कोविड डायरीज! - १५ एप्रिल २०२१

Submitted by अज्ञातवासी on 26 April, 2021 - 14:54

डिस्क्लेमर -
कोविडविषयी कुणाला काही खूप निगेटिव्ह वाचायचं नसेल, तर पुढचा लेख वाचू नये

१४ एप्रिल २०२१

https://www.maayboli.com/node/78666

कालच्या डायरीतल्या काही राहिलेल्या बाबी...
१. आंबेडकर जयंतीचा बऱ्याच ठिकाणी नुसता धिंगाणा चालू होता. नाशिकची अवस्था काय आहे, हे कुणालाही कळत नसल्याची परिस्थिती होती.
२. जीवनावश्यक गोष्टींची दुकाने चालू राहतील, असं जाहीर करूनही, दुकानांमध्ये खरेदीची झुंबड उडाली होती.
'नाशिक शमशान बना हुवा है!' शेखचे शब्द मला आठवले.
आणि या शमशानात प्रेत बनण्यासाठी लोकांची चढाओढ चालू होती...
बॅक टू वर्तमानकाळ.
गाडीतून सगळं सामान बाहेर काढलं. रडारड चालूच होती.
"आजोबांना कळवलं?" मी काकांना विचारलं.
"नाही, तसेही ते भानावर नाहीत."
"कळवूही नका. त्यांना समजणार नाही, आणि समजलं तरी दुःख पचवता येणार नाही."
इतकी शांतता कुठून आली होती माझ्यात?
मी संवेदनाहीन झालो होतो की निगरगट्ट.
बऱ्याच वस्तू घरातून नव्याने घेतल्या.
रात्री ११ वाजता परतीचा प्रवास सुरु झाला...
'दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढतच चाललाय...
आज महाराष्ट्रात इतक्या जणांचा मृत्यू...
एकाच वेळी इतक्या प्रेतांना अग्निडाग...'
'पोम्म्मम्म्म!!'
समोरच्या गाडीच्या कर्कश हॉर्नने मी भानावर आलो.
बाबा माझ्या बाजूला... मागे दोन्ही काका...
कुणीही जागं नाही, मी भानावर नाही...
कस शक्य आहे?
काळझोप??
मी गाडी बाजूला थांबवली... सरळ बाटली बाहेर काढली.
तोंडावर दणदणीत पाण्याचे फटकेच मारले.
शिक्षा म्हणून...
आणि गाडी पुन्हा गाडीत बसून गाडी चालू केली.

