सांजभयीच्या छाया

Submitted by रानभुली on 30 April, 2021 - 02:05
Image Courtsey -  https : // freerangestock  dot com

द रीज

शिमल्यातली चैतन्य ओसंडून वाहणारी जागा. टाऊन हॉलपासून चर्चपर्यंत नजर जाईल तिथे तरूणाई असते. मध्यमवयीन, वयस्कर इथे आले की सगळेच तरूण होतात. प्रचंड ऊर्जा असलेलं ठिकाण आहे.
चर्च आणि लायब्ररीच्या मधून मागे डोंगराकड्याकडे जाणारा रस्ता आहे. तर एक लक्कडबाजाराकडे जातो.
या पहिल्या रत्याने पाठीमागे गेले की तीन रस्ते फुटतात. त्यातला डावीकडचा पुन्हा लक्कडबाजाराला जाणा-या रस्त्याला मिळतो.
दुसरा डोंगरकड्यालगत निघतो. तो समोर एका रेषेत सरळ जातो. तिसरा उजवीकडे डोंगरमाथ्यावर जातो.
झक्कू पॉईण्ट !
सुंदर चढण आहे.

जो समोरचा रस्ता आहे त्या रस्त्याने चालत गेलं की रस्ता अरुंद होत जातो. मग एक पडायला आलेलं लॉज दिसतं. इतक्या सुंदर ठिकाणी आशिर्वाद नावाचं घिसंपिटं नाव असलेलं हे हॉटेल कधी काळी बांधकामासाठी काढलेलं होतं. पण काही कारणाने ते पूर्ण झालेलं नाही. सिमेंटचं बांधकाम आहे. त्याला रंग सुद्धा लावलेला नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधकाम आहे. डावीकडे मोठा खड्डा आहे. त्यातही उतरून बांधकाम केलंय. खालच्या रूममधे जाण्यासाठी पाय-या आहेत. तर उजवीकडे कड्याला लागून, कड्याचा फायदा घेत जुन्या पद्धतीचं चिरेबंदी बांधकाम आहे. जुनी असली आणि रया गेलेली असली तरी ही वास्तु टुमदार आहे.

रस्त्यावर टेबल टाकून हॉटेलचा मॅनेजर आणि त्याच्यासोबत गावातले रिकामटेकडे बसलेले असतात. स्थानिकांमधे रिकामटेकडे तसे कमीच . हे खूप वर्षांपासून हॉटेलच्या स्टाफमधे आहेत. नवीन येणा-याला रस्ता इथेच संपतो असे वाटते. पण स्थानिकांना माहीत आहे. मॅनेजरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहून नजरेने मागे इशारा केला तरी मग एखादी खुर्ची हलते.

मागचा रस्ता खुला होता.
इथे थोडी छोटी घरं आहेत. पण आहेत सुंदर.
दार्जिलिंगपासून खाली उतरताना रेल्वेलाईनच्या बाजूने निळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा एका रंगात रंगवलेली घरं दिसतात. तशीच घरं इथेही आहेत. कडा संपल्याने दोन्ही बाजूला खाली दरी दिसते. उजव्या बाजूची दरी ही खालच्या डोंगराचा माथा आहे. फारशी खोल नाही. धोकादायक तर मुळीच नाही.

फुलांच्या बागा आहेत. रानफुलांची उधळण आहे.
एक सफरचंदाची बाग आहे. इथपर्यंत फारसे पर्यटक येत नाहीत. ही घरंही भाड्याने दिलेली असतात.
मागे एक दुमजली बंगली आहे.

गेल्या महिन्यापासून मी इथे राहतेय.
शिमल्याला तशी अनेकदा येऊन जाऊन असते. पण अशी सोय पहिल्यांदाच झाली आहे.
या वेळी कामानिमित्त आलेय.

काम पण माझ्या आवडीचं आहे.
आणि अजून एक गोष्ट आहे. जी माझ्या आयुष्याला अर्थ देणार आहे.

इथे तो आहे.
त्याचा शोधही घ्यायचाय.
रस्ते कुठून कसे मिळतात काही सांगता येत नाही.
कुठे पुणे, कुठे कोलकाता , कुठे दुर्गापूर आणि कुठे शिमला.
गाठी अशा पडत असतात.

सांगते सगळं.
जरा फिरून येते. दम खाते आणि पहिल्यापासून सगळं सांगते.
महिन्याभरापासून सकाळच्या धुक्यात आणि थंडीत झक्कूपॉईण्टपर्यंत चालत जाते. आख्खी चढण चढून जाते.
इथे रात्री बेरात्री सुद्धा मुली निर्धास्त फिरू शकतात. उत्तर भारतात पहाडी इलाके मुलींच्या बाबतीत सुरक्षित आहेत खूप.
दार्जिलिंग असेल, औली - बद्रीनाथ असेल.
खूप छान लोक आहेत.

झक्कूपॉइण्टचा रस्ता किती देखणा आहे.
दाट झाडी, थंड आणि ताजी हवा. जंगलच आहे.
या रस्त्याला ब्रिटीशकालीन मोठ मोठ्या बंगल्या आहेत.

एक मोठ्ठं वळण गेलं की या रस्त्याला एक छोटा रस्ता येऊन मिळतो.
तिथे एक देखणा बंगला आहे.
लाकडी आणि काचेचा.

मोठं देखणं फाटक, त्यातून आत जाणारा रस्ता. फुललेली आणि राखलेली बाग.
एक झुला, पोर्च आणि तो बंगला.
निसर्गाचं देखणेपण जपत उभा असलेला हा बंगला येणा-या जाणा-यांचं लक्ष वेधून घेतो.
कुणा कर्नल स्कॉटने बांधला होता. त्याच्याकडून झल्ली नावाच्या पंजाब्याने घेतला होता.
आणि आता मुखर्जींनी घेतलाय.

मुखर्जी दुर्गापूरला मामाच्या घरासमोरच राहतात. दोघेही प्रचंड श्रीमंत आहेत.
दोन्ही घरांचा घरोबा आहे.
मुखर्जींचे घर पिढ्यानपिढ्या संस्कृत विद्वानांचे घर म्हणून प्रसिद्ध आहे. मामाला जमीनदार म्हणून मान आहे. या दोघांकडेही सत्ता आहे.
कुणाला लागलं खुपलं तर दुस-याला वेदना व्हाव्यात असं नातं आहे या दोन्ही घरांमधे.

मुखर्जींच्या एका बहीणीने म्हणजे अनामिकाने धाकट्या मामाशी, सुब्रतोशी प्रेमविवाह केला तेव्हां थोडेसे संबंध बिघडले होते. पण ते लगेच सुरळीत झाले. दोन्हीकडच्यांनी सामंजस्य दाखवले होते त्या वेळी.
पुढे मुखर्जींचे लग्न झाले. बहीणीचे येणे जाणे पुन्हा सुरू झाले.
त्यांना मुलगी झाली...

आणि मग चमत्कारीक घटनांची मालिका सुरू झाली.
अनामिका मामीने सगळं कसं व्यवस्थित सांगितलं होतं..

क्रमशः
पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी ही विनंती).

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुंदर वर्णन केलंय गं कथेत.. डोळ्यांसमोर उभं केलंस शिमला...
दार्जिलिंग पाहिलयं पण शिमला नाही पाहीलं अजून..

पुढचा भाग वाचते नंतर..