दिवा विझवू नकोस (रहस्यकथा)

Submitted by करभकर्ण on 9 May, 2021 - 06:30

जंगलाच्या वेशीबाहेर ते दोघे उभे होते. केशव आणि राघव. दोन्ही हात कमरेवर ठेवून, ते आत खोलवर जंगलाकडे बघत होते. जंगलाच्या खोलीचा, घनतेचा अंदाज घेत होते. आज त्यांनी पैज लावली होती होती. आणि ती आजच पूर्ण करायची होती. शाळा नेमकीच सुटल्याने, ते लगबगीने जंगलाकडे आले होते. कोणी आपल्याला पाहिले नाही ना? याची भिती होती. परंतु तसे काही झाले नव्हते. ते दोघे त्या जंगलाच्या वेशीबाहेर उभे होते. सूर्य मावळतीला आला होता. डोंगराआड जाण्याची त्याची लगबग सुरू झाली होती. कोणत्याही क्षणी, तो त्या मोठ्या डोंगराआड अदृश्य झाला असता. पैज  पूर्ण करण्याचा काळ नजीक आला होता.
सह्याद्रीचे ते घनदाट जंगल, शेकडो मैलांपर्यंत पसरलेले होते. ते उभे होते तेथून साधारणतः काही मैल आत, जंगलात एक देवीचे मंदिर होते. कुठली तरी विचित्र देवी असावी ती. कारण तिची मूर्ती काहीशी ओबडधोबड होती. त्या देवीच्या समोर एक मोठा दिवा होता. गावातील लोकांचे म्हणणे होते की, तो दिवा सतत पेटलेला असतो. तो कधीच विझत नाही. आता हे किती खरे! आणि किती खोटे! हे सांगणे कठीण. पण गावातील लोक निर्धाराने सांगायचे की, तो दिवा सदासर्वकाळ पेटलेला असतो. तो दिवा कसा पेटतो? कोण पेटवतो? तो पेटवणारा दिसत का नाही? याची उत्तरे मात्र कोणी देत नसे. पण तिथे दिवा आहे आणि तो सतत पेटलेला असतो, यावर मात्र ते ठाम होते.
   याच दिव्याची कथा केशवने राघवला सांगितली. तेव्हा राघवने त्याची किती चेष्टा उडवली! असे काही जंगलात नाही. दिवा वगैरे सगळं खोटं आहे, हे राघवचे मत होते. तर असा दिवा जंगलात आहे, हे केशव त्याला निक्षून सांगू लागला. पण दोघेही एकमेकांवर विश्वास ठेवेनात!तेव्हा त्या रागाच्या भरात, त्यांची ती  पैज लागली. राघव रात्रीचा त्या जंगलात जाणार, आणि ते देवीचे मंदिर पाहणार. जर तेथे दिवा लागलेला असला तर तो दिवा विझवून, तो परत गावात येणार. अगदी साधी सरळ पैज! त्या रागाच्या भरात राघवने पैज मंजूर केली. आणि ती पूर्ण करायला, ते दोघे जंगलाच्या वेशीबाहेर उभे होते. राघव जंगलात जाणार. दिवा विझवणार. आणि त्याची वाट बघत केशव या वेशीवर थांबणार. एकंदरीत असे त्यांचे नियोजन ठरले.
   राघव तयार झाला. काहीही होवो, पैज हरायची नाही. ती जिंकायचीच! पैज जिंकली की, केशव त्याचे हरएक काम ऐकणार होता. त्याचे दप्तर वागवणार होता. दुपारी सुट्टीत त्याला पाणी आणून देणार होता. डबा खाऊन झाला की, तो धुऊन देणार होता. असे बरेच कामे तो करणार होता. तो जंगलाकडे निघाला. जाताजाता केशवने त्याला मारुतीची शपथ घातली की, दिवा असेल तर तो विझवायचा. मधूनच परत यायचे नाही. त्याला माहित होते, राघवला मारुतीची शपथ दिली की, तो खोटे बोलणार नाही. तो दिवा विझवणारच!