१५ एप्रिल २०२१
रात्री साडेबारा वाजता अपोलो हॉस्पिटलसमोर गाडी उभी केली.
काही रडारड वगैरे असेल, अशी मनाची तयारी होती.
काहीही नाही. फक्त सुन्न चेहरे.
मनाची तयारी केलेले.
"फक्त दोन लोक आत जा."
बाबा आणि काका... आत गेले.
दुसरे काका आणि मी, उरलेले कागदपत्र पूर्ण करायला लागलो.
वट्ट साडेआठ लाख बिलाची रक्कम...
मी गाडीत जाऊन बसलो, आणि मान मागे टेकली.
काका आठवले. काही अश्रू ओघळले.
आयुष्य पुरेपूर जगले काका.
"आजच वाटे लावावं लागेल." काका गाडीवर टकटक करत म्हणाले.
"रात्री?"
"रात्र पहाट काही नाही. वेळच तशी आलीये."
"घरी कसं समजवायचं? मंडळी गोळा झाली असेल. दादाला कसं आणायचं?"
काकाही गोंधळले.
आज काकांच निधन झालं.
त्यांच्या घरात गेल्या ५ दिवसांपासून त्यांचा मुलगा, सून आणि बायको कोरोना पेशन्ट आहेत...
फोनाफोनी झाली. बऱ्याच भवती न भवतीनंतर बाबा, काका आणि मी स्मशानभूमीत जाईन असं ठरलं.
गाडी स्मशानासमोर लावली. तुफान गर्दी!!!
दहा बारा प्रेते सोशल डिस्टन्स पाळून जळत होती...
आणखी काही वेटिंग वर...
आम्हीही वेटिंग वर होतो...
कसं लिहू हे?
स्मशानात आम्ही वेटिंग वर होतो?
आमचं प्रेत वेटिंग वर होतं?
आमची बॉडी वेटिंग वर होती?
झाली...
एकदाची वेटिंग संपली. कुणीतरी राख सावडून निघून गेलं.
तिथे आमचा नंबर लागला...
काय होतं ते? त्या गाठोड्डयात माझे काका होते की कोण?
कुणाला कळणार?
मध्यरात्रीच्या वेळी मी त्या गाठोड्याला अग्निडाग दिला.
...आणि फ्लॅटवर निघालो.
गेल्या गेल्या खसखसून अंघोळ केली.
एकही विषाणू राहायला नको...
आणि अंथरुणावर पडलो.
कुणीही रडत नव्हतं... सगळे थकलेले.
एक सुटकेची भावना.
...मात्र तरीही झोप येत नव्हती.
सकाळी उठलो. झोपेतून नाही. पण उठलो...
राख सावडायला हवी..
काका आणि मी निघालो..
धगधगत्या चिता अजूनही होत्या...
आणि काही वेटिंगवर...
आम्ही राख सावडून परतलो...
कुणालातरी नक्की हायस वाटलं असेल...
पुन्हा अंघोळ, पुन्हा झोप...
लाल फडक्यात बांधलेल्या अस्थी...
मरण स्वस्त होत आहे... आणि माणसाची संवेदनशीलताही...
इतक्या चिता जळताना दिसल्या, काहीही वाटलं नाही.
इतके मृत्यू दिसले, काहीही वाटलं नाही.
माझ्या मना बन दगड...
जाऊ दे.
विचारांच्या तंद्रीत झोप केव्हा लागली, कळलं नाही.
फ्लॅटवर बाल्कनीतल्या एका कुंडीत त्या अस्थ्या घालून ठेवल्या.
काकांनी आयुष्यात खूप पैसा कमावला. खूप. पाण्यासारखा. खूप मोठा बंगला बांधला...
नाही जाता आलं परत...
ज्या गावात इतका मान कमावला... त्या गावात नाही जाता आलं परत...
अस्थी सुद्धा नेऊ शकलो नाही...
पहिल्यांदा मनातून हललो, खूप हललो...
आणि पहिल्यांदा इतकं रडू कोसळलं...
सकाळी बारा वाजता थोडंस जेवण करून, परतीचा प्रवास सुरू झाला.
दोन वाजता सगळ्या काकांना त्यांच्या घरी ड्रॉप करून मी आणि बाबा घरी पोहोचलो.
पुन्हा अंघोळ... रितीप्रमाणे.
चार वाजता काकांच्या बंगल्यावर.
काकूंचा रडवेला चेहरा...
शेवटी बघता सुद्धा आलं नाही.
सहा फुटावरून त्यांच्याशी बोलत होतो.
दादा आणि वहिनीशी तसच.
येणारे सुरू झाले होते. बाहेरच काका आणि बाबा येणाऱ्या जाणाऱ्यांशी बोलत होते.
बराच वेळ तिथेच होतो...
सहा सात फूट अंतरावर...
रात्री साडेआठ ला जेवण.
मग मोबाईल चेक...
केव्हा झोप लागली कळलं नाही...
...आजच्या गेलेल्यांचे श्रद्धांजलीचे मेसेज टायपायचे राहूनच गेले...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळजी घ्या.
हे सर्व भीतीदायक आहे.प्रत्यक्ष या अनुभवातून जाणाऱ्यानाच माहीत.

मागचा ही भाग वाचला.
काळजी घ्या.
हे सर्व भीतीदायक आहे.प्रत्यक्ष या अनुभवातून जाणाऱ्यानाच माहीत.+ 1
खरं तर हे क्रमशः नको होतं. इथेच थांबायला हवं होतं. इतरवेळी गोष्टी , कथा , अनुभव क्रमशः असलं की वाचक ही प्रतीक्षेत असतो पुढच्या भागाच्या. पण इथं सुन्न होतय क्रमशः वाचून Sad Sad :

सर्वांचे धन्यवाद!

डायरीत किती पाने असतील माहिती नाही, पण प्रत्येक पानात धगधगते अनुभव आहेत...

१. कोविड carriers -

मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोविड आला.
या वर्षी आता पीकला आहे.
एक सर्वसामान्य समजूत, की एकदा कोरोना झालेल्याला कोरोना होत नाही.
म्हणजे पुन्हा विषाणू शरीरात शिरले तरी त्रास होत नाही.
बरोबर?
पण मग याना लोकांना विषाणूंचा प्रसाद वाटायचा हक्क दिलाय का????
'मला कोरोना होऊन गेलाय भो, आता आपल्याला काही नाही.' तोंडावर मास्क नको, काही नको.
अमरत्व प्राप्त झाल्यासारखी वागणूक.
...आणि सचिन जोशी....
Dear Sir,

Please allow me to work from home. I was COVID positive in month of September 2021 and fully recovered now, but don't want to be carrier, of anything happens....

सचिनसारखा कामात सिंसीयर माणूस मी बघितलेला नाही..
आणि आता लाईफ मध्ये सुद्धा!!!

@ Adnyatwasi
Back to back donhi part wachale.
Bhayanak aahe, ya anubhavatun konalach java lagu naye.
Mala vatata pratyekachi ek Covid diary asel, titkyach bhayavah anubhavanchi. Kahitari hiravnari, kahitari shikavnari.
Sagalikade negative vibes asatana he anubhav ajunach negativity vadhavat nahi ka?
(Maza personal mat)
Pan lihinyachi tumchi Bhasha khup prabhavi aahe.

काळजी घ्या.
बऱ्याच लोकांना अजून याची जाणीव नाहीये हे आपलं दुर्दैव आहे. +११११११

दाहक अनुभव. रोज टीव्हीवर सतत या बातम्या असतील तरीही लोकांना समजत नसेल तर अवघड आहे. जे काळजीपुर्वक वागताहेत त्यांना किती धोका आहे याचा. Sad

हे सगळं फार भयानक आहे आणि हाताबाहेरचं पण व्हायला लागलंय. पण एक सुचवू का अज्ञातवासी राग मानणार नसाल तर, सध्या हे असं डिस्टर्बींग खरंच लिहीण्याची गरज आहे का? आय नो तुम्ही वर तसा सल्ला दिलाय पण प्रत्येक जण ते डिस्क्लेमर बघेलच आणि खालचे वाचणार नाही याची खात्री नाही ना. माबो एक स्ट्रेसबस्टर असावी सध्याच्या परिस्थितीत एवढीच इच्छा होती म्हणून म्हणले. बाकी तुमची इच्छा. हेमावैम.

सर्वांचे धन्यवाद आणि आभार!

अजून खूप काही लिहावंसं वाटत होतं, पण आता मन शांत झालंय.
आजोबा गेले. कोरोनाने नाही, तर वृद्धापकाळाने... त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही, पोटचा पोरगा गेलाय अस...
फॅमिलीने टेस्ट केलीये, उद्या रिपोर्ट्स येतील. लक्षणे काही नाहीत, पण या काही दिवसात अनेक कोरोना बधितांच्या संपर्कात आलोय म्हणून.
गावात प्रत्येक घरात एक पोजिटिव्ह आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे आता बनियन बरमुडा आणि विनामास्क फिरताय. संख्या वाढतेय फिरणाऱ्यांची, आणि पॉजिटिव्ह लोकांची.
माझा बॉस, ज्याचा पहिल्या भागात उल्लेख आला, तोही आता पॉजिटिव्ह आहे. कॉर्पोरेट ऑफिसमधला आता मी एकमेव निगेटिव्ह उरलो...
१५ एप्रिल ते आजचा दिवस. जवळच्या २३ लोकांच्या मृत्यू झालाय. त्यापैकी १२ जण ३० च्या आतले ४ जण ४० च्या आतले होते...
पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानानुसार काही हौशी कार्यकर्ते लोकडावूनचं पालन होतंय की नाही, ते बघण्यासाठी घोळक्याने मेनरोडवर उतरले होते. त्यापैकी आता ४ पोजिटीव्, १ ऑक्सिजनवर आणि एक ऑक्सिजन बेडच्या शोधात आहे...

आता स्वतःसाठी केलेली नियमावली, काही नियम कठोर वाटू शकतील. पण असो.

१. घराबाहेर पडायचं नाही. पडलो तरी घरी आल्यावर अंघोळ केल्याशिवाय कुठेही हात लावायचा नाही.
२. घराच्या वरांड्यात बसायचं नाही.
३. कुणीही कितीही जवळचा भेटायचं म्हटला, तरी नम्र नकार द्यायचा.
४. कुणीही सिनियर सिटीजन ज्ञान देत असला, की आम्ही किती उत्साही वगैरे, तर तिथेच त्याला 'तुमचं जगून झालंय, आम्हाला जगू द्या' ऐकवायचं.
५.कितीही घरात बोर होत असेल तरी बाहेर पडायचं नाही.
६. बातम्या बघायच्या नाहीत. कारण बातम्यांवाले कोरोनविषयी किती जागरूक आहेत, हे काल कळलं. टीआरपीच्या खेळात, एका क्षणात कोरोनाच्या बातम्या नाहीश्या होऊन निवडणूका चालू होत्या. त्यात आपले मराठी चॅनेलही आघाडीवर होते.
७. कुठलेही स्टेटस बघायचे नाही, किंवा ठेवायचे नाही.
८. कुणालाही जास्त पोजिटीवीटीचे डोस पाजायचे नाहीत. नॉर्मल राहायचं...

अशीच नियमावली गेले वर्षभर पाळत आहे.
फोनवर लोकांच्या, नातेवाईकांच्या संपर्कात आहे.
हि वेळही निघून जाणार आहे तोपर्यंत स्वत:ला जपण्यातच शहाणपण आहे.

अज्ञात, तुमच्या कुटुंबावर काही दिवसातच दोन आघात झाले..
सांत्वना कशी करावी? लवकर यातून बाहेर पडायची शक्ती देवो..
नियमावली अगदीच मुद्देसूद.
हे सगळंच पाळूनही माझं माहेर याच्या तावडीत होतं...
कारण शेजारच्या फ्लॅट मधे पाॅसिटीव्ह होते आणि सांगितलं नाही...
फक्त रोगाशी नाही तर माणुसकी विसरलेल्यांशी आणि यंत्रणेशी लढताना
जास्त दमणूक होते...

१५ एप्रिल ते आजचा दिवस. जवळच्या २३ लोकांच्या मृत्यू झालाय>>
काळ फार कठीण आहे! तुम्ही तर केवढे आघात सोसलेत. अशावेळे शब्द तोकडे. काळजी घ्या.

@ गौरि>>>हे सगळंच पाळूनही माझं माहेर याच्या तावडीत होतं...
कारण शेजारच्या फ्लॅट मधे पाॅसिटीव्ह होते आणि सांगितलं नाही>>>>> माझेहि अगादि सेम.
त्यानच्या कडे ये-जा चालु होति पण सोसायति मध्ये सांगितलं नाही.
मि माझ मुलगा पाॅसिटीव्ह निघालो. आम्हि कोरेनटाइन झालो आणि २ दिवसात ते गेले/ वारले
नशिब आम्हाला काहि त्रास झाला नाहि.