चंद्रभान

Submitted by ज्येष्ठागौरी on 21 March, 2021 - 14:00

'चंद्रभान'
खूप दिवसांनी क्लबच्या मैदानावर चालायला गेलो, मैदानाची एक चंद्रकोर पूर्ण केली, मान वर केली आणि तोंडातून एक आह निघाली. झाडांच्यावरुन तो दिसला, शाकंभरी पौर्णिमेचा चंद्र. लालबुंद, गरगरीत वाटोळा! स्वर्गीय अनुभूती देणारं रुप. ते मनात साठवत तिथेच काही क्षण उभे राह्यलो.आजूबाजूला शांतता,हलकेच उलगडणारी पहाट ह्याचा कानात आणि डोळ्यात आणि साहजिकच मनात साठवणारा आनंद घेत.बाजूला नवरा होता तोही असाच स्तब्ध होता.काही क्षणांनी दोघंही भानावर आलो आणि परत चालायला सुरुवात केली.एकही शब्द न उच्चारता. मनात एक वेगळी भावना घोळवत चालत राहिलो.खूप दिवस झाले ,एका अगदी जवळच्या, हृदयाच्या जवळच्या सुहृदाच्या अचानक जाण्यानं दोघे पूर्ण हलून गेलो होतो.वेदना आणि संवेदना ह्या दोघांच्या परे गेलेला आमचा मित्र मनात एवढी मोठी पोकळी सोडून गेलाय की काही चांगलं वाटेनासं झालंय.पण आज त्या दुःखाला, त्या पोकळीला कुठेतरी एक अर्थ शोधवासा वाटलं.मग रोज सकाळी अगदी आपसूक व्हायला लागलंय, चालायला लागल्यावर वर बघणं.तो कुठे आहे ते बघणं.त्या पोकळीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न!
तशी चंद्राची आणि आपली दोस्ती खरंतर जुनीच की.पण आजकाल त्याच्याकडे निरखून बघितलं जात नाही.वाड्याच्या अंगणातून दिसत राहायचा तो.नारळाच्या झावळ्यांच्या मागे,चिंचेच्या झाडामागे! खगोलशास्त्रीय दृष्ट्या तो ग्रह,स्वयंप्रकाशित नसणारा असला तरी आपल्याला तो सूर्याइतकाच प्रिय आहे.पृथ्वी फिरते ह्यापेक्षा तो उगवतो आणि मावळतो ह्यावरच आपला अजूनही विश्वास आहे आणि समुद्राला भरती ओहोटी आणण्यापर्यंत त्याची मजल आहे हे मनात इतकं पक्कं आहे.अजूनही लहान मुलांना झोपताना त्याला लिंबोणीच्या झाडामागे जाऊन झोपावं लागतं!प्रेमात त्याला ताऱ्यांसकट पृथ्वीवर यावं लागतं! चंद्रप्रेमी कुटुंबात जन्म झाल्यानं हे प्रेम वेगवेगळ्या रुपात कायम समोर आलं!पहाटे होणारं चंद्रग्रहण, गजर लावून उठवून मुद्दाम दाखवणारे बापू आणि कोजागिरीला चंद्राबरोबर सर्व मुलांना ओवळणारी आई.आमच्या तिघा भावंडांचे जन्म अमावस्या पौर्णिमेचे, म्हणजे आईच्या भाषेत सरती अमावस्या किंवा नुकतीच लागलेली पौर्णिमेचे असल्यामुळे त्यात काही चांगलं वाईट समजायचा प्रश्न आलाच नाही कधी.चंद्राला खळं पडलं तर त्यात काही वाईट नाही तर उलट त्याचं शास्त्रीय कारण आणि सौन्दर्य दाखवणारे वडिल. बापूंना हा चंद्र आमच्यापर्यंत पोहोचवायची कोण हौस! प्रतिपदेची कोर आणि बीजेची कोर ह्यातला सूक्ष्म,अगदी दोराभर फरक असतो पण तो निश्चित असतो आणि बघावा लागतो निरखून हे त्यांनी दाखवलं.त्यामुळे ह्या चंद्रावर भलतीच माया आहे आपलीही, हे कळलं.कधीतरी मग एक शब्द सापडला Selenophille म्हणून, one who loves moon.स्वतःवर खूश व्हायला झालं. अनेक लेबलं लोकं चिकटवत असतात पण आपलं लेबल आपण ठरवायचं, तसं हे एक मस्त सापडलं.आणि आपल्या आजूबाजूलाही अशी कित्येक मंडळी आहेत हे जाणवायला लागलं.
चंद्राबद्दल इतक्या गोष्टी ऐकल्यात की तरीही नवनवीन कळत राहतं आणि नवीन काहीही ऐकायला अजूनही मजा वाटते.चतुर्थीचा चंद्र बघायचा नसतो असं कोणी सांगितलेलं असतं तर त्या दिवशी अगदी सकाळीच दिसून डोळे मिचकावणारा तो आपल्याला दिसतो.कोणी सांगतं बायकांनी मुद्दाम चंद्रप्रकाशात चालावं.(moon walk घ्यावा मायकेल जॅक्सनचा नव्हे तर खराखुरा चांदण्यातला !)अर्थातच हे सांगणारी बाई selenophille असणार नक्कीच.अमावास्येला मुलांचे जन्म शुभ असतात हे सांगून अमवास्येभोवतालची भीतीची चादर दूर करणारी पणजी,lunatic म्हणजे मानसिक रुग्ण चंद्राच्या पौर्णिमे अमावस्येबरोबर होणारे मानसिक बदल हे कथा कादंबऱ्यातून भेटणार,जुनी
