अदा बेगम - भाग ३

Submitted by बिपिनसांगळे on 30 March, 2021 - 12:28

अदा बेगम - भाग ३
---------------------------
प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी अदा आणि बाबुलजी वाड्यावर गेले .
वाडा नव्हताच तो .नुसता एक दगड - मातीचा ढिगारा उरला होता. तो भग्न झाला होता ,जळाला होता .
अदा त्याच्याकडे डोळ्यात पाणी आणून बघत होती .डोळ्यात साठवून घेत होती. ती त्याच वाड्यात लहानाची मोठी झाली होती .तिथेच तिने यौवनात पदार्पण केलं होतं .
ते दोघे त्यांच्या खास दालनात पोचले. त्याची शान लयाला गेलेली. एकदम तिला- जणू घुंगराची छमछम ऐकू आली .तिला नूरआपा आठवली.
तिने एकदम चेहरा वळवला .तिला हुंदका आवरला नाही .बाबुलजीचीही अवस्था काही वेगळी नव्हती .
निघताना दोघांनी सुस्थितीत मिळालेलं काही मोजकं सामान घेतलं.
एका आडव्या झालेल्या जळक्या खांबाखाली, तिला तिची कट्यार मिळाली ते पाहून तिला आनंद झाला .
“बेटा ,ये कटार ?” बाबुलजीने विचारलं.
“हां ! कटार ! हम साधुवोंके साथ जा रहे हैं . हम साधू नहीं ! “
तो बिचारा आश्चर्याने तिच्याकडे पहात राहिला .
दोघे वाड्यातून बाहेर पडले.

*******

ते निघाले तेव्हा भगव्या कफनीतल्या बाबुलजीला पाहून अदाला हसू आलं; तर तिला पाहून बाबुलजीला !
कफनी चढवताना बाबुलजीला वाटलं - आयुष्याच्या शेवटी याच मार्गावर चालायचं असतं . देवाने आपल्याला बरोबर त्या मुकामवर आणून पोचवलंय. आपलं आयुष्य तर आता चार दिनकी चांदनी आहे ; पण अदा तर आताशी उगवती चांदणी आहे!...
त्यांचे गावोगावी पायी मार्गक्रमण सुरु झालं. कधी इथे तर कधी तिथे , कधी एखाद्या देवळात, कधी सरायमध्ये तर कधी उघड्यावर. कधी एखाद्या टुमदार गावाच्या कुशीत.
सारं आयुष्य विलासात गेलेलं. पैशात. अदा आणि बाबुलजीसाठी हे आयुष्य वेगळंच होतं. खडतर. कधीतरी उपवासही घडत . त्यात हवा बदलू लागलेली . दिवसाचं तापमान हळूहळू वाढू लागलेलं .
साजशृंगार नसलेली अदा वेगळीच दिसू लागली होती. त्यात नाजूक अदाला अशा श्रमांची सवय नव्हती. पण त्यातही तिचं सौन्दर्य झाकलं जात नव्हतं. सुकलेल्या फुलासारखा तिचा चेहरा झाला होता .पण तरी विरक्तीच्या त्या वस्त्रांमध्ये तिचं सौंदर्य सात्विक वाटत होतं.
अदा त्यांच्या सोबत होती फक्त.
ती काही साध्वी बनलेली नव्हती. कधीतरी तिचे पाय थिरकण्यासाठी बेचैन होत. कधीतरी गळ्याच्या पिंजऱ्यात अडकलेले स्वर बाहेर निघण्याची धडपड करीत.
पण ती काहीच करत नसे. फक्त ठराविक वेळी नमाज तेवढी अदा करत असे.
पण एक झालं होतं . जथ्यामध्ये सगळेच वयाने मोठे. एक गोविंदजीच काय तो तिच्या वयाचा होता . गोरापान ,धारदार नाकाचा . लहान वयातच तो साधू झाला होता. आणि - तो शिवाजीच्या मुलखातला होता. अदा त्याच्याकडून त्याची भाषा शिकू लागली .
एकदा तर मोगली सैन्याची एक तुकडी त्यांना आडवी आली . गोसाव्यांच्या जथ्यामध्ये बाई कशी ? त्यांना शंका आली . बाबुलजीने सांगितलं , “ ही माझी मुलगी आहे . आम्ही तीर्थयात्रेला चाललोय . “ त्यातल्या एक-दोघांचा डोळा अदावर गेला. पण त्यांचा सरदार अरीफखान भला माणूस होता. त्याने त्याच्या माणसांना अडवलं . संन्याशांना कशाला त्रास द्यायचा? असा सवाल त्याने केला.
नाहीतर त्यादिवशी अदावर अतिप्रसंग ओढवला असता. अदाला एकेक वेगळेच नमुने भेटत होते. तिला वाटलं जगात वाईट माणसं असतातच. बेसूर गाणाऱ्यांसारखी. पण चांगली माणसंही असतात. सुरेल स्वरांसारखी.
त्यांचा प्रवास साधारणपणे समुद्रकाठच्या प्रदेशातुन चालला होता . टप्प्या टप्प्याने मुक्काम होता . अदा निसर्गाची बदलती रूपं पाहत होती. मजल दरमजल करीत ते महाराष्ट्रात दाखल झाले. अलिबागच्या आसपास .फाल्गुन मासाचे दिवस होते.
त्या संध्याकाळी त्यांचा मुक्काम एका गावात पडला. रात्री गावकरी जमले. भजनाला.
गोविंदजी मृदंगावर बसला होता.
एक - दोन भजनं झाली आणि ? एकाएकी अदा गाऊ लागली.