   सूर्य पूर्णपणे मावळतीला गेला होता. वातावरणातला उरला सुरला संधीप्रकाशही, नाहीसा झाला होता. राघव जंगलाची ती वाट तुडवत आत निघाला. खिशातली छोटीसी बॅटरी त्याने बाहेर काढली. सुरुवातीचे विरळ वाटणारे जंगल, आता चांगलेच घनदाट भासत होते. पायाखालची वाटही आता वेगळीच जाणवायला लागली. आधीची टणक आणि कोरडी वाट आता संपली होती. दलदलीची वाट सुरु झाली होती. त्या दलदलीत पाय फसत होते. कधी तळवा, कधी घोटा, तर कधी गुडघ्यापर्यंत पाय खाली दलदलीत फसत होते. चालताना त्रास जाणवत होते. खूप कष्टाने एकेक पाऊल टाकत तो पुढे जात होता. उंच झाडे, खुरटी झुडपे, वेली, रोपटे, रुंद बुडाचे अजस्त्र वृक्ष, उंच झाडे यांनी जंगल घनदाट बनले होते. बांबू, सिडार, आंबा, नागचंपा, किंडल, जांभुळ या वृक्षांनी आजूबाजूची दाहकता वाढली होती. तो चालत बराच पुढे आला होता.
    हळूहळू आता एका एका प्राण्यांचे आवाज आजूबाजूच्या भागातून येऊ लागले. अवतीभोवतीच्या दलदलीच्या पाण्यातून, डुबुकss  डुबुकss असे वेगवेगळे बेडकांचे उड्या मारल्याचे आवाज येऊ लागले. कोठेतरी वाघाची एक मोठी डरकाळी, त्याचे कंपन उडवून गेली. जंगलाचा कोअर एरिया लागला असावा. कारण जंगल आता अती घनदाट झाले होते. आजूबाजूचे काही दिसेना झाले. रातकिड्यांच्या आवाजाला नेमकीच सुरुवात झाली होती. त्यांचा तो आवाज रात्रीचा संकेत होता. रात्र सुरू झाली होती. आजूबाजूचे जंगल आता भयानक वाटू लागले.
  त्याच्या बॅटरीचा उजेड आता तोकडा पडू लागला. सगळीकडे केवळ घनघोर अंधार दिसू लागला. राघवच्या मनाला आता भीतीचा स्पर्श झाला. मनातील आत्मविश्वास आता कमी कमी होऊ लागला. जंगलाची भीती वाटू लागली. उगीच पैजेचा हट्ट धरला, त्याचा त्याला आता पश्चाताप होऊ लागला. पण एवढ्या दूर आलो आहोत तर, काहीतरी करावे लागणार होते. मंदिराचा, त्या दिव्याचा शोध घ्यावा लागणार होता. तो जरा स्थिर झाला. त्याने आजूबाजूला जरा निरखून पाहायचा प्रयत्न केला. दहा-पंधरा मीटरवर त्याला एक उंचवटा दिसला. तो लगबगीने तिकडे निघाला. त्यावर चढून अवतीभोवती बघू लागला. जरासा अंधार झाल्याने लांबचे दिसत नव्हते. तरी तो निक्षून बघू लागला. आणि अचानक त्याची नजर त्या दृश्यावर स्थिर झाली. अंगावर सरसरून काटा आला. भीतीची सणक मेंदूपर्यंत गेली. त्या उंचवट्या पासून थोडेसे दूर, त्याला मिणमिणता उजेड दिसला. तो उजेड हलता होता. पिवळसर होता. तो निश्चित दिव्याचा होता! भीती, उत्सुकता, नवल, आश्चर्य या सगळ्या भावनांनी त्याच्या मनात गर्दी केली. तो त्या पिवळसर उजेडाच्या दिशेने निघाला. दिवा खरोखरच अस्तित्वात होता, हे त्याला पटले होते.
