अदा बेगम - भाग ५

Submitted by बिपिनसांगळे on 30 March, 2021 - 22:54

अदा बेगम - भाग ५
-------------------------
पुढल्या एका छोट्या वस्तीच्या अलीकडे , गावाबाहेर एक मारुतीचं देऊळ होतं. देवळाच्या पटांगणात गोसाव्यांचा एक जथा पथाऱ्या टाकून पडला होता. तोच जथा !.... ज्या मध्ये अदा होती.
ती नुसतीच पडलेली होती . तिला झोप येत नव्हती . तिला हिरोजी आठवत होता ... रात्रीच्या गडद निळ्या आकाशात पाहताना तिला वाटत होतं - चांदण्या खूप असल्या तरी चंद्र एकच असतो .
त्या शांततेत तो टापांचा आवाज घुमत होता. सगळेच जागे झाले. बाबुलजी पुढे झाला . त्याने घोडा धरला. घोड्यावर कोणी स्वार पडलेला होता . दोघा गोसाव्यांनी त्याला खाली घेतलं. हिरोजीला. सगळेच उठले ,गोळा झाले.
आणि - अदाचं काळीज लककन हललं.
समोर हिरोजी होता. तिचा हिरोजी ...पण ?...तो - या अवस्थेत ? … त्याचं काही बरंवाईट ? ...
‘ या अल्लाह ‘, तिने खुदाला दुवा मागितली .
‘क्या अजब इत्तेफाक ! ‘ ती मनाशी नवल करत राहिली.
हिरोजी शुद्धीवर आला. एकाने त्याला पाणी पाजलं. दुसऱ्याने त्याची मरहमपट्टी केली.
तिची चलबिचल बाबूलजीच्या आणि गुरूच्या लक्षात आली.
हिरोजी पुन्हा पुन्हा ग्लानीत जात होता , मध्येच काहीबाही बडबडत होता .
अदा त्याच्या उशापाशी बसली. रात्रभर! तो झोपेत कण्हत होता. ती त्याला थोपटत होती. त्याच्या मुंडासं सोडलेल्या दाट काळ्याभोर केसांमधून हात फिरवत होती.
पहाट झाली. पक्ष्यांची किलबिल सुरु झाली. गारवा कमी झाला . प्रसन्न वाटू लागलं . हिरोजी भानावर आला. त्याला काल रात्रीच्या लढाईची याद आली. तो धडपडून जागा झाला व उठून बसला. नुकताच डोळा लागलेली अदाही उठली .
“ हिरोजी कैसे हो ? “ती त्याच्या डोळ्यांमध्ये रोखून पहात म्हणाली.
“ ठीक हाय ! मला काय होतंया ? “तो बेफिकीरपणे बोलला. तो मर्दगडी आता चांगला तरतरीत झाला होता. ते तिच्याही लक्षात आलं होतं.
तिने त्याचं नाव घेतलं, याचं त्याला आश्चर्य वाटलं होतं .
“ पहचाना ? “तिने अपेक्षेने विचारलं . त्याचा चेहरा न्याहाळत .
“ नहीं, म्हंजी तू कोण ? “
“ हिरोजी, मी अदा ! सुरत याद आहे ? “
आता हिरोजीच्या दिमागातली शमादानं पटापटा उजळली.
“ अदाबेगम कोठेवाली ? “
“ हां तीच मी.”
“मंग तुजी ही अवस्था ? “
“ हां, माझी ही अवस्था. आणि ती तूच केलीस हिरोजी. “
“ माफ कर, अदा. मी त्या येळी माझ्या राजाची चाकरी करत होतो. “
“ असं ? आणि आता ? “
“ आता बी तेच करतोया . “
“ तू - तू माझी दौलतबी लुटली अन माझं दिलबी ……”
“ काय बोलती तू ? काय काळयेळ ? “ तिच्या मोडकं-तोडकं मराठी बोलण्याचं मनाशी नवल करत तो म्हणाला.
आणि पुढे ती खट्याळपणे बोलली,” नुसता मुलुखगिरी करीत हिंडतो. . . अन लगीन कधी करणार रे तू ? “
“ मी ? आण लगीन ? माझ्या फर्जपुढे मला दुसरं कायबी नाय ,कळलं ?” मग तो पुढे म्हणाला ,” माझ्याशी कोण करणार लगीन ? . . .”
अदा त्याच्या डोळ्यात पाहत बोलली - “ मी !... करशील ? “
“ तू ?... “
“ का ? विचारात पडलास ? मी यवन आहे म्हणून ? कोठेवाली आहे म्हणून ?”
त्याने गोंधळून नुसतीच मान हलवली. नकारार्थी. तिचं बोलणं त्याच्या डोस्क्यापर्यंत घुसतच नव्हतं.
“माझं पिरेम हाय तुज्यावर ! " अदा म्हणाली .
तो आश्चर्यचकित होऊन खुळ्या नजरेने तिच्याकडे पहातच राहिला.
“ हिरोजी तू एकच तर गावलास या आलम दुनियेत, ज्याच्यावर मी जान छिडकते. आता तू मला जवळ कर ,नाहीतर झिडकार. कुछ भी कर. आगे किस्मत क्या ? मालूम नहीं. पण मेले तरी तुझ्या यादमें जीव सोडीन. ही अदाची जबान आहे.”
त्याने तिचे दोन्ही हात धरले .जवळ घेतलं. तिच्या डोळ्यात पाहिलं.
तिच्या स्वरातला ठामपणा , तिच्या डोळ्यातलं सच्चं प्रेम त्याला जाणवलं. त्याने तिला आणखी जवळ घेतलं. तिचा चेहरा आरक्त झाला. खाली झुकला.
“ अदा ...” तो भिजलेल्या स्वरात म्हणाला, “ अगं कुटल्या परिस्तितीत भेटलो आपण ? पैल्या येळी भलतंच काई घडलं अन आताची ही भेट अशी . . . मी असा तुज्या तावडीत सापडलो - तू तर माजी जान घ्यायची सोडून माज्यावर जान छिडकते ? असं कसं ?”…
“तुला नाय कळणार , प्यार काय असतं ते ? तू पडला एक सिपाही ! खूप शिकले मी थोड्या दिवसात . जथ्यामध्ये राहून माझे खयालच बदलून गेले . प्यारका मजहब नही होता, लेकिन लोग इसे समजते नही… तू एक सच्चा आदमी आहेस आणि मी अदाच आहे पण एक नवी अदा! “
मग तो पुढे तिला काही सांगत राहिला. ती मुग्धपणे ऐकत राहिली.

