गीत गावयाचे

Submitted by निशिकांत on 4 May, 2021 - 11:29

गीत गावयाचे

रियाज केला, पंख नसोनी
कसे उडायाचे?
दु:ख असूदे मनी, सुखाचे
गीत गावयाचे

रंग भराया मैफिलीत का
गात कुणी असते?
जशी मागणी तसा पुरवठा
सूत्र योग्य नसते
जीवनगाणे तादात्म्याने
आळवावयाचे
दु:ख असूदे मनी, सुखाचे
गीत गावयाचे

उगाळल्याने कधी वेदना
कमी होत नसते
हमी आपुल्या आनंदाची
कुणी देत नसते
शिल्पकार मी माझा आहे
सिद्ध करायाचे
दु:ख असूदे मनी, सुखाचे
गीत गावयाचे

राग कोणता कसा छेडला?
मोजक्यांस कळते
ताल, सूर आर्ततेत भिजता
दाद किती मिळते!
जीवनास खुलविते विरहिणी
गात रहायाचे
दु:ख असूदे मनी, सुखाचे
गीत गावयाचे

कर्फ्यू असतो आसवांस अन्
उसास्यांस सुध्दा
निर्विकार दे तुझा चेहरा
वापरण्या बुध्दा!
व्रत मी धरले, दु:ख आपुले
आत कण्हायाचे
दु:ख असूदे मनी, सुखाचे
गीत गावयाचे

कैक सोबती प्रवासात या
आले अन् गेले
गेलेल्यांनी बहाल केले
विरहाचे प्याले
काच कशाला? जे झाले ते
ठीक म्हणायाचे
दु:ख असूदे मनी, सुखाचे
गीत गावयाचे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३गीत

Group content visibility: 
Public - accessible to all site users