चंद्रकळा प्रेमानं बाळगणारी आई ह्या सगळ्या परिपाकातून तो डोकावत राहतो आपल्या घरात आणि मनात. कोर किंवा पूर्ण बिंब ह्या आकारात लागणारं कुंकू, चंद्रकांत नावाच्या पुष्कराजच्या उपरत्नावर चंद्रकिरण पडले तर त्याला पाझर फुटतो असं कुठंसं वाचलेलं. कोणाचं सहस्रचंद्रदर्शन, कोणाचं चांदण्यातलं डोहाळजेवण!चतुर्थीचा चंद्रोदय आणि ईद का चांद!कथा कवितांमधून भरभरुन भेटणारा आपला अगदी जवळचा मित्र!
ह्या चतुर्थीच्या संदर्भात मी एक कथा वाचली होती की एक खेड्यातली बाई निर्जला चतुर्थीचं व्रत करत असते,तिचा एकुलता एक मुलगा जीवघेण्या आजारातून सुखरुप बरा झालेला असतो त्यासाठी नवस फेडायचे म्हणून. 'चंद्रोदय' झालेला दिसल्याशिवाय' जेवायचं नाही असं तिचं व्रत असतं आणि त्यामुळे घड्याळात नाही पण आभाळात चंद्र पाहण्यासाठी तिचा आठ वर्षाचा मुलगा माळरानावर जात असतो की समोर उगवलेला चंद्र चटकन दिसावा आणि आईला उपास सोडता यावा. ती गोष्ट वाचून कितीतरी क्षण डोळ्यातलं पाणी मी थांबवू शकले नाही.असे मनाचे कित्येक बंध बांधले गेलेत चंद्राशी आपले.वेगवेगळ्या कलांचे!कोजागरीचा चंद्र हा अगदी केशरी आटीव दुधासारखा दुधाळ, गुरूपौर्णिमेचा ढगांच्या आडचा,दत्तजयंतीचा वेगळा सात्विक तेज असणारा.
ग्रहणाच्या रात्री म्लान झालेला चंद्र आणि होळीच्या वेळचा काहीसा खट्याळ!प्रत्येक पूर्ण चंद्र वेगळा,अगदी वेगळा!आपली सामान्य माणसाची ही तऱ्हा तर संवेदनशील आणि प्रतिभावान लेखक आणि कवी यांना तर किती भारावून जायला होत असेल.सिनेमांमध्ये आणि कवितांमध्ये ह्याची मुशाफिरी तर आहेच!गुलजारांच्या कित्येक कवितांमध्ये तो डोकावला आहे,नव्हे तर अगदी ठाण मांडून बसलाय."नौ बरस लंबी अमावस"ह्या कल्पनेनं आपल्याला पुनःपुन्हा पाहताना रडू फुटलंय.किंवा एक सौ सोला चांद की रातें एक तुम्हारे कंधे का तील किंवा चांद चुराके लाया हूँ ,किंवा मैंने चांद को रोक के रखा है एक रात के लिए। म्हणणारे गुलजारजी त्यामुळेच फार फार जवळचे वाटतात.
मी लहान असताना आई एक गोड गोष्ट सांगायची, चंद्राची आणि त्याच्या आईची.आईनं शिवलेला अंगरखा त्याला रोज रोज घट्ट व्हायचा मग चंद्राची आई त्याची माया थोडी उसवायची असं पंधरा दिवस व्हायचं आणि पंधरा दिवसांनी तोच रोज थोडा थोडा सैल व्हायचा मग आतून एक टीप घालायची पंधरा दिवस!अशी काहीशी.अजूनही मी आकाशात त्याला बघितलं की आज कितपत सैल किंवा घट्ट असेल अंगरखा हा विचार चेहऱ्यावर हसू आणतो..
गुलजारजींनीच त्याला बहुरुपिया म्हणलाय,रोज वेगळं रुप घेणारा,रोज वेगळा दिसणारा, रोज वेगळी भावस्थिती असणारा.म्हणजे अगदी आपल्यासारखाच.रोज बदलणारा.कलाकलांनी बदलणारा!म्हणजे आईच्या गोष्टीचा गर्भितार्थ पण वेगळाच होता की काय?
पुढं लेकीनं शाळेत तयार केलेल्या दुर्बिणीतून चंद्र बघायची नामी संधी आली पण बघायच्या आधी सूचना आली ती पौर्णिमेच्या आसपास न बघायची! अगदी पौर्णिमा नाही पण जवळपासच्या तिथीला पहिला तर खरोखरच त्याचं सौन्दर्य डोळे दिपवणारं होतं,खरंतर न झेपणारं!अशा कित्येक पौर्णिमा आणि प्रतिपदा,द्वितीया आणि अष्टमीचा चंद्र बघितलाय.
खूप पौर्णिमा स्मरताना मात्र एका पौर्णिमेची आठवण नकोशी वाटते, फार भयानक येऊन गेली, वैशाखातली,मोठया भावाचा प्रवास अचानक धक्कादायकरीत्या संपला आणि मग दूर मद्रासहून त्याला पुण्याला आणण्याचा प्रवास सुरु झाला..माझे वृध्द आणि विकलांग आईवडिल आणि सगळे आप्त,सुहृद त्याला शेवटचं डोळ्यात साठवायची वाट बघातानाची उलगडत जाणारी ती वैशाख पौर्णिमेची रात्र,माझ्याबरोबर तो चंद्र एरवी लखलखीत असणारा पण तेंव्हा म्लान दिसत होता की माझ्या डोळ्यातल्या तळ्यात त्याचं धूसर प्रतिबिंब होतं माहिती नाही!तो माझ्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता असं वाटलं.
