रंगुनी रंगात सार्‍या

Submitted by शंतनू on 29 March, 2021 - 07:12

२००८ ची गोष्ट आहे. कामानिमित्त मुंबईला राहत होतो, तेव्हा एक मित्र मला म्हणाला 'परवा होळी आहे. येणार का रंगपंचमी खेळायला?' पुण्यात सदाशिव पेठेत बालपण घालवलेला मी ह्या प्रश्नावर साडेतीन ताड उडालो. माझ्यातला व्याकरण-नाझी जागा झाला. होळीला रंगपंचमी कशी काय? मुळात 'पंचमी' ही तिथी होळीपौर्णिमेनंतर ५ दिवसांनी येते त्यामुळे 'पौर्णिमेला पंचमी खेळणे' म्हणजे ख्रिसमसच्या रात्री फटाके उडवून हॅप्पी न्यु यिअर करणे किंवा संक्रांतीला ध्वजवंदन करून गणतंत्रदिन (चिरायू होवो वगैरे) साजरा करणे अशी क्षणचित्रं माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली. तो एक वेळ 'रंग खेळायला येतोस का' म्हणाला असता तर मला तितका धक्का बसला नसता, कारण एव्हाना मला 'होली'च्या दिवशी रंग खेळतात हे हिंदी चित्रपटात बघून आणि दरवर्षी नेमाने होळीच्या दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर छापून येणार्‍या ढोलवादनरत रंगलिप्त मोदयुक्त अत्युल्लसित महामहीम लालूप्रसाद यादव ह्यांचा फोटो बघूनही माहित झालं होतं. पण त्या खेळालाच हा मित्र 'पंचमी' म्हणतो ही कल्पना मला रम्य वाटली. असो. आजकाल सदाशिव पेठेतही 'होली'लाच रंगपंचमी खेळतात. कारण त्याच दिवशी सगळ्यांना सुट्टी असते. त्याबद्दल 'हॅप्पी होली' हे लिहिलेलं आहेच. मीही आता तितका व्याकरण-नाझी राहिलो नाही. उलट मीच लिहिताना कितीतरी चुका करायला लागलो आहे! असो. तर विषय आहे 'रंग खेळणे' ह्याबद्दल.

रंगपंचमी हा लहानपणी तसा एक आवडीचा सण. त्याला कारणही तसंच होतं. उन्हाळ्याला सुरुवात झालेली असायची. संक्रांतीनंतर तिळातिळाने की काय म्हणतात तशी कमी होणारी थंडी पुढे ढेपे-ढेपेने, ढिगा-ढिगाने कमी होऊन अचानक नाहीशी व्हायची. जवळ येऊन ठेपलेल्या वार्षिक परिक्षेचे चटके शाळेत आणि घरात बसायला लागायचे. आंबे यायला, आईस्क्रीम खायला अजून १-२ महिने अवकाश असायचा. अश्या वेळी हा थंडावा अगदी हवाहवासा वाटत असे. होळी जवळ आली की होळीला लागणार्‍या साहित्याबरोबरच रंगपंचमीसाठी लागणारा दारुगोळासुद्धा विकत घेतला जायचा. जणू काही आपण युद्धच करणार आहोत अश्या कल्पनेने बालसैनिक त्यांच्या पिचकारीरूपी बंदुका, रंगरूपी दारूगोळा आणि पाण्याचे फुगे-नामक अतिशय बेभरवशाचे बॉम्ब विकत घ्यायला अगदी उत्साहाने सरसावायचे. रंग हे सर्वात मुख्य 'मट्रियल' असल्यामुळे आपली दोस्तमंडळी कुठल्या रंगात जास्तीत जास्त विनोदी दिसतील ह्या कल्पनाविलासात क्षणभर रमून आम्ही आपापले रंग निवडायचो. पिचकारीच्या बाबतीत दुकानदाराच्या 'यंदा हा नवीन स्टॉक आलाय बाजारात, भारीतला आहे' ही थाप आणि वडिलांच्या 'काय करायचंय असलं फॅन्सी, चायनीज काहीतरी! साधी दाखवा' हे म्हणताना पाठीवर पडलेली थाप, ह्या दोन्ही थापांचा सुवर्णमध्य गाठला जाऊन एक मध्यम आकाराची पिचकारीसारखी दिसणारी पिचकारी घेतली जात असे. मागच्या कुठल्यातरी वर्षी अशोकस्तंभावरच्या चार की तीन सिंहांसारखी दिसणारी पिचकारी घेऊन झालेला पश्चात्ताप अजूनही आठवत असल्यामुळे निदान पाणी पटकन भरता येईल आणि पटकन उडवता येईल हा मुद्दा आता कळीचा झालेला असायचा.