*******

माणकोजी त्याची फौज घेऊन लांबवर रानात लपला होता. हिरोजीच्या शोधासाठी , त्याच्या स्वारांचे त्याने चार भाग पाडले होते .तो मोजके स्वार घेऊन दबकत, लपत हिरोजीचा शोध घेत होता.
शेवटी तो हिरोजीपाशी पोचला. त्यांची भेट झाली. माणकोजीच्या डोळ्यात पाणी होतं.अदाने त्यालाही ओळखलं. तिला पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं आणि तिने ओळखलं याचंही .
“ हिरोजी , कालची मोहीम फत्ते झाली नाय. राजांना काय तोंड दाखवायचं ? “ माणकोजी म्हणाला.
हिरोजी उसळला, “ व्हय. असं वाटतं उठावं, घुसावं त्या फौजेमध्ये. मेलो तरी बेहत्तर. पण कामगिरी फत्ते झालीच पाहिजे.”
त्यावर अदाने त्याच्या तोंडावर हात ठेवला.
“हिरोजी जख्मी है आणि तुम्ही हे असं बोलता ?” तिने माणकोजीला खडसावलं.
माणकोजी आश्चर्याने एकदा तिच्याकडे आणि एकदा हिरोजीकडे पाहतच राहिला.
“ माणकोजी, “ अदा म्हणाली , “. जान जोखीम में पड जायेगी.”
“पण माणकोजी म्हणतो ते खरं हाय . आरं , इथं जीवाला घाबरतुया कोण ? “,हिरोजी म्हणाला.
अदा त्या निडर योद्धयाकडे पाहतच राहिली.
मग म्हणाली , " एक तरकीब आहे. “
त्यावर त्या तिघांची एक मसलत झाली.
*******

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचतोय.
कथेचे भाग सलगपणे येताहेत त्यामुळे वाचनानंद द्विगुणीत होतो आहे.

वाचतेय
छान सुरुये कथा Happy
रोचक आहे
तो काळ आणि घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या