नंतर खूप कालांतराने लक्षात आलं की खरंतर तो आहे तसाच आहे पण माझ्याच मनाचं प्रतिबिंब त्याच्यावर पडत राहतं.
तीन वर्षांपूर्वी मुंबईला गेटवेजवळच्या रेडिओ क्लबमध्ये रात्री जेवत बसलो होतो, योगानी कोजागरी होती, पाण्यावर डुलणाऱ्या बोटी, चमकणारे पाणी आणि तो साक्षात परमेश्वरी आशीर्वाद एखाद्या मऊ उबदार पांघरुणासारखा सर्वदूर पसरलेला.कितीतरी वेळ अगदी न बोलता ते चांदणं अंगावर बाळगत राहिले, घरच्या जुन्या दागिन्यांसारखं!आणखी एक ती एक पूर्ण बिंबाची रात्र कच्छच्या रणातून बघितलेली super moon ची त्रिपुरी पौर्णिमेची! पांढरं शुभ्र मिठाचं वाळवंट आणि वरती शुभ्र चांदण्याची बरसात,किती घेशील दो कराने,वाटावं असं वातावरण!ते चांदणं ओढणीत बांधून घरी न्यावं असं लाखवेळा मनात आलं.कुठल्यातरी कधी न बघितलेल्या अचानक लाभलेल्या,अनुभवता येणाऱ्या सुखद स्पर्शाची सय!
रुमी ह्या कवीनं काय सुंदर ओळी लिहून ठेवल्यात.look at the moon in the sky not in the lake.किती खरंय!सौन्दर्याची उधळण नाही ना पकडून ठेवता येत,ते फक्त मनात एक कोपरा पकडून तिथे मुक्काम ठोकतं.मैत्रीसारखं!हवं तेंव्हा पेटारा उघडून आत डोकावता मात्र येतं! Everyone sees the unseen, in proportion to the clarity of their heart..असंही रुमी म्हणतो.किती आशयघन शब्द!चंद्राच्या बाबतीत किती खरं आहे.चंद्रही तुकड्यातुकड्यात दिसतो.तो आहे तसाच असतो पण आपल्याला मात्र तो भरताना आणि रिता होतानाही भेटत राहतो..आणि आपणही चंद्राप्रमाणे कित्येक काळ रिता घालवतो,अगदी पोकळी अनुभवतही पुढं जात राहतो कधी अगदी टाकोटाक भरभरुन मिळतं काहीतरी.आणि कधी सुटून रितं करुन जातं पण तरीही आपल्या हातून सुटलेलं काहीतरी,असं वेगळ्या मार्गानं, वेगळ्या स्वरूपात आपल्याला कडकडून भेटतं की काय!आमचा हा मित्र शारीर कधीच भेटणार नाही हे त्याचं नसण्याचं आभाळभर दुःख वागवतानाच,तो त्या अंधारात आपल्याबरोबरच चालत असतो ही भावना मनात घर करते आहे. मोठी माणसं ह्यालाच विवेक म्हणत असावीत का!त्यानं आम्हाला दिलेल्या निखालस स्नेह,माया,सख्य ह्या सगळ्या शब्दातीत भावनांना खोल जपून ठेवलं आहेच की. जास्त सजगपणे आता चंद्राकडे बघितलं जातंय, जास्त स्नेहानं, जास्त आत्मीयतेनं! अचानक गवसलेलं हे चंद्रभान फार हृद्य आहे.मनातली आणि आयुष्यातली ही पोकळी वागवतानाच, तो अमावस्या आणि पौर्णिमेचा खेळ न्याहाळून बघताना खूप वेगवेगळ्या भावना मनात येताहेत. शब्द,कृती,विचार,भावना आणि अर्थातच आठवणी ह्यामधून हा आमचा मित्र भेटत राहणारे.आता वेदनांच्या पल्याडच्या जगात असणाऱ्या त्याच्याबद्दलचा स्नेह तर चिरंतन असणारे.कुठल्याही नात्यांपलीकडंच असणारं हे नातं कायम राहणारे, मनात अर्थात! अगदी चंद्रासारखं..वर बघितलं की दिसणारं आणि ज्या एक दिवशी दिसत नाही त्यादिवशी ते अस्तित्व आहे पण माझ्या नजरेला आत्ता दिसत नाहीये अशी समजूत घालणारं. मित्रा, जिथे असशील तिथून बघत रहा रेआमच्याकडे, चंद्रप्रकाशासारखा बरसत रहा, मंद कौमुदीसारखा सुखावह अनुभूती देत रहा..जिथे असशील तिथून तुला आम्ही दिसू ना रे! आम्हीही तुझ्या आठवणीच्या खोल डोहात आहोत सदैव!तुझ्या मैत्रीच्या न फेडता येणाऱ्या सुखद ऋणात!हे सगळं मनाच्या तळात लपवून उठायला हवं, तुझ्याशिवायच्या जगात वावरायला हवं! आता दीर्घ श्वास घेते आहे!
गुलजारांच्याच ओळी आठवताहेत परत!
एक सबब मरने का था
एक तलब जीने की थी
चांद पुखराज का
रात पश्मीने की
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा अप्रतिम लिखाण..:) लेखात रूमीचा उल्लेख आलाय त्यावरून आठवलं की 'रुमी है ' ह्या नावे कार्यक्रम होतो पुण्यात. 31 जानेवारीला सुदर्शनला प्रयोग होता.