मैं तेरे गुण गाऊं हरी
मैं तेरे गुण गाऊं
जो मैं गुण गाऊं
तो मैं सुख पाऊं
जो मैं गुण ना गाऊं
तो मैं दुःख पाऊं
तिचा आवाज स्वर्गीय होता. तयारीचा होता. त्यामध्ये विलक्षण करुणा होती. गावकरी भजनाबरोबर डोलू लागले. गोसावी तिच्याकडे पाहू लागले. गुरु आश्चर्याने पाहू लागले . तिचा आवाज ऐकून ,गोसाव्यांना वाटलेल्या आश्चर्याने बाबुलजीला हसूच फुटलं .
संगीताची जाण असलेल्या गोविंदजीचे कान तृप्त झाले. तो तिच्या स्वरांचा आणि तिचाही विचार करत राहिला . तिच्या स्वरांनी जणू तो बांधला गेला . त्याला क्षणभर तिची तारुण्यसुलभ ओढ वाटली आणि मग त्याला स्वतःचा तिरस्कार वाटला .
तर अदाच्या मनात तिचेच स्वर आल्हाददायक रुंजी घालून तिच्या मनाला शांतवत होते .
*******

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान लिहीत आहेत बिपिनजी. सगळे भाग येईपर्यंत वाचावे कि नाही या विचारात होते .
छान चालली आहे कथा. या कथेची पार्श्वभूमी कशी काय सुचली हे वाचायला आवडेल.

सामी
ऐतिहासिक कथा लिहायची होती.
पण इतिहास कुठला ? तर आपल्याला जवळचा अन आवडीचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांचा .
मग त्यातल्या एका घटनेवर लिहायचं ठरवलं
पण जर सरळ एखाद्या घटनेवर लिहिलं - अर्थात - आपल्या भाषेत , तरी जमलं असत . पण असं वाटलं कि त्यातलीच एखादी घटना घेऊन त्यावर काल्पनिक लिहावं . मग सुरत स्वारी निवडल . या स्वारीने अशी एखादी व्यक्ती असेल कि जी उध्वस्त झाली असेल असं विचार करता - मला अदा सापडली . मग अर्थात , पुढचं लिहिणं होतंच , तरी ते काम सोपं नक्कीच नव्हतं कारण ज्ञात इतिहास लिहीण सोपं पण काल्पनिक लिहिताना स्वातंत्र्य असलं तरी धागे जुळवणी कर्मकठीण होती.
असो

आपण एवढा इंटरेस्ट दाखवला , हे छान वाटलं
खूपच आभार
कळावे

उत्तम लेखनशैली, परंतु 1895 साली प्रकाशित झालेल्या 'लोलन बैरागीण' या दत्तात्रय गोविंद सडेकर यांच्या पुस्तकाचा प्रभाव जाणवतो. तिथे पानिपत युद्धाची पार्श्वभूमी आणि इथे सुरतेची लूट. तिथे नायक महादजी शिंदे आणि इथे हिरोजी. नायिका बैरागीण आणि बाकी घटनाक्रम कथा खुलवण्यासाठी उत्तम होता आणि त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.

अदब ,

खूपच आभार
विशेषतः
इतक्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी .
माहिती नवीन होती .