कळा ज्या लागल्या जीवा..... राजकवि भा. रा. तांबे..... एक रसग्रहण

Submitted by रेव्यु on 29 March, 2021 - 09:36

कळा ज्या लागल्या जीवा
अस्वस्थ करून टाकणारी, तरीही प्रगल्भ काव्याचे मूर्तीमंत रूप अशी ही भा. रा .तांब्यांची कविता
एक रसग्रहण
रवी उपाध्ये... 29-3-21
कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?
वेदनांची पर्रिसीमा, मी व्यक्त होऊ शकत नाही अन मला ठाऊकही आहे की अन्य कोणी समदु:खी देखील नाही. मग अंतरीच्या या व्यथा सांगू तरी का अन कशा?
उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,
कोणी सांत्वन केले तरी कशा जातील माझ्या व्यथा? केवळ तोंडदेखल्या भावना व्यक्त करून काय होणार? तसे पाहू गेले तर सहानुभूतींचा अथांग सागर दिसतो आहे पण त्या समुद्रातील पाण्यासारख्याच, माझ्या जीवाला शांत करणारे कोणीच नाही! काय अप्रतिम आहे ही ओळ. पाणीच पाणी चहूकडे असूनही पिण्याला थेंब नाही..
खूप सुंदर.
जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.
जन पळ भर म्हणतील हाय हाय.... ही देखील भा. रा. तांब्यांचीच व्यथा, अन कदाचित तत्पूर्वीची ही हताशा.... लोक केवळ एक उपचार म्हणून चार शब्द बोलतील अन बंधुत्व व्यक्त करतील, नुसत्याच वायफळ भावनांचा पूर आलेला असेल पण ते शेवटी नक्राश्रूच असतील. खरोखर स्वानुभव वाटतो... यथार्थच
नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.
विदग्ध स्थितीत मी वाहून जात आहे, पण नावाला देखील मला पैलतिरी नेणारा सेतू दिसत नाहीये. सेतूची उपमा किती सार्थ वाटते, व्यथा आणि वेदना सतावतात आणि चहूकडे वणवा पेटला आहे.... मन:स्थितीचे, विषण्णतेचे, हताश अन असहाय्यतेचे हे वर्णन नाही, स्वानुभव- आपबीतीच वाटते
नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी.
हे कडवे या कवितेचा शीर्षबिंदु आहे.... अनेक संवेदनशील कवींनी तो एकाकीपणा अन दु:ख व्यक्त केले आहे, जीवाभावाचे मैतर पुढे निघून जातात, राहता केवळ स्मृती अन आपण कुढत, त्यांची साद येते, मग ते कैफी आझमींचे “बिछडे सभी बारी बारी असो”. आता इथे, या धरेवर माझे काही राहिले नाही, पैलतीर खुणावतोय. माझे जाणे अवघड केले आहे या नको असलेल्या पाशांनी, ती मी बांधून घेतलेले पाश नाहीत,
कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट काळिजाचे हे तुटाया लागती धागे.
जीवाला लागलेली ही हुरहुर, वेदना, पैलतीराची ओढ कशी मी सहन करू, मला हवी आहे मुक्ती, हृदयात काहूर माजलंय, सर्व बंधनांचे धागे तुटू लागलेत
पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !
माझी हताशा, निराशा, व्यर्थतेची भावना कोणी समजून घेत नाहीत. मला इथले वास्तव्य नकोसे झाले आहे. अशास थितीत मी दिग्मूढ झालो आहे. यात माझा उपहास होतोय, माझ्यावर व्यंगात्मक बाण सोडले जाताहेत... काय करू रे देवा? कोण करेल सुटका या यातनांतून
राजकवि भास्कर रामचंद्र तांबे
लेखनकाल -३० जानेवारी १९२२, अजमेर
जीवन नीरस झालेल्यांचे हे विदारक मनोगत आहे अन भा. रा. तांब्याशिवाय हे आणखी कोण इतक्या समर्थपणे व्यक्त करू शकले असते. पण दु:खद वस्तुस्थिती ही आहे की ही त्यांच्या उत्तरायुष्यातील जीवनकालाची वस्तुस्थिती आहे. नटसम्राटाची हीच वेदना होती ना?
अन हो, आपण सुध्दा आत झाकून पाहिले तर “ बिछडे सभी बारी बारी” किंवा “नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानी” ची अनुभूती तर आपल्या सर्वांनाही कधी न कधी झाली आहे अन यातच कवीचे श्रेय आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर रसग्रहण.
मधुघट चे जसे एकापेक्षा अधिक अर्थ आहेत त्याप्रमाणे..
माझ्या डोळ्यांपुढे दुसरे काही आले.

कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?

कवीच्या प्रसुतिकळा आहेत. काव्य प्रसवण्याच्या कळा आहेत या. मधुघटच्या वेळी कवीला एक वर्ष काव्य सुचले नव्हते. पण कवीवर्यांनी वर्षभर वाट पाहिली. आणि आपल्या या अवस्थेवरच कविता लिहून टाकली. मधु (एखादं गोड काव्य) लोक मला मागतात पण माझ्या घरात तर रिकामे मधुघट पडलेले आहेत. थोडक्यात मी इतका रिता आहे कि माझ्याकडे देण्यासारखं काही उरलेलं नाही आता.
पण आता कवीला काव्य सुचतेय.
त्याच्या ज्या कळा आहेत त्या फक्त ईश्वरालाच ठाऊक ! कारण हे तिथूनच येतंय.
पण मी लिहू कुणासाठी ? कुणाला काय पडलेय त्याचे ?

मधुघटच्या वेळी कवीला कधी मग नवीन कविता असे विचारणारे लोक आता विचारपूस देखील करत नसावेत. मुळातच ज्यांच्यावर / ज्यांच्यासाठी लिहावी त्यांचे वर्तन कवीला अस्वस्थ करतेय.

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,

छातीवर हात ठेवून तरी अंतरीची बोच कमी होईल का ? पाणीच पाणी आहे सगळीकडे पण प्यायला पाणी नाही. अर्थात काव्यतृष्णा भागवावी असे काव्य कुठेच नाही. पण काव्याचा समुद्र आजूबाजूला आहे. हीच व्यथा आहे.

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.

ज्यांच्यासाठी काव्य आहे त्यांच्याकडे संवेदनशीलतेचा अभाव आहे. कोरड्याच गप्पा आणि दिखाऊ बंधुभाव आहे. हमामा म्हणजे तलाव फक्त गर्जनेतच आहे, डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही. म्हणजे असे रसिक आहेत कि ज्यांच्या सहवेदना बेगडी आहेत. त्यांना हे काव्य कसे देऊ ? त्यांना या जाणिवा कशा होणार ? कवीइतकाच रसिक सुद्धा संवेदनशील हवा आहे.

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.

प्रतिभेला बहर आलेला आहे. काळ लोटला आहे. पण या प्रतिभेला बाहेर येण्यासाठी ना कुठे सेतू , ना नाव. ज्यात काव्य तरून जाईल.
आठवणींचं द्वंद्व आहे. सर्वत्र फक्त दावे आहेत. आश्वासनं आहेत. पण या प्रतिभेला न्याय द्यावा असे चित्र वर्तमानात (काळ =नदी) दिसत नाही. त्यातून एक हताशा आलेली आहे.

नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी.
हा काळ मोठा कठीण. अशी वेळ येणे म्हणजे पैलतीरी जाण्याचे वेध लागणे. आता माझे काव्य हे पलिकडे जाणारे आहे. जे जे या अवस्थेतून पलिकडे गेले, त्यांचे शहाणपणाचे शब्द आठवताहेत. कवीला काव्य सांगण्यासारखा प्रगल्भ श्रोतृवर्ग न मिळणे हा एका कवीचा मृत्यूच आहे. त्याला आता पलिकडचे वेध लागलेत. पण का कोण जाणे इथे कोणते पाश त्याला बांधून ठेवताहेत. चलबिचल होतेय. कदाचित , आशा असावी, आज ना उद्या माझे काव्य पुन्हा डोक्यावर घेतले जाईल. त्याला न्याय मिळेल...

कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट काळिजाचे हे तुटाया लागती धागे.

पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !

आधीच्या कडव्यात कवीची हतबलता, अस्वस्थता चित्रित झालेली आहे. संन्यासाची ओढ आहे. बहुधा काव्यसंन्यास घ्यावासा वाटत असावा. पण त्याच वेळी बहरलेली प्रतिभा मागे ओढतेय. कवीच्या जीवाची ही घालमेल कुणाला समजणार ? बहरलेल्या प्रतिभेतून प्रसरणारं काव्य ग्रहण करणारा श्रोता नाही, वाचक नाही तर हे सर्व कुणासाठी ?