जियो
फार फार सुंदर अलवार अन मनाच्या गाभ्यातून लिहितेस तू
थांकु सो मच
एक एक आठवण अशी काही समृद्ध... आनंदाचीही दु:खाचीही ... खरं तर अनुभूतीची! फार प्रामाणिकपणे पहातेस सगळ्याकडे। अन ते शब्दात ओवता येतं तुला, जियो

अवलताई +१
खूप सुंदर लिहिलं आहे तुम्ही. अनुभवांची, जाणिवांची समृद्धी ओळीओळींमधून जाणवते तुमच्या.
चंद्र माझ्याही आवडीचा. Happy मी नुकताच दोन चंद्र नावाचा लेख लिहिलाय. वाचून पहा कसा वाटतो.
https://www.maayboli.com/node/78215

बऱ्याच दिवसांनी लिहीलंत तुम्ही! मला आत्ता काही दिवसांपूर्वी आठवण आली होती. नेहमीप्रमाणे सहज आणि अर्थगर्भ लिखाण. धन्यवाद.

लंपन, सोनाली, ऋचा,मंजूताई,अवल,वावे, सांज,अनया मनापासून धन्यवाद! लंपन ह्यावेळी नक्की नाही जमलं ,पुन्हा झाला तर नक्की प्रयत्न करेन.वावे नक्की वाचेन!

नेहमी प्रमाणेच सुंदर! तुमची लेखनशैली इतकी सहज आहे की इतक्या विविध विषयांना स्पर्श होतो पण एकदम सहज transition होते.