तो लगबग करत उजेडाच्या दिशेने निघाला. अचानक पाठीमागून काहीतरी आवाज आल्यासारखा जाणवला. तो गरकन पाठीमागे वळाला. पण पाठीमागे काहीच दिसले नाही. भास झाला असावा, असा विचार करून तो त्या दिव्याकडे निघाला. दिवा नजीक येत होता. आजूबाजूचा कानोसा घेत, तो त्या ठिकाणापर्यंत आला. एव्हाना किती काळ, वेळ लोटला हे काहीच माहीत नव्हते. त्याने बॅटरीचा झोत समोर टाकला. समोरचा देखावा काहीसा भग्न, विचित्र, कुरूप जाणवत होता. एक ढासळलेल्या मंदिराचा साचा समोर उभा होता. बॅटरीच्या उजेडात तो अजूनच भेसूर वाटत होता. मंदिराचे खांब अर्धवट कोसळलेले होते. वरचा भाग सगळा खाली आला होता. त्याने बॅटरीचा झोत मंदिराच्या गाभार्‍यात मारला. त्या क्षण दोन क्षणात भीतीच्या मुंग्या अंगभर पसरून गेल्या. समोर त्या ओबड-धोबड देवीची मूर्ती होती. काहीशी विचित्र, काहीशी बेढब! अशी कुठली देवी असावी ही? एवढ्या क्रूर आणि बिभत्सअवतारातील! त्याने बॅटरीचा झोत झटकन बाजूला काढला. त्या मूर्तीकडे जास्त वेळ पाहण्याची त्याची हिंमत झाली नाही.
  त्याने मान डावीकडे वळवली. आता तो त्या दिव्याकडे पाहू लागला. एका बुटक्या चौकोनी खांबावर तो दिवा पेटलेला होता. मोठ्या पंजाच्या आकाराचा तो दिवा पिवळसर उजेड फेकत होता. त्याच्या मनात सरसर करत ते प्रश्न उमटुन गेले. हा दिवा कोण लावत असेल? हा सतत कसा पेटता असेल? एवढ्या घनदाट जंगलात कोण हा प्रकार करत असेल? त्याची नजर त्या दिव्यावर खिळली होती. दिव्याची वात संथगतीने, डौलदारपणे हलत होती. डुलत होती. दिव्याच्या हलणाऱ्या वातीसोबत, राघवची मान संथपणे इकडून तिकडे हालत होती. तो दिव्याकडे मंत्रमुग्धपणे बघू लागला. कोणीतरी एवढ्या कष्टाने पेटवलेला दिवा, आपण असा कसा विझवायचा? ते मोठे पाप ठरेल. तो अक्षम्य अपराध ठरेल. याचा कोणी प्रयोजक असेल तर, तो आपल्यावर नजर रोखून असेल. त्याने झटकन इकडेतिकडे पाहिले, पण काहीच नजरेस पडले नाही. असा अचानक दिवा विझवायचा, हे त्याच्या मनाला पटेना. तो द्विधावस्थेत अडकला. दिवा विझवायची इच्छा होत नव्हती, पण सोबत पैजही हरायची नव्हती!
     त्याच्या मनात संघर्ष पेटला, पण पैजेने इच्छेवर मात केली. दिवा विझवायला तो समोर झाला. त्याने हळूच फुंकर मारली. दिवा फडफडला, पण विझला नाही. त्याने पुन्हा तसाच प्रयत्न केला. पण आताही दिवा विझला नाही. तो क्षणभर थांबला. फूssssssssss अशी जोरात फुंकर मारली. दिव्याची मोठी फडफड झाली, आणि सेकंद दोन सेकंदात दिवा विझला गेला. आजूबाजूला मिट्ट काळोख पसरला. डोळ्यात काळ्याकुट्ट काजळाची पट्टी पसरावी, तशी अंधाराची पट्टी पसरली गेली. क्षण दोन क्षण त्याला समोर काहीच दिसेना. सगळा काळोख नजरेसमोर तरळला होता. हळूहळू नजर सरावली. बॅटरीचा प्रकाश पुढे पडत होता. त्याला आता तिथं पळभरही थांबवेना! येथून जेवढ्या लवकर बाहेर जाता येईल, तेवढ्या लवकर तो बाहेर पडणार होता. त्याने लगबग केली. तो पुढे चालू लागला. पंधरा-वीस पावलेच पुढे टाकले असतील, अचानक त्याला काहीसा मंद मंद उजेड आजूबाजूला पसरलेला दिसला. तो क्षणात पाठीमागे वळला. मेंदूवर कोणीतरी मनामनाचे वार करत आहेत, अशी जाणीव त्याला