दिगंत : भाग १४

Submitted by सांज on 13 April, 2021 - 07:03

मावळत्या सूर्याकडे पाहत एका मोठ्या दगडावर तिघे बसले होते. एक स्वप्नाने पछाडलेली, एक स्वत:च्या एकटेपणाचा अर्थ शोधणारी, आणि त्यादोघींच्या मध्ये येणार्‍या क्षणाला हसत सामोरा जाणारा तो. रियाच्या स्वप्नांनी भरलेल्या, जराशा गोंधळलेल्या डोळ्यात स्वत:साठी जागा शोधणारा. ध्यानीमनी नसताना या वळणावर येऊन ठेपलेले तिघे. काही प्रवास माणसाला स्वत:शी कनेक्ट व्हायला मदत करतात. तसं काहीतरी. संहिताला आता तिची सम सापडायला लागली होती. अनुराग ती रियाच्या डोळ्यांत शोधत होता. आणि रिया? तिच्या मनात पराकोटीचं द्वंद्व चालू होतं. तिनेच तयार केलेल्या प्रश्नांशी ती स्वत:च झगडत होती. शेजारी बसलेला अनुराग आणि त्याचं असणं तिला हवहवसं वाटायला लागलं होतं. पण ते मान्य करणं जड जात होतं. अगदी स्वत:पाशी सुद्धा. काही कुंपणं आपणच आपल्या भोवती बांधून घेतो त्यापैकी काहीतरी.

काही वेळाने ती शांतता भंगत रियाच्या फोनची रिंग वाजायला लागली. नंबर अनोळखी होता. तिने फोन रीसीव केला.

“हॅलो..” थोडासा ओळखीचा वाटणारा पुरुषी आवाज.

“हॅलो, कोण बोलतय?” रिया.

“हाय रिया, मी अनिकेत.. संहिताचा मित्र..”

रिया गोंधळली, तिने संहिता कडे पाहिलं. ती सूर्यास्त निरखत दुसर्‍या टोकाला बसली होती.

“ओह हाय.. बोल नं..”

“मला संहिताशी बोलायचं होतं, तिचा फोन लागत नाहीये म्हणून तुला लावला.”

रियाची ट्यूब पेटली. संहिताचा फोन मागच्या 3-4 दिवसांपासून बंद होता.

“ओह ओके.. मी देते तिला फोन. एक मिनिट हा..”

रिया उठून संहिता पाशी आली आणि खुणेनेच अनिकेतचा कॉल असल्याचा सांगितलं. संहिता गोंधळली. तिने तसाच फोन कानाला लावला.

रिया अनुराग जवळ येऊन बसली. अनुरागने काय झालं म्हणून विचारलं. रियाने खांदे उडवले.

“हॅलो..” संहिता.

“अगं कुठेयस तू?? फोन बंद का आहे आणि? कालपासून ट्राय करतोय मी. फ्लॅटला पण कुलूप आहे. तिथेही जाऊन आलो. ठिके ना सगळं?”

अनिकेतने एकदम प्रश्नांचा भडिमार केला. संहिता अजून गोंधळली.

“मी ठीक आहे. तू का फोन लावत होतास पण?”

“आधी आहेस कुठे ते सांग.” अनिकेत.

“हो सांगते पण झालंय काय..”

“काय झालय? तुझ्या दोन बॉस सकट स्टाफ पैकी बर्‍याच जणांचे कॉल्स येतायत मला दोन दिवसांपासून. काही न सांगता तू तीन दिवसांपासून गायब आहेस असं कळलं. त्यांनी कॉनटॅक्ट करण्याचे खूप प्रयत्न केले पण झाला नाही. आपल्याविषयी माहीत होतं सगळ्यांना. सो मला काही महितीय का म्हणून विचारत होते सगळे. आणि मग हे सगळं ऐकून..”

“काय.. हे सगळं ऐकून काय?” संहिता.

“..मलाही काळजी वाटायला लागली तुझी. फोन बंद. घरी जाऊन आलो. ते पण बंद. शेजार्‍यांना काही माहीत नाही. शेवटी जुन्या सिम मधून रियाचा नंबर शोधून काढला.”

त्याचं बोलणं ऐकून संहिताला आतून खूप छान वाटायला लागलं. ती काय मिस करत होती ते लगेच तिला जाणवलं.

“काळजी वाटते तुला अजून..” लटक्या उपरोधाने ती म्हणाली.

“काळजी? छे. अजिबात नाही. तुझे ऑफिस वाले पैसे देतायत तुला शोधण्याचे. म्हणून शोधतोय.” थोडा आणखी चिडून अनिकेत म्हणाला.

“हाहा.. मला एवढा भाव मिळतोय? सिरियसली?” ती मोठयाने हसली.

“कुठे आहेस आणि काय झालय सांगशील आता?” अनिकेत.

“हम्पी. हम्पी मध्ये आहे.”

“हम्पी? तिथे काय करतेयस?”

“पळून आलोय मी आणि रिया..”

“पळून?”

“हाहा हो... इट्स अ लॉन्ग स्टोरी..”

“ओह.. काळजी करण्यासारखं नाहीये ना काही?”

“नाही.”

“आणि ऑफिसचं काय? चिडलेयत सगळे. जॉब सोडायचा विचार आहे?”

“हो.. resignation बरोबर घेऊनचं जाणार आहे त्या वर्माची भेट घ्यायला.”

