आसवे विसरूत का?

Submitted by निशिकांत on 15 May, 2021 - 11:29

वाचा आणि ऐका एक गझल---( वीक एंड लिखाण-१६.०५.२०२१ )

वृध्दत्व, स्त्रीभ्रुण हत्त्या, स्त्रियांवरील अन्याय हे मी ज्या ठिकाणी वाढलो त्यामुळे कदाचित, माझ्या अत्त्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. मी या विषयावर बर्‍याच कविता, गझला आणि लेख पण लिहिले आहेत. कित्येक गझलेत या विषयावरील शेर डोकावत असतात. माझे बरेच गझलकार मित्र माझी टिंगल पण करतात. त्यांचा प्रश्न असा की हेच विषय किती दिवस हाताळायचे? मी त्यांना एका कार्यक्रमात उत्तर दिले की जोपर्यंत हे प्रश्न समाजात अस्तित्वात आहेत; तोपर्यंत त्यांचा उहापोह करणे मी कवि/शायरांचे कर्तव्य समजतो.
आज या गझलेत मी पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न उचलला आहे; जरा वेगळ्या पध्दतीने.
मी नोकरीत असताना माझ्या कर्यालयीन कर्तव्याचा भाग म्हणून बर्‍याच वृध्दाश्रमांना भेटी दिल्या. त्यांना जमेल तेवढी आर्थिक मदतही केली. मी या ठिकाणी भेटतांना आवर्जून तेथील वृध्दांशी आस्थेने बोलत असे. प्रत्येक वृध्द म्हणजे एक वेगळी करुण कहाणी असायची. त्यात सविस्तर आज जात नाही. पण एक्च गोष्ट मी येथे नोंद करू इच्छितो की मला कोणत्याही आश्रमात शेतकर्‍यांचे, गरीबांचे माय बाप आढळले नाही. सर्वांची मुले उच्च मध्यम अथवा श्रीमंत वर्गात मोडणारीच होती. ही आपल्या उच्चभ्रू सुशिक्षित समाजाची एका अर्थाने शोकांतिकाच आहे. असेच मी या आधी एकदा लिखाण केले असता कांही शहाण्यांनी प्रतिसाद दिला की,"आज काल दुसर्‍या देशात स्थायिक झालेल्या मुलांच्या आई बापांची कड घेऊन मुलांची टिका करण्याची टुम निघाली आहे" मी त्यांच्या संवेदनाहीन प्रतिसादाने अवाकच झालो आणि डोक्यावर हात मारून घेतला.
वृध्दत्वाचे प्रश्न वेगळेच असतात. एक तर साठी ओलांडल्या नंतर जीवनात मोठी पोकळी निर्माण होते. आपण समाजाला नकोसे आहोत ही भावना बळावते. पहिले वैभव आठवून अधीकच कुचंबणा होते. ही झाली मानसिक बाजू. आणि पुढच्या पिढीतील सदस्यांचे वागणे. ते नकोसे झाले आहेत हे पावलोपावली वागण्यातून संकेत देणे हे फार त्रासिक असते वृध्दांसाठी.
आजची गझल ही मुले दूर गेलेल्या एका वृध्द जोडप्याचे मनोगत आहे. ते एकमेकाशी सकारात्मकतेने बोलत आहेत आणि तेही कुणालाही दोष न देता! सलाम त्यांच्या पॉझिटिव्हिटीला.
ही गझल ज्यांनी माझ्या गझल गायनाचा औरंगाबादला कर्यक्रम केला ते पराग चौधरी आणि त्यांच्या पत्नी सौ मिनाक्षी चौधरी यांनी मिळून गायली आहे. ही ऐकताना गझल नसून हे एक द्वंद्वगीत आहे असे वाटते हे विशेष. आधी गझल वाचण्यासाठी खाली देतोय कारण कांही निवडक शेरच चौधरी दांपत्यांनी गायलेले आहेत.

आसवे विसरूत का?
(मुले दूर असलेल्या वृध्द जोडप्याचे मूक रुदन)

पाचवीला पूजलेली आसवे विसरूत का?
मंद हसणे शुष्क ओठी सांग तू फुलवूत का?

आणली जेंव्हा फुले मी वाहिली देवास तू
माळ तू बनवून गजरा, पौर्णिमा उजवूत का?

जे नशीबी तेच घडले जे हवे जगलो कुठे?
निश्चयाने शृंखलांना या क्षणी तोडूत का?

बध्द चाकोरीत जगलो वास्तवाला पकडुनी
आज त्या क्षितिजास पकडू, आपुल्या बाहूत का?

चल जरासे धीट होऊ हात तू हातात दे
काय म्हणती लोक सारे काळजी सोडूत का?

वाढदिवशी जश्न केला सर्व पोरांच्या किती !
जन्मलो आपण कधी त्या तारखा आठवूत का?

त्या मुलांची, नातवांची काळजी केली किती?
पाय मागे ओढती पण मोकळे होवूत का?

ऊब मायेची कुणाला आपुल्या आहे हवी?
संपल्याचे गीत लिहिण्या शब्दगण जुळवूत का?

काचते सारे जिवाला काळजा पडती घरे
वेदना रेखाटण्याला कुंचले शोधूत का?

नागडे हे सत्त्य आहे तू मला अन् मी तुला
सोडुनी हे विश्व दोघे "त्या" जगी जाऊत का?

भासते "निशिकांत" का रे खूप जगणे राहिले?
जे न केले ते कराया चल पुन्हा जन्मूत का?

ही गझल ऐकण्यासाठी क्लिक करा---https://www.youtube.com/watch?v=X_DzyyVd1pk

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users