चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान!

Submitted by मार्गी on 18 April, 2021 - 09:14
chandra mangal pidhan

सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. काल १७ एप्रिलला संध्याकाळी आकाशामध्ये चंद्राने केलेलं मंगळाचं सुंदर पिधान बघता आलं. काही काळ मंगळ चंद्राच्या पलीकडे लपला होता आणि नंतर समोर आला. म्हणजेच हे चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान- अर्थात एक प्रकारचं ग्रहण होतं.

सूर्यास्ताच्या आधीच मंगळ चंद्राच्या पलीकडे गेलेला होता. ठीक ७:२१ ला चंद्राच्या बिंबापलीकडून मंगळ परत समोर आला. माझ्या टेलिस्कोपमधून ह्याचे फोटोज व व्हिडिओज घेता आले. नुसत्या डोळ्यांनीही हे दृश्य बघता आलं. पण चंद्र मंगळाहून फार जास्त तेजस्वी असल्यामुळे नुसत्या डोळ्यांनी तो दिसण्यासाठी आणखी जास्त वेळ लागला व चंद्रापासून थोडा दूर आल्यानंतरच मंगळ दिसला. मंगळ बाहेर येताना टेलिस्कोपमधून घेतलेला व्हिडिओ इथे बघता येईल.

काल पंचमीची कोर होती आणि चंद्र व मंगळ वृषभ राशीमध्ये व अग्नी ता-यापासून दक्षिणेला साधारण साडेपाच अंश म्हणजे आपण बघताना हात पूर्ण लांब केल्यास हाताची तीन बोटे मावतील इतक्या अंतरावर होते. ह्यावेळी मृग नक्षत्र, ब्रह्महृदय तारकासमूह, रोहिणी नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र, व्याध, पुनर्वसू नक्षत्र, प्रश्वा, सप्तर्षी आदि ठळक तारे व तारकासमूह सहजपणे बघता आले. चंद्र आपल्यापासून सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे आणि मंगळ ह्यावेळी सुमारे २९ कोटी किलोमीटर अंतरावर आहे. तरीही ह्या दोघांसह पृथ्वीचे एका रेषेमध्ये येणे आपण नुसत्या डोळ्यांनी बघू शकतो. आपले छोटेसे डोळेही अतिशय दूर अंतरावरची अशी अद्भुत दृश्यं बघू शकतात.

अशा अनेक खगोलीय दृश्यांना बघण्यासाठी आपले डोळे "उघडे" मात्र असावे लागतात. आपण जवळ जवळ नेहमी आपल्या समस्या व अहंकारामध्ये अडकलेलो असतो. पण जेव्हा आपण आकाशातले असे सुंदर नजारे व इतक्या विराट अंतरावरचे दृश्य किंवा आपल्याहून लाख- कोटी पट मोठे तारे किंवा आपल्या सूर्यापासून हजारो प्रकाशवर्ष दूर अंतरावरचे तारे बघतो तेव्हा आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव होते! आपली पृथ्वीच इतकी नगण्य आहे की आपली तर गणतीच होऊ शकत नाही! आणि त्या संदर्भात मग आपला अहंकार किती व्यर्थ आणि आपल्या समस्यांचं स्थान किती नगण्य ही जाणीव होते. आणि त्याबरोबर हेही जाणावतं की, आपले इतके चिमुकले डोळेही ह्या विराट रंगमंचावरची अशी दृश्य बघू शकतात. हजारो प्रकाश वर्ष लांब अंतरावरचे तारे व आकाशगंगा आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी बघता येणं हा मोठाच चमत्कार नाही का?


.

