एक उन्ह शोधत होते..

Submitted by सांज on 16 May, 2021 - 06:20

एक उन्ह शोधत होते..

त्याचा हलकासा कवडसाही पुरेसा होता माझ्यासाठी.

सकाळी उठल्यावर पाखरांची चिव-चिव ऐकत ओसरीवर बसताना त्याची हलकी तिरीप अंगावर घेण्याचं स्वप्न..

अवाजवी होतं?

घराच्या कौलांतून वाट शोधत त्याने यायला हवं होतं मला, माझ्या कुशीत..

चुलीवर भाजलेली खमंग भाकरी,

ठेवली असती त्याच्याच उजेडात उभी.. निवायला..

माझ्या कपाळावरचे घर्मबिंदू पाहून चेष्टा करणार्‍या त्याला,

तरातरा सामोरं जाऊन म्हटलं असतं,

तुझ्या लाहीने भाजणारी कातडी नाही माझी.

आधीच रापलेल्या चेहर्‍याला

तू आणि काय रापवणार आहेस!

परसात,

झाडांच्या जाळीतून पाझरणारी त्याची रांगोळी अंगावर घेऊन निजले असते दुपारच्यावेळी.

काही खेळ मांडले असते..

काही गार्हानी ऐकवली असती..

तिन्हिसांजेला,

आभाई पसरलेलं केशर,

कुंकवात मिसळून लावून घेतलं असतं कपाळी..

माझ्या सावळ्या देहाला दिली असती जराशी झळाळी..

एक उन्ह शोधत होते..

भर उन्हाच्या किर्र दुपारी..

दृष्टी हरवलेल्या डोळ्यांच्या किनारी..

सांज
https://www.chaafa.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा !