मैफिल

Submitted by सांज on 21 April, 2021 - 12:11

डोळे बंद करून, एकाग्र होऊन त्याने गिटारच्या तारा छेडल्या. आणि नंतर जवळपास अर्धा तास तो ती अवीट गोडीची सिम्फनी तल्लीन होऊन झंकारत राहिला. त्याच्या अगदी आधी बासरीवर मालकंस आळवला होता त्याने. हे असं जीवघेणं काहीतरी तो करायचा आणि मग अनघा भान हरपून त्याच्याकडे पाहत राहायची नुसती. सैलसर बांधलेले कुरळे केस तिच्या गोर्‍या गालांवर रेंगाळत असताना, लागलेल्या तंद्रीतून बाहेर येत डोळे उघडून जेव्हा त्याने तिच्याकडे पाहिलं तेव्हा, एक अतिशय मधाळ, तृप्त हसू तिच्या चेहर्‍यावर उमटलेलं त्याला दिसलं. तिच्या त्या पाणीदार बोलक्या डोळ्यांत त्याला त्याच्यासाठीची दाद अशी ओसंडून वाहताना दिसली की मग तोही शांत शांत होत जायचा..

अनघाने मग तिची डायरी उघडली. त्याने त्याची गिटार बाजूला ठेवली आणि तिच्या कवितेची वाट पाहत पुन्हा त्या कुरळया बटांकडे पाहू लागला. ती कविता वाचायला लागली की तिच्या गोड आवाजाचा स्पर्श झाल्यासारख्या त्या बटा हलकेच थरथरायच्या. त्यांचा तो लडिवाळ खेळ पाहण्यात तो हरवून जायचा. डायरीचं हवं ते पान उघडल्यावर एकवार त्याच्याकडे पाहून तिने तिची कविता वाचायला सुरुवात केली,

रे कान्हा..

असा काय रे तू?

फुलवून जातोस मनात ऋतू

राधा मग रुसते, झुरते..

सावरते पैंजण हळू-हळू

वृंदावनात मिटतात मग वेली

अन निळाईत भिजते रात्र ओली

तुझी बासरी घुमतच असते

मंद सुरेल वेळी अवेळी

कोणास ठाऊक कसा कुठून

प्रेम पाठवतोस तिच्या गोड सुरांतून

यमुनेकाठी मग पुन्हा चंद्र उगवतो

तुझ्या पाऊली चांदणं पसरतो

राधेचा पदर पुन्हा थरथरतो

पैंजण तिचं पुन्हा सैल होतं

अंगावरून अन तुझं मोरपीस फिरतं

वेणु विसावते, चंद्र खुळावतो

यमुना जळी तुझा रंग मिसळतो

मिटलेल्या वेली मग पुन्हा मोहरतात

पुन्हा गंधाळते रात्र ओली

दु:ख शमतं

काळ थांबतो

विरुन जातात पण-परंतू

तुझ्यात ती आणि तिच्यात तू

मिसळतात रंग आणि शमतात ऋतू..

रे कान्हा..

असा काय रे तू..

कविता संपते. ती त्याच्याकडे पाहते. तो तिच्याचकडे पाहत असतो, भारावून जाऊन. नेहमीप्रमाणे हरवलेला असतो तिच्यात, तिच्या कवितेत. ओतप्रोत प्रेम वाहत असतं त्याच्याही डोळ्यांतून. तिला तिची दाद मिळालेली असते..

आणि मग त्याच्या सूरांचं आणि तिच्या शब्दांचं एक होणं अंगणातल्या रातराणीच्या सुगंधातून दरवळत राहतं रात्रभर.. मैफिल संपल्यावर तिचे सूर बराच वेळ मनात रेंगाळत राहतात तसं..

- सांज
https://www.chaafa.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमी प्रश्न पडतो, गोष्टीत सामान्य माणसे का नसतात आमच्या सारखी,
सगळी भारीच, श्रीमंत, सुखवस्तू, सुंदर टॅलेंटेड असतात Happy

@बन्या इथे त्या दोघांच्या सांपत्तिक स्थितीचा कुठे उल्लेख आहेसं मला वाटत नाही.
आणि मुळात असं काही ठरवून मी लिहत नाही. माझ्या सामान्य मन-बुद्धीला जे जसं स्फुरेल ते तसं लिहते. त्यात कमतरता असण्याची शक्यताही मी नाकारत नाही.
आणि हो, माझं सगळं लिखाण तुम्ही वाचलं असण्याची शक्यता आणि अपेक्षा दोन्ही नाही. ते वाचल्यावर कदाचित तुमचं मत वेगळं असू शकेल.

प्रतिसादा बद्दल आभार!

तुझी वेणू घुमतच असते

वेणू विसावते

वेणू 'तुझा' 'विसावतो' असं हवं ना.

तो वेणू ती बासरी

'सांगा बायांनो कुठे वेणु वाजला, नादाने जीव माझा घाबरला' असे एक गाणेही आठवले.