आई---( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 8 May, 2021 - 09:50

आई--( वीक एंड लिखाण )---मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

आज मातृदिवस. खूप दिवसापासून मला माझ्या आईबद्दल लिहायचे होते. आज योग आला.
माझी आई एका छोट्या खेड्यात जन्मलेली. ती शाळेत गेलीच नाही शिक्षणासाठी. घरीच तिला अक्षर ओळख होण्याइतपत शिकवले गेले. हेतू हा की तिला पोथी, अभंग, वेगवेगळ्या व्रतांच्या कहाण्या वाचता याव्यात. त्या वेळी स्त्रीशिक्षणाची हीच मर्यादा होती. हा काळ १००वर्षापूर्वीचा आहे.
तिचे लग्न ती अगदी लहान असताना झाले आणि ती माहेरच्या तुलनेत अंबाजोगाई नावाच्या शहरात आली. प्रपंचाचा गाडा सुरू झाला.
सासरी संयुक्त जंबो कुटुंब. दिवसभर सर्व स्त्रियांना घरकामे करावी लागायची. मी माझ्या आईला दिवसभर राबताना पाहिलय. त्यावेळी कांही कळत नव्हते पण आज कठीण आयुष्याचे संदर्भ कळतात. माझ्या आईला तर जास्तच कामे करावी लागत असत कारण तिची कमकुवत बाजू म्हणजे माझे वडील कांहीच कमवत नव्हते.
आम्ही चार भाऊ आणि तीन बहिणी होतो. संयुक्त परिवारात न कमवत्या बापांची मुले म्हणून नेहमीच आमची हेटाळणी होत असे. सापत्न भाव पण दिसत होता. पण नाविलाज होता. पण आईने आमच्यावर उत्तम संस्कार केले. ती नेहमी म्हणायची की चार पुस्तके वाचाल तर पोटभर खाल. तिने आईच्या मायेत कधीही कमतरता भासू दिली नाही.ती सहनशीलतेची मूर्तीच होती. इतके कमी शिक्षण असून मला आईच्या एका गोष्टीचे नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे. खेडूत आणि गावंढळ पार्श्वभूमी असून सुध्दा त्या जुन्या काळत पण आईने सर्व भावंडाची अधुनिक नावे ठेवली. मी निशिकांत तर धाकटा भाऊ भास्कर, नंतरचे दोन अरूण आणि श्रीकांत. बहिणी ईंदू, ललिता आणि पुष्पा. ज्या जमान्यात पांडुरंग, तुकाराम, सरस्वती, भागीरथी अशी नावे ठेवली जायची त्या काळात आईला किती विरोधाचा/टिकेचा सामना करावा लागला असेल याची कल्पनक्च केलेली बरी.
आई तिच्या शेवटच्या काळात सर्वात लहान भवाकडे होती. वयाची नव्वदी ओलांडल्यावर तबियतीच्या शिकायती सुरू झाल्या.एकेदिवशी भावाचा फोन आला की आई सर्वांना भेटायचे म्हणत आहे. आम्ही सारे विनाविलंब आईकडे भेटायला गेलो. चार दिवस आम्ही चौघे भाऊ आणि चार सुना यांनी आईबरोबर व्यतित केले. एके दिवशी ती आपण होऊनच म्हणाली की बाळांनो तुम्ही सारे नोकरदार आहात. आता माझ्यात जास्त अडकू नका. सर्वांना भेटले आणि संतुष्ट झाले. आता तुम्ही परत जा बाळांनो. आम्ही आपापल्या नोकर्‍यांच्या गावी परतलो. आठच दिवसांनी लहान भावाचा फोन आला की आईला देवाज्ञा झाली. मी एकदमच अनाथ आणि छत्रहीन झालो. आम्ही सारे परत लहान भावाकडे गेलो आणि क्रियाकर्म उरकले. सर्वांनी निर्णय घेतला की चौदावा करूनच जायचे. आमच्या उपाध्यायाने सांगितले होते की तुमच्या आईचे पूर्ण आयुष्य जगून झाले आहे. रडारड आणि शोक कमीतकमी करा आणि रोज आईच्या आठवणी, भजने असे कांही करत जा. रोज दुपारी आम्ही सारे एकत्र एक तास बसायचो. कुणी आईच्या आठवणी सांगत तर कुणी हरीपाठ वाचत. माझी पत्नी गाणे छान गाते. ती भक्तिगीते म्हणत असे. माझा धाकटा भाऊ किर्तन छान करायचा. तो एखाद्या अभंगावर निरूपण करत असे. १४ दिवस हे अव्याहत चालू होते. शेवटी सर्व क्रियाकर्म आटोपून लहान भावाचा निरोप घेवून वापस निघालो. माझा बसचा प्रवास चौदा तासाचा होतो. या प्रवासा दरम्यान सारख्या आईच्या आठवणी येत होत्या. या प्रवासादरम्यान आईवर सुचलेली गझल खाली देतोय. या गझलेच्या अलामतीत चूक आहे हे माझ्या नंतर लक्षात आले. पण भावनावेगात लिहिलेल्या या गझलेत दुरुस्ती करण्यास मन धजावले नाही. क्षमस्व.

माईच ज्योत होती

समईत देवघरच्या आईच वात होती
ओजास पसरणारी माईच ज्योत होती

पाऊल उचलले मी पहिले जगात जेंव्हा
आई जणू खुशीचा साक्षात झोत होती

संगीत पाठ पहिला ऐकून तृप्त झालो
झोपेत गुंगताना ती गीत गात होती

निजता कुशीत रात्री गोष्टीस सांगताना
स्वप्ने मला उद्याची ती दाखवीत होती

स्वतःस विसरली ती बाळास पोसताना
गाठी न पीळ कोठे, रेशीम पोत होती

खडतर प्रपंच सारा, खडबड असून तळवे
पाठीवरी मुलायम फिरवीत हात होती

नाभीत जन्मलेला ब्रह्मा उदास आहे
सांगा घरी तयाच्या आई घरात होती?

वैकुंठ नको मजला दे येरझार जगती
शतजन्म जीवनाचे आईच गीत होती

ना गाईले कधीही भारूड वेदनांचे
अश्रूस लपवणारी ती खास प्रीत होती

वृक्षास आज आहे एकांत वेदनांचा
पचवून दु:ख जगणे रक्तात रीत होती

ज्यांनी तिला बघावे, सारे उडून गेले
जोडून हात जगली ती शांत शांत होती

"निशिकांत" माय तुजला बघते वरून आहे
तूज ठेच अन् तिच्या रे! सिसकी उरात होती

निशिकांत देशपांडे, पुणे
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

_/\_