या अशा कुंठीत वेळी

Submitted by अनन्त्_यात्री on 3 April, 2021 - 06:42

एकही कविता आताशा
काळजाला भिडत नाही
शब्द मोहक विभ्रमांनी
भ्रमित आता करीत नाही

कोरडा असतो किनारा
लाट फुटते मत्त तरिही
जखम होते खोलवर पण
रक्त आता येत नाही

प्रार्थनांचे मंत्र निष्प्रभ,
बीजअक्षर श्रांतलेले
भंगलेल्या देवतांना
आळवूनी भ्रष्टलेले

मार्गदर्शी ध्रुव अन्
सप्तर्षी आता लोपलेले
दीपस्तंभांचे दिवेही
भासती मंदावलेले

या अशा कुंठीत वेळी
दाटुनी येते मनी
विफलता, जी रोज उरते
रोमरोमा व्यापुनी

एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी
शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी

Group content visibility: 
Use group defaults