कबुलीजबाब

Submitted by अनन्त्_यात्री on 7 April, 2021 - 09:54

रोज तो जुळवून अपुली
एक कविता ठेवतो
वृत्त-मात्रा-अर्थ-लय-
-छंदात निशिदिनी रंगतो

जे न दिसते रविस तेही
मिटून डोळे पाहतो
काव्य अन् शास्त्रामधे तो
क्षण नि प्रतिक्षण डुंबतो

कल्पनांचे भव्य इमले
सुबकसे तो बांधतो
(मी तयांची द्वारपाली
आपखुशीने निभवितो)

विविध प्रश्नांचा तुम्हाला
अटळ छळ जो जाचतो
मात त्याला देऊनी तो
मिति-दिशा ओलांडतो

शब्द धन वाटून अविरत
थकून कधि तो थांबतो
(मी ही त्या दुर्मिळ क्षणाची
वाट गुपचूप पाहतो)

आजवर कोणा न कथिले
तेच आता सांगतो
कल्पना उचलून त्याच्या
मीच कविता प्रसवितो

Group content visibility: 
Use group defaults