त्या मागच्या क्ष वर्षी मी, का कुणास ठाऊक, ती चार सिंहांची पिचकारी घेतली होती. तशी ती काही अशोकस्तंभासारखी दिसत नव्हती. पण तिला ४ बाजूला असलेल्या ४ सिंहाच्या तोंडांमुळे मला अशोकस्तंभाचीच आठवण झाली. ती इतर पिचकार्‍यांसारखी पिचकारी नव्हती. त्याला पाणी आत ओढायला आणि फेकायला पंप नव्हता. बाजूच्या एका सिंहाच्या पायाशी एक बटण होतं, जे दाबल्यावर त्या सिंहाच्या तोंडातून पाणी उडणार. पाणी संपलं की मधल्या सिंहाच्या डोक्यावरचं बूच काढून तो आख्खा सिंहावळा पाण्यात तिरका बुडवून त्यात पाणी भरून घ्यायचं. हे खेळणं पिचकारी आहे हे कुणाला कळणारच नाही आणि आपण सगळ्यांना रंगवू, हा गनिमी कावा करण्याचा माझा आनंद त्यातून पहिल्यांदा पाणी उडवेपर्यंतच टिकला. जेमतेम तीन इंच, आणि जरा जोर लावून 'पाय' इंचापर्यंत त्यातून पाण्याची बारीक धार उडाली. आता एकेकाला भिजवायचं म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचणं भाग होतं. बॉर्डर सिनेमात शत्रूच्या गोळ्या खात आणि 'माँ शक्ती' म्हणत हातात अँटी-टँक माईन घेऊन जाणारा सुनील शेट्टी डोळ्यासमोर आणा. तो निदान बॉर्डरच्या पलिकडे पोहोचतो तरी! माझ्या हातातल्या त्या इवल्याश्या सिंहोचकारीतलं पाणीच संपल्यामुळे मी बादलीत ती बुडवून पाणी भरायला घेतलं. त्यात 'थेंबे थेंबे तळे साचे' ह्या न्यायाने सावकाश पाणी भरलं जात होतं. तो पर्यंत मला सर्वांनी सर्व रंग-पाणी-फुग्यांनिशी धू धू धुतला होता. पुढे ते सिंह बाजूला पार्क करून सरळ आंघोळीच्या तांब्याने उरलेली रंगपंचमी खेळल्याचं आठवतंय. त्यामुळे फॅन्सी पिचकार्‍यांचा धसकाच घेतला होता. अशीच कधीतरी एक दुधारी पिचकारी माझ्या हातात आल्याचं आठवतंय. म्हणजे ती समोरच्यावर पाण्याचा मारा बरोबर करायची, पण त्यात पाणी भरताना आपण पिस्टन जोरात ओढला, तर त्या पिस्टनच्या मागच्या भोकातून पाणी आपल्याच अंगावर उडायचं - अशी दोन्हीकडून पाण्याची धार काढू शकणारी दुधारी पिचकारी होती ती.