झाली. भीतीचे भाले शरीराच्या आरपार घुसत आहेत, अशी वेदना त्याला जाणवली. समोर दिवा लागलेला होता. अगदी पूर्वीसारखाच. संथ आणि पिवळसर. तसाच संथपणे तो जळत होता. तो जाग्यावर स्थितप्रज्ञ झाला. हे कसे शक्य आहे? तो थरथर करत दिव्याकडे निघाला. दिव्या जवळ गेला. आजूबाजूचा कानोसा घेत, होते नव्हते तेवढे प्राण त्या फुंकरीत आणत त्याने ती फुंकर दिव्यावर सोडली. दिवा पुन्हा फडफडत विझला. पुन्हा पूर्वीसारखाच अंधार आजूबाजूला पसरला गेला. तो झपाझप पावले टाकत निघू लागला. जेमतेम पंधरा वीस पावले टाकली असतील, अचानक पुन्हा दिवा पेटला. आता मात्र तो भयभीत झाला. हे प्रकरण सोपे नाही, याची जाणीव त्याच्या मनाला झाली. आता भीतीने सगळे शरीर, मन, मेंदू व्यापून गेले होते. तो तसाच पुन्हा माघारी वळला. वेगाने दिव्याकडे धावला, तो विझवला आणि तसाच वेगाने, धावत पुढे निघाला. दिव्यापासून जेमतेम सात आठ मीटर तो गेला असेल, पिवळा, तांबडा उजेड त्याच्या आसपास प्रकट झाला. दिवा पुन्हा पेटला होता. आता राघव गर्भगळित झाला. प्रत्येक रक्ताचा थेंब मलूल झाला होता. भीतीने तो उद्विग्न झाला. डोळ्यात अश्रूंची धार लागली. आपण महाभयंकर संकटात सापडलो आहोत, याची जाणीव त्याला झाली.आपली आता सुटका नाही, या जाणिवेने त्याची मती कुंठीत झाली. तो हतबल झाला. क्रोध,भीती, हतबलता,उद्विग्नता या भावनांनी त्याच्या मनात गर्दी केली. याच भावनांच्या भरात तो तसाच पुन्हा माघारी फिरला. क्रोधाने, भीतीने पुन्हा तीच ती फुंकर मारून त्याने दिवा विझवला. काही क्षण तो तसाच दिव्याजवळ थांबला. दिवा कसा लागतो? ते बघू लागला. पण काहीच हालचाल जाणवेना. दिवा विझलेलाच होता. त्याला हायस वाटलं. तो एकेक पाऊल टाकत पुढे जाऊ लागला. दिवा अजून विझलेला होता. त्याने पावलांचा वेग वाढवला. दिवा पेटला नव्हता. त्याच्या मनाला बरे वाटले. त्याने डोळ्यातले पाणी हाताने पुसले. निघण्याची घाई केली.  आणि अंधाराचा तो काळा पडदा चिरून, तो दिव्याचा उजेड त्याच्या डोळ्यात शिरला. दिवा पेटला होता. पण क्षणात पुन्हा तो विझला. पुन्हा क्षणात पेटला. पुन्हा विझला. आता दिवा विझत होता, पेटत होता. राघवच्या हृदयांची स्पंदने आता वाढू लागली. त्याच्या शरीराचा एक एक भाग गोठून जात होता. एक एक अवयव मेंदूच्या आज्ञेबाहेर जात होता. डोळे जड पडत होते. छातीत कळ उठत होती. आता दिवा पेटत होता, विझत होता आणि त्याचबरोबर त्याच्या हृदयाची स्पंदने वाढत होती. आता दिव्याची उघडझाप वेगाने होऊ लागली, ती वाढतच जाऊ लागली. त्याच्या उघडझापा बरोबर त्याच्या हृदयाचे स्पंदने  वाढू लागले. त्याची घुसमट तीव्र होऊ लागली. भीती परमोच्च टोकाला पोहोचू लागली. धाड्दिशी तो खाली जमिनीवर कोसळला गेला. हृदयाची स्पंदने अमर्यादित झाली होती. त्यांची मर्यादा संपली होती. तो जाग्यावर गतप्राण झाला होता.
            