“हम्म.. तू अशक्य आहेस. अजिबात बदलली नाहीयेस.”

“अशक्य मी आहेच. पण बहुतेक बदलायला लागलेय आता.”

“?”

“कळेल तुला आल्यावर..” मावळणार्‍या केशरी सूर्याकडे पाहून संहिता म्हणाली, “भेटशील ना?”

अनिकेत जरासा शांत झाला. आणि मग म्हणाला,

“ये लवकर”

संहिताने फोन ठेवला. तिच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा आनंद होता.

ती फोन घेऊन रियापाशी आली. संहिताचा चेहरा पाहून रियाला अंदाज आला. अनुराग मात्र गोंधळला होता. पण तो गप्प राहिला.

“ऑल ओके?” रियाने विचारलं.

“येस.. मोर दॅन ओके.” ती छान हसत उत्तरली. रिया मग समजून शांत राहिली.

“आपण पळून आलो ना सो ऑफिस मधले लोक चौकशी करत होते..” संहिता पुढे म्हणाली.

“तुम्ही पळून आलाय?” अनुराग आश्चर्य वाटून म्हणाला.

यावर रिया आणि संहिता दोघी एकमेकींकडे बघून हसल्या. आणि घडला प्रकार त्याला समजाऊन सांगता सांगता तिघांचा परतीचा प्रवास सुरू झाला.

आता गाडी अनुराग चालवत होता. रिया त्याच्या बाजूला आणि संहिता धावणारा रस्ता पाहत मागे बसली होती.

त्या दोघींचं तडकाफडकी निघून येणं, प्रवास, त्याआधीचा घटनाक्रम सारं रियाकडून ऐकताना अनुराग अजून अजून तिच्याकडे ओढला जात होता. नंतर नंतर तर तिचं बोलणं त्याला फारसं ऐकुच येईना. इतका तो तिच्या किती सांगू आणि किती बोलू म्हणणार्‍या डोळ्यांमध्ये गुंतून गेला.

काहीवेळाने ती जराशी शांत झाल्यावर तो म्हणाला,

“अनेगुडीला नको, हम्पीलाच मुक्काम करू आपण. उद्या दुपारची फ्लाइट आहे माझी हुबळीहून.”

“तू जातोयस?”

नाराजीच्या सुरात रिया पटकन बोलून गेली. आणि मग ते लक्षात आल्यावर एकदम शांत झाली.

अनुराग हलकेच हसला आणि म्हणाला,

“हो. वीकएंड संपला ना. जावं लागेल. मला नाही सोडायचाय माझा जॉब.”

“ओह हम्म..” हसण्याचा प्रयत्न करत रिया म्हणाली.

त्यानंतर तिघे शांतच राहिले. हम्पी येईपर्यंत.

अनुरागच्या हॉटेल समोर त्याने गाडी थांबवली. रिया आणि तो खाली उतरले. रिया उगाच रेंगाळली.. तिच्याकडे पाहत अनुरागच म्हणाला,

“सो, इट्स ए बाय देन?”

रिया ची आतल्या आत प्रचंड घालमेल सुरू झाली.

पण काही न सुचून ती त्याची नजर टाळून, “येस..” असं काहीतरी म्हणाली.

अनुराग जरासा घुटमळला. पण मग काही न म्हणता तो वळला आणि आत निघून गेला. हातातून काहीतरी सुटत असल्यासारखं रियाला वाटायला लागलं. पण काही न बोलता ती सरळ ड्रायविंग सीट वर जाऊन बसली आणि तिने गाडी स्टार्ट केली.

संहिता तिच्याकडे पाहत होती. न राहवून ती म्हणाली,

“ही इज अ नाइस गाय रिया..”

पण ते ऐकून न ऐकल्यासारखं करत रिया गाडी चालवत राहिली. नेहमीपेक्षा जास्त वेगाने.

दोघी हॉटेल वर परतल्या. भूक तशी नव्हतीच फारशी. फ्रेश होऊन संहिताने डायरी उघडली. आणि रिया छताकडे पाहत बेडवर आडवी झाली. बराचवेळ या कुशीवरून त्या कुशीवर करत राहिली. पण तिला झोप येईना. आणि डोक्यातले विचारही सरेनात. इतक्यात तिचा फोन वाजला. तिने वळून पाहिलं. ‘text message from Anurag’ स्क्रीन वर नोटिफिकेशन पॉप अप होत होतं.

तिने क्षणार्धात फोन unlock केला आणि मेसेज उघडला.

“6 AM sharp at kodandrama temple ghat, HAMPI”

ती क्षणभरासाठी प्रचंड रोमांचित झाली. मग गालातल्या गालात हसली. आणि मग सकाळ होण्याची वाट पाहत कुशीवर वळली.

क्रमश:

सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह वाह...
शेवटच्या भागातच अभिप्राय द्यायचा असं ठरवलं होतं..पण आता रहावत नाही.
मस्त लिहिताय..काल रात्री एकदम चार भाग आले तेव्हा खुप मस्त वाटलं...
प्रवासवर्णन + कथा असा थोडाफार फॉर्मॅट मस्त फ्रेश वाटतोय वाचायला....
हंपी बघावसं वाटु लागलय मला...
पुढे काय होतय टाका लवकर..

खूप छान! तुझ्या blog वर हे सगळे वाचले...
इथे पुन्हा वाचले, मस्त!
Movie मधलं हम्पी आवडलं होतंच आणि तू वर्णन केलेलं पण आवडलं...