पाण्याच्या फुग्यात योग्य प्रमाणात पाणी भरणे ही पासष्टावी आणि तो फुगा योग्य वेळेला योग्य व्यक्तिवर फुटेल अश्या रितीने भिरकावणे ही सहासष्टावी कला मानण्यात यावी. पाणी भरलेल्या फुग्याला ते पाणी कमी न होऊ देता आणि फुगा हातातून निसटू न देता गाठ मारणे - ही देखिल एक कलाच आहे. ह्या सर्व कलांमध्ये ढ असल्यामुळे एक तर माझे काही फुगे पाणी भरतानाच तो ताण सहन न होऊन फुटायचे, किंवा कमी पाणी भरल्यास एखाद्यावर आदळून देखिल फुटायचेच नाहीत. त्यात अर्धं पाणी आणि अर्धी हवा हा शोध कुणीतरी लावला होता. तो फुटण्यासाठी जरा जोरात मारावा लागतो. त्यामुळे फुटला, तर जखमी सैनिक बोंबलत असे आणि नाही फुटला तर तोच फुगा बुमरँग होऊन आपल्यावर येण्याचा धोका असे. काही गनिम एखाद्या मुलाच्या शर्टात पाठीमागून हा फुगा हळूच सरकवून देत व मग एक जोरदार शाबासकीची थाप देऊन त्या फुग्याचे उद्घाटन होत असे. बाकी काही असलं तरी 'आपल्यावर फुगा फुटणे' हा एक इगो इश्यु असतो. एखाद्याने नकळत पाणी उडवलं किंवा नकळत रंग लावला, तर कधी इगो दुखावला जात नाही; पण आपल्यावर कुणी फुगा फोडला, तर बुद्धिबळात चेकमेट केल्यासारखी जाणीव होते.

सगळे रंग एकत्र केले तर पांढरा रंग तयार होतो - असा कुणीतरी अतिशय चुकीचा शोध लावला आहे. तो शास्त्रज्ञ नक्कीच भारतीय नसणार, किंवा असल्यास कधी रंग खेळला नसावा. तुम्ही कितीही पिवळे, हिरवे वगैरे रंग लावा, शेवटी त्या सगळ्यांच्या मिश्रणातून एक लालसर गुलाबी रंग तयार होतो अशी माझी एक ठाम समजूत आहे. दिवसभर रंग खेळून परतणारी पोरे पहा, सगळी लालसर दिसतात. पुढे आठवडाभर त्यांचे कान आणि केसांची मुळं तो लालसर रंग चिवटपणे मिरवत असतात. कपडे तर त्या गडद लालसर गुलाबी रंगात इतके खराब होतात की ते धुवायचा विचारही करू नये. चित्रपटात होली खेळणारे लोक पांढरे कपडे घालून घराबाहेर पडतात, तेव्हा त्यांना त्यांची आई ओरडत कशी नाही? आम्हाला पांढरे कपडेच काय, कुठलाही फिकट रंग मिलीमीटर भर जरी कपड्यावर असेल तर असे कपडे त्या दिवशी घालायला मज्जाव होता. सगळ्यात विटलेले, आखूड होणारे, गोळे निघालेले 'वासांसि जीर्णानि' त्या दिवशी बाहेर काढले जायचे आणि ते खेळून झाल्यावर टाकण्यास योग्य झाल्यावरच आतला आत्मा शांत होत असे. सुवर्ण आणि चांदी आम्हा मृत्तिकेसमान असल्याचे बिंबवले गेल्यामुळे त्या सहजासहजी न निघणार्‍या अघोरी रंगांपासूनही आम्ही अलिप्त राहू ह्याची खबरदारी पालक घेत असत. तरीही लपून ह्या चंदेरी रंगांची तस्करी करून ते फासण्याची मस्करी करणार्‍यांचे चेहरे त्यांच्या आईने सँड पेपरने घासल्याचे किस्से ऐकिवात आहेत.