घाईने आणि चिंताग्रस्त चेहऱ्याने केशव त्या दिव्याच्या खांबापासून बाजूला आला. राघवला खाली पडताना त्याने पाहिले होते. त्याच्या हातातली काडेपेटी खाली गळून पडली होती. विझलेला दिवा पेटवताना, त्याला मजा वाटत होती. पण त्याची मस्करी अशी राघवच्या जीवावर बेतेल, याची त्याला कल्पना आली नव्हती. त्या निष्प्राण राघवजवळ तो आला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी गळू लागले. त्याचा मित्र समोर मरून पडला होता. आणि त्याच्या मरणाला तोच कारणीभूत ठरला होता. हो तोच! एक पैज लावून, आणि दुसरे दिवा पुन्हा पुन्हा पेटवून तो त्याच्या मृत्यूचे कारण बनला होता. सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. केशव आता रडत होता. समोर आपल्या मित्राचा निष्प्राण देह ,अवतीभवतीचा तो मिट्ट काळोख, ती देवीची ओबड-धोबड मूर्ती, ते ढासळलेले भग्न मंदिर ! आपल्या एकटेपणाची आता केशवला जाणीव झाली. राघव संपला होता. आपली मस्करी त्याला भोवली होती. येथून आता निसटलेलेच बरे! त्याने एकदा राघवच्या त्या निष्प्राण चेहऱ्यावर नजर टाकली. त्याचा कायमचा निरोप घेतला. आणि तो उठला. जायला निघाला आणि तोच तो पिवळसर उजेड घनघोर अंधार भेदत त्याच्या चेहर्‍यावर पडला. दिवा पेटला होता! पळभर सुन्न शांतता पसरली. आणि काही कळायच्या आत, धाड्दिशी केशवचे कलेवर खाली जमिनीवर पडले. अगदी राघवसारखाच स्पंदने वाढून तोही गतप्राण झाला होता. आता दिवा तसाच जैसे थे जळत होता. कधीही न विझण्यासाठी!!

*समाप्त
-वैभव नामदेव देशमुख.

Group content visibility: 
Use group defaults

वर्णने छान आहेत. कथा पण छान आहे.
अमानवीय, मानवीय असा खेळ छान रंगवला.
शेवट मानवीय केला असता तर पहिल्या कथेप्रमाणेच वास्तववादी झाला असता (हे वै मत).

रानभुली,
हा तेही आहे. माझ्याही मनात तोच विचार आला होता. बट तोच तो jammer झाला असता म्हणून, शेवट अमानवीय केला.

कडक वर्णन आणि वातावरणनिर्मिती

मला वाटले शेवट असा असेल की ...

स्पॉईलर अ‍ॅलर्ट

.

त्यांची पैज ऐकून आणि केशवचा प्लान समजून अजून कोणीतरी तिसरी व्यक्ती काय घडतेय हे बघायला आली असेल. तिनेच मग अखेरीस सहज दिवा लावला असेल. पण अजून तिसरे कोणी असू शकते याची कल्पना नसल्याने केशव अटॅक फटॅक सटॅक झाला असेल Happy

स्पॉईलर अ‍ॅलर्ट,
हाही शेवट भारी झाला असता.
अभिप्राय मात्र खूप आवडला.