एक कविता आईसाठी..

Submitted by माउ on 27 April, 2021 - 15:06

पहाटवेळी हळूच उठते केस बांधुनी हात जोडते
नि-या सारख्या पदर सारखा करून घराला साद घालते

तिची पाऊले पडता येतो सूर्य मागुनी उजळत सारे
तिच्या भोवती नाच नाचती किरण गोजिरे गुणगुणणारे

पाणी भरते देव पूजिते आवरते मन आवरते घर
गरम चहाच्या वाफेमधुनी तिचा बिलगतो प्रसन्न वावर

साडी निळसर केस बांधते दार थांबवून निरोप घेते
शिकवून येते कुण्या मुलांना आयुष्याची अवघड गणिते

दमून येते, मिठीत घेते चिल्यापिल्यांना खाऊ देते
तिची उशाशी पाठ टेकता दिवस संपतो रात संपते

हसताना ती दिसते सुंदर चिडतानाही दिसते सुंदर
आई असते श्वासांमधले थिजले भिजले हळवे अंतर!

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

छान!