रंगांचा खेळ हा तसं म्हटलं तर सामूहिक, पण त्यातही बरंच वैविध्य आहे. वरती लिहिलेले किस्से हे ज्यांपुढे अगदीच सोज्वळ वाटतील असे अनेक प्रकार अनेक ठिकाणी पाहिले आहेत. कॉलेजला असताना हॉस्टेलवर मुलांनी काढलेली धिंड, फाडलेले कपडे, फोडलेली अंडी - अश्या गोष्टी पाहून कधी कराव्याश्या वाटल्या नाहीत. पण अश्यांचेही बरेच किस्से असणार ह्याची कल्पना आहे. उत्तरेत तर रंग खेळणे हा खूप मोठा सण आहे. त्या सणाशी निगडित अनेक खाद्यपदार्थही असतात. तुमचेही ह्यापेक्षा वेगळे किस्से तर नक्कीच असतील आणि ह्या निमित्ताने ते ही वाचायला आवडतील. खाली प्रतिक्रियांमध्ये जरूर लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलं आहे!
मी लहानपणी कधीच रंग खेळले नाहीये. अकरावीला असताना आत्याच्या गावचं ज्युनियर कॉलेज चांगलं असल्याने तिकडे रहायला गेले. तेव्हा तिथे लगेचच छान मैत्रिणी झाल्या. त्यांचा खरं म्हणजे आधीचा (हायस्कूलचा) ग्रुप होता. पण तरी त्यांनी आम्हां नवीन मुलींनाही खूप सहज सामावून घेतलं. तेव्हा रंगपंचमीच्या दिवशी त्या सगळ्या धाड टाकल्यासारख्या आत्याच्या घरी येऊन धडकल्या होत्या आणि बागेतल्या विहिरीतून पाणीबिणी काढून आम्ही यथासांग रंग खेळलो! नंतर आत्याने सगळ्यांसाठी चहा केला. मग तिथून दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी. ही रंगपंचमी माझ्या चांगलीच आठवणीत राहिली आहे.

खूप मस्त लिहीलंय. खूप हसू आलं त्या सिंह पिचकारीबद्दल वाचून Lol
पण आपल्यावर कुणी फुगा फोडला, तर बुद्धिबळात चेकमेट केल्यासारखी जाणीव होते. >>> अगदी अगदी. थँकफुली हा प्रसंग एकदाच घडला आहे माझ्या बाबतीत.

हा लेख वाचून एकदम फसकन हसू आलं. फॅन्सी वाटणार्‍या पिचकार्‍या हमखास दगा देतात हे मात्र खरं. सिंह पिचकारी ची जागा आता त्या पाठीवर अ‍ॅन्ग्री बर्ड किंवा पोकेमॉन चं पिम्प बॅकपॅक आणि त्याला नळी काढून पुढे साधी पिचकारी याने घेतली असावी. मुळात ही पिचकारी महाग असल्याने घेतानाच 'आता पुढची ३ वर्षं हीच वापरायची' या बोलीने घेतलेली असते,प्रत्यक्ष शो च्या दिवशी पहिल्या १० मिनीटात नळी तुटून किंवा संयम संपून ते पाठीवरचं पिंप थेट समोरच्याच्या अंगावर रिकामे करणे,पिंपाचे झाकण हरवून टाकणे असे प्रकार चालू होतात.

करोनापूर्वहोळीआठवणीस्वगतः
होळीला स्वतःला 'रंगतयार' करणे(तेल, क्लिन्सिंग मिल्क लावून) हासुद्धा अत्यंत निरुपयोगी प्रकार आहे. या खेळात मुरलेल्या बायका मिठी मारुन सरळ पाठीवरुन आत, केसात अश्या अतिशय दुर्बोध जागी हिरवा वगैरे रंग टाकतात.तो एका अंघोळीत धुवायला मी साबण, बेसन पीठ, जुने झालेले ओट, ज्वारी पीठ, कडू बाजरी पीठ असं सगळं आळीपाळीने लावल्याचं आठवतंय. तरी बाहेर आल्यावर हिरवा एलियनच. ३ आंघोळी (पुढचे ३ दिवस) केल्यावर जरा बरा चेहरा दिसायचा. बरं ऑरगॅनिक रंग आणून सगळ्यांना दिले तर 'या फिक्या रंगांनी मजा नाही' म्हणून कोणीतरी तो हर्बल गुलाल लिहीलेला हिरवा आणून ओततंच. (हर्बल गुलाल असं लिहीलेली भडक्क हिरव्या आणि लाल रंगाची पाकिटं, त्यांना हर्बल समजणे म्हणजे ओसामा बिन लादेन च्या पुढे परमपूज्य किंवा संत लिहीण्यासारखेच.)

वावे, मोहिनी, rmd, mi_anu - धन्यवाद.

rmd - लिहा की त्या प्रसंगाबद्दल.

mi_anu, 'रंगतयार करणे' - हे जबरी आहे! 'हिरव्या रंगाचा हर्बल गुलाल' हे पहिल्यांदाच ऐकलं. म्हणजे तो हर्बलही नाही व हिरवा असल्यामुळे गुलालही म्हणवत नाही.

