अध्यात्माची भूमिती

Submitted by अनन्त्_यात्री on 14 April, 2021 - 09:41

अनादिच्या अलिकडचा
"अ" हा नि:संग असा एक बिंदू घेतला.
मग
अनंताला स्पर्श करू धजणारा,
ज्ञानगम्य असा,
"ज्ञ" हा दुसरा बिंदू घेतला.

"अ" ला "ज्ञ"शी जोडणारी
"अज्ञ" ही रेषा आखली.

ह्या रेषेवर
माझ्याच जवळपास
कायम घोटाळणारा
"हम्" हा बिंदू निवडला.

"अज्ञ" या रेषेशी
लंबरूप,
फटकून असणारे,
"सोs" हे प्रतल
असे निवडले
की ते "अज्ञ" रेषेला
"हम्" बिंदूत छेदेल.

"सोs" प्रतलावरील
१,२,३,.... ∞ या बिंदूंपासून
"हम्" बिंदूकडे जाणार्‍या रेषाखंडांना
अनुक्रमे
"सोsहम् १",
"सोsहम्२"
"सोsहम् ३".......
....."सोsहम् ∞"
अशी नावे दिली.

मग या लंबरेषाखंडांची नावे
(१,२,३,....∞ हे प्रत्यय वगळून)
अविरत उच्चारत राहिलो.

अध्यात्माची भूमिती
(की भूमितीचे अध्यात्म?)
मग
रोमारोमात भिनत असताना
अचानक लक्षात आलं-

"अज्ञ" रेषेवरच्या
"अहम्" या रेषाखंडाची लांबी
हळूहळू
शून्यवत् होतेय.

Group content visibility: 
Use group defaults

<<अ हा नि:संग असा बिंदू असेल तर मग त्यास अज्ञ ह्या रेषेचा संग कसा काय झाला? अ हा नि:संगच रहायला हवा. हम् ह्या नावाचा बिंदू का घेतला ह्याचं उत्तर 'अहम्' अक्षरे जुळवता यावीत ह्याशिवाय दुसरे सापडत नाही. बिंदूंना एकाक्षरी नावे देण्याचा प्रघात आहे. त्यामूळे सो पुढे आलेले अवग्रहचिन्ह देखिल प्रघाताच्या विपरित आहे. >> हा सगळा विचार केल्यावर शेवटी उमगते की प्रघाताविरुद्ध विचार केल्याशिवाय आणि प्रवाहाविरुद्ध विचार केल्याशिवाय अध्यात्मप्रगती अवघड असावी. असा विचार करून मग मी पुढे अ आणि सोsहम् (न) च्या मधोमध ध्या(न) हा बिंदू घेतला (इथे न = १,२,३,४, .....). ध्या-न करू जाता मन हरपले आणि मग अ ते ध्या ही त्रिज्या मानून काढलेले वर्तुळ (न नुसार मोठे-मोठे होत जाणारे) अ पाशीच असलेल्या त्म ह्या बिंदूतून गेले. न जसा जसा वाढवत नेला तसा अध्यात्मोच्छिष्टम् जगत्सर्वम् हा प्रत्यय आला.

बाउंसर !
डोक hang झालं राव... अर्थ लावता लावता.
(अध्यात्म माणसाला या भौतिक जगाच्या किचकट व गोंधळात टाकणाऱ्या गोष्टींपासून दूर सहज व सोप्या मार्गाकडे नेते.)
जरा "इस्कटून" सांगा कि .

Me kharach asa sagala kadhun pahila aani mag kavita umagat geli, khupach vegali aani chhan

मग
रोमारोमात भिनत असताना
अचानक लक्षात आलं-

"अज्ञ" रेषेवरच्या
"अहम्" या रेषाखंडाची लांबी
हळूहळू
शून्यवत् होतेय.>>>

हे आवडलं.. हे 'शून्यवत् होणं' जपून सांभाळा.. _/\_