रंग प्रार्थनेचे

Submitted by Gandhkuti on 20 April, 2021 - 04:23

रंग प्रार्थनेचे

सोनसळी बहावा फुले
जणू लक्ष लामणदिवे
नाम तुझे गोड देवा
सदा मनी मी ध्यावे

कृष्ण सावळी तुळस
डोले माझ्या अंगणात
रूप तुझे देखणे देवा
झुले माझ्या रे मनात

शुभ्र पांढरा तगर
मंदिराच्या दारात
सदा वसतोस देवा
तू माझ्या रे अंतरात

लाल पळस पांगारा
रूप तुझेच रे उदारा
तुझ्या नामस्मरणे
उजळे मनाचा गाभारा

केशराचे सडे
पारिजात घालतो
शिंपतो अत्तर केवडा
वाट तुझीच पाहतो

आकाशाची निळाई
रूप पाहते तळ्यात
तुझे गीत गाण्यासाठी
उतरे नादब्रह्म गळ्यात

तुझ्या कृपेचे इंद्रधनू
सप्तरंगात सजले
तुझ्यावर विसंबून
मी जागेपणी निजले

नीज तूच, तूच जाग
रंग तू, तूच गंध
शब्द तूच, तूच आर्त
नाद तू, तूच छंद

विश्वरूपी तू सर्वत्र
फुलात, पानात, दिपात
पूजा कशी करू तुझी मी
तू तर माझ्याही रूपात...

गंधकुटी

Group content visibility: 
Use group defaults

Thanks