आमच्या वाड्यात पण अत्यंत रावडी पद्धतीने खेळायचो आम्ही रंग पंचमी
पिचकारी फक्त फुगे भरायला
त्या भयाण हिरव्या रंगाला काची कलर म्हणतात बहुतेक. रंग वगैरे खेळून झाल्यावर घरी जाताना हळूच कोणाच्या तरी डोक्यात टाकायचा, अजिबात पाणी नाही. घरी गेल्यावर डोक्यावरून अंघोळ करताना भडक गुलाबी रंगाचं पाणी Wink

डोक्यात अंडी फोडणे, रंगाने दात घासणे (हे खरंय :D),
एखाद्याला टार्गेट केलं जायचं. म्हणजे त्याच्या भोवती गोल करून त्याला आधी नखशिखांत भिजवायचे आणि मग कलर लावायचा. हे टार्गेट आखो अखोमे ठरायच आणि कधी कधी डबल गेम पण व्हायचा, ऐन वेळेस दुसऱ्यावर पडी घ्यायची Lol

माझ्या डोक्यात अंड फोडल्यामुळे आजी ने मला घरात घेतले नव्हते. वाड्यातल्या नळावर डोकं धुवून मग च एन्ट्री मिळाली

लिहिले ले सर्व अगदी तंतोतंत , सगळ्यांंनी लहानपणी अनुभवले - उपभोगले आहे..
किती बारकावे टिपले आहेत...
फार सुंदर!

अशा चेकमेट प्रसंगाबद्दल कशाला लिहायचे खरंतर Happy इतका काही मोठा प्रसंगही नाही तो. पण नेमका रंगपंचमीचा मुहूर्त धरून एका मैत्रीणीकडे गेलो होतो आम्ही सगळ्या. रंग वगैरे उद्योग करायचे नाहीत असं ठरलं होतं. आणि शिस्तीत रंग नाहीच खेळलो. पण दारातून आत आल्या आल्या स्वागताची झप्पी देताना तिने पाठीत पाण्याचा फुगा फोडला होता (आणि माझा धपाटा खाल्ला होता Proud ) पुढचा सगळा वेळ वाळण्यात गेला होता माझा.

अशीच एका उंचाड्या मित्राने गुपचूप डोक्यात कांची कलर टाकल्याची दर्दनाक आठवण आहे Proud घरी येईपर्यंत कळलंच नाही. आणि घरी आल्यावर पाहिलं तर रामसेच्या पिक्चरमधल्यासारखे केसांमधून लाल ओघळ आले होते Lol

आम्ही शिस्तीत डेक्कन वर बिल्डिंग मध्ये रंग पंचमी. फुगे फोडणे वगैरे मग शनिवार पेठेत जाउन वाड्यातली रंगपंचमी. हैद्राबादेस पाण्याचे
दुर्भिक्ष्य मग कोरडी होळी. नवरा व त्याचा गृप अतरंगी गोष्टी करायचे. म्हणजे एका डब्बा पण खूपच कॅरेक्टर असलेल्या अँबॅसेडर मधून १०-१२ मित्र मिळून पुण्यास जायचे व लगेच परत यायचे. गाडीतच रमी खेळायचे. जोक्स गप्पा इतर धमाल.

मुंबईत पहिले आलो तेव्हा २९ मजल्यावर घर होते तिथून लोक जमीनीवर गच्ची त होळी खेळाय्चे ते बघायला मजा येते. यावेळी आराम . घर गार करून फोन वर सर्फिन्ग व गेम्स आणि रात्री होळी पार्टी नव्या जनरेशनची.

शांतनू .. मस्त लिहिले आहे.. मजा आ गया...
मुंबईत रंगपंचमी शब्द देखील लोकांना माहीत नसतो... होली म्हणजे रंग...
आम्ही होळीच्या खड्ड्यात पाणी भरून चिखल करून त्यात ऑईलपेंट टाकायचो...
मग एकेकाला धरून त्यात फेकण्यात येत असे...