विचार,…आपल्याला जसं कौतुक हवंसं वाटतं तसंच ते इतरांनाही वाटत असणार ही जाणीव…!!! बरोबर ना?

नाही म्हणजे, माझं म्हणणं असं मुळीच नाही की सगळ्यांनी फक्त एकमेकांची कौतुकं करत राहूया; पण चांगल्या गोष्टीला पटकन् चांगलं म्हणुया…एखाद्याची कविता, चित्रं, रंगकाम,विणकाम, छायाचित्र,स्वभावगुण,छानशी रांगोळी,एखादा पदार्थ आवडल्यास मनात नं ठेवता त्याच्यापर्यंत पोहोचवूयात लगेच…आणि नात्यांमध्ये नव्याने निर्माण होणारी सकारात्मकता अनुभवुयात!! काय म्हणता??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर मुळात कुणाचं तरी कौतुक करण्यासाठी लागतं ते मोठं मन…आणि मनमोकळे विचार,…>>> अगदी पटलं.

लेख खूप सुंदर लिहिलायं आणि लेखातले विचारही आवडले.

तुमचं कौतुक ह्यासाठी की, तुम्ही तुमचे विचार लेखात छान मांडलेत.

छान लिहीले आहे.
>>>>>>तुमचं कौतुक ह्यासाठी की, तुम्ही तुमचे विचार लेखात छान मांडलेत.
+१

एकदम बरोबर. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे "वचने किम दरिद्रता" म्हणजे दुसऱ्यांशी बोलताना / दुसर्यांविषयी बोलताना तरी शब्दांचा दळीद्रीपणा / कंजूषी करू नये.

अजून एक छोटंसं निरीक्षण म्हणजे एखाद्याने तुमच्यासाठी एखादी गोष्ट केली आणि तुम्ही त्या व्यक्तीचे आभार मानले आणि शक्य असेल तिथे चारचौघात त्या कामाचा / मदतीचा उल्लेख करून कौतुक केलं.. की पुढच्या वेळी त्या माणसाला तुमच्यासाठी ते काम करण्याचा उत्साह राहतो. हे घरी/ ऑफिसमध्ये / समाजात सर्वत्र लागू पडते.

छान !
अजून एक अनुभवातून आलेला सल्ला, कवतुक करायची घाई करू नये.

म्हणजे बायको एखादा नवीन ड्रेस घालून आपल्यासमोर ऊभी राहते. आणि आपण लॅपटॉपमधून नजर बाहेर काढून तिच्यावर टाकायच्या आधीच सवयीने, वाह मस्त छान छान बोललो की फार शिव्या पडतात.

>>>>आपण लॅपटॉपमधून नजर बाहेर काढून तिच्यावर टाकायच्या आधीच सवयीने, वाह मस्त छान छान बोललो की फार शिव्या पडतात.
लोल!!! अगदी अगदी,
मग मीही उट्टं काढते नवर्‍याने त्याच्या म्युझिक सिस्टीमविषयी काही विचारले की मागे पुढे न बघता, न ऐकता चान चान करते. मग तोही चिडतो.

सर्वप्रथम तुमचे कौतुक उत्तम लेख लिहल्याबद्दल!
कौतुक,प्रशंसा,खुशामत ह्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.आपण ज्या घरात राहतो त्या नात्यातील लोकांचे ॠणानुबंधं आपल्यासोबत जुळलेले असतात.आईने तर आपल्यासाठी सर्व जीवन अर्पण केलेले असते.खर तर याची सुरवात आपल्या घरातूनच व्हायला हवी.आई निरनिराळे खमंग,खुसखुशीत आणि चविष्ट पदार्थ आपल्याला खाऊ घालते पण आपण हे पदार्थ खाऊन तर घेतो पण कौतुक करायचे विसरून जातो.आई पण अपेक्षा ठेवत नाही आपल्या माणसांकडून.पण आपण जर त्या पदार्थाचे कौतुक केले तर त्याचा आनंद अवर्णनीय असतो.बघा तिच्या चेहऱ्यावर!तुम्ही अनुभव घेऊन बघा याचा फायदाच होईल तुम्हाला! अजून छान-छान पदार्थ खायला मिळतील.
बाबा पण आपल्या सर्व गरजा पूर्ण करतात प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची पूर्तता त्यांच्याकडूनच होते.सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिक बाबी.बाबांना धन्यवाद द्या या सर्व गोष्टींसाठी.आणि आपल्या आयुष्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करा बघा त्यांचे डोळे नाही पाणावले तर नवलच!
बहिणीचे पण नाते अशेच आई-बाबांच्या मारापासून वाचवणारी ती रक्षणकर्ता असते.आणि खासकरून मुलींबद्दलची खास माहीती तीच आपल्याला पुरवित असते तर अशा या जिव्हाळ्याच्या आणि प्रेमळ बहिणीचं कौतुक करायला विसरू नका.
भाऊराया हा तर आपला हमराज असतो. आपले सर्व गुपित आईबाबांपासून लपवून ठेवतो.प्रत्येक बाबींमध्ये त्याचा सहभाग असतो.सर्व काही आपण त्याच्यासोबत शेअर केलेलं असतं.तर या बंधूचे कौतुक कराच आपण आपल्या आयुष्यात त्याच्या योगदाणाबद्दल!
मी तर म्हणेल या सर्व नात्यांना मग ते
आई-बाबा,बहिण-भाऊ,आजी,आजोबा,काका-काकू,मामा-मामी अशा सर्वांना
I LOVE YOU म्हणा.बघा मग काय जादू होते ती.तुमच्या संबंध जीवनाला कलाटणी मिळेल आणि तुमचे जीवन सुखमय होईल.

तर मुळात कुणाचं तरी कौतुक करण्यासाठी लागतं ते मोठं मन >>> +१ अगदीच पटलं.
प्रतिसादात पण छान लिहीलेय.