कालच्या घटनेसंदर्भात अजून एक गोष्ट महत्त्वाची ही की, ती बघण्यासाठी ज्या प्रकारे चंद्र- मंगळ एका रेषेत येणं आवश्यक होतं, अगदी तसंच बघणारा दर्शकही आवश्यक होता. अशा घटनेच्या निरीक्षणामध्ये बघणारा दृष्टा महत्त्वाचा असतो. जेव्हा सजग बघणारा आणि दृश्य ह्यांची सांगड असेल तेव्हाच ही घटना बघता येऊ‌ शकते. आणि जिथे आपण सजग होऊन बघत नाही, तिथे आपण छोट्या गोष्टीही बघू शकत नाही. आणि त्याच अनुषंगाने कोणतीही गोष्ट बघणे किंवा न बघणे हे आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा कोणी फूटबॉल खेळत असतो, तेव्हा त्याच्या पायांना रक्त आलं तरी वेदना जाणवत नाही, कारण पायांकडे लक्ष म्हणजे ध्यान दिलंच जात नसतं आणि ध्यान तर खेळण्यामध्ये असतं. जेव्हा तो खेळाडू‌ घरी जाईल व पायांकडे त्याचं लक्ष जाईल, तेव्हाच त्याला वेदनेची जाणीव होईल. म्हणून जर आपण योग्य प्रकारे सजग होऊन बघू शकलो, तर अवांछित गोष्टींवरचं आपलं लक्ष आपण काढून घेऊ शकतो. आणि जेव्हा आपण बघणं बंद करतो, तेव्हा ते दृश्य आपल्यासाठी उरत नाही. जर आपण दु:ख, त्रास, अडचणी ह्यावरून आपलं ध्यान काढलं तर अशाही दृश्यांपासून आपण मुक्त होऊ शकतो.

-निरंजन वेलणकर (niranjanwelankar@gmail.com, ०९४२२१०८३७६). २१ डिसेंबर २०२० रोजीच्या गुरू- शनी युतीचे फोटोज, व्हिडिओ व त्यासंदर्भातला अनुभव इथे वाचता येईल: http://niranjan-vichar.blogspot.com/2020/12/blog-post.html

Group content visibility: 
Use group defaults

कालच्या घटनेसंदर्भात अजून एक गोष्ट महत्त्वाची ही की, ती बघण्यासाठी ज्या प्रकारे चंद्र- मंगळ एका रेषेत येणं आवश्यक होतं, अगदी तसंच बघणारा दर्शकही आवश्यक होता. अशा घटनेच्या निरीक्षणामध्ये बघणारा दृष्टा महत्त्वाचा असतो. जेव्हा सजग बघणारा आणि दृश्य ह्यांची सांगड असेल तेव्हाच ही घटना बघता येऊ‌ शकते. आणि जिथे आपण सजग होऊन बघत नाही, तिथे आपण छोट्या गोष्टीही बघू शकत नाही. आणि त्याच अनुषंगाने कोणतीही गोष्ट बघणे किंवा न बघणे हे आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा कोणी फूटबॉल खेळत असतो, तेव्हा त्याच्या पायांना रक्त आलं तरी वेदना जाणवत नाही, कारण पायांकडे लक्ष म्हणजे ध्यान दिलंच जात नसतं आणि ध्यान तर खेळण्यामध्ये असतं. जेव्हा तो खेळाडू‌ घरी जाईल व पायांकडे त्याचं लक्ष जाईल, तेव्हाच त्याला वेदनेची जाणीव होईल. म्हणून जर आपण योग्य प्रकारे सजग होऊन बघू शकलो, तर अवांछित गोष्टींवरचं आपलं लक्ष आपण काढून घेऊ शकतो. आणि जेव्हा आपण बघणं बंद करतो, तेव्हा ते दृश्य आपल्यासाठी उरत नाही. जर आपण दु:ख, त्रास, अडचणी ह्यावरून आपलं ध्यान काढलं तर अशाही दृश्यांपासून आपण मुक्त होऊ शकतो. >>
क्या बात!
हे खास माझ्यासाठी लिहिलय! सध्या काही फालतू गोष्टींवरून इतका मानसिक त्रास होत आहे की हे ऐकायची गरज होती!
नवरा हेच वेगळ्या भाषेत सांगत होतं, पण आत्ता वाटतय तुमचं सांगणं पटतय!

खूप खूप धन्यवाद!

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद! Happy धन्यवाद नानबा जी, आनंद वाटला. Happy