आणि या अस्वस्थतेतून कवीची जी चलबिचल होतेय, जी तगमग होतेय त्यातून शेवटचं कडवं आलेलं आहे.
हा माझ्या अल्पबुद्धीनुसार दिसलेला अर्थ.

अल्पबुद्धी कसे रानभुली???
अप्रतिम रसग्रहण !

कवीला काव्य सांगण्यासारखा प्रगल्भ श्रोतृवर्ग न मिळणे हा एका कवीचा मृत्यूच आहे.>>>
अरसिकेषु कवित्वनिवेदनं शिरसि मा लिख , मा लिख , मा लिख .... असे सुभाषित सुद्धा आहे.

भारा तांबेना टीबी झाला होता व ते हळू हळू खंगुन गेले म्हणे

तेंव्हा कुणीतरी त्यांना पत्र लिहिले होते की आता कविता का लिहीत नाही , त्याला उत्तर म्हणून मधुघट कविता लिहिली , अशी दंतकथा ऐकून आहे

खरे खोटे माहित नाही,

गुगलवर शोधूनही काही सापडले नाही

त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या उत्तरायुष्यात कवितेची विनंती केली तेव्हा त्यांनी विमनस्कावस्थेत ती लिहिली असे वाचण्यात आले

आता गुणगुणताना लक्षात आले

लगागागा लगागागा लगागागा लगागागा

असे चलन आहे , वृत्ताचे नाव माहीत नाही

ह्याच वृत्तात सजन रे झूठ मत बोलो आहे
चालीत म्हणून बघा

मुझे तेरी मुहोब्बत का सहारा मिल गया होता

@ रेव्यु

मला अतीव प्रिय असलेली रचना आणि तितकेच सुंदर रसग्रहण. रानभुली यांचा प्रतिसादही सुंदर आहे.

वसंत प्रभूंच्या सुमधुर चालीवर लता मंगेशकरांच्या आवाजात ऐकतांना खरंच जीवाला कळा लागतात :-

https://www.youtube.com/watch?v=pzPrPSgC5R4

@ रेव्यु
सुंदर लिहिले आहे. भा.रा. तांबे यांच्या रचना प्रिय आहेत व रसग्रहणही आवडले.

तुमचे आणि रानभुली हिने लिहिलेले दोन्ही अर्थ भावले! लता दिदींच्या आवाजात ऐकताना खरोखरच हृदयात कळ उठते.
मला ही कविता ऐकताना जाणवलेली एक नवलाची गोष्ट अशी की दोन कवींना एकाच प्रकारची उपमा सुचावी असे घडले आहे. The rime of the ancient mariner या सॅम्युअल टेलर कोलरीजच्या प्रसिद्ध दीर्घकाव्यात खालील ओळी आहेत
Water water everywhere all the boards did shrink
Water water everywhere, not a drop to drink
आणि तांबे यांची ही ओळ
समुद्री चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही!
Great minds think alike असंच वाटतं हे साम्य पाहून!

छान रसग्रहण. तांब्याची कविता शेवटी शेवटी सूफी तत्त्वज्ञानातल्या ईश्वर अथवा परमशक्तीला प्रियकर मानून त्याच्याशी एकरूप होण्याची तळमळ ह्या संकल्पनेकडे झुकली आहे. कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी किंवा नववधू प्रिया मी बावरते ही अशा काव्याची ठळक उदाहरणे. प्रियकर भेटीची आस लागली आहे. जीवाला चैन नाही, विरहवेदनेच्या कळा सोसवत नाहीत, कधी एकदा तुला येऊन भेटते असे झाले आहे ही भावना साकारणारी आमीर खुस्रो साहेबांची जे हाले मिस्किन मकुम तगफुल ही द्विभाषिक रचना सुप्रसिद्ध आहे. शिवाय कौन प्यास बुझाये मेरी, पिया मिलन की आस, आज सजन संग मिलन बनिलवा अशा अनेक चिजा आहेत ह्या भावनेने नटलेल्या. संत ज्ञानेश्वरांच्या विराण्याही आहेत, चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, घानु वाजे घुण घुणा वगैरे.