तू नसतास तर?

Submitted by उमेश कोठीकर on 19 May, 2009 - 01:15

ए, ऐक ना!
हो रे, नेहमी तूच ऐकतोस,
पण आज अगदी मनापासून,
तुझ्या नकळत तुझ्याकडे खुप खुप बघतांना,
एकदम विचार आला...
तू नसतास तर?.......आयुष्यात?
एकदम भरून आले बघ!
खरंच तू नसतास तर.....
कोणी जपले असते मला;
एव्हढे फुलासारखे?
तुझे ते अपार काळजी घेणे...
प्रेमाने आणि सुखाने गुदमरून टाकणे,
माझ्या कमीपणाचेही...किती कौतुक करणे,
खरंच तू नसतास तर?
कोणी म्हटले असते?
ऑफिसमधून थकून आल्यावरही..
माझ्या निरर्थक रागावर हलकेच हात फिरवून,
"बरे वाटत नाही का गं? थांब, मी करतो कॉफी"
खरेच तू नसतास तर?
मिळाले असते? एव्हढे प्रेम, सुख, भरीव आयुष्य?
अगदी देवासारखे तुझे आईबाबा!
आणि.... मी मात्र समजत राहिले त्यांना,
प्रतिस्पर्धी.... माझ्या प्रेमातले!
किती ओढाताण झाली असेल ना तुझी?
खरेच तू नसतास तर?
कोणी केली असती एव्हढी काळजी?
माझ्या रडण्याची...रागाची..
स्वतःवरच चिडण्याची?
आणि तू मात्र....
माझ्या चुका... उद्वेग...चिडचिड..हट्टीपणा
सगळं... माझा अल्लडपणा समजून
सामावून घेतलंस! हसत हसत,
माझे जिव्हारी लागणारे शब्दही!
तू नसतास तर?
कोणी समजावलं असतं मी हरल्यावर?
मुसमुसणार्‍या मला, माझ्या रागाला,
रडण्याला, लहान मुलासारखं,
मांडीवर हलकेच थोपटत,
हसवत हसवत, नकळत स्वतःच ओला होत!
तू नसतास तर?
केलं असतं कोणी सहन?
माझं वेड्यासारखं.... मनातल्या न सापडणार्‍या
राजकुमारालाच शोधणं...... तुझ्याच सावलीत,
तुला गृहीत धरून.... वृक्षासारखं!

मात्र आता... आयुष्याच्या संध्याकाळी,
'तू नसतास तर' ... या गदगदणार्‍या विचाराने,
मला सावली देऊन...पोळलेल्या तुझ्या हातांवर
अश्रूंचे शिंपण करीत... दाटून,
एव्हढेच बोलू शकते,
मी... नसते जगू शकले रे!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसवत हसवत, नकळत स्वतःच ओला होत!
मस्तच!

शब्द नाहीत प्रतिसाद द्यायला. अप्रतिम.

उमेश, मस्तच!! भावली!!! Happy

-------------------------------------------------------------
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको

ए, ऐक ना!......... सुरुवातच गोड केलीस उमेश. गूड १
माझा नवरा खरंच असा आहे, मला जपणारा, काळजी घेणारा.
ह्याचंही विडंबन होउ शकतं? कुठे आहे ते?

अतीव सुंदर...

विष्णु.... एक जास्वंद!
*******************************************
माणसांच्या मध्यरात्रि हिंडणारा सूर्य मी... माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा...

विष्णू, सृष्टी, दक्षे, गौरी, अक्श्री, पल्ली, क्रिष्नाजी, जागू, शमा धन्यवाद. माफ करा, उशीरा धन्यवाद देतोय.
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

उमेश तू कविता मनात शोधतोस की कविता तुला शोधत येते.
कसली अप्रतिम कविता लिहीतोस तू.

ही कविता, तसेच ती अर्पणपत्रिका ....
तू नक्कीच मागच्या जन्मी अकबराच्या दरबारातलं एक रत्नं असावं असं वाटायला लागलं आहे मला.

अतिशय तरल.

"माझं वेड्यासारखं.... मनातल्या न सापडणार्‍या
राजकुमारालाच शोधणं...... तुझ्याच सावलीत,
तुला गृहीत धरून.... वृक्षासारखं!"

उमेश प्रत्येकालाच तुमच्या कवितेत आपल्या एका छोट्या विश्वातली कुठली ना कुठली रंगछटा सापडतेय..
यातच तुमच्या कवितेचं सार्थक..!! खुप छान..!! आणखी काय हवं असतं एका कवीला..!!

उमेशजी.... प्रतिसाद उधार राहू द्या, मांडून ठेवा...
कारण या अप्रतिम कवितेला प्रतिसाद देण्यासाठी तितकेच अप्रतिम शब्द पाहिजे.
ते मिळाल्यावर देईन प्रतिसाद....

सध्यातरी एकच शब्द.......... फोडतय.

उमेशजी,
(मोठ्या मनाच्या माणसाने लिहिलेली) मोठ्या मनाची कविता !
Happy

या 'तु' मध्ये मला तर तो (सद्मामधील) कमल कसन ही दिसला ..
Happy

एखाद्या स्त्रीच्या मनातली हळुवार भावना शब्दात मांडणे ही खूप कठीण गोश्ट आहे आणि ती तुम्ही समर्पक शब्दात मांड्ली आहे.कारण असे म्हणतात की स्त्रीचे मन अथांग आहे.असो.कविता खूप आवड्ली.

<<<<मात्र आता... आयुष्याच्या संध्याकाळी,
'तू नसतास तर' ... या गदगदणार्‍या विचाराने,
मला सावली देऊन...पोळलेल्या तुझ्या हातांवर
अश्रूंचे शिंपण करीत... दाटून,
एव्हढेच बोलू शकते,
मी... नसते जगू शकले रे!!>>>

रडवलं या कवितेने Sad

_/\_

Pages