क्वारंटाईन झालेला 'मी'

Submitted by हर्षद साबळे on 7 May, 2021 - 00:29

क्वारंटाईन झालेला 'मी'
ऑक्सीजन मागायला झाडापाशी गेलो,
झाड बोललं, "आरे जंगलात मेट्रो पळवायचीयं ना तुला?"
जंगल सपाट केलेला
अपराधी 'मी'

क्वारंटाईन झालेला 'मी'
औषध मागायला झाडापाशी गेलो,
झाड बोललं, "फोटो पुरताच वृक्षारोपणाचा आव आणायचायं ना तुला?"
छान सेल्फी काढलेला
अनुत्तरीत 'मी'

क्वारंटाईन झालेला 'मी'
आश्रय मागायला झाडापाशी गेलो,
झाड बोललं, "हाय-फाय माड्या बांधायच्यात ना तुला?"
बकाल वस्त्या केलेला
हतबल 'मी'

शेवटी,
क्वारंटाईन झालेला 'मी'
सरणाला लाकडं मागायला झाडापाशी गेलो,
झाड रागातच बोललं, "अजून बराच अत्याचार करायचायं ना तुला?"
आता मात्र,
कोपरापासून हात जोडलेला 'मी'
माफी मागायची पण लाज वाटलेला 'मी'
जिवंतपणीच मेलेला 'मी'
क्वारंटाईन झालेला 'मी'...

(क्वारंटाईन गड्यांनो निदान काही नाही तर एकतरी झाड लावाच...)

-हर्षद बाळासाहेब साबळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users