कसा तू?

Submitted by @गौरी on 6 May, 2021 - 06:07

दूर कुठे क्षितीजाजवळ भासतो मज तू असा,
गहन गंभीर स्तब्धतेत उभा अश्वत्थ जसा,
कोलाहल सारा सार्‍यांचा दडवून अबोल कसा?
स्थितप्रज्ञ, निर्लेपतेचा घेतलाय तू जणू वसा॥

अंतरीचा आर्त आर्जव, भावनेची चिर दुर्दशा,
आभाळून दैन्य आले, झाकोळून कश्या दशदिशा,
नियतीच ती जेता जिथे, कोण कुणी द्या कुणा दोषा,
आक्रोश- संयमाचे, द्वंद्व नित्य या मनोदेशा॥

अंधारल्या अंगणात ही मिणमिण एक दिवा दिसे,
भास्कराचे तेज पसरे, ऊर्जेत चैतन्य भासे,
रात्रीचा तम सारून हळूच, स्वप्नांची उषा हसे,
अंतरीचा दाह शमता, मनात एक शून्य गवसे॥

©️@